अकल्पित..!११

Barach vel gela mag Aditi jawal to basala," aaditi mala Tula kahi sangayache aahe." Vijay

राज्य स्तरीय करंडक कथा मालिका
शीर्षक -अकल्पित...!११
विषय - रहस्यकथा

"इन्स्पेक्टर साहेब ,अहो आमचा एक नातेवाईक मेल्याने आम्हाला जावे लागेल तिकडे. आदिती ताई एकट्याच घरी आहेत. वेळ सुद्धा अशी आहे की सोबतीला कुणाला बोलावू पण शकत नाही.तुम्ही थोडे काय करायचे ते बघा की." आदिती च्या वाड्यावरून सदानंद चा फोन आला  होता.


"हो बघतो मी काय ते. तुम्हाला कधी निघायचं आहे? " विजय

"संध्याकाळ पर्यंत गेलो तरी चालेल जी." सदानंद

" बरं संध्याकाळ पर्यंत पोचतो मी. " विजय.

आदिती ला सुद्धा चैताली ने संपवले आहे हीच साऱ्या ग्रुप ची धारणा होती. त्यामुळे आता त्याच गैरसमजात सगळ्यांना राहू देणे गरजेचे होते. विजय आणि अगदी एक दोन विश्वासू पोलिस  ऑफिसर आणि शिपाई सोडता सगळ्यांना चैताली ने आदितीला संपवले हेच ठाऊक होते.त्यामुळे आता आदिती कडे विजय ला स्वतः च जाणे भाग होते. तसेही तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने  त्याला चक्कर लावूनच बघावी लागणार होती. त्याने आदितीच्या आई बाबांना फोन करून तशी कल्पना दिली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथे आदितीला सोबत म्हणून तिथे पोचावे ही सुद्धा विनंती केली.
आदितीचे आई ,वडील अगदी राजी ,खुशी यासाठी तयार झाले होते. कित्येक दिवसांनी त्यांची लाडकी लेक त्यांना दिसणार होती.


इकडे विजयला चैताली ने दिलेली माहिती अन् तिच्या ग्रुप च्या मुलांनी दिलेली माहिती बऱ्याच अंशी सारखीच आढळली होती. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून समोर आलेली नावे अदनान आणि इस्माईल भाई यांची माहिती काढायची अन् त्यांच्यासाठी सापळा रचण्याची जिम्मेदारी पुणे पोलीसांकडे सोपवून तो आपले इतर कामे आणि चैताली च्या सुरक्षेची जिम्मेदारी दुसऱ्या ऑफिसर वर सोपवून तो निघाला होता.


तो कुठे चालला आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. सदू  काकांशी फोन वर तेवढा तो संपर्कात होता. कदाचित तो पोचायच्या आधीच सदुकाकांना जावे लागणार होते कारण तिथून त्यांना सुद्धा पुढची मजल गाठायची होती.


आदितीला सुद्धा त्याने काळजी करू नको ,आज रात्री तो तिच्या सोबतीला असणार आहे याची कल्पना दिली होती. तिची अवस्था बघता तो येतांनाच खायला काहीतरी घेऊन येणार होता. सोबतीला अजून कुणी हवं का? हे विचारायला सुद्धा तो विसरला नव्हता. कारण आदिती चा तो मित्र असला तरी ती त्याच्यासोबत कंफर्टेबल असेल का? हे बघणे सुद्धा त्याला आवश्यक वाटत होते.सदू काका आणि मंजुळा मावशी असते तर हा प्रश्नच नव्हता मुळी...!


