Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अकल्पित..!१२ अंतिम भाग

Read Later
अकल्पित..!१२ अंतिम भाग

राज्य स्तरीय करंडक कथा मालिका

अकल्पित..!१२,अंतिम भाग

विषय -  रहस्य कथा " त्या दिवशी चैताली ड्रग ॲडिक्ट आहे हे कळल्यावर तिच्या ह्याच कमजोरी चा फायदा घ्यायचे मी ठरवले." विजय

तो पुढे सांगू लागला  चैताली ला त्याने दहा पंधरा मिनिटांचा वेळ दिला होता पण  चैताली ला काही सुचत नव्हते. काही विचार करावा अशी तिची अवस्था च नव्हती. केव्हा तिला डोज भेटतो अन् केव्हा तिची बेचैनी थांबते असे तिला झाले होते.

आज ती या मार्गाला वळली होती त्याला कारणीभूत हेच तर होते.नाहीत

र एक चांगली मुलगी किती आशेने आपल्या भविष्याची स्वप्न  घेऊन या नवख्या शहरात आली होती. अत्यंत गुणी ,चुणचुणीत अन् स्पोर्ट्स चॅम्पियन चैताली पण खरंच असंगाशी संग अन् प्राणाशी गाठ म्हणतात ते खोटे नव्हतेच. वाईट ग्रुप च्या तडाख्यात सापडली. अदनान च्या संपर्कात आली. फ्रेंडशिप मधे झालेली चॉकलेट ची देवाण घेवाण पुढे आयुष्याचा एक अविभाज्य भाग च बनून गेली.मग सुरू झाले ब्लॅकमेल करणे ...!  सवय तर लागली होती पण घरून तेवढे आर्थिक पाठबळ नव्हते.तिच्या याच असहायतेचा फायदा घेत तिच्या गुणांचा अन् तिच्या चपळतेचा  वापर  करून घेतला गेला नेहमीच...! ती त्यात भरडली जातेय हे तिला कळत होतं पण त्यातून सुटकेचा मार्ग कधी सापडला नाही. उलट या चक्रात ती अजून अजून गुरफटली जात होती. अन् या अशाच संदर्भातून ती आज आदिती आणि जय च्या मृत्यूस कारणीभूत ठरली होती.

जेव्हा तिच्यावर ही जिम्मेदारी टाकली गेली तिने स्पष्ट नकार च दिला होता. आजवर तिने अनेक गुन्हे केले होते पण असा कोणाचा जीव घ्यायचा प्रयत्न तिने केला नव्हता. पण फक्त ड्रग्ज च्या मोहापायी ती नको ती चूक करून बसली होती. आता काय सांगावे? या विचारात असतांनाच इन्स्पेक्टर विजय वापस आले होते. विजय जवळ असलेले तिच्या आवडीचे चॉकलेट आणि गोळ्यांची डबी आता मात्र तिला काही सुचू देत नव्हते. तिची विचार शक्ती आता पूर्ण संपली होती. आता फक्त समोर असलेले चॉकलेट आणि गोळ्या एवढेच तिला खुणावत होते. अत्यंत आशाळभूत नजरेने ती तिकडे बघत होती...!

" चॉकलेट हवंय ना हे मिस चैताली ? मग पटापट आधी आमच्या प्रश्नांची योग्य उत्तरं द्यायची. तू जेवढा वेळ घेशील तेव्हढेच हे चॉकलेट तुला उशिरा भेटेल. आता तूच ठरव काय ते?" विजय

" विचारा तुम्ही सांगते मी?" अधीर झालेली चैताली बोलली.

"आता तूच मला सगळं सांगणार. काय झालं जय आणि आदिती चं? तू तिथे जायचा उद्देश काय? तुला तिथे कोणी पाठवलं आणि तू कोणासाठी काम करतेस या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. तू सविस्तर सांगणं सुरू कर .मला सगळं पटलं की मग हे चॉकलेट तुझं!" विजय

आता मात्र चैताली अगदी पोपटा सारखी बोलू लागली. ...

" मी चैताली. एका चांगल्या घरची गावातली मुलगी. इथे शिकायला म्हणून आले अन् दुर्दैवाने या विचित्र संगतीत फसले.मी कशी या चक्रात फसले कळलेच नाही पण निघणे मात्र अवघड होत चालले होते. माझा मित्र अदनान मला ड्रग्ज पुरवायचा अन् बदल्यात मी काहीही करायला तयार व्हायचे. एका मोठ्या ड्रग रॅकेट शी मी कशी जुळली गेले मला कळलेच नाही.

मधल्या काळात कोरोना आला आणि सारे जग च ठप्प पडले. कित्येक लोकांचे व्यवसाय गेले. माझ्यासारख्या लोकांची तर फारच अडचण झाली. पण तेव्हाही गुप्त पद्धतीने हे काम सुरूच राहिले. आता उघडपणे हे सगळे करता येत नसल्याने गड , किल्ल्यांसारख्या निर्जन जागी रेव्ह पार्ट्यांचे छुपे आयोजन करून हे सगळे जोमात चालायचे. त्यातल्या त्यात आमच्या ग्रुप च्या लोकांनी निवडलेला गड थोडा दूर आणि दुर्गम असल्याने तिकडे फारसे कुणी यायचे नाही आणि यांचे  बरे फावायचे.

