अजूनही बरसात आहे..
मेघा छाए आधी रात
बैरन बन गई निंदिया..
बता दे मैं क्या करूँ ||धृ ||
मेघा छाए आधी रात
बैरन बन गई निंदिया..
बता दे मैं क्या करूँ ||धृ ||
सब के आँगन दिया जले
रे मोरे आँगन जिया..
हवा लागे शूल जैसी
ताना मारे चुनरिया..
आयी हैं अंशु की बारात
बैरन बन गई निंदिया ||१||
रे मोरे आँगन जिया..
हवा लागे शूल जैसी
ताना मारे चुनरिया..
आयी हैं अंशु की बारात
बैरन बन गई निंदिया ||१||
बरीच रात्र उलटून गेलेली.. रेडिओवर लतादीदींच्या सुरेख आवाजातलं गाणं सुरू होतं. बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. अगदी स्वच्छंद. या पावसानं तिचं मन अगदी सैरभैर झालं होतं. एरवी हाच पाऊस तिला खूप आवडायचा पण आज तिलाच कळत नव्हतं. ती का इतकी बैचेन होतेय? काय सलतंय मनात? ती खूप अस्वस्थ होती. कॉफीचा घोट गोड लागण्याऐवजी कडवट लागत होता. आज लतादीदींच्या आवाजातलं तिचं आवडतं गाणं ऐकताना तिच्या मनात इतकं का काहूर दाटून येत होतं? पुन्हा पुन्हा कंठात उमाळे का दाटून येत होते? काही समजत नव्हतं. इतक्या वर्षांनी जुन्या जखमांवरील खपली उडाली होती. घाव पुन्हा हिरवा झाला होता. आज कित्येक वर्षांनी गाण्याच्या मैफिलीत तिनं त्याला पाहिलं होतं. तेंव्हापासून तिचं मन सैरभैर झालं होतं.
“तोच स्तंभीत करणारा आवाज.. अजूनही तोच गोडवा.. ती जादुई नजाकत, भान हरपून टाकणारे स्वर.. तेच गाण्यातलं माधुर्य.. सारं काही तेच..”
ती मनाशीच पुटपुटली. आपोआप मनाचे वारू भूतकाळाच्या दिशेने धावू लागले. डोळ्यातला पाऊस आपसूकच बरसू लागला. आठवणींची गर्दी झाली. कॉलेजच्या मखमली दिवसांतला सोनेरी क्षणाचा कप्पा अलगद उलगडत होता. गॅदरिंगचा तो दिवस जश्याचा तसा डोळ्यांसमोर उभा राहिला. जणू काही काल परवाच घडलेली गोष्ट.. तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारा तो डोळ्यांसमोर फेर धरू लागला.
“त्या दिवशीही असाच पाऊस कोसळत होता..”
खिडकीतून ओथंबणारे थेंब पाहून ती स्वतःशीच बडबडली. ती पावसाळी रात्र.. गंधाळलेले ते क्षण, रोमांचित करणारा तो त्याचा स्पर्श.. सारं डोळ्यासमोर तरळून गेलं.. ती जुन्या आठवणीत हरपून गेली. तिला तो रम्य काळ आठवला आणि भरून आलेल्या आभाळासारखी तिची अवस्था झाली.
कॉलेजचं पहिलंच वर्ष.. ते सोनेरी दिवस.. स्वप्नांचा वेध घेणारं, फुलपाखरांचे पंख लावून उडण्याचं ते वय. प्रेमात वेडं होण्याचं, फुलायचं, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झोपळ्यावाचून झुलायचं वय.. स्वराने कला शाखेत पहिल्या वर्षासाठी ऍडमिशन घेतलं होतं. मे महिना संपून नुकताच जून महिना सुरू झाला होता. स्वराचं कॉलेजही सुरू झालं होतं. अजून अभ्यासक्रमाला फारशी सुरुवात झाली नव्हती. आज सिनियर मुलांचं गॅदरिंग होतं. सिनियर ज्युनियर सर्वांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. संध्याकाळी चार वाजता सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ऑडीटरियम मध्ये एकत्रित येण्यास सांगितलं होतं. स्वरा आणि तिची मैत्रीण स्नेहल कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्टॉपवर थांबल्या होत्या आणि अचानक कूस पालटावी तशी ऋतुचक्राने कूस पालटली रखरखीत उन्हाच्या झळा लागत असताना अचानक सोसट्याचा वारा सुरू झाला. काळ्या ढगांनी सूर्य झाकोळून गेला. अचानक हवेत गारवा वाटू लागला आणि पहिल्या पावसाने आपली वर्दी दिली. अचानक आलेल्या पावसानं रस्त्यावरच्या गर्दीची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली होती. छत्री, रेनकोट काहीही सोबत नसल्याने बरेचजण पावसापासून वाचण्यासाठी बसस्टॉप, आजूबाजूच्या दुकानात आडोश्याला शिरले. पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.