संध्याकाळ व्हायच्या थोड्या आधीच विजय तिथून निघाला होता. तरी पोचायला त्याला थोडा उशीर च होणार होता. मागच्या वेळेसारखेच शेवटचा प्रवास पुन्हा सायकल ने करावा लागणार होता जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. सगळ्या प्रवासात एकच गोष्ट मात्र इन्स्पेक्टर विजय ला डाचत होती ,जय बद्दल आदिती ला कसे सांगायचे. त्यावर ती कशी रिॲक्ट  करेल? विजय जय ला शोधून काढेल हा किती मोठा विश्वास होता तिचा  विजय वर. त्याने शोध तर लावला होता त्याचा पण तो शोध मात्र फारच दुःखदायक होता. खरं तर त्यात विजय चा काहीच दोष नव्हता त्याच्याच पाठपुराव्यामुळे  तर प्रकरण मार्गी लागू लागले होते पण एका सच्च्या मनाच्या माणसाला घडलेल्या गोष्टीचे वैषम्य वाटते तशीच काहीशी अवस्था त्याची झाली होती.


आदितीबद्दल  त्याच्या मनात असलेला  प्रेमाचा ओलावा तर तिला दुःखाच्या खाईत लोटेल असे काही करायला त्याला अजूनच परावृत्त करत होता. त्यामुळेच त्याने आदितीला फोन वर हे सांगायचे टाळले होते अन् आज मात्र ती वेळ प्रत्यक्षात येणार होती.कसे सांगायचे सगळे आदितीला? कसं सहन करेल सारं ती. कोलमडून तर जाणार नाही ना...! या सगळ्या विचारांनी त्यालाच ग्रासले होते.


तो वाड्यावर पोचला तेव्हा अंधारून आलं होतं. आदिती सुद्धा अजून तो आला नव्हता म्हणून चिंतेत होती पण त्याला बघताच तिचा चेहरा ऊजळून निघाला. तिची तब्येत आता थोडी सुधारलेली दिसत होती. नैसर्गिक वातावरणाचा परिणाम की काय ती बरीच फ्रेश वाटत होती.


विजय फ्रेश झाला. नको नको म्हणत असतांनाही आदिती ने त्याच्यासाठी चहा आणलाच. तिला अजिबात त्रास होऊ नये याची तो काळजी करत होता अन् तिला त्याच्यासाठी काय करू नी काय नको असे होऊन गेले होते. थोड्या जुजबी गप्पा आटोपल्या.  बाहेरच्या मोकळ्या अंगणात  बसून दोघांनी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चैताली आणि तिचा पूर्ण ग्रुप पकडला गेल्याची खुशखबर सुद्धा त्याने तिला सांगितली. 


" विजय मला सगळे सविस्तर सांग ना..!" आदिती

एव्हाना नऊ वाजले होते ,"आदिती आपण आधी जेऊन घेऊ मग निवांत गप्पा मारू,काय म्हणतेस...!" विजय

"अरे हो, तू थकून भागून आलास ,तुला भूक सुद्धा लागली असेल मी याचा काही विचारच केला नाही हं. " म्हणत आदिती जेवणाचे पार्सल आणायला गेली.


खरं तर विजय ला स्वतः च्या भूकेपेक्षा तिचीच जास्त काळजी होती. त्याने सांगितलेल्या घटने नंतर ती जेवूच शकणार नाही याची त्याला खात्री होती.


बोलतच दोघांचीही जेवणं आटोपली. जेवणानंतर दोघांनीही शतपावली सुद्धा मोकळ्या आंगणात आटोपली. चौसोपी वाडा असल्याने बाहेरून आतले काही दिसत नसे त्यामुळे हे शक्य होते. असं मोकळेपणी फिरणं अन् समवयस्क व्यक्तीशी मारलेल्या गप्पांनी आज तिला खरं तर खूप मोकळं वाटत होतं.


बराच वेळ गेला मग आदिती जवळ तो बसला," आदिती मला तुला काही सांगायचं आहे." विजय


" काय सांगायचं असेल याला? " तिच्या मनात अचानक प्रश्नचिन्ह उभे राहिले.