पण अचानक एक दिवस हे भवानी स्पोर्ट्स अकॅडमी वाले आले आणि त्यांनी एक दोन महिन्यात इथे ट्रेकिंग चा बेत आखला. यांच्या ग्रुप ची फारच ख्याती हो ट्रेकिंग आणि गड संवर्धनासाठी...! यांचे इथे आगमन म्हणजे आमच्या धंद्यावर पूर्ण पाणी फेरणे आहे असे आमचे बॉस म्हणायचे. मग यांचा काहीतरी बंदोबस्त करावा म्हणून प्लॅनिंग सुरू झाले. गोष्टी गोष्टींमध्ये माझे ट्रेकिंग चे गुरु मोरे सर हेच जय चे सुद्धा गुरु असल्याचे कळले.

कोरोना च्या काळात सगळे बंद असल्याने ते सुद्धा आर्थिक चणचणीत च होते. आमच्या बॉस ने त्यांना आर्थिक मदत देऊ केली जिची त्यांना अत्यंत गरज होती पण त्या बदल्यात त्यांनी जय ला इथे ट्रेकिंग पासून परावृत्त करावे एवढी विनंती केली.त्यांनी त्यांचा साधा हॉटेलिंग चा व्यवसाय आहे आणि जय तो उधळून लावेल तर त्यांच्या पोटापाण्याची अडचण होईल हा बहाणा सांगून सरांना राजी केले.

ठरल्याप्रमाणे मोरे सरांनी जय ला ट्रेकिंग पासूनच परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. 

" जय,हे सगळे फोल असते रे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात फारच अडचण झाली बाळा माझी. नुसते ध्येयाने प्रेरीत होऊन पोट भरत नसते. हे सगळे फावल्या वेळात करायचे उपद्व्याप आहेत. आधी तू आपल्या करिअर वर फोकस कर ."असा सल्ला त्यांनी दिला. पण जय काही मानला नाही.त्याचे ट्रेकिंग चे प्लॅनिंग सुरूच राहिले.मग मात्र बॉस नी मोरे सरांना आम्हा चार जणांची त्यांच्या ग्रुप मध्ये वर्णी लावून द्यायची व्यवस्था करायचे आदेशच मोरे सरांना दिले.मोरे सरांनी जय कडे शब्द टाकला आणि सरांवरच्या प्रेमापोटी इच्छा नसतांना देखील त्याने आम्हाला ग्रुप मध्ये घेतले. खरंतर त्यांच्या शिस्तबद्ध ग्रुप मध्ये आम्ही फारच विसंगत होतो. आमचे तिथे जुळणे कुणालाच आवडले नव्हते  आणि ते अगदी स्पष्ट दिसायचे. एकदा मी तर आदितीला याबद्दल जय शी बोलतांना पण ऐकले होते. आणि जय नी तिला आश्वासन दिले होते की ह्या ट्रेक नंतरचा अनुभव असाच राहिला तर आम्हाला तो ग्रुप मधून काढून टाकणार...! म्हणजे यावेळी च जय चा काटा काढणे जरूरी होते. मोरे सर मात्र आमच्या या प्लॅन पासून पूर्ण अनभिज्ञ होते. ट्रेकिंग च्या आवडीमुळे मी जय चा ग्रुप जॉईन केला असेच त्यांना वाटले."चैताली

" चैताली तुला तर जय चा काटा काढायचा होता ना मग तू आदितीला कां ढकलून दिलेस? प्लॅन नुसार सगळे व्यवस्थित सुरू होते. जय आणि आदिती सुद्धा एकदम चांगले ट्रेकर असल्याने  आम्ही तिघे सगळ्यांच्या समोर होतो. माझे सवंगडी फक्त नावाचेच ट्रेकर होते त्यामुळे ते फारच मागे होते. वरचा कडा चढणे माझ्यासाठी फारसे अवघड नव्हते पण मी मुद्दामच मागे  राहिले आणि वर चढायला मदत मागितली. माझ्या अपेक्षेनुसार जय मला मदत करेल असे वाटत होते पण झाले उलटेच,जय ऐवजी आदिती ने मला मदत करून वर घेतले. नाहीतर त्याच दरम्यान जय ला खाली खेचून पाडायचा माझा पूर्ण प्लॅन होता पण आदिती मुळे तो फिस्कटला...! वर आल्यावर मला आता वेळ घालवायचा नव्हता.त्यामुळे मी कोणताही बहाणा करून जय ला खाली ढकलून  द्यायचा प्लॅन करू लागले. बस अगदी व्यवस्थित सारे जमून आले असतांना नेमका जय तिथून बाजूला झाला अन् अचानक तिथे आलेली आदिती जोराने माझा धक्का लागून  खाली पडली. तिचा आवाज ऐकुन जय धावला तिला सावरायला अन् तिथेच पाय निसटून तो सुद्धा आपटत आपटत खाली पडला.माझे काम आपोआपच झाले होते.

