अजूनही बरसात आहे भाग ३

अजूनही बरसात आहे



अजूनही बरसात आहे.. भाग ३

स्वरा लहानपणापासून अगदीच पाऊसवेडी.. पावसाची बरसात कायम तिला हवीहवीशी वाटायची. जणू पाऊस तिच्या आयुष्याचाच एक भाग बनला होता. पाऊस तिचं जगणं बनला होता. तिन्ही ऋतूत पावसाळा तिला भारी वाटायचा. तिचा डॅडा रविकांत तिला नेहमी चिडवायचा,

“तुझं हे पावसाचं वेडं पाहून मला असं वाटतंय की, तुझ्यासाठी नं बच्चा, चेरापुंजीत एक बंगला बांधावा. आणि तुला तिथे कायमसाठी ठेवून द्यावं. तिथे बाराही महिने पाऊस असतो म्हणे.. तिथे तू आणि तुझा लाडका पाऊस.. काय धिंगाणा घालायचाय तो घाला. एन्जॉय करा मस्त तुझ्या लाडक्या पावसाबरोबर..”

“हो.. चालेल मला डॅडा.. तू पण येशील ना माझ्या सोबत? आपण दोघे मिळून पावसात चिक्कार धमाल करू..”

स्वराने लगेच स्वीकृती देऊन टाकली. पावसावरून बापलेकीच्या अशा गंमतीजंमती, चिडवाचिडवी चालायची. आजही रविकांत आणि स्वरा दोघे मिळून पावसाची धमाल मस्त एन्जॉय करत होते.

“बापलेकीच्या या प्रेमाला कोणाची दृष्ट नको लागायला.”

दोघांचं निर्व्याज प्रेम पाहून देवाचे मनोमन आभार मानत कुसुम मनातल्या पुटपुटली.

दुसऱ्या दिवशी स्वरा आणि स्नेहल कॉलेजला जाण्यासाठी निघाल्या. आज स्नेहलकडे त्या गॅदरिंगमध्ये गाणाऱ्या अर्णव गोखलेची माहिती काढण्याची मोठी कामगिरी होती. दोघीही घाईने कॉलेजमध्ये पोहचल्या. काळभोर आभाळ गच्च भरून आलं होतं. पावसाची तिची काय गट्टी होती देव जाणे! जणूकाही आपल्या प्रियेसीच्या भेटीला आतुर झालेल्या प्रियकरासारखा तो धावून आला होता. स्वरा आणि स्नेहल कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करणार इतक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि स्वरा पुन्हा एकदा भान हरपून आकाशाकडे हात वर करून पावसाचे थेंब अंगावर झेलू लागली. त्या बरसातीत चिंब ओली झाली. पावसाच्या थेंबांचा ओला स्पर्श तिला सुखावत होता. स्नेहल मात्र पावसापासून स्वतःला वाचवत एका कॉलेजच्या इमारतीच्या एका कोपऱ्यात आडोश्याला जाऊन उभी राहिली. तिने स्वराला खेचून नेण्याचा खूप प्रयत्न केला पण स्वरा कोणाचं काहीही न ऐकता तिच्याच तालात पावसात टपोरे थेंब झेलण्यात गुंग होती. जणूकाही बाहेरील जगाचा तिला विसरच पडला होता. जगाची पर्वा न करता ती तशीच पावसात भिजत होती. आपल्याच नादात..

तो आपल्या मित्रांसोबत कँटीनच्या बाकावर बसून पाऊस न्याहाळत होता. इतक्या आल्हादकारी वातावरणात हातातल्या कपातील गरमागरम चहाचा घोट पावसाची मजा अजूनच द्विगुणित करत होता. इतक्यात त्याला पावसात भिजणारी स्वरा दिसली. सफेद टॉप आणि लाल रंगाच्या लॉन्ग स्कर्टमध्ये ती खूपच सुरेख दिसत होती. एखाद्या अवखळ शाळेकरी मुलीसारखी ती भासत होती. तिला पावसात भिजताना पाहून त्याला त्याच्या कवीमित्राची सुंदर कविता आठवली आणि आपसूकच त्या सुंदर कवितेच्या ओळी त्याच्या मुखातून बाहेर पडल्या.

