. . .अजूनही चांदरात आहे !

she misses him after long time.



राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

कथेचे शिर्षक - . . . अजूनही चांदरात
आहे!
विषय - .. . आणि ती हसली!
जिल्हा - संभाजी नगर
लेखिका-©® स्वाती बालूरकर , सखी

सुमती हॉलमध्ये फेर्‍या घालत होती.
खूप बेचैन होती. खूप आनंदाचा क्षण असूनही ती हरखून गेली नव्हती.
आज अचानकच त्याची तीव्रतेने आठवण झाली, या कारणानेच ती बेचैन होती.

अधेमधे त्याची आठवण बरेचदा यायची पण आजची ही तगमग खूप जास्त होती.
म्हणजे तो जर त्यावेळी योगायोगाने कुठून समोर आला असता तर कदाचित तिने त्याला करकचून मिठी मारली असती. मिठी मारण्याइतपत त्याचं नातं नसलं तरीही!
मनाला भूतकाळात जाण्यासाठी साधं निमित्त लागतं.
कुठल्याही एका छोट्याशा घटनेवरून किंवा आठवणी वरून मन लगेच कितीतरी वर्षांचा प्रवास कितीतरी किलोमीटरचा मैलांचा प्रवास करून तिथे निघूनही जातं.
शरीर इथेच राहतं पण मन त्याच वेळेत भटकत असतं. मन क्षणार्धात "त्याच्या" आठवणीत भिजून २० वर्षे मागं गेलं होतं.
या क्षणी सुमतीचं मन जवळ जवळ दोन तप मागे यूथ फेस्टिव्हलमध्ये , जिथे तो त्याच्या कॉलेजकडून आला होता.
तिथे आंतरमहाविद्यालयीन ग्रुप डान्समध्ये तो जिंकला होता आणि सोलो डान्स मध्ये ती प्रथम आली होती.

तो अचानक समोर आला, तिने अभिनंदन म्हटलं, ओळख नव्हती!
पण कलेच्या क्षेत्रात ओळखीची गरजही राहत नाही.
एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली ती मनापासूनची दाद होती .

"सुमती राईट? क्लासिकल डान्समध्ये मेहनत घे. एक दिवस तू खूप मोठी होशील. स्पार्क आहे तुझ्यात, यू डोण्ट नो!"
त्याचं ते वाक्य तिच्या मनात कोरलं गेलं होतं.
इतका मोठा कोरियोग्राफर आणि ग्रुप डान्स चा विजेता मला एक टिप देतोय या विचाराने ती आनंदी झाली होती.
तिला आजही वाटतं की बिना संपर्काचं बिना फोन किंवा बिना मेसेजचं तो काळच प्रेमाचा सुंदर सर्व काळ होता म्हणजे मनाचा मनाशी खूप संवाद व्हायचा आणि न भेटताही नातं आपोआप दृढ व्हायचे.
त्या आठवडय़ाच्या यूथ फेस्टिव्हलमध्ये ते दोघे मनाने खूप जवळ आले होते. अबोल भाषेतून व नजरेच्या बोलीतून .
जणू एक अव्यक्त करारच झाला होता दोघांमध्ये.

" क्लासिकल मध्ये मेहनत कर म्हणाला होतात ना सुयश , त्यावेळी मी कुठला डान्स फॉर्म घेऊ ते नाही सांगितलंत?"
वर्षभरानंतर दोघेजण एकदा ठरवून एका कार्यक्रमात काही वेळेसाठी भेटले होते आणि तिने न राहवून विचारलं होतं.

" कथ्थक . . . सुमती कत्थक! नथिंग एल्स!"
तो बोलून गेला .
"एक विचारू ? कत्थकच का?" तिने मुद्दाम विचारलं होतं.

"स्वतःला कधी लक्षपूर्वक पाहिलंस का? विशेषतः तुझ्या बोटांचा आकार कधी निरखून पाहिलास का तू ?"
"म्हणजे. . काय?"

" लक्षपूर्वक बघ ऊर्ध्व चक्र करून अधो चक्र करताना हात जेव्हा वर घेतेस तेव्हा. . . कमाल दिसतेस, तुझं तू पायाकडे पाहताना चा लूक जणू माझ्या डोळ्यात कॅप्चर होतो आणि तो तत्कार तर इतका लयीत असतो की नजर खिळते."
ती श्वास रोखून ऐकत होती.
" म्हणजे त्रिताल वर लयीत जेव्हा पायांची हालचाल होते तेव्हा मी तुला एका हाताने तुझं घागरा पकडून दुसर्या हाताने ती मुद्रा व मानेची नाजूक हालचाल करताना पाहतो, आय मीन अशी कल्पना करतो तेव्हा तुझ्या पायांच्या थिरकण्यासोबत माझं मन थिरकत असतं आणि तुझा तो भावूक चेहरा माझ्यासमोर एक जिवंत चित्र बनून जातो ."
तिचे श्वास खूप तीव्र गतीने चालत होते. . . हे सगळं कधीच झालं नव्हतं पण त्याने शब्दाने तिचंच जिवंत चित्र तिच्यापुढे उभं केलं होतं.
" सुयश प्लीज ! थांबवा ना हे सगळं! म्हणजे हे काय?"

