Login

अजूनही बरसात आहे.. भाग ४

अजूनही बरसात आहे

अजूनही बरसात आहे..भाग ४

दोघांची अवस्था फारच वाईट होती. पुढाकार कोण घेणार हा प्रश्न होता. अर्णव स्वराचाच विचार करत आपल्या खोलीत बसला होता. पाऊस त्याच्या मनाप्रमाणे बरसतच होता. इतक्यात त्याचा मित्र अभिषेक आत आला. ओले झालेले केस टॉवेलने पुसत त्याने अर्णवला विचारलं.

“काय मित्रा! असा का खोलीत एकटाच बसला आहेस? कसला एवढा विचार करतोयस? बाहेर बघ किती मस्त रोमँटिक वातावरण आहे. चल चहा आणि सोबत मस्त कांदाभजी खाऊन येऊ.”

“नको यार अभिषेक.. तू जा..”- अर्णव

“अरे काय झालं? स्वरामुळे का?”

अभिषेक त्याला चिडवत म्हणाला. अर्णवने त्याला त्याची अडचण सांगितली.

“बस.. इतकंच.. काय यार तू पण.. मला वाटलं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय.. आता सोडवतो बघ तुझा प्रॉब्लेम पण लक्षात असू दे काम झालं की मला पार्टी द्यावी लागेल तुला..”

अभिषेक म्हणाला.

“हो करूया.. नक्की पार्टी करूया..प्रॉमिस..”

“थांब मी आलोच.. पण पार्टीचं तेवढं लक्षात ठेव..”

पार्टीचं प्रॉमिस घेऊन अभिषेक तिथून बाहेर पडला. अभिषेक अर्णवच्या कॉलेजच्या मित्रांपैकी सर्वात जिवलग मित्र. एकदम जिगरी दोस्त आणि आता स्वरा आणि तिच्या मैत्रिणींचाही चांगला मित्र झालेला. अर्णवच्या मनातलं स्वराविषयीचं प्रेम त्याला ज्ञात होतं. तिच्यासाठी अर्णवचं व्याकुळ होणं तो जाणून होता. अभिषेकला अर्णवची होणारी घालमेल, दिवसरात्र होणारी तडफड समजत होती. तोच तर होता या गोष्टींचा एकमेव साक्षीदार. मित्राच्या प्रेमाखातर अभिषेकने स्वराशी बोलायचं ठरवलं. अर्णवच्या मनाची अवस्था स्वराला सांगायचीच असा पक्का निर्धार केला आणि अर्णवच्या वतीने तो स्वराकडे त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यासाठी गेला. अभिषेक त्या दोन जीवांना प्रेमी युगलांना एकत्र आणू पहात होता.

दुसऱ्या दिवशी अभिषेक कॉलेज संपल्यानंतर वर्गाबाहेर स्वराची वाट पहात थांबला होता. स्वरा आणि तिच्या मैत्रीणी वर्गाच्या बाहेर पडल्या. इतक्यात अभिषेकने स्वराला आवाज दिला. त्याला पाहून स्वरा आणि तिच्या मैत्रिणी थांबल्या.

"हाय स्वरा, कशी आहेस? थोडं थांबशील? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.."

“हो.. बोल ना.. काय बोलायचं आहे?”

स्वराने प्रश्न केला.

“सांगतो.. पण..”

अभिषेक बोलता बोलता थांबला. त्याने स्नेहल आणि बाकीच्या मुलींकडे पाहिलं.

“काही महत्वाचं बोलायचं असेल पण आपल्यामुळे अभिषेकला स्वराशी बोलायला अडचण होतेय.”

ही गोष्ट स्नेहलच्या लक्षात आली. थोडा विचार करून ती स्वराला म्हणाली,

“स्वरा.. तू बोल अभिषेकशी. आम्ही पुढे कॅन्टीनमध्ये जातोय. गार्लिक सँडविच ऑर्डर करतो.. तू ये लवकर.. वाट पाहतोय.. गर्ल्स.. लेट्स गो..”

स्नेहल इतर मैत्रिणींसोबत कॅन्टीनच्या दिशेने चालू लागली. स्वरा अभिषेककडे चिंतेने पाहत म्हणाली,

"काय झालं अभि? एनी प्रॉब्लेम? सगळं ठीक आहे ना? काय सांगायचं तुला?"