“असा कसा आगंतुकासारखा आलाय कोण जाणे! आधीच कॉलेजला जायला उशीर झालाय आणि हा थांबायचं नाव घेईना. गॅदरिंग सुरुही झालं असेल.”
स्वराकडे पाहत स्नेहल बडबडली. स्वराचं मात्र तिच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. पावसाचे थेंब अंगावर झेलण्यात ती गुंग होती. तिला पाऊस खूप आवडायचा. हात पसरून आकाशाकडे तोंड करून पावसाचे थेंब झेलताना तिला प्रचंड आनंद व्हायचा. आजही ती चिंब भिजली होती. गुलाबी रंगाचा चुडीदार तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता. चाफेकळी नाक, गालावर गोड खळी, पाणीदार काळेभोर बोलके डोळे, नाजूक गुलाबी ओठांच्या पाकळ्या. हातात नाजूक सोन्याचं ब्रेसलेट, काळेभोर केस मोकळे सोडलेले. मधेच तिचं ते गोड मधाळ हसू. हृदयाचा ठोका चुकवणारा तिचा तो कटाक्ष.. पावसाच्या धारा झेलतानाचं तिचं ते रूप अधिकच मोहक दिसत होतं. इतक्यात स्नेहलला बस येताना दिसली.
“स्वरा, काय वेडेपणा आहे हा? अगं, किती भिजली आहेस! अशीच ओलेत्याने गॅदरिंग पाहत बसणार आहेस का? आजारी पडशील ना! चल बस आली बघ. पुरे आता..”
स्नेहलने अक्षरशः तिला खेचून पुन्हा बसस्टॉपवर आणलं. मोठया नाखुशीनेच स्वरा बसमध्ये चढली.
“आह..! सुरेख..”
स्वराला पाहताच त्याच्या मुखातून कौतुकाने आपसूक शब्द बाहेर पडले. तो तिच्याकडे पाहतच राहिला.
“काय गं तू पण.. किती छान पाऊस कोसळतोय आणि तू.. अगदीच अनरोमँटिक आहेस बघ.”
स्वरा नाखुशीनेच नाक फुगवून बसमध्ये खिडकीशेजारच्या सीटवर बसत स्नेहलला म्हणाली.
“असू दे मी अनरोमँटिक. तू आहेस ना रोमँटिक तेच बस झालं. ”
स्नेहल तिला चिडवत म्हणाली. बाजूच्या सीटवर बसलेला मुलगा आपल्याकडे एकटक पाहतोय हे स्वराच्या लक्षात आलं.
“काय विचित्रच आहे हा.. कधी मुलगी पाहिली की नाही.. कसा एकटक बघतोय..”
ती त्याच्याकडे रागाने पाहत पुटपुटली. तिने त्रासिक मुद्रा करून त्याच्याकडं पाहिलं तसं त्यानं तिच्यावरून आपली नजर हटवली आणि तो खिडकीबाहेर पाहू लागला.
थोड्याच वेळात बस कॉलेजच्या स्टॉपवर थांबली तश्या त्या दोघी खाली उतरल्या. आधीच त्यांना खूप उशीर झाला होता.
“चल लवकर स्वरा, कार्यक्रम संपला असेल..” स्नेहल म्हणाली.
“मग कशाला जायचं ऑडिटरीयममधल्या रिकाम्या खुर्च्या गोळा करायला? राहू दे ना गं.. आपण जाऊया ना परत..पावसात भिजूया मस्त!”
स्वरा उत्साहाने म्हणाली.
“नाही.. आपण ऑडिटरियममध्ये जाणार आहोत उरलेला कार्यक्रम पाहायला.. समजलं तुला?”