तिला ते सगळं ऐकावं वाटत होतं पण एक अनामिक भीती वाटत होती.
त्याचा शब्द ना शब्द मनात कोरला गेला होता.
शब्दागणिक मनातली जवळीक व आदर वाढत होता.
या कलाकाराच्या मनात एकदा भेटल्याने इतकी जवळीक आहे हे कदाचित तिच्या कल्पने बाहेरचं होतं.
"ऐक ना त्यातल्या काही तुझ्या कत्थक करतानाच्या मुद्रा अशा पोस्टर बनून माझ्यासमोर आहेत, वेगवेगळ्या अटायरमधली, वेगवेगळे एक्स्प्रेशन्स जे मी असे इमॅजिन केलेय तुला ज्यावेळी नॅशनल, इंटरनॅशनल लेवल वर परफॉर्म करशील व ते फोटो सगळी कडे छापून येतील. त्या माझी आठवण येईल तुला.
विश्वास ठेव . मराठी नीट येत नाही पण समजावण्याचा प्रयत्न करतोय. कळालं का? सुमती?"
"असा दिवस माझ्या आयुष्यात?" ती इतकच पुटपटली.
" नक्की येईल! हा एक दिवस!"
" पण तुम्ही असाल ना तिथे , हे सगळं पाहायला?"

" असेन की नाही हे माहीत नाही. नसेलही कदाचित! आजची ही आपली शेवटची भेट . तुझ्यातल्या त्या नृत्य कलेला व आवडीला या जगाच्या त्रासात आणि संघर्षात मरू देऊ नकोस. कला जिवंत ठेव. एक दिवस नक्की सक्सेसफुल होशील."

सुदैवाने की दुर्दैवाने तेच झाले.

ती त्यांची शेवटची भेट ठरली.

तिने त्याला सुयश गुप्ता ला आग्रह केला होता, थांबण्यासाठी-
"नको थांबवूस ,माझं जीवन हवेप्रमाणे, वादळाप्रमाणे आहे. मी केव्हाही, कुठेही असू शकतो किंवा कुठल्या क्षणी मी नसूही शकतो. त्यामुळे मला कुणीच बांधून ठेवू शकत नाही. मी कुणाच्याच बंधनात रहात नाही, मी कुठेच स्टेबल होत नाही.
माफ कर माझी मराठी तुझ्या इतकी चांगली नसेल पण मी मला काय वाटते ते तुझ्यापर्यंत पोहोचवू शकतो. उगीचच भावनांमध्ये अडकून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस सुमती! मी जेवढं सांगितलं तेवढं कर, तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे! आताच पाहू शकतोय मी."
ती वर्तमानात परतली.

आज सुमती जेव्हा हॉलमध्ये फेऱ्या मारत होती आणि जुन्या आठवणीत पोहोचून सुयश ची आठवण ताजी करत होती, आज तोच दिवस होता .
एचआरडी मिनिस्ट्रीकडून आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात तिचं कत्थक प्रस्तुत झालं होतं.
टाळ्यांचा कडकडाट होत होता.
शेकडो फोटो टिपले गेले.
ते सारे फोटो पेपरमध्ये, टीव्ही वर आणि सोशल मिडीयावर झळकत होते.

"तो पाहिल ना जगातल्या कुठल्यातरी कोपऱ्यातून, नक्की पाहिल!" ती स्वतःलाच सांगत होती.

का कुणास ठाऊक पण ती आज त्याच्यासाठी खूप व्याकूळ झाली होती.
त्याच्या त्या विश्वासावरच ती नृत्य शिकली हाेती.
कत्थक सारख्या शास्त्रीय नृत्यात तिने प्रावीण्य मिळवलं होतं. साधना केली होती. आज स्वतःचं डान्स स्कूल काढलं होतं.
स्वत च्या छंदाशीच जणू विवाहबद्ध झाली होती.
आज रेडिओ लावला शांत आराम खुर्चीत बसली.
लताबाईंच्या आर्त सूर खोलीत पसरला होता "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे !

ती त्या गाण्यात हरवली आणि अशी कल्पना करत राहिली की जगातल्या कुठल्यातरी एका कोपऱ्यातून तो हे सगळे फोटो पाहतो आहे , तिला तिथून आशीर्वाद देत आहे . आणि ती मनसोक्त हसली एकटीच !

नैतिकतेच्या आधारे किंवा कल्पनेतल्या असेल पण तो तिचा गुरू झाला होता.

आयुष्यात कुठलं एक वाक्य जीवन बदलून टाकेल सांगता येत नाही म्हणून अशा घटना किंवा असे लोक गुरू बनून राहतात जे एकलव्यासारख्या शिष्याच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतात .
गाणं चालत होतं-
" कळेना मी पाहते कुणाला ,
कळे ना हा चेहरा कुणाचा?
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे!
अजूनही वाटते मला की
अजूनही चांदरात आहे!

समाप्त
©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक १०. ०८ .२०२२

जिल्हा - संभाजीनगर ( औरंगाबाद )