तिच्या उत्तराची वाट न बघताच त्याने सांगणे सुरू केले.
चैताली तिच्या मागावर होती अन् तिने आदितीला संपवायचा प्रयत्न केला हे तिला माहित होतेच पुढे तिच्याच मागावरून जय ला शोधायचा केलेला प्रयत्न अन् त्याचं हाती आलेलं कलेवर....! सांगता सांगता तो थबकला. कपडे आणि एकंदरीत शरीर यष्टी वरून तो जय च वाटत होता पण पुढील तपास सुरू आहे हे जेव्हा त्याने सांगितले तेव्हा आदिती अगदी शॉक झाली.ती उठून उभी झाली,जय चे खांदे पकडून त्याला,"तू खरं सांगतोस ना विजय,नाही हे खरं नाही आहे.....!" म्हणत स्फुंदून स्फुंदून ती रडायलाच लागली. विजय च्या छातीवर डोकं ठेवून रडणाऱ्या आदिती ला कसं समजवावं त्याचं त्यालाच कळत नव्हतं. तिला काही वेळ तसेच रडू देणे योग्य आहे असा विचार करत तो फक्त तिच्या डोक्याला थोपटत राहिला होता.


काही वेळाने आवेग ओसरल्यावर आदितीला विजय च्या अवस्थेची जाणीव झाली अन् ओशाळत ती दूर झाली. त्याने तिला खुर्चीवर बसवले.प्यायला पाणी दिले. तिचा हात थोपटत तो म्हणाला..
" हे बघ आदिती ,तुझ्या आणि जय मधे नाजूक बंध होते याची मला पुरेशी कल्पना जय च्या बहिणीकडून,तुमच्या ग्रुप कडून आणि तपासादरम्यान आली आहे. जरी सध्या त्या नात्याला मूर्त रूप नव्हते तरी मनाने तुम्ही एकमेकांच्या प्रेमात होतात हे एव्हाना मला कळलं आहे. त्यामुळे दोन तीन दिवस होऊनही मी तुला हे सांगणं टाळत होतो. कारण एवढ्या बिकट परिस्थितीतून गेल्यावर तुझ्या मनावर अजून परिणाम होऊ नये हीच माझी इच्छा होती.तुझ्या दुःखाची मला कल्पना आहे पण सावर स्वत:ला...!"

"आदिती  तू त्यांचे टार्गेट नव्हतीच! त्यांना जय लाच संपवायचे होते पण चुकीने प्रत्येक वेळी तू मधात येत गेली अन् त्यातच तुझ्यासोबत ही घटना घडली. चैताली तर फक्त मोहरा आहे आदिती यातला एक पण यामागचे सूत्रधार मात्र वेगळे आहेत. त्यांचा शोध लावणे आता बाकी आहे. आता नुसते हातपाय गाळून किंवा शोक करून चालणार नाही. जय ने जे बलिदान दिलं आहे ना,त्याला  न्याय मिळालाच पाहिजे आदिती ,मिळालाच पाहिजे. पूस ते डोळे अन् जय सारखी खंबीर पणे या सर्वांचा सामना कर . हीच जय ल खरी श्रद्धांजली असेल.

आदिती ने जय ला तर गमावलेच होते पण तिला विजय चे सुद्धा म्हणणे पटले होते अन् मनात  या सगळ्यांशी दोन हात करत जय ला तिला न्याय मिळवून द्यायचा होता अन् त्यासाठी ती सज्ज्ज झाली होती.

विजय चैताली ने काय सांगितलं ते मला सविस्तर सांगशील का? हे सगळे आमच्या मागे कां लागले ते मला नेमके कळेल का? आजवर जे घडले ते माझ्यासाठी कल्पनेच्या पलीकडले आहे.पण मला सगळं जाणून घ्यायचं आहे.


पुढे  काय झालं  हे जाणून घेण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.


टीम - भंडारा

©® मुक्ता बोरकर  -आगाशे
मुक्तमैफल

🎭 Series Post

View all