अजूनही बरसात आहे.. भाग ६

अजूनही बरसात आहे



अजूनही बरसात आहे.. भाग ६

ऋतूचक्र वेगाने फिरत होतं. अर्णव आणि स्वरा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तसं अर्णववर कॉलेजमधल्या बऱ्याच मुली मरत होत्या. त्याने एकदा तरी त्यांच्याकडे पाहावं, बोलावं म्हणून तरसत होत्या पण अर्णव मात्र फक्त स्वराच्या प्रेमाच्या धुंदीत धुंद होता. कॉलेजच्या मुलीना स्वराचाही हेवा वाटत होता. तीन वर्ष कसे निघून गेले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. अर्णव पदवीधर झाला. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम. घरात तोच थोरला असल्याने सर्वांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण त्याच्यासाठी त्याचं गाणं हेच सर्वस्व होतं. श्वास होता. गाण्यातच करियर करायचं त्यानं मनाशी पक्कं केलं. तो प्रयत्न करत होता. छोटया मोठया कार्यक्रमात गायचा. छान गिटार वाजवायचा. पैसे कमावण्यापेक्षा नावारुपाला येणं त्याच्यासाठी जास्त महत्वाचं होतं पण त्याला म्हणावं तसं यश येत नव्हतं. छंद आणि करियर याची सांगड घालणं त्याला कठीण जात होतं.

चार पैसे कमावणं त्याच्यासाठी खूप गरजेचं होतं म्हणून मग त्याने एका म्युजिकल इन्स्टिटयूटमध्ये गिटार वाजवायला शिकवण्याचं, गाण्याची आवड असणाऱ्यांना शास्त्रीय गाणं शिकवण्याची अर्धवेळाची नोकरी पत्करली. त्याचबरोबर गाण्याची छोट्यामोठ्या कार्यक्रमाची आमंत्रणंही तो स्वीकारू लागला. पदवीधर झाल्यानंतर अर्णवचं कॉलेज संपलं. स्वराचं कॉलेजचं अजून एक वर्षे बाकी होतं. त्याचं कॉलज संपल्याने स्वराला भेटणं जवळजवळ अशक्य होऊ लागलं. म्हणून मग या समस्येवर दोस्त अभिषेकने तोडगा सुचवला आणि अर्णवने पुन्हा त्याच कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्यूशनसाठी ऍडमिशन घेतलं. त्या निमित्ताने स्वरा डोळ्यांसमोर राहील, रोज तिला भेटता येईल हा हेतू होता. स्वरा पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. दरवर्षी पदवीच्या फायनल परीक्षा नेहमी एप्रिल मे महिन्यात असायच्या पण यावर्षी थोड्या पुढे ढकलल्या गेल्या. जुन महिन्याच्या पंधरा तारखेपासून परीक्षा सुरू होणार होत्या. जश्या परीक्षा तोंडावर आल्या तसे सर्वजण परीक्षेच्या तयारीला लागले. जुन महिना सुरू झाला आणि आपल्या दरवर्षीच्या नियमानुसार  स्वराच्या लाडक्या पावसाचं जोरदार आगमन झालं. धो धो पाऊस पडू लागला की पाऊसवेड्या स्वराला चिंब भिजण्याची लहर येऊ लागली. 

एक दिवस स्वरा, अर्णव कॉलेजचा तास संपल्यानंतर ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणींसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा घेत गप्पा मारत बसले होते. गप्पांचा विषय परीक्षा, अभ्यास हाच होता पण शरयूने मात्र आज एकदम वेगळाच सूर आळवायला सुरुवात केली होती.

“फ्रेंड्स, आपल्या परीक्षा जवळ आल्यात. आता कॉलेजही संपून जाईल. त्यानंतर कोण कुठे असेल काय माहित? पुन्हा भेट होईल की नाही सांगता येत नाही..”

शरयू सुस्कारा टाकत म्हणाली.

“असं का म्हणतेस यार? कॉलेज संपलं तरी आपण भेटत राहू. एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असू.. असं निर्वाणीचं बोलू नकोस गं.. फार वाईट वाटतं मला.”

स्वरा शरयूला समजावणीच्या सुरात म्हणाली. इतक्यात काजोल सिन्हा म्हणाली

“पण यार, काय मस्त क्लायमेट झालंय बघ ना.. अश्या वातावरणात कुठेतरी फिरायला जावंसं वाटतंय.. क्या कहते हो, चले? थोडा मस्ती करते है!”

