एक नवी पहाट

I won by depression

एक नवी पहाट......

"हॅलो......हॅलो तू माझं ऐकून तरी घे...प्लिज प्लिज..." आरती फोन वर मिहीरला विनवण्या करत होती. तोपर्यंत त्याने तिकडून फोन कट केला. 

आरती आणि मिहीर यांची एका व्हाट्सप ग्रुप मध्ये ओळख झाली. ग्रुप वर बोलता बोलता कधी ते एकमेकांशी पर्सनल पेजवरती बोलू लागले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. रोज बोलता बोलता त्यांच्यात चांगलीच मैत्री जमली होती. आरती कॉलेज करत होती तर मिहीर एका कंपनी मध्ये नुकताच जॉबला लागला होता. दोघांच्याही घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती.आरतीच्या घरात तिची मोठी बहीण आई आणि बाबा असे राहत. तर मिहिरच्या घरी चार बहिणी आणि आई बाबा असे राहत होते. मिहीर एकुलता एक मुलगा त्यामुळे घरात सगळ्यांचाच लाडका होता. बहिणींचा तर तो जीव की प्राण होता. त्यामुळे सगळ्या जणी त्याचे लाड करत. याउलट आरतीकडे मात्र मोठ्या भावाचं बोलणं घरातले ऐकायचे पण तिच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नसे. त्यामुळे ती नर्व्हस राहू लागली. आपलं मन ती मिहीर जवळ मोकळं करे. त्यामुळे तिलाही बरं वाटे. मिहीर देखील आपली प्रत्येक गोष्ट तिला सांगत असे. त्यामुळे दोघांचंही मेसेजवर बोलणं व्हायचं. मग एकदा मिहीरने तिला फोन केला. पण घरी सगळीच असल्याने आरतीने फोन कट केला. कॉलेजला गेल्यावर तिनं त्याला फोन करून सगळं सांगितलं. घरी असताना फोन करू नको हेही सांगितलं. आरतीचं घर पुढारलेलं असलं तरी काही बाबतीत म्हणजे मुलांचे फोन येणं.. त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं या बाबतीत मागासलेलं होतं. त्यामुळे शक्यतो ती बाहेरच त्याच्याशी फोन वर बोले आणि मग घरी येई. ती त्याच्याशी सगळं शेअर करत होती. मग एखाद्या दिवशी घरी मिळालेला ओरडा असो किंवा कॉलेजला होणारी मजा मस्ती..त्याच्याशी बोलल्यावर तिला हलकं वाटायचं...जात येता मेसेज , फोन यामुळे त्या दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले. मग एकदा ऑफिसचं काम सांगून मिहीर तिला भेटायला आला. दोघेही वेगवेगळ्या शहरात राहत होते. त्यामुळे त्यांना रोज भेटणं शक्य नव्हतं. तो आल्यानंतर दोघेही खूप वेळ एकत्र होते. त्यांनी खूप गप्पा मारल्या. एकत्र जेवण केलं आणि ते घरी गेले. असं खूप दिवस चालू होतं..दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. त्यामुळे आरतीचं कॉलेज संपल्या नंतर घरी सांगून , घरच्यांच्या परवानगीने लग्न करायचं असं ठरवलं. दोघांनाही एकमेकांची सुखं दुःख वाटून घ्यायला आपलं असं माणूस मिळालं होतं. त्यामुळे रोजचं बोलणं, कधीतरी होणारी भांडणं, त्यातून होणारे रुसवे फुगवे यातून त्यांचं नातं फुलत होतं. या सगळ्यांमध्ये एक वर्ष कधी गेलं कळलंच नाही.. आरतीचं कॉलेज पूर्ण झालं आणि पुढील शिक्षणासाठी ती बाहेर जावुन शिकायचा विचार करू लागली परंतु घरच्यांनी तिला विरोध केला. त्यामुळे आहे तिथेच तिला पुढील शिक्षण घेणं भाग पडलं. मिहीर देखील तिला अभ्यासात मदत करत होता. त्यांच्याच सल्ल्याने तिनं  पुढील शिक्षणाचा मार्ग निवडला. काही दिवसांनी मिहिरच्या घरच्यांना आरती बद्दल आणि त्याच्याबद्दल कळलं. तेव्हा त्यांनी त्याबाबतीत मिहिरला खूप सुनावले. आम्ही सांगू त्याच मुलीशी तुला लग्न करावे लागेल नाहीतर आम्ही जीव देऊ असं त्याच्या आईबाबांनी त्याला धमकी दिली. मिहीरने त्यांना खूप समजावून पाहिले पण त्यांना आरती सून म्हणून नको होती. त्यांना एका बड्या घरातली मुलगी त्यांच्या मिहिरसाठी करून घ्यायची होती. आई बाबांच्या हट्टामुळे मग त्याचाही नाईलाज झाला. 