थोडा थांबून दीर्घ श्वास घेत अभिषेक म्हणाला,

"स्वरा, मी जे तुला सांगणार आहे, ते तू प्लिज शांतपणे ऐकून घे. चिडू नकोस किंवा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. अर्णवविषयी मला तुझ्याशी बोलायचंय थोडं. मी इतक्या दिवसांपासून पाहतोय आणि मला जाणवतय अर्णव तुझ्यावर खूप प्रेम करतोय. त्याला तू खूप आवडतेस. दिवस रात्र तो फक्त तुझ्याच विचारात असतो.. हे बघ स्वरा जसा तो माझा मित्र आहे तशीच तू पण माझी मैत्रीण आहे आणि म्हणूनच मी तुला हे विचारण्याचं धाडस करतोय. तुला काय वाटतंय अर्णवबद्दल? तुझ्याही मनात तेच आहे का?"

स्वरा शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होती. एक गोड स्मित हास्य करत ती त्याला म्हणाली,

"अभि, तू तुझ्या मित्राबद्दल सांगितलंस, मी ऐकून घेतलं पण मला हे सगळं त्याच्या तोंडून ऐकायचं आहे. माझं उत्तर मी त्यालाच देईन.चल बाय.. मी निघते आता..”

स्वरा तिथून अभिषेकचा निरोप घेऊन आपल्या मैत्रिणींना जॉईन करण्यासाठी कॅन्टीनच्या दिशेने निघाली. खरंतर स्वरा मनातून सुखावली होती. तिला तर आधीपासूनच अर्णव आवडत होता. त्याचं तिच्याकडे पाहणं, काळजी करणं तिला आवडत होतं. त्याचं अदबीने वागणं, बोलणं तिला त्याच्याकडे आकर्षित करू लागलं होतं. मुलींविषयी त्याच्या मनात असलेला आदर त्याच्या वागण्यात, बोलण्यात कायम तिला जाणवायचा. त्याच्या कविता ऐकताना, वाचताना ती त्यात रमून जायची. त्याचं गिटार वाजवणं तिला अजून त्याच्याजवळ खेचून नेत होतं. त्याचं गाणं ऐकताना ती देहभान विसरून जायची. जणू काही गाण्यातल्या प्रत्येक बोलातून, शब्दातून तो तिला भेटायचा. तिला त्याची ओढ वाटू लागली होती. प्रेम वाटू लागलं होतं पण मनातलं ओठांवर आलं नव्हतं. स्वराची ही अवस्था स्नेहलला कळून चुकली होती. एक दिवस स्वरा आणि स्नेहल कॉलेजच्या आवारात बाकावर बसून गप्पा मारत होत्या. बोलण्यात अर्णवचाच विषय होता.

“स्वरा, अर्णव तुला इतका आवडतो तर तू प्रपोज का करत नाहीस त्याला?”

स्नेहल तिला विचारलं.

“तो खूप आवडतो मला.. पण मी कशी सांगू? मी एक मुलगी आहे. मी कसं बोलू?”

स्नेहलच्या प्रश्नावर स्वराने प्रतिप्रश्न केला.

“अरे त्यात काय? सरळ समोर जायचं.. हातातलं गुलाबाचं फुल समोर करायचं आणि ‘आय लव्ह यू’ बोलून टाकायचं.”

स्नेहल आपल्या नाटकी अंदाजात स्वराला म्हणाली.

“चल गं.. वेडी.. असं काही नाही करणार मी..”

तेंव्हा स्वराने स्वतःहून अर्णवशी बोलण्यास नकार दिला होता आणि आजच्या घडीला तिला अर्णवच्या मनातली गोष्ट अभिषेककडून समजली होती. अर्णवला ती खूप आवडते. त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे ऐकून तिला खूप आनंद झाला होता. कधी एकदा स्नेहलला हे सांगतेय असं तिला झालं होतं. स्वरा कँटीनमध्ये पोहचली. स्नेहल तिची वाट पाहत एका बाकावर बसली होती. बाकीच्या इतर मैत्रिणी घरी जायला उशीर झाला म्हणून पुढे निघून गेल्या होत्या. स्वराला पाहून स्नेहल उठून उभी राहिली.

“काय झालं गं? काय बोलला अभिषेक?”

तिने प्रश्न केला.

“स्नेहा.. स्नेहू माय डार्लिंग.. आय लव्ह यू..”

असं म्हणत तिला हाताला धरून गोल गिरकी मारली.

“अगं.. अगं.. थांब जरा.. काय झालं? इतकी का खुश? चक्कर येईल ना मला.. काय झालंय तुला?”

स्नेहल स्वराला थांबवत म्हणाली. स्वराने अभिषेक सोबत झालेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला. ते ऐकून स्नेहललाही खूप आनंद झाला.

“अरे व्वा! म्हणजे आग दोनो तरफसे लगी है! जलना तो तय है! मग तू काय म्हणालीस त्याला?”

आनंदून स्नेहलने विचारलं.

“मी अभिषेकला म्हणाले की, त्याने बोलू दे. त्याच्या तोंडून ऐकेन मी आणि त्यालाच उत्तर देईन.”

“मग?पुढे काय झालं?” - स्नेहल

“तो ठीक आहे म्हणाला. बघू पुढे काय होईल? चल आपण निघूया आता.. पाऊस येईल असं दिसतंय आणि मला भिजायचंय.”

स्वराने हसून उत्तर दिलं.

“नाही हं.. आता मी तुला मुळीच भिजू देणार नाही. आजारी पडलीस तर अर्णवला काय सांगायचं आम्ही? त्याच्या प्रेमाला सांभाळलं नाही? आता तुला अशी हेळसांड करून चालणार बाई..”

स्नेहल तिला चिडवू लागली. हसतखेळत गप्पा मारत त्या घरी परतल्या. मधेच तिच्या लाडक्या पावसाने वर्दी दिलीच. इकडे अभिषेकने खोलीवर येताच अर्णवला सर्व वृत्तांत सांगितला. अर्णव त्याची जणू वाटच पाहत होता. अभिषेकने बोलायला सुरुवात केली.

“हे बघ मित्रा, तिने मला तिच्या मनातलं स्पष्ट काही सांगितलं नाही. तू तिला विचारल्यावर सांगेन असं म्हणालीय. तुलाच तिला विचारावं लागेल. आपण एक काम करू. तिला मेसेज करू आणि भेटायला बोलवू किंवा मेसेज करण्यापेक्षा तू तिला कॉलच कर.. मेसेजने फार कन्फ्यूजन होतात.”

असं बोलता बोलता अभिषेकने स्वराला अर्णवच्या फोनवरून कॉल केला. मोबाईलच्या डिस्प्लेवर अर्णवचं नाव पाहून स्वरा हरकून गेली. तिने पटकन कॉल घेतला.

“हॅलो.. बोल अर्णव?”- स्वरा

“हॅलो स्वरा, मी अभिषेक.. थांब जरा अर्णवला तुझ्याशी बोलायचं आहे.”

असं म्हणून अभिषेकने अर्णवकडे मोबाईल दिला. अर्णवने आधी आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि बोलायला सुरुवात केली.

“हाय स्वरा, कशी आहेस? जेवलीस का? तिकडे पाऊस पडतोय? मला जरा..”

अर्णव घाबरतच बोलत होता.

“अरे इकडतिकडंचे काय प्रश्न विचारतोस? हवामनाच्या गप्पा मारायला फोन केलास का? मूळ मुद्द्याला ये..”

अभिषेक त्याला खुणावत दरडावून म्हणाला.

“थांब नां अरे.. बोलतो नां..”

अर्णव चाचरत बोलू लागला.

“अगं, उद्या तुझ्याकडे काही अर्जेंट काम आहे का? नसेल तर आपण उद्या संध्याकाळी भेटु शकतो? तुला कॉलेजजवळच्या सीसीडीमध्ये भेटायला यायला जमेल? मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे. येशील?”

एका दमात अर्णवने बोलून टाकलं.

“हो मी येईन..”


स्वराने त्याला भेटण्याचं कबूल केलं. ती हो म्हणताच अर्णवने लगेच कॉल कट केला.

“फट्टू साला, कितना डरता है! अरे फक्त भेटायला बोलवायचं होतं तुला. काय घाबरतोस?”

अभिषेक त्याला चिडवत म्हणाला. अर्णवने फक्त हसून त्याच्याकडे पाहिलं.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात?

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all