अजूनही बरसात आहे.. भाग २

अजूनही बरसात आहे

अजूनही बरसात आहे.. भाग २ 


“कोण आहे हा अर्णव? इतके दिवस आपल्याला कसा दिसला नाही? नवीन ऍडमिशन असेल? माहिती काढायला हवी..”

स्वराच्या मनात प्रश्नांची शृंखला तयार झाली. आपल्या मैत्रिणीला विचारात गढलेलं पाहून स्नेहलला तिला चिडवण्याचा मोह अनावर झाला.

“काय स्वरा डार्लिंग, पडली का विकेट? एकदम क्लिन बोल्ड का?”

फिदीफिदी हसत स्नेहलने प्रश्न केला.

“हाय! काय सांगू तुला यार.. एकदम मार डाला.. कलेजा खल्लास..”

एकदम छातीवर हलकीच मूठ आपटत मरण्याचा अभिनय करत दीर्घ श्वास घेत स्वरा म्हणाली.

“पण कोण आहे हा? कुठून आलाय? कोणत्या वर्गात? आपल्याला माहिती हवीय याची..”- स्वरा..

“अरे फिकर नॉट.. उद्याच सगळी इन्फॉर्मशन काढून देते. आपली गुप्तहेर संघटना कामाला लावते. टेन्शन नही लेने का.. हम दोस्त किस कामके फिर? दोस्तीके लिए तो जान भी हाजीर है मेरी जान.. और जान सलामत रही तो ही स्वरा तेरा काम हो पायेगा.. तो फिर चलो.. जिंदा रहनेके लिए कुछ पेटपूजा करते है!”

स्वराच्या गळ्यात हात टाकत स्नेहल म्हणाली.

“चला.. नौटंकी कुठली! इमोशनल ब्लॅकमेल करतेय.. मला माहित होतं, माझ्या खिशाला चाट लावणारच तू.. पण उद्या मला त्याची सगळी माहिती हवीय समजलं का?”

स्नेहलने हो म्हटलं तसा तिचा जीव भांड्यात पडला. पोटपूजा करून दोघीही घरी परतल्या. घरी येताना पुन्हा एकदा पावसाची सर धावून आली. पाऊसवेडी स्वरा पावसात चिंब भिजली होती. दारावरची बेल वाजवली. स्वराच्या आईने दार उघडलं. तिला पाण्यात निथळताना पाहून कुसुमचा पारा चढला.

“स्वरा, किती भिजलीस? आजारी पडशील ना..”

“मम्मा.. मम्मा..”

कुसुमचा हात पकडून स्वराने तिच्याभोवती जोरात गिरकी मारली.

“अगंगं.. हळू.. वेड लागलंय का तुला? चक्कर आली नं मला..”

डोक्याला धरत स्वराची आई म्हणाली.

“काय मस्त कार्यक्रम होता मम्मा.. आणि त्याचा आवाज तर इतका गोड होता की अजून माझ्या कानात घुमतोय.. वाटत होतं की फक्त त्यालाच ऐकत राहावं..”

स्वरा पुन्हा त्याच्या विचारात हरवून गेली. आईने हलवून जागं केल्यावर भानावर आली.

“हो समजलं.. तुझ्या गप्पा नंतर ऐकते.. आधी हे ओले कपडे बदलून ये नाहीतर सर्दी होईल.. आजारी पडशील.. जा पटकन..”

आईने तिला दराडून सांगितलं तशी स्वरा चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेली.

“अशीच आहे ही पाऊसवेडी अगदी आपल्या डॅडांवर गेलीय..”

कुसुम हसून स्वतःशीच बडबडली आणि स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. गॅसवर चहाचं आधाण ठेवलं. इतक्यात दारावरची बेल वाजली. कुसुमने दार उघडलं. समोर रविकांत, स्वराचे बाबा दारात चिंब भिजलेल्या अवस्थेत दारात उभे होते.

“अहो काय हे? थांबायचं ना थोडं.. काय घाई होती? किती भिजलात पहा.. आता या लवकर आत..”

रविकांत आत आला. कुसुम त्याला टॉवेल देत म्हणाली,

“डोकं पुसून घ्या पटकन.. असे कसे ओ तुम्ही दोघेपण? पाऊस म्हटला की दोघंही अगदी भान हरपून जाता.. ती पण बघा भिजून आलीय. मग सर्दी होते, आजारी पडते आणि मला निस्तरावं लागतं.”

काहीशी त्रासिक मुद्रा करत कुसुम म्हणाली. इतक्यात स्वरा बाथरूममधून बाहेर आली.

“काही नाही होत तिला.. ‘पंजाब दी शेरणी’ आहे ती. एवढ्याश्या पावसाने कुठे आजारी पडणार आहे का? आम्ही मस्त पाऊस एन्जॉय करतोय. तुझ्या सारखं नाही..सारखी पिरपीर.. हो की नाही स्वरा?”

रविकांतने आपल्या मुलीकडे पाहत म्हटलं. 

“अगदी बरोबर बोललास डॅडा.. इतका मस्त पाऊस आहे आणि हिची सारखीच भुणभुण सुरू आहे.”

आईला चिडवत स्वरा बाबांना येऊन बिलगली.

“आजारी पडलात की सांगते तुम्हा दोघांना..,”

चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवत कुसुम म्हणाली तसे दोघेही खळखळून हसले. 

‘स्वरा’ कुसुम आणि रविकांत यांचं एक छोटंसं सुखी कुटुंब.. रविकांत कौर शहरातले बडे उद्योजक.. व्यवसायिकांच्या राज्यातलं एक नामांकित प्रस्थ. रविकांत पंजाबच्या छोट्या गावात, गर्भश्रीमंत कुटुंबात चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्मास आलेला.. एक उमदा युवक.. वडिलोपार्जित शेती आणि दुग्धव्यवसाय.. गावात प्रतिष्ठित घराणं म्हणून मानसन्मान.. घरात कशाचीही कमी नव्हती. स्वतःच्या बळावर स्वतःचं विश्व निर्माण करण्याच्या ध