...........................................

मिहिरच्या घरी कळल्यानंतर देखील आरती मध्ये आणि त्याच्यात बोलणं होत होतं. त्याने सगळी परिस्थिती तिला सांगितली. आपण एकमेकांपासून दुरावणार या भीतीनेच त्यांना काही सुचेनास झालं. आरती या बाबतीत घरी सांगुही शकत नव्हती. कारण तेवढं अनुकूल वातावरण तिच्या घरी नव्हतं. त्यामुळे आपल्याच खोलीत ती रात्री उशीत तोंड खुपसून रडायची. मिहिरच्या आई बाबांनी त्याला आरतीशी असणारे संबंध तोडायला सांगितले. नाईलाजाने त्याने आरतीला फोन केला.

" हॅलो आरती....." मिहीर 

" हॅलो....बोल ...कसा आहेस तू ? ....किती दिवसांनी फोन केलास... आपण भेटूया रे प्लिज..." आरती काकुळतीला येऊन बोलत होती.

" आरती माझ्या घरच्यांना तू पसंत नाहीस...आई बाबा ऐकतच नाहीयेत ग..." तो देखील भावूक होऊन बोलत होता. 

"होईल सगळं नीट....आपण वाट पाहूया ना....मी...मी थांबायला तयार आहे.." ती रडत रडत म्हणाली.

" नाही आरती....आई बाबा नाही ऐकणार....त्यापेक्षा....." मिहीर

" त्यापेक्षा काय....??? " तिनं विचारलं.

" त्यापेक्षा आपण इथेच थांबलेलं बरं..... माझा पण नाईलाज आहे ग पण मला आईबाबा imp आहेत...तू प्लिज समजून घे .. " तो तिला समजवत म्हणाला.

" आणि मी.....?? मी नाहीये का तुझ्यासाठी महत्वाची....?? बोल प्लिज..." ती त्याला ओरडून विचारत होती. 

" आरती प्लिज..... मी काहीच करू शकत नाहीये....प्लिज समजून घे..." मिहीर तिला विनवत होता.

" काय समजून घेऊ....? माझ्या प्रेमाला तुझ्या लेखी काहीच किंमत नाहीये का...मी खेळणं नाहीये हवं तेव्हा घेतलं नि फेकून दिलं....मी ही माणूस आहे रे..मला ही भावना आहेत...मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय..." आरती

" आरती प्लिज....मलाही त्रास होतोय पण माझ्या हातात काहीच नाहीये....आईबाबा खरचं आपल्या जीवाचं काहीतरी करतील याची भीती वाटते मला..." मिहीर

" आणि माझ्यावरच्या प्रेमाचं काय.... आपण समजावू ना त्यांना...मी थांबायला तयार आहे....प्लिज..." ती विनवण्या करत होती.

" नाही ...आरती...आपण थांबुया... प्लिज तू मला समजून घे...मी फोन ठेवतोय...." मिहीर म्हणाला.

" प्लिज तू एकदा ऐकून घे माझं....हॅलो हॅलो....प्लिज मिहीर प्लिज...." ती ओरडत होती पण पलीकडून फोन कट झाला होता.

रात्री ती फारसं जेवली सुद्धा नाही. उगीच कोणतरी विचारेल म्हणून ती शांतच होती. पण रात्री आपल्या खोलीत गेल्यावर मात्र तिनं अश्रूंना आपली वाट मोकळी करून दिली. रात्रभर ती झोपली नाही. मिहिरच वागणं बोलणं....त्याचं समजावणं ती आठवत राहिली. सकाळी उठल्यावर देखील काही झालं नाही असं दाखवून ती कॉलेजला गेली. पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. विचार करून तिचं डोकं फुटायची वेळ आली होती. कॉलेजला गेल्यावर तिनं तिच्या मैत्रिणीला सगळं सांगितलं. तिला आधीपासून हे सगळं माहीत होतंच..त्यामुळे तिनंही तिला त्यातून बाहेर पडायला सांगितलं. तिला आधार दिला.

...................................


