अकल्पित..!४

Kahi vel tasach shantet gela.he eagle home aaditichya tabyetichya drushtine suddha garjeche hote.

राज्य स्तरीय साहित्य करंडक
कथा मालिका 
शीर्षक - अकल्पित..!४
विषय - रहस्यकथा


आज आदिती सकाळीच उठली.तीची बॅग तिला मिळाल्याने तिला त्यातल्या त्यात हायसे वाटत होते. तिच्या कामाच्या वस्तू हाती लागल्या होत्या. ट्रेकिंग वरून वापस दुसऱ्या ट्रॅक ने यायचे असल्याने बॅग्स सोबतच होत्या.एक दोन का होईना पण ड्रेस सुद्धा बॅग मधे होते.


आज व्यवस्थित सारे उरकून तिने तिचा दुसरा ड्रेस अंगावर चढवला होता. जवळ असलेल्या सामानाचा उपयोग करून ती आज बऱ्यापैकी तयार झाली होती.   डोक्याला बँडेज असूनही आज तिच्या चेहऱ्यावर असणारी आजारी पणाची झाक जाऊन ती जरा तरतरीत वाटत होती. तिला स्वतः लाच आज बऱ्यापैकी फ्रेश वाटू लागले होते. तिच्या अवती भवती असलेल्या साऱ्यांनाच ती किती सुंदर आहे याची आज प्रचिती येत होती.  


काही वेळानी डॉक्टर राऊंड ला आले आणि पाठोपाठ च इन्स्पेक्टर विजय..! आदिती चे आजचे प्रसन्न रूप पाहून दोघेही अगदी आनंदी झाले. डॉक्टरांना तिची या सगळ्यातून बाहेर यायची धडपड भावली होती तर विजयला एवढ्या बिकट अवस्थेत असतांना सुद्धा,डोक्याला ताण देणाऱ्या घटना घडूनही ज्या प्रकारे मनाचा तोल सांभाळायचा ती जो प्रयत्न करत होती. त्यातून बाहेर  पडायची तिची धडपड त्याला मनापासून आवडली होती. सध्या घडलेल्या घटनांनी झाकोळले गेलेले तिचे साैंदर्य अशा साध्या फ्रेश होण्यानेही खुलून आले होते.

" हॅलो आदिती, गुड मॉर्निंग...!" म्हणत च विजयने सहज संवादाला सुरुवात केली. 


"काल मी पुण्याला पोलिस स्टेशन ला फोन लावला होता. त्यात मिसिंग च्या ज्या कंप्लेंट होत्या त्यात एक नाव तुझे होते आणि दुसरे नाव जय शिर्के चे होते."

तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांनी आणि त्याच्यासाठी त्याच्या घरच्यांनी  कंप्लेंट  नोंदवली होती.

हा जय शिर्के कोण? तू त्याला ओळखतेस  का आदिती?"विजय

  
" हो हाच तो जय आमच्या ट्रेकिंग ग्रुप चा कॅप्टन !पण तो पण कसा काय मिसींग झाला आहे?" अदिती च्या चेहऱ्यावरचे भाव झरकन बदलले.आदिती साठी हा एक मोठा धक्काच होता.


" आदिती तू सविस्तर सांगू शकणार का मला याबद्दल? अर्थात तुला बरं वाटत असेल तरच..!" विजय


"मी काल रात्री च विचार केला होता ,तुम्हाला उद्या याबद्दल सविस्तर माहिती द्यायचा . असा विचार केला तेव्हाच कुठे मी नीट झोपू शकले. अन् आज बघा न हे सगळं सांगायची वेळ माझ्यावर यावी हा योगायोगच!"आदिती


"भवानी स्पोर्ट्स अकॅडमी नावाची जी संस्था आहे ना तिचा मालक हा जय शिर्के....!
 मी, जय,अपूर्वा,स्नेहा,वैशाली,विशाल आदी आम्ही पदवी पर्यंत एकत्रच शिकलो. पुढे वाटा   वेगळ्या झाल्या. मी  आणि अपूर्वा कॉमर्स मधे मास्टर्स केलं. जय ने पुढे स्पोर्ट्स मधे आवड असल्याने बी पी एड, एम पी एड केलं. स्नेहा आणि वैशाली ने अकाउंटिंग चे जॉब्स करणं सुरू केलं. विशाल पण आपल्या व्यवसायात जम बसवू बघत होता पण आम्ही अधे मधे भेटत राहायचो. खेळाची आवड हा आमच्या मैत्रीतला एकमेव दुवा.