पाउस म्हटले म्हणजे मग
ती वेडी अगदी होते
अन्‌ चिंब चिंब होताना
ती नाव कागदी होते

तो थरथरणारा चाफा
अन्‌ ती भिजलेली माती
गाणी त्या ओठांवरली
थेंबात विरघळुन जाती

ती खुशाल भिजते आणिक
हा जीव कापरा होतो
देहाच्या वळणावरला
तो थेंब नाचरा होतो

रे दग्ध यौवना हसते
पावसात ओघळताना
आवरू कसे मन माझे
तो थेंब थेंब जळताना

पाउस आणिक ती म्हणजे
जन्मोजन्मीच्या गाठी
तो जेव्हा जेव्हा येतो
ती येते भिजण्यासाठी

पावसास आठवताना
ती पाउसपक्षी होते
घन तिच्याचसाठी भरतो
बिजलीची नक्षी होते

घन बरसत बरसत येता
ती थेंब निथळता होते
हिरवीशी कच्ची ओली
मृद्गंधी काया लेते

© परेश पवार (शिव)

त्याने त्याच्या मित्राची कविता मोठ्याने सर्वांसमोर वाचून दाखवली.
“वाह! क्या बात है! एकदम भारी रे..”

असं म्हणत सर्वांनी टाळ्याच्या गजरात कवितेचं आणि सादर करणाऱ्याचं कौतुक केलं. कविता वाचून दाखवताना त्याच्या डोळ्यासमोर स्वरा दिसत होती. पावसाचे थेंब झेलणारी,पावसामुळे साचलेल्या पाण्यात देहभान विसरून नाचणारी, उड्या मारणारी स्वरा त्याच्या मनाला स्पर्शून गेली होती. पावसाचा जोर कमी झाला तशी स्नेहल तिच्यावर बरसली.

“वेडी आहेस का स्वरा? किती भिजलीस बघ.. हा पाऊस आला नं तुला काय होतं कोण जाणे? आता चल वर्गात..”

असं म्हणत स्नेहलने स्वराचा हात पकडून आत ओढलं. मोठ्या नाखुशीनेच स्वरा तिच्यासोबत वर्गाच्या दिशेने चालू लागली आणि समोरच तिला तिच्याकडे पाहत असलेला तो दिसला. दोघांची नजरानजर झाली. एकदम काळजाचा ठोका चुकावा असं तिला झालं होतं. काळेभोर डोळे, धारदार नाक, व्यायामाने कमवलेली पिळदार शरीरयष्टी, मजबूत बाहू, ओठांवर असलेली काळीभोर मिशीची महिरप त्याच्या रुबाबदार रूपात अजूनच भर घालत होती. पावसाने ओलसर झालेले त्याचे केस अजूनच छान दिसत होते. स्वराने किंचित लाजत त्याला स्माईल दिली. त्यानेही हसून तिला ओळख दाखवली. त्याचं ते दिलखेच हसणं पाहून ती जागीच थांबली. भान हरपून त्याच्याकडे एकटक पाहत होती. स्नेहलने हलवून जागं केल्यावर ती भानावर आली आणि निमूटपणे स्नेहलच्या मागोमाग वर्गाच्या दिशेने चालू लागली. स्वरा पुढे निघून गेली पण तिची नजर मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून त्याचाच शोध घेत होती. ती वर्गात तासाला बसली खरी पण मनात मात्र तोच घोळत होता. राहून राहून त्याचा हसरा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. तो, त्याचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आठवत होता. तो स्वर तिच्या कानात घुमत होता. तास संपून गेला तरी स्वरा स्वतःच्याच विचारात मग्न होती.

“चला मॅडम तास संपलाय.. की तुम्ही इथेच बसून राहणार? एक काम करा तुम्ही बसा इथेच.. मी जाते घरी.. आणि तुम्हांला जी माहिती हवीय ती सुद्धा जाऊ देत माझ्यासोबत घरी.. नाही सांगत मग कोणालाच..”

स्नेहल स्वरासमोर बोट नाचवत म्हणाली तशी स्वरा तिला लाडीगोडी लावू लागली.

“ए सांग ना यार.. प्लिज.. असं काय करते? तू कबूल केलं होतंस ना.. मग सांग ना मला.. कोण आहे तो?”

स्वरा आर्जवे करू लागली तसं थोडासा भाव खात स्नेहल म्हणाली,

“सांगेन.. पण आज जाताना एक गरमागरम कॉफी विथ चीज गार्लिक सँडविच देणार असशील तर बोल.. मंजूर? मान्य तर बोल नाहीतर…”

“हो गं बाई, एक काय चार वेळा कॉफी देईन.. तू फक्त त्याची माहिती सांग. नौटंकी कुठली..”