दिवसभर कॉलेजला असताना आरतीचा वेळ जायचा. पण रात्री मात्र तिला मिहीरची आठवण सतवायची. त्याच्याशी बोलायची, मन मोकळं करायची तिला सवय झाली होती. त्यामुळे त्याच्या अशा अचानक सोडून जाण्याने ती एकटी पडली. तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचार घोळू लागले. रोज तिची उशी अश्रूंनी न्हाऊन निघायची. घरी तिला कोणीच मनमोकळं बोलू द्यायचं नाही. त्यामुळे ती अधिकच गप्प राहू लागली. आणि मिहीरबद्दल तर घरी सांगणं शक्यच नव्हतं. उद्या जर हे घरी कळलं तर आई बाबा आपल्याला नक्की ओरडतील. आपल्यामुळे त्यांची लाज जाऊदे नको यासाठी आपणच आपलं आयुष्य संपवू हा विचार तिच्या डोक्यात घोळायला लागला. आपण एकटे आहोत आणि आपलं या जगात कोणीही नाही ही भावना तिच्या मनात तग धरू लागली. दिवसेंदिवस तिच्यातील हे नैराश्य वाढत होतं. मनातल्या मनात ती घुसमटत होती. 
वरून जरी ती शांत असल्याचा आणि हसतमुख असल्याचा आव आणत होती तरी तिच्या मनात चाललेलं द्वंद्व कोणालाच माहीत नव्हतं. एकदा ती अशीच कॉलेजला जात असताना रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी होती. गाड्या वेगाने जात होत्या. इतक्यात तिनं पाहिलं तर एक सात - आठ वर्षाचा मुलगा रस्ता क्रॉस करतोय. दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी येत होती. तिनं धावत जाऊन त्या मुलाला हाताला धरून पुन्हा फुटपाथवर घेवून आली. अजूनही तिला धडधडत होतं. त्या मुलाच्या गावीही नसलेला मृत्यू तिनं समोर पहिला होता. ' आपण वेळेत त्याला मागे खेचलं नसतं तर...काय झालं असत...?? ' या विचारानेच ती हादरली. त्या मुलाकडे तिनं नीट पाहिलं मळके कपडे.. हातापायांना माती लागलेली... ती शांत झाल्यावर तो मुलगा तिच्याकडे खाण्यासाठी काहीतरी मागू लागला. तिनं आपल्या डब्यातली पोळी भाजी त्याला एका कागदात गुंडाळून दिली तसा तो मुलगा पळत निघून गेला. ती त्या छोट्या मुलाच्याच विचारात होती. आज कॉलेजला न जाता ती एका शांत ठिकाणी जावुन बसली. ती विचार करू लागली आज एका मुलाला आपण वाचवलं...मृत्यू म्हणजे काय हे स्वतः डोळ्यांनी पहिला. अजूनही ती थरथरत होती....' मग आपण स्वतःच स्वतःचा जीव घेऊ शकू ???..... त्या भिकारी मुलाने आपल्याकडे खायला मागितले....त्यांना त्यांच्या जेवणाचीही भ्रांत असते...उद्या आपल्याला खायला मिळेल की नाही हे देखील त्यांना माहीत नाही तरी ती मुलं जगतात...आणि आपण...??? आपण का जीव देतोय...?? आपलं प्रेम आपल्याला मिळालं नाही म्हणून....??? तेवढ्यासाठी आपण आपलं आयुष्य संपवतोय..?? ' तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.


..................................


ती त्यांच तंद्रीत घरी आली. रात्री सुद्धा जेऊन झाल्यावर तिच्या डोक्यात तेच घोळत होतं. 'आपल्यात कोणतही व्यंग नाही...आपण आपली कामं स्वतः करू शकतो. आपल्याला रोज वेळेवर जेवायला मिळतंय...आपल्याला आई बाबा सगळ्या गोष्टी आणून देतात...पण त्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या आणि झोपडपट्ट्यांमधून राहणाऱ्या माणसांपेक्षा आपण कितीतरी सुखी आहोत...त्यांच्या जवळ काही नसताना देखील ती माणसं जगतात...आनंदाने राहतात मग आपण का नाही....??? ' तिनं आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाकला...दिवस हळूहळू पुढे सरकू लागले. आरतीने आपले छंद जोपासायला सुरवात केली... मेहंदी , चित्र काढणं यात ती वेळ घालवू लागली...वेगवेगळ्या लोकांची पुस्तकं वाचू लागली.. त्यामुळे तिला जगण्याची नवी उमेद मिळत गेली.. कॉलेज सोबतच ती पार्ट टाइम जॉब करू लागली त्यामुळे स्वतःच्या पायावर ती उभी राहिली. या सगळ्यात आई बाबांचीही तिला मदत झाली..त्यांनी तिला सांभाळून घेतलं... आई बाबांचं वेगळंच रूप तिला पाहायला मिळालं. एरवी ओरडणारे आई बाबा तिला जवळचे वाटू लागले. आपलं चांगलं व्हावं यासाठीच तर ते ओरडतात ते तिला जाणवलं...तिनं मिहिरच्या विचारातून स्वतःला सावरलं. ती आता स्वतःसाठी वेळ देवु लागली. स्वतःच्या कामातून ती स्वतःला बदलत गेली आणि नैराश्याच्या खोल दरीतून ती स्वतःच बाहेर पडली होती.... तिच्या मनात तिच्याच बदलेल्या विचारांची नवी पहाट उगवली होती...!!!!


समाप्त..


या कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. कथा आवडल्यास नावसाहित शेअर करावी.