पुढे जय नी ही भवानी स्पोर्ट्स अकॅडमी काढली.हळू हळू त्याचा त्यात चांगला जम बसला. आमच्या एका छोट्या गेट टुगेदर दरम्यान त्याने आम्हाला त्याचे जुने सवंगडी म्हणून त्याच्या या अकॅडमी मधे आमंत्रित केले आणि आम्ही सगळे  त्याच्या या अकॅडमी शी जुळलो. रोज तर नाही पण  शनिवार रविवारी मात्र आम्ही सगळे संध्याकाळी वेळात वेळ काढून तिथे जायचो. जय ला मदत आणि आपली आवड जोपासणे हा दुहेरी उद्देश त्या मागे होताच. पुढे आमच्या मनाने गड किल्ल्यांचे संवर्धन आणि ट्रेकिंग करण्याची उचल खाल्ली आणि आम्ही व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन आपला ट्रेकिंग ग्रुप तयार केला. अधून मधून वेळ मिळेल तसे आम्ही ट्रेक ला जायचो. गडावरील कचरा साफ करणे आणि त्याच्या संवर्धनासाठी काय करता येईल यावर विचार विनिमय करायचो. हळूहळू समविचारी लोकं आमच्याशी जुळत गेले. 


आता आमचा चांगला ग्रुप बनला होता. आमचं काम पण जोमात सुरू झालं होतं. शिक्षण,व्यवसाय आदी सगळं सांभाळून आम्ही हे सगळं करत होतो त्यामुळे  कुणालाच घरून काही आडकाठी नव्हतीच!! पण मधातच कोविड मुळे सारे डिस्टर्ब झाले.


सगळे स्थिरस्थावर झाल्या नंतर पुन्हा नव्या उत्साहाने आम्ही ट्रेकिंग साठी सज्ज व्हायचे ठरवले.दोनेक महिन्यात ट्रेकिंग ला जायचे आम्ही नक्की केले. यादरम्यान तीन चार मुलामुलींचा एक ग्रुप आमच्या ग्रुप ला जॉईन झाला. पण काही दिवसांत च त्यांचे वागणे आम्हाला खटकू लागले होते. त्यांचा ॲटिट्यूड त्यांची आणि आमची वैचारिक तफावत आम्हाला नेहमीच डाचत राहायची.एकदा आम्ही सगळ्यांनी यावर विचारविनिमय करून जय शी याबद्दल बोलायचं असं ठरवलं. जय माझं बरंच म्हणणं ऐकायचा म्हणून हे काम मलाच सोपवण्यात आलं.

"जय हा नवा ग्रुप जो आपल्याला जॉईन झाला आहे ना, कां कोण जाणे आपले आणि त्यांचे विचार कुठेतरी जुळत नाहीत असं साऱ्यांना वाटते. त्यांचे आगावू वागणे, एखाद्याला उतरून बोलणे,त्यांचे पांचट विनोद, त्यांच्या तोंडाला येणारा स्मोकिंग चा वास सारेच आपल्या ग्रुप शी विसंगत वाटते मला. ते ग्रुप मध्ये नसलेले च उत्तम असं आम्हाला सगळ्यांना वाटू लागलेय. आपल्या ग्रुप चं वातावरण बिघडायला अजिबात वेळ लागणार नाही त्यांच्यामुळे..! वेळीच त्यांना बाजूला करायला हवे नाही तर आवरायला हवे असे आम्हाला वाटते." मी एका दमात त्याला सांगितले.