स्नेहल हरकून सांगू लागली.

“आमच्या गुप्तहेर संघटनेच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, त्याचं नाव ‘अर्णव गोखले’ सेकंड इयर बी ए. मूळचा सिंधुदुर्ग, कोकणातला. शिक्षणासाठी आपल्या कॉलेजात. सध्या मुक्काम पोस्ट आपल्या कॉलेजचं बॉईज हॉस्टेल. गायनाची आवड आणि त्यातच करियर करण्याची इच्छा.. छोट्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये गातो. कविता करण्याचा छंद.. उत्तम गिटार वादक.. आतापुरतं इतकंच..”

“अच्छा.. ‘अर्णव गोखले’ सेकंड इयर..”

स्वरा पुटपुटली. अर्णव स्वराचा सिनियर होता. आता तिच्या रोज अर्णवच्या डिपार्टमेंटजवळ चकरा होऊ लागल्या. ती त्याच्याशी बोलण्याचा बहाणा शोधू लागली. येता जाता त्याला पाहणं जणू तिचा छंदच झाला होता. रोज आरश्यात पाहून उगीच हसणं नित्याचं झालं. छान छान ड्रेस घालणं, मॅचिंग सॅन्डल्स, ज्वेलरी घालणं,मेकअप करणं, अर्णवसाठी नटणं तिला आवडू लागलं. खरंतर अर्णवलाही स्वरा आवडू लागली होती. कोणीतरी आपल्यावर असं वेड्यासारखं प्रेम करतंय ही भावना त्याला सुखावत होती. पहिल्यांदाच इतकं कोणीतरी आवडू लागलं होतं. सारखं त्याचं मन तिच्याकडे धाव घेत होतं. एक अनामिक हुरहुर.. काहीतरी विलक्षण गोड अर्णवच्या आयुष्यात घडत होतं. रोज अर्णवचे डोळे स्वराचा शोध घेत असायचे. ती दिसली की हृदयात एक हलकीच गोड कळ उठायची. ओठांवर हसू यायचं. मनात सतत तिचाच विचार असायचा. सतत आसपास तिच्या असण्याचा भास व्हायचा. तिच्याशिवाय कशातच त्याचं मन रमत नव्हतं.

"हे प्रेम तर नाही ना? का इतका हळवा होतोय मी? स्वरासाठी? ती मला हवीय माझ्या आयुष्यात कायम. येईल का? देईल का साथ जन्मभरासाठी? तिच्याही मनात हेच असेल का? तिचंही माझ्यावर प्रेम असेल का?"

अशा अनेक प्रश्नांनी त्याचा जीव व्याकुळ झाला होता पण तिला सांगण्याचा त्याला धीर होत नव्हता. स्वराची अवस्थाही काही वेगळी नव्हती. सतत अर्णवचा तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागला. त्याच्याच विचारात ती गुंग असायची. जेवणात, अभ्यासात साऱ्यावरून तिचं लक्ष उडून गेलं होतं.

“काय होतंय हे? का त्याच्याशिवाय मन कुठेच रमत नाही? का त्याची इतकी आठवण येते? का त्याचाच भास होतोय मला? मी त्याच्या प्रेमात पडलेय का? त्याला माझ्या बद्दल काय वाटत असेल? त्यालाही मी आवडत असेल का? आणि जर असेल तर तो का बोलून दाखवत नाही? मी एक मुलगी.. मी कसा पुढाकार घेऊ? माझ्या प्रेमाची कबुली मीच कशी देऊ?”

स्वराला बरेच प्रश्न पडले होते पण उत्तरं सापडत नव्हती. दोघांची मनोवस्था सारखीच होती. दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. आग तर दोन्ही बाजूनी लागली होती पण हे सांगणार कोण? कबुली देणार कोण? प्रेमातलं पहिलं पाऊल उचलणार कोण? दोघांपुढे मोठा यक्षप्रश्न उभा राहिला. मग एक दिवस अर्णवनेच पुढाकार घ्यायचं ठरवलं. आपल्या प्रेमाची कबुली देण्याचं ठरवलं. आताही पाऊस बरसत होता. तोच तर दोघांच्या प्रेमामधला खरा दुवा होता. दोघांच्या प्रेमाचा खराखुरा साक्षीदार..

पुढे काय होईल स्वरा अर्णवच्या प्रेमाचा स्वीकार करेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all