राज्यस्तरीय करंडक कथामालिका
शीर्षक - अकल्पित...!२
विषय - रहस्य कथा.
काही वेळातच ॲंबुलन्स सायरन देत तिथे पोहोचली. ग्लानीतच असलेल्या आदितीला त्यातून उपचार करण्यासाठी दवाखान्यात नेले गेले.
"माधव तू इथेच थांब यांच्या जवळ,मी जानकी ताईंना पाठवतो,आता आम्ही सगळे जातो बेटा..,रात्री अजून कुणीतरी येईल, एक एक करून लक्ष देऊ सारेच..!"
तिला फक्त ॲडमिट करून आपलं कर्तव्य संपलं असं न समजता ती मंडळी आळीपाळीने अदितीच्या जवळ राहून लक्ष देत होती.तो मुलगा माधव तर सतत तिच्या सेवेत होता.
उपचारांना आदिती प्रतिसाद देऊ लागली होती .तिचे रिपोर्ट्स सुद्धा नॉर्मल होते. डोक्यावरच्या जखमेतून अती रक्तस्त्राव झाल्याने वारंवार तिची शुद्ध हरपत होती. डॉक्टरांनी ती जखम व्यवस्थित साफ करून तिथे टाके घालून घेतले होते. लावलेल्या आय व्ही फ्लुईडस मुळे आता तिला थोडी ऊर्जा मिळून अन् सोबतीला असलेल्या उपचारांना प्रतिसाद देत ती त्यातून सावरत होती.
शुद्धी वर आल्यावर सुद्धा तिच्यावर खूप मोठा मानसिक ताण असल्याचे डॉक्टरांना जाणवत होते. माधव च्या सांगण्यानुसार तर ती खूप वरून पडली असावी हेच आकलन प्रथम दर्शनी होते.
"डॉक्टर,पेशंट झालाय का सेटल?? चौकशी करू शकतो का आम्ही आता त्यांची ?" इन्स्पेक्टर डॉक्टरांना विचारत होते.
मेडिको लीगल केस असल्याने पोलिसांना इन्फॉरमेशन दिली होतीच. त्यामुळे तिची चौकशी करण्यासाठी पोलिस डॉक्टरांना परमिशन मागत होते. पण त्यांनी मात्र तिला थोडा अवधी द्यावा असं त्यांना सुचवलं होतं.
"तुम्हाला एकंदरीत काय वाटतेय डॉक्टर? काय झालं असावं असा तुमचा अंदाज आहे." इन्स्पेक्टर डॉक्टरांना विचारत होते.
"माझ्या एकंदरीत आकलना नुसार अदिती
एक तर ती तिथून घसरुन पडली असावी, दुसरी गोष्ट म्हणजे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा किंवा कुणाचा तरी धक्का लागून ती पडली असावी अथवा कुणी तरी तिला उंचावरून ढकलून दिले असावे. हे तीनही पर्याय शक्य आहेत ." डॉक्टर
त्यामुळे ती शॉक मधे जाण्याची शक्यताच डॉक्टरांना जास्त वाटत होती.
त्यामुळे ती पूर्ण बरी झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा ताण तिला द्यायचा नाही अशी सक्त ताकीद च दिली होती त्यांनी सगळ्यांना.
हळू हळू उपचारांनी आदिती आता पूर्ण बरी होऊ लागली होती. तिने रडण्या भेकण्याचा , स्वत:ला अपाय करून घेण्याचा किंवा तिथून पळून जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला नव्हता त्यामुळे तिनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असे डॉक्टरांना फारसे वाटत नव्हते.
आदिती ची जाणीव जशी पूर्ववत होऊ लागली होती. तिच्या अवती भवती असणाऱ्या, नात्या गोत्याचे नसूनही तिची आपली समजून काळजी घेणाऱ्या सगळ्यांना बघून तिला बरेच आश्वस्त वाटत होतं . ही सगळी माणसं नसती तर घडलेल्या घटनेने तिचा माणुसकी वरचा विश्र्वासच उडून गेला असता कदाचित..!
माधव आणि आदिती मधे आता एक वेगळाच बॉण्ड निर्माण झाला होता. अगदी स्वतः च्या घरच्या व्यक्तीची काळजी घ्यावी तशी तो तिची काळजी घेत होता. आदिती मधे त्याला नसलेली मोठी बहीण दिसत होती अन् तिला त्याच्यात लहान भाऊ....!
आदिती आता बरीच रिकव्हर झाली होती. डॉक्टरांनी त्यामुळे आता तिचा पोलिस येऊन जबाब नोंदवून घेतील याची पूर्ण कल्पना तिला दिली.
ग्लानी मधे असतांनाही रोज पोलिसांच्या वेशातील कोणीतरी येतं हे तिला कळत होतेच. आता मात्र तिला स्वतः ला प्रत्यक्ष त्या गोष्टीचा सामना करावा लागणार होता.