" हे बघ आदिती तू म्हणतेस ते अगदीच योग्य आहे. त्यांचे वागणे मला सुद्धा आवडत नाही ,त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मला पण खटकत आहेत. पण त्यांचा ट्रेकिंग चा अनुभव मात्र दांडगा दिसतोय. त्यांच्या या अनुभवाचा आपल्या ग्रुप ला फायदा होईल हा एकमेव उद्देश समोर ठेवून मी त्यांचे हे सगळे सहन करतोय.या आधी ते ज्या ग्रुप मध्ये होते ते मोरे सर माझे ट्रेकिंग मास्टर आहेत. माझ्यासाठी ते दैवता समान आहेत.हा दुसरा भाग.  तुम्हाला त्रास होतो हे कळते मला पण प्लीज यावेळी सपोर्ट करा. जर जास्तच त्रास झाला तर पुढे यावर आपण विचार करू." म्हणत जय नी उलटपक्षी तिचीच समजूत काढली होती.


"*असंगाशी संग प्राणाशी गाठ* म्हणतात तसे काही नाही झाले म्हणजे मिळवले !" म्हणत आदिती तिथून निघून गेली.

पुढे ठराविक दिवशी सगळे ट्रेकिंग ला गेले. यावेळचा ट्रेक दूरचा असल्याने आदल्या दिवशीच सगळे तिथे जाऊन मुक्कामी राहिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच ट्रेक ला सुरुवात करायची होती. त्यामुळे सगळ्यांजवळच्या  बॅग्स मधे जुजबी सामान होते. 

रात्री सुद्धा जय ने सगळ्या सूचना द्यायला सगळ्यांना बोलावले होते तेव्हा सुद्धा हा संपूर्ण ग्रुप गायब होता.आता मात्र जय ला त्यांना सोबत घेतल्याचा पश्चात्ताप वाटत होता. कारण त्यांच्या मुळे ग्रुप ची शिस्त सुद्धा बिघडत होती.पण सकाळी मात्र हे सगळे ट्रेकच्या वेळी वेळेवर हजर होते. ट्रेकिंग करतांना तर चैताली सोडता कुणालाच प्रॉपर ट्रेकिंग येत नाही हे सुद्धा त्याच्या लक्षात आले होते. पण हे सगळं लक्षात यायला जयला फार उशीर झाला होता.

पुढे काय झाले ते तुला  माहीतच आहे विजय ,ते मी आधीच सांगितलं आहे. पुन्हा तेच आठवायचं म्हटलं की खूप त्रास होतो माझ्या मनाला...!

जय चं मीसिंग असणं हे सुद्धा माझ्यासाठी अजून शॉकिंग आहे. आता तर माझं डोकंच सुन्न व्हायची वेळ आली आहे असं वाटायला लागलं मला. " आदिती बोलायची थांबली.

एकादमात सगळे सांगून मोकळी झाली ती. माधव ने पाण्याचा ग्लास समोर धरला तिच्या .त्यातील पाणी एका दमात संपवले तिने. माधव बद्दल पुन्हा एकदा तिच्या मनात कृतज्ञता पूर्वक प्रेम दाटून आले अन् त्याच आवेगात तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले.

काही वेळ तसाच शांततेत गेला. हे सगळे होणे आदिती च्या तब्येतीच्या दृष्टीने सुद्धा फार गरजेचे होते.

 आदिती च्या खाली पडण्यात जयचा तर काही हात नाही ना? अन् तो असा मिसिंग कसा काय झाला ? हे दोन प्रश्न आता इन्स्पेक्टर विजय ला सतावू लागले होते.
पण आदिती ची मानसिक अवस्था बघता या विषयावर आता भाष्य करणे बरोबर नाही हे त्याला कळत होते. त्यामुळे आदिती चे सांत्वन करून आणि उद्या पुन्हा येईन  असे आदितीला सांगून तो तिथून बाहेर पडला होता.

खरंच जय चा सुद्धा यात काही हात असेल का?
बघूया कथामालिकेच्या पुढच्या भागात.


टीम - भंडारा

©® मुक्ता बोरकर - आगाशे
        मुक्तमैफल

🎭 Series Post

View all