“हाँ यार, आयडिया बुरी नही है! वैसे भी फिर कब मिलेंगे या नही मिलेंगे.. कुछ पता नही नां? एक दिन बाहर जाते है! चिल मारते है! दिन यादगार बनाते है! क्या कहते हो?”

समीरने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“पण जायचं कुठे? जास्त लांब नको हा.. उगीच प्रवासात जास्त वेळ जातो. प्रवासानेच दमायला होतं आणि मग मज्जा करण्यासाठी एनर्जीच नसते. जवळपास जाऊया.”

सायलीने आपली भूमिका स्पष्ट केली.

“अरे मग एक दिवसासाठी म्हणत असाल तर इथे जवळच महाबळेश्वरला जाऊ.. आपापल्या बाईक्स घेऊन जाऊ.. माझ्या काकांचं फार्महाऊस आहे तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा केअर टेकरही असेल. घरगुती पद्धतीचं जेवण मिळेल आपल्याला. मी त्यांना सांगितलं तर ते आपली राहण्याची उत्तम सोय करतील. आपण शनिवारी पहाटे निघू.. दिवसभर मस्त फिरू, सगळे पॉईंट्स पाहू.. एक रात्र स्टे करू आणि दुसऱ्या दिवशी निघू परत.. काय म्हणता? तिथे बरंच काही पाहण्यासारखं आहे.. आणि पावसाळ्यात तर भारी असतं सगळं.. दिवसभर मस्त भटकंती करायची.. रानात फिरायचं, रानमेवा खायचा मस्त गावरान तिखट झणझणीत जेवणावर ताव मारायचा आणि दंगा मस्ती करत यायचं परत.. सांगा ना जाऊया का?

प्रांजलने प्रस्ताव मांडला. सर्वांनाच तिचा प्रस्ताव आवडला. नाही, हो म्हणत गहन चर्चेनंतर सर्वांचं एकमत झालं. सहलीसाठी अनेक जागांची चर्चा झाल्यावर एक दिवसासाठी महाबळेश्वराला प्रांजलच्या काकांच्या फार्महाऊसवर जाण्याचा प्लॅन ठरला. प्रांजलने लगेच तिच्या काकांना फोन करून तिकडे येत असल्याचं सांगून टाकलं. घरी येताच स्वराने आईला ट्रिपबद्दल सांगितलं.

“आई, आम्ही पिकनिकला जाणार आहोत. महाबळेश्वरला.. प्रांजलच्या काकांचा बंगलो आहे तिथे.. तिने परवानगी घेतलीय काकांची.. येत्या शनिवारी निघणार आहोत.”

“नाही स्वरा बेटा, तरुण मुलींनी असं एकटीने नाही जायचं कुठे.. ऐकतेस ना? काय काय बातम्या छापून येतात पेपरमध्ये.. उगीच रिस्क नको.. हवंतर आपण काही दिवसांसाठी कोकणात जाऊया तुझ्या डॅडासोबत आपल्या फार्महाऊसवर.. पण एकटं कुठेही जायचं नाही. माझी परवानगी नाही.”

कुसुम निक्षुन म्हणाली.

“अगं आई, मी एकटी कुठेय? माझ्याबरोबर माझे फ्रेंड्स आहेत. आणि फार दूर नाही. महाबळेश्वरलाच जातोय. तेही प्रांजलच्या काकांच्या फार्महाऊसवर.. प्लिज आई.. जाऊ दे ना गं.. एकदा का कॉलेज संपलं की पुन्हा कोण कुठे असेल.. आमची भेट होईल की नाही काय माहित.. प्लिज ना.. डॅडा तू तरी सांग ना आईला..”

रडवेली होत तिने तिच्या बाबांकडे पाहिलं. रविकांत सोफ्यावर पेपर वाचता वाचता दोघी मायलेकींचं बोलणं ऐकत होता. स्वराच्या आवाज देण्याने त्याने पेपरमधून डोकं वर काढलं आणि कुसुमकडे पाहून म्हणाला.

“जाऊ दे ना तिला. आता काय लहान राहिलीय का ती प्रत्येक गोष्टीत आपली परमिशन घ्यायला? ती मित्रमैत्रिणींसोबतच जातेय ना? तेही आपल्या ओळखीतल्या.. जाऊ दे तिला..आता नाही एन्जॉय करणार तर कधी? जा स्वरा तू जा..”