आदिती ला जोराचा धक्का लागल्याने कदाचित ती दूर फेकली जावून पडली कदाचित त्यामुळेच ती जीवित राहिली. पण जय मात्र पाय निसटून पडल्याने घसाटत ,आपटत पडला हे मी पाहिले. 

पुढे आदिती जिवंत असल्याचा आम्हाला सुगावा लागला आणि अतिशय धोका पत्करून आम्ही आदिती चा सुद्धा निकाल लावला अन् जय गेला होता त्याची विल्हेवाट लावतांना आम्हीं मात्र पकडले गेलो." चैताली बोलायची थांबली.

"चैताली म्हणजे तू काल बोलत होतीस ते सर म्हणजे मोरे सर  ना...! आणि तुमचे बॉस नेमके कोण ग??" इन्स्पेक्टर विजय

" तुम्हाला हवं ते सगळं सांगितलं मी! आता फालतूचे प्रश्न कशाला विचारताय?"आता गोळ्या द्या मला प्लीज." चैताली

" चैताली मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे मग हे सगळं तुझेच." 

" सांगते सांगते . इब्राहिम भाई आमचे बॉस आहेत.अदनान च्या माध्यमातून मी या सगळ्यांशी जोडले गेले." चैतालीचैताली ला तिचे चॉकलेट दिले गेले. साऱ्या गोष्टी चैताली च्या नकळत रेकॉर्ड झाल्या होत्याच आणि विजय तिथून पुढच्या तपासासाठी बाहेर पडला.कारण आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता.

पुढे तपासानंतर हे फक्त एवढेच नाही तर एक मोठे ड्रग्ज रॅकेट असल्याचे अन् विविध शहरांमध्ये ते पसरल्याचे समोर आले होते. व्यवस्थित मागोवा घेऊन रॅकेट शी संबंधित बऱ्याच जणांना ताब्यात घेतले गेले होते. पुढे कोर्टात सबळ पुरावे असल्याने त्यांना योग्य ती शिक्षा सुद्धा झाली होती.

आदिती जिवंत असल्याने अन् चैताली ची सुद्धा या सगळ्यातून बाहेर पडायची तयारी असल्याने तिला तिची शिक्षा आटोपल्यावर यातून बाहेर पडायला मदत करायचे सगळ्यांनी ठरवले होते.झालेल्या घटनेचा तिला स्वतः लाच अत्यंत पश्चात्ताप झाला होता.

आज या घटनेला एक वर्ष होत आले होते. जय च्या बलिदानामुळे एका मोठ्या रॅकेट ला पकडण्यात यश आले होते. त्यांच्या ट्रेकिंग ग्रुप मध्ये विजय आणि जय ची बहिण जुई हे दोन नवीन मेंबर जुळले होते आणि पुन्हा जोमाने सगळ्यांनी हे काम पुढे न्यायचे ठरवले होते. कारण सर्वानुमते हीच जय ला खरी श्रद्धांजली होती.

जय च्या स्मृतिदिनी आदिती पुन्हा विचारात हरवली होती कारण हाच तो वर्षापूर्वी चा दिवस होता तिच्या जीवनाला *अकल्पित* वळणावर आणून सोडणारा....!

या घटनेने अनेक दिव्यांतून तिला जावे लागले होते. किती यातना सहन कराव्या लागल्या होत्या. घरच्यांपासून दूर चोरी छुपे राहावे लागले होते....!

माधव च्या रुपात तिला एक लहान भाऊ लाभला होता. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने आदिती च्या बाबांनी त्याच्या पुढच्या शिक्षणाचा भार तेच पेलणार असल्याचे त्याच्या आईबाबांना सांगितले होते.कधीकाळी जय ची सहचारिणी होऊ इच्छिणारी आदिती आज तिच्या आणि जय च्या घरच्यांच्या इच्छेने अकल्पित पणे विजय ची सहचारिणी झाली होती. पण ध्येय मात्र एकच होते. गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे....!

???????????? मनोगत:कथा मालिका लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न! कितपत यशस्वी झाला  हे आपण रसिक वाचकच सांगू शकाल. खरं तर ट्रेकिंग वगैरे विषयाशी माझा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यामुळे लेखनात काही त्रुटी आढळल्यास त्यास सांभाळून घ्यावे. गड किल्ले आपले वैभव पण या अशा जागांच्या निर्जनतेचा फायदा घेत तिथे रेव्ह पार्ट्या आयोजित केल्या जातात आणि ड्रग्ज रॅकेट चालतात हा धागा पकडून लिहिलेली ही कथा. 

हे सगळं थांबवायचे असेल तर गडकोटांचे संवर्धन व्हावे हीच इच्छा मनी बाळगून लिहिलेली ही कथा मालिका. कशी वाटली ते कळू द्या आपल्या प्रतिक्रियांमधून..!

धन्यवाद!

टीम - भंडारा

©® मुक्ता बोरकर - आगाशे

      मुक्तमैफल    ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mukta Borkar- Agashe

Private Practitioner

मी एक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असून मला कथा आणि कविता लिहिण्यात अभिरुची आहे.

//