खरं तर या आधी पोलिसांशी संबंध यावा असं कधी आयुष्यात काही घडलेच नव्हते तिच्या अन् आयुष्याच्या या वळणावर आपला आवडता छंद आपल्याला हेही वळण दाखवून देईल असं तर तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण जे घडलं होतं ते अकल्पितच...!!! अन् त्या घटनेचा उलगडा पोलिसांच्या मदतीशिवाय करणे शक्यच नव्हते.
"माधव पोलीस काय काय विचारणार रे मला? मला खूप टेन्शन आलं रे,कसे असतील रे ते पोलीस इन्स्पेक्टर,प्रश्न विचारून मला अगदी भंडावून तर नाही सोडणार ना!" आदिती
आतापर्यंत घडलेल्या घटनेचा ताण मनावर वागवणाऱ्या आदितीला आता पोलिसांच्या चौकशीला सामोरे जायचं टेन्शन वाटू लागलं होतं.पण माधव आणि सगळी मंडळी मात्र तिला मनापासून धीर देत होती.
"ताई, या आधी पण दोन तीनदा येऊन गेले ग ते पोलीस इन्स्पेक्टर.जातीने तुझी विचारपूस करून गेले. डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं होतं त्यांना की तू बरी होईपर्यंत तुझ्या मनावर आणि डोक्यावर ताण येईल असं काहीच तुला विचारायचं नाही म्हणून.
ते इन्स्पेक्टर सुद्धा इतके समजदार वाटले ना,त्यांनी पण अगदी डॉक्टरांचा शब्द न शब्द पाळला. आमची सुद्धा ते खूप आस्थेने चौकशी करतात. फक्त तुझा माग घेत कुणी आलं होतं का? तू एवढ्या दिवसात कुणाला संपर्क साधायचा प्रयत्न केला का? कुणाबद्दल बोलली का?? असेच प्रश्न त्यांनी विचारले. खरं सांगू ते एवढे साधेपणाने आणि सहज विचारत होते ना की माझी आजपर्यंत असलेली पोलिसांबद्दलची भीतीच पार गायब झाली
बघ...!" हसत हसत माधव सांगत होता.
"बापरे!! कोणत्या विश्वात होते . माझ्या मागावर कुणी येऊ शकते याचा विचारच नाही केला मी आजवर. आई बाबा तिकडे माझी किती काळजी करत असतील. त्यांना हे सगळे कळले असेल का? काय वाटत असेल त्यांना आपली मुलगी अपघातात गेली असं तर वाटत नसेल ना! त्यांना फोन लावू का???
अरे, माझा फोन च तर नाही आहे माझ्या जवळ.पण मला आता आई बाबांशी बोलायचे आहे." मनातल्या मनात आदिती चे स्वगत सुरू होते.
तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव बघून माधव लाच काळजी वाटायला लागली होती. मी तर बोलता बोलता ताई ला काही वेगळं सांगितलं नाही ना! असा विचार करून त्याने जीभ चावली.
पण तिच्या मनात काय चालले हे जाणून घेणे जरुरी होते.
" ताई ए ताई ,कसल्या विचारात गढली ग एवढी? काय झालं ग?"
"माधव , काही नाही रे. आजपर्यंत डोके अजिबात काम करत नव्हते पण आज मात्र आई बाबांची आठवण आली मला.माझा फोन वगैरे काही भेटला का तुला ??"
बोलता बोलता आदिती भावूक झाली अन् तिच्याही नकळत डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या तिच्या...!
"असं ग काय म्हणतेस ताई, आई बाबांना विसरलीस म्हणून. सतत आई ,बाबा असाच तर जप करत असायची तू शुद्धीत नसतांना. पण आम्हाला पण काही जास्त माहीत नव्हतं ना...! एक तर डॉक्टरांनी तुला सध्या काहीच विचारायचं नाही म्हणून सांगितलेलं. अन् तुझी अवस्था बघून खरंच काही विचारायची इच्छा पण नाही झाली ."
माधव घेत असलेली तिची काळजी बघून ती पुन्हा भारावून गेली .
"ताई मग आपण डॉक्टरांसोबत आणि ते इन्स्पेक्टर येतील ना त्यांच्यासोबत बोलून घेऊ मग ते दोघे करून देतील काही तरी व्यवस्था...!"
माधव आदितीला आश्वासक स्वरात सांगत होता.
अजून एक प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत होताच...! "तिच्या मागावर खरंच कुणी आले होते का???" याच्या साध्या विचारानेच तिचे डोके दुखायला लागले होते.
पुढे काय झाले आदितीचे? हे जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की वाचा...!
टीम - भंडारा
©® मुक्ता बोरकर - आगाशे
मुक्तमैफल