“करा काय करायचं ते.. तुमच्या असल्या फाजील लाडानेच तर ती बिघडत चाललीय. अजिबात ऐकत नाही. तुमची फूस असल्यावर काय? मुलगी मोठी होतेय. काही विपरीत घडायला नको म्हणून बोलतेय. पण इथे माझं कोण ऐकतेय?”

असं म्हणत कुसुम रागाने किचनमध्ये निघून गेली. स्वराने रडवेलं होऊन बाबांकडे पाहिलं.

“तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या आईला मी समजावतो. बरं तुझ्यासोबत कोण कोण आहेत? कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊन ठेव.. आपली मोठी गाडी घेऊन जा ड्राईव्हर काकांना पण सोबत घेऊन जा.. ”

रविकांत म्हणाला.

“अरे डॅडा त्याची काहीही आवश्यकता नाही. मोठी गाडी नको. तुलाही लागेलच ना? हे बघ आमच्या ग्रुप मध्ये पाचजणांकडे बाईक्स आहेत. आम्ही एकूण दहाजण आहोत. होऊन जाईल मॅनेज.. तू काळजी करू नकोस आणि इथे महाबळेश्वरला तर जायचं आहे. लांब जाणार असतो तर आपलीच गाडी काढली असती मी..”

स्वरा रमाकांतला पिकनिक बद्दल भरभरून सांगत होती

“बरं ठीक आहे.. सावकाश जा.. मस्त एन्जॉय करा..”

रविकांतने परवानगी दिली तशी स्वरा आनंदाने त्याला बिलगत म्हणाली.

“थँक्यू डॅडा, तू या साऱ्या जगातला बेस्ट डॅडा आहेस. आय लव्ह यू सो मच डॅडा.. पण तू आईला समजावशील ना?”

रविकांतने मान डोलावली तशी स्वरा आनंदाने आत तिच्या खोलीत निघाली. जाता जाता ही आनंदाची बातमी तिने लगेच मैत्रिणींना कॉल करून कळवली.

दुसऱ्या दिवशी सर्वजण नेहमीच्या ठिकाणी गोळा झाले. स्वरा, शरयू, प्रांजल, अभिषेक, स्नेहल, समीर, काजोल, विवेक आणि सौरभ आपापल्या बॅगा घेऊन अर्णवची वाट पाहत उभे होते. अजून अर्णवचाच तपास नव्हता.

“अरे यार, हा अर्णव ना नेहमी लेट करतो? स्वरा हा नक्की येणार आहे ना? आपल्याला टांग तर दिली नाही ना?”

सौरभ त्रासून म्हणाला.

“अर्णव येणार आहे. त्याने मला तसं सांगितलंय. काहीतरी काम आलं असेल. आपण त्याची वाट पाहूया..”

स्वरा रस्त्याकडे पाहत म्हणाली.

“आणि तो आलाच नाही तर?”

मुद्दाम तिला चिडवण्यासाठी काजोल म्हणाली.

“मग मी पण येणार नाही. जा तुमचे तुम्ही..”

नाक फुगवत स्वरा म्हणाली. इतक्यात समोरून तिला अर्णव बाईकवरून येताना दिसला. आकाशी रंगाचा टी शर्ट आणि क्रिम कलरची कॉटन जिन्स, डोळ्यावर काळ्या रंगाचा गॉगल टी शर्टची पुढची दोन बटणं उघडी असल्याने मध्येच डोकावणारी सोन्याची चेन त्याच्या रुबाबात आणखीनच भर टाकत होती.

“कसला हँडसम दिसतोय यार.!”

त्याला पाहून स्वरा मनातल्या मनात पुटपुटली.

“सॉरी.. सॉरी.. सॉरी.., थोडा लेट झाला.. वाटेत ट्रॅफिक लागलं.. चला निघूया?”

सर्वांनी होकार दिला. अर्णवच्या बाईकवर मागे स्वरा बसली. ज्यांच्याकडे बाईक्स होत्या त्यांनी एकेकीला मागे बसवलं. आणि आपल्या गतीने महाबळेश्वरच्या दिशेने निघाले.

पुढे काय होतं? ती पावसाळी रात्र आयुष्यात काय वळण घेऊन येईल पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया )

🎭 Series Post

View all