अकल्पित..!६

"Inspector tumhala tapasat ji lagel ti madat Karu aamhi,aadhi mazya dadala shodha ho!" mhanat jui ne punha aart sad ghatali.


राज्य स्तरीय करंडक कथा मालिका
शीर्षक -अकल्पित...! ६
विषय - रहस्यकथा

इन्स्पेक्टर विजय आता जोमाने केस च्या तपासाला लागला होता. जय च्या नाहीसे होण्याचे गूढ कायम होतेच. ते शोधून काढणे सुद्धा जिकरीचे होते. 


आदिती च्या मोबाईल मधून संपूर्ण ग्रुप मधल्या सदस्यांचे नंबर घेतले गेले.  जय चा पत्ता घेऊन पुण्यातील पोलिस टीम सोबत तो आज जय च्या घरी भेट देऊन आला. 
जय च्या नाहीसे होण्याने जय च्या घरचे सुद्धा फारच चिंतित झाले होते. आदिती च्या आई बाबांसारखीच त्याच्याही आईवडिलांची अवस्था झाली होती. त्याची छोटी बहीण जुई कसे बसे आईवडिलांना सावरायचा प्रयत्न करत होती. जय आणि आदिती दोघांच्या ही अचानक गायब होण्याने ती सुद्धा  खूपच डिस्टर्ब झाली होती. हे सगळं तिच्यासाठी खूपच शॉकिंग होते.


 नेमके काय झाले हे कळायला काहीच मार्ग नव्हता. कारण पूर्ण ग्रुप च तेव्हा त्यांच्यापासून बऱ्याच दूर अंतरावर होता. फक्त चैताली च काय तेवढी तेव्हा तिथे हजर होती. तिच्या सांगण्यानुसार ती अन् जय वरती पोचले होते. आदिती ला काही तिथे चढणं जमत नव्हतं. म्हणून तिने जय ला मदत मागितली .जय तिला वर यायला मदत करतांना आदितीचा हात सुटून ती खाली पडली अन् तिला वाचवण्याचा नादात निष्कारण जय सुद्धा खाली पडला. असं चैताली चं म्हणणं होतं.सगळ्या ग्रुप ला तिने तसेच सांगितले होते. घटनेची ती एकमेव साक्षीदार  असल्याने तिनी जे सांगितलं त्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला होता. अजूनही दोघांचाही काही पत्ता  सुद्धा लागला नव्हता.


इन्स्पेक्टर विजय च्या डोक्याला छळणारा प्रश्न ,जय चा तर यात काही हात नाही ना ? ह्याचा माग घ्यायचा त्याने पुन्हा प्रयत्न चालवला.

" मिस जुई आम्हाला तर असं कळलं की, जय आणि चैताली मिळून आदिती ला ढकलून दिलं आणि दिशाभूल करण्यासाठी जय परागंदा झाला." इन्स्पेक्टर विजय


"कोण म्हणतेय असं?? काही पण काय बोलताय इन्स्पेक्टर तुम्ही. माझा दादा असं करणं शक्यच नाही. कुणाच्याच बाबतीत नाही अन् आदीतीच्या बाबतीत तर अजिबातच नाही." जुई


"कां बरं आदिती मधे काही विशेष आहे का?" विजय


"तसं दोघांमध्ये काही रिलेशन नव्हतं पण अलीकडे दादा ला ती आवडू लागली होती. सदा न कदा आदिती चा च जप चालला असायचा त्याचा. मी त्याला चिडवलं की त्याच्या चेहऱ्यावर चे भाव अगदी बघण्या लायक असायचे. मीच म्हणाली होती त्याला की मग आदितीला प्रपोज करून टाक म्हणून . पण तिच्याही मनाचा पूर्ण कल जाणून घ्यायचा म्हणून फक्त तो थांबला होता.
ज्या आदिती वर तो जीवापाड प्रेम करत होता तिला तो असा ढकलून देईल??शक्य तरी आहे का हे??" आता मात्र जुई चा बांध फुटला होता.

एकतर भाऊ गायब असणं अन् वरून पोलिसांची त्याच्यावर च आळ घेऊन सुरू असलेली प्रश्नांची सरबत्ती!! एवढं वाईट अजून काय असू शकत होतं तिच्यासाठी...!


आता मात्र जय चा शोध घेणं ,ग्रुप मधल्या सगळ्यांचे  वेगवेगळे जबाब नोंदवून सगळं पडताळून बघावं लागणार होतं.


"सांभाळा स्वतः ला आणि शक्य झाल्यास  ग्रुप मधल्या इतरांचे पण पत्ते द्या. 


" इन्स्पेक्टर तुम्हाला तपासात जी लागेल  ती मदत करू आम्ही,आधी माझ्या दादाला शोधा हो!!" म्हणत जुई ने पुन्हा आर्त साद घातली.


आधी जय बद्दल काही माहीत नसल्याने त्या दिशेने तपासच केला गेला नव्हता पण आता तो सुद्धा गडावरून नाहीसा झाल्याने त्याचाही शोध घेणे जरुरी होते.त्यामुळे लगोलग आधी जय चा शोध घ्यायचा आणि मगच पुढची दिशा ठरवायची असा विचार करूनच इन्स्पेक्टर विजय तिथून बाहेर पडला.

जुई नी सांगितल्या प्रमाणे जय च्या मनात असलेला प्रेमाचा अंकुर आदितीच्या मनात सुद्धा रुजला होता का हा सुद्धा विचार त्याच्या मनाला आता सतावू लागला होता.आदिती एकतर जुनी मैत्रीण ! सुंदर ,सद्गुणी अतिशय ॲक्टिव. पाहता क्षणीच कुणीही तिच्या प्रेमात पडावं  एवढी सुंदर...! शालेय जीवनातच ती त्याला आवडायची पुढे दोघांच्याही वाटा वेगळ्या झालेल्या पण नियतीने अचानक त्यांना पुन्हा अशा वळणावर आणून सोडले होते...! . आज तिच्याजवळ तिचे ओळखीचे असे कुणी नव्हते. परक्या लोकांनी तिला आपलेपणा दिला होता हे अगदी मान्य! पण अशा परिस्थितीत एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून त्याचे असणे अन् तो तिचा जुना मित्रच असणे ही त्यातल्या त्यात तिच्या मनाला दिलासा देणारी बाब होती. आज तिला त्याच्या मदतीची गरज होती.


आज आदिती त्याची जबाबदारी बनली होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू  त्याला अजूनच तिच्याकडे आकर्षित करू लागला होता .पुन्हा मनात तिच्याविषयी असलेल्या भावना उचल खाऊ लागल्या होत्या. एक जबाबदार अधिकारी म्हणून तो तिची काळजी वाहत होता हे जितके खरे होते तितकेच ती त्याची मैत्रीण असल्याने एक वेगळाच आयाम त्या काळजीला मिळाला होता. पण आज जय आणि आदिती बद्दल ऐकून मनात उगवू लागलेला आशेचा अंकुर फुलण्या आधीच मावळू लागला होता.


माझं आदिती वरचं प्रेम इतकं तद्दन अन् तकलादू नक्कीच नाही. प्रेमाची व्याप्ती खूप मोठी असते.  फक्त स्वतः च्या मनासारखे झाले म्हणजे प्रेम सफल झाले असे कुठे असते का??? आदिती आणि जय आधीच एकमेकांशी या नात्यात,या बंधनात गुंफले गेले असतील तर त्या दोघांच्या मध्ये येण्याचा मला काहीच अधिकार नाही.खरंच त्या जुई चे आभार मानावे तितके कमीच, नाहीतर मी वारंवार आदिती च्या या अपघातामध्ये जय चा च कसा हात आहे हे सिद्ध करत बसण्याचा निष्कारण प्रयत्न करत बसलो असतो अन् नकळतच आदिती मनाने दुखावली गेली असती अन् मग कदाचित माझा तिरस्कार करत गेली असती.


एखादेवेळी आदिती च्या नजरेत माझ्याविषयी प्रेम नाही दिसले तरी चालेल पण त्याची जागा  जर तिरस्काराने घेतली तर मलाच सहन होणार नाही ते. आदिती वर माझं प्रेम आहे अगदी मनापासून प्रेम आहे. अन् ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला असं दुःखी कष्टी खरंच मी पाहू शकणार का? नाही खचितच नाही. आदिती सुखी आणि आनंदी असण्याताच माझ्या प्रेमाचे सार्थक आहे. मी पूर्ण प्रयत्न करणार आदिती ला सुखी आणि आनंदी ठेवण्याचा,हे माझं वचन आहे स्वतः चं स्वतःलाच!!
उद्यापासून कसून जय साठी शोध मोहीम राबवायाची अन् डोंगर, दऱ्या,कडे कपारी शोधून त्याचा माग घेऊन त्याचा ठावठिकाणा शोधून आदितिला गोड सरप्राइज द्यायचं अन् मग तिच्या चेहऱ्यावरचा समाधानी भावात अन् तिच्या गोड हसण्यात आपण आपलं समाधान शोधायचं असं मनोमन ठरवून तो पुढच्या कामाला लागला.


दुसऱ्याच दिवशी पहाटे पूर्ण टीम सोबत इन्स्पेक्टर विजय गडावर पोचला. तिथून घसरून पडल्यानंतर  कोणकोणत्या ठिकाणी पडलेला माणूस सापडू शकतो यावर सोबतच्या सहकाऱ्यांसह त्याने चर्चा केली.  इतका सुंदर अनुपम निसर्ग अन् मोकळे मनाला उल्हासित
करणारे वारे गडावर वाहत होते पण संपूर्ण लक्ष जय प्रकरणात एकवटल्याने त्या साऱ्यांकडे त्याचे लक्षच गेले नव्हते. फक्त कुठे कुठे जय सापडू शकतो त्या शक्यताच तेवढ्या तो पडताळून बघत होता.एक तर तो एक कर्तव्य दक्ष अधिकारी असल्याने आपल्या कामात अतिशय चोख होता अन्  ज्याला शोधायचे होते ती त्याच्या प्रिय व्यक्तीची प्रिय होती.


सगळा व्यवस्थित आढावा घेऊन बाहेर पडतांना  त्याला  गडावरचे एक छोटेखानी मंदिर दिसले.नकळत तिथे जाऊन त्याने देवीचे आशीर्वाद घेतले. त्याने हाती घेतलेल्या कार्यात त्याला यश येऊ देत अशी मनोमन देवीची करुणा भाकली. देवीचा प्रसन्न चेहरा अन् आशीर्वाद देण्यासाठी उठलेले हात जणू आपल्यालाच आशीर्वाद देत आहेत अन् " जा बाळ यशस्वी  हो !" म्हणत देवी त्याचे यश चिंतित आहे असेच त्याला क्षणभर वाटले. काहीवेळ गाभाऱ्यातली शांतता अन् प्रसन्नता त्याने अनुभवली अन् नव्या जोमाने अन् उत्साहाने आपल्या कार्य पूर्तीसाठी तो तिथून बाहेर पडला.


पुढे काय झाले हे जाणून घ्या कथेच्या पुढच्या भागात.

 टीम - भंडारा

©® मुक्ता बोरकर - आगाशे
          मुक्तमैफल

"

🎭 Series Post

View all