स्नेहल तिला दटावत म्हणाली. धावतच त्या कॉलेजच्या ऑडीटरियममध्ये पोहचल्या. सर्व विद्यार्थी आधीच जमले होते. अर्ध्याहून अधिक कार्यक्रम संपला होता. त्या दोघी समोर मांडलेल्या रिकाम्या खुर्चीत जाऊन बसल्या. कार्यक्रमाची लवकरच सांगता होणार होती. शेवटचा परफॉर्मन्स बाकी होता. कोण्या अर्णव गोखलेचं गाणं सादर होणार होतं. संयोजकांनी तसं घोषित केलं आणि ते मागील बाजूस निघून गेले. तो मागच्या बाजूने स्टेजवर आला. त्यानं उजव्या हातात माईक पकडला आणि पहिला सूर लावताच पूर्ण हॉलमध्ये निरव शांतता पसरली. थेट काळजाला हात घालणारा आवाज, जादुई, किती नजाकत, अगदी मुरलेल्या गायकासारखा!
“अरे, हा तर तोच बसमध्ये भेटलेला..”
स्वरा मनातल्या मनात पुटपटली. तिला खूप आश्चर्य वाटलं. त्याचं गाणं ऐकण्यात ती तल्लीन झाली.
“रिमझिम गिरे सावन…”
गाणं संपलं तसं लगेच दुसऱ्या गाण्याची फर्माईश आली. एक, दोन, तीन एकामागून एक फर्माईशी येत होत्या. तो फर्माईशी पूर्ण करत एका पाठोपाठ गाणी गात होता. त्याचं गाणं इतकं सुरेख होतं की कोणालाच वेळेचं भान उरलं नव्हतं. बराच उशीर झाला होता. संयोजकांनी त्याला खुणावलं तसं तो सर्वांचे आभार मानून स्टेजवरून खाली आला. टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढच्या वर्षी खास त्याच्या गाण्यांची मैफिल सजवू असं सांगून संयोजकांनी नाईलाजाने कार्यक्रमाची सांगता केली. सर्व मुलं, मुली हॉलबाहेर पडू लागली पण स्वरा मात्र अजूनही एकसारखी स्टेजकडे पहात होती. स्नेहल तिला वारंवार सांगत होती.
“गाणं संपलं चला निघूया आता..”
पण ती जागेवरून हललीच नाही. गाण्यात तिची तंद्री लागली होती की घरी निघायचं तिला भानच राहिलं नाही. इतक्यात अर्णव समोरून येतांना दिसला. ती सरळ त्याच्यासमोर जाऊन हात पुढे करून म्हणाली,
“मी स्वरा, सर तुमचा ऑटोग्राफ द्या ना प्लिज..”
तो मिश्किलपणे हसला.
“कारण कळेल का?” - अर्णव
“सर तुमचा आवाज अजूनही कानात घुमतोय. गाणं संपलं तरी मला कळलं नाही.”
“पण बसमध्ये भेटलो तेव्हा तर तुमची प्रतिक्रिया वेगळी होती. तो तुम्ही माझ्याकडे रागाने पाहून टाकलेला कटाक्ष मी विसरलेलो नाही..”
तो मिश्किलपणे म्हणाला तशी ती दातांनी ओठ दाबून हसली. मग अर्णवनेच तिच्या समाधानासाठी ऑटोग्राफ दिला अन एक गोड स्माईल देऊन तिथून निघून गेला. खरंतर पुन्हा पुन्हा मान वळवून त्याच्याकडे पहावं असाच होता तो.
“हाय रे! कसला गोड आवाज आहे यार! अगदी मंत्रमुग्ध करणारा.. मनाला भुरळ घालणारा.. शिवाय त्याचा जबरदस्त ऍटिट्यूड, डोळ्यात स्पार्क.. त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं हसणं, सारंच दिलखेच.. रुबाबदार..किती हँडसम दिसतोय यार!”
स्वराच्या मनानं कौल दिला.
“पण कोण आहे हा? आजवर का दिसला नाही? कॉलेजमध्ये नवीन आलाय का?”
स्वराने ऑटोग्राफ बुक कडे पाहिलं.
“अर्णव गोखले”
स्वाक्षरी पाहून तिच्या तोंडून आपसूकच शब्द बाहेर पडले.
कोण होता हा अर्णव? हा पाऊस स्वराच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार आहे? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)
©निशा थोरे (अनुप्रिया)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा