अकल्पित..!५

Aai babanshi bolalyane Aditi chi Kali ata khulali hoti.maghachya audasinyache savat Aaya barach prana at sir sale hote.

 राज्यस्तीय करंडक मालिका 

शीर्षक - अकल्पित...!५

विषय - रहस्यकथा

जय चे मिसिंग असणे आदिती साठी खूपच शॉकींग होते. माझ्या नंतर त्याला पण तर ढकलून दिले नसेल ना चैताली ने?? त्याला काही झाले तर नसेल ना?? तो सुखरूप असेल ना ??अशा नाना शंका आता आदिती च्या मनात फेर धरून नाचू लागल्या होत्या. पुन्हा पुन्हा मन त्याच गोष्टीचा विचार करत होतं. कितीही डोक्यातून काढावं म्हटलं तरी  तो विषय काही केल्या डोक्यातून हटत नव्हता. विचार करकरून अगदी डोकं फुटायची वेळ आली होती तिची. पण तिच्या या अशा नाजूक अवस्थेत गुंता सुटायचा अजून वाढतच जात होता.

जय तिचा अत्यंत चांगला मित्र होता शेवटी. अन् अलीकडे तिचे मन त्याच्याकडे ओढ घेऊ लागले की काय? असं तिला वाटायला लागलं होतं. त्याच्याही देहबोलीतून तो तिच्यात गुंतत चालल्याचं तिला जाणवायला लागलं होतं. शब्दात भावना जरी बोलल्या गेल्या नव्हत्या पण नजरेची अन् मनाची भाषा न बोलताच  कळायला लागली होती.

मी तुला,तू मला गुणगुणू लागलो

पांघरू लागलो , सावरू लागलो...

नाही कळले कधी,नाही कळले कधी

नाही कळले कधी जीव वेडावला..

ओळखू लागलो,मी तुला तू मला..अशी काहीशी अवस्था दोघांचीही अलीकडे झालेली.

मैत्रीचा सहवास कधी प्रेमात परिवर्तित होऊ लागला होता हे त्यांना कळलंच नव्हतं.

फक्त एकमेकांची वाटणारी ओढ, त्यांचं एकमेकांना जपणं,एकमेकांसाठी बेचैन असणं...

प्रेमात पडण्याची हीच तर सारी लक्षणं असतात ना..!म्हणूनच एवढे दिवस जाऊनही जय नी संपर्क साधायचा किंवा तिचा माग काढायचा काही प्रयत्न केला नाही तेव्हाच तिला ते जाणवले. मग कदाचित आपण ज्याला प्रेम समजत होतो ती त्याच्या लेखी कदाचित फक्त मैत्रीच असू शकते अशी सुद्धा तिने तिच्या मनाची समजूत घालून घेतली होती तिने अशाही अवस्थेत. खरं तर हे एवढं दुःख वरतून,अपेक्षा भंगाचं  दुःख, सोबतीला जीवा भावाचं कुणीही नसणं किती  विचित्र परिस्थितीतून जात होती ना ती..!यापेक्षा मरण आलं असतं तर परवडलं असतं असं सुद्धा खूपदा वाटायचं तिला मग आईबाबा डोळ्यासमोर यायचे अन् ह्या सर्व भावनांचे मळभ अलगद बाजूला सरायचे. जगण्याची नवी उमेद तिच्यात जागायची.इन्स्पेक्टर जय नी मात्र जेव्हा विजय सुद्धा मीसिंग आहे असं सांगितलं अन् मग मात्र तिचं मन अजूनच सैरभैर झालं होतं.त्याच्याबद्दल मनात जी कटुता येऊ बघत होती तिची जागा आता त्याच्याबद्दलच्या प्रेम आणि काळजी ने घेतली होती. विजय ला सुद्धा तिच्यासारखं च धक्का देऊन पाडून तर दिलं नसेल ना ! हा  विचार आता पुन्हा पुन्हा तिला सतावू लागला होता .ह्यामुळे तिचं अस्वस्थ होणं अगदीच स्वाभाविक होतं.किती सुंदर ग्रुप होता ना त्यांचा..! एका वेगळ्या ध्येयाने प्रेरित अन् जीवाला जीव देणाऱ्या जीवश्च कंठश्च सवंगड्यांचा ग्रुप. पण कोणत्या मुहूर्तावर चैतली च्या त्या    चांडाळ चौकडी ची  वक्र दृष्टी या ग्रुप वर पडली अन् अगदी ग्रहण लागावं तशी या सुंदर ग्रुप ची वाताहत झाली.अनाहुताची चाहूल लागावी तसं तिला ही चांडाळ चौकडी खटकली च होती पण ज्यांची अजून आपल्याशी पुरेशी ओळख सुद्धा नाही त्यांनी एकदम आपल्या जीवावर उठावं हे मात्र तिला फारच अनाकलनीय वाटायचं.

पुन्हा पुन्हा तोच तोच विचार करकरून काल फ्रेश वाटणारी आदिती आज पुन्हा चिंतित वाटत होती.काही वेळाने पुन्हा इन्स्पेक्टर विजय चौकशी साठी आले."गुड मॉर्निंग आदिती,कशी आहेस तू?" म्हणत हसून त्याने संवादाला सुरुवात केली. " बस ठीक!!" म्हणत जुजबी उत्तर देत आज आदिती थांबली होती.मॅडम चा मूड काही बरा दिसत नाही आज ! मनातच म्हणाला इन्स्पेक्टर विजय.पण तिला तसेच  उदास सोडून जायला त्याचे मन धजेना."आदिती , मी काल तुझ्या घरी फोन केला होता.तू घरी न परतल्याने घरचे सगळे फार चिंतेत आहेत. काकूंनी तर तब्येत सुद्धा बिघडवून घेतली. एकुलती एक लाडाची लेक ना तू अन् ट्रेकिंग ला गेलीस काय अन् अचानक नाहीशी झालीस काय. असं तर होणारच होतं." विजय

"काय घरी फोन केला होता तुम्ही?? आणि आई आजारी आहे??" मला जायचं आहे ,आई बाबांना भेटायचं आहे." म्हणत लहान लेकरा सारखी ती स्फुंदू लागली.

"आदिती ,मी काल सांगितलं आहे  तुझ्या बाबांना तू सुखरूप आहेस म्हणून. पण तुम्ही सध्याच एकमेकांना भेटू शकणार नाही याची सुद्धा कल्पना दिली मी त्यांना. परत तू इथे आणि सुखरूप आहेस हे कोणालाही कळणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यायला बजावलं मी त्यांना...!

आता मी त्यांना पुन्हा फोन लावतो, त्यांच्याशी एकदा थोडक्यात बोलून घे. तुझ्या फोन वरून मात्र अजिबात कॉल करायचा नाही. त्यांनी पण तुला कॉल करायचा नाही एवढं पथ्य मात्र पाळायचं.विजय च्या मोबाईल वरून  त्याने आदिती च्या बाबांना फोन लावला. 

 हॅलो!!!" पलीकडून बाबांचा आवाज ऐकताच आदितीचे डोळे पुन्हा पाण्याने भरून आले." हॅलो बाबा, मी बोलतेय आदिती....!"

थोडावेळ फक्त निःशब्द शांतता होती."बाबा , मी इथे सुखरूप आहे. खूप चांगली माणसं मिळाली इथे मला,अगदी घरच्यासारखी काळजी घेतात माझी. आणि हे इन्स्पेक्टर विजय आहेत ना हे माझे वर्गमित्र च आहेत . त्यामुळे माझी अजिबात काळजी करू नका. मी अगदी सुखरूप आहे. आईला सांगा तब्येतीची काळजी घ्यायला."बाबांनी फोन एव्हाना स्पीकर वर केला होता. आदिती ला फोन वर बोलतांना बघून अन् तिची खुशाली ऐकूनच आई फ्रेश झाली होती." बेटा,तू बरी आहेस ना,आता लवकरच बरी होईन बघ मी...! स्वतः ची काळजी घे बाळ!" आई"विजय बेटा, तुम्ही सगळे आहातच आदिती ची काळजी घ्यायला आणि आदिती सुखरूप आहे ही त्या परमेश्र्वराची च कृपा!!" म्हणत आई ने विजय सोबतच सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.आई बाबांशी बोलल्याने आदिती ची कळी आता खुलली होती. मघाच्या औदासिन्याचे सावट आता बऱ्याच प्रमाणात दूर झाले होते. 

विजय च्या डोक्यात मात्र जय बद्दल चे विचार थैमान घालत होते. जय कुठे गेला असेल? त्याचा या प्रकरणात काही हात असेल का? कुणाला काही संशय येऊ नये म्हणून तो गायब झाला असेल का? की आदिती प्रमाणेच त्याच्याशी सुद्धा काही दगा फटका झाला.

"आदिती  तुझ्या पडण्यात जय चा तर हात नसेल ना ग?" शेवटी विजय ने मनातला प्रश्न विचारलाच!!

"जय माझा अतिशय चांगला मित्र आहे. त्याच्याबद्दल मी असा विचार सुद्धा करू शकत नाही. त्याच्या प्रत्येक योजनेची, प्रत्येक गोष्टीची मला अगदी इत्यंभूत माहिती असायची. त्याला कुठेही कधीही काही संभ्रम वाटला तर तो नेहमीच मला विचारायचा किंवा सल्ला घ्यायचा. आमच्या दोघांच्या विचारांमध्ये बरेचदा एकवाक्यता असायची. एकप्रकारे आमची वेवलेंथ चांगलीच जुळायची म्हटलं तरी चालेल. या नवीन ग्रुप बद्दल सगळ्यांनाच वाटायचं पण जय ला सांगायची जिम्मेदारी मात्र सगळ्यांनी माझ्यावरच सोपवली होती. कारण जय माझं ऐकायचा किंवा त्याला एखादी गोष्ट पटवून देणं मला जमायचं. 

ट्रेकिंग च्या आदल्या रात्री सुद्धा ह्या ग्रुप ला सोबत घेऊन केवळ पश्चात्ताप च होत आहे हे त्याने शेवटी कबूल केले च होते की माझ्याजवळ."आदिती जे सांगत होती त्यावर विश्वास ठेवणे भाग होते. कारण आदिती ची आकलन क्षमता, लोकांची पारख अतिशय चांगली आहे याचा पदोपदी अनुभव विजयला येतच होता.त्यामुळे आता जय चे नेमके काय झाले याचा शोध लावणे ओघाने आलेच होते. अगदी आदिती च्या पडण्याने सुरू झालेले हे प्रकरण निरनिराळे फाटे फुटत कुठे घेऊन जाईल काहीच कळत नव्हते.

पुढे काय झाले जय चे? काही बरेवाईट झाली की तो स्वतः गायब झाला? हे सगळे जाणून घ्यायचे असल्यास वाचा कथेचा पुढचा भाग.©® मुक्ता बोरकर - आगाशे

       मुक्तमैफल

.


🎭 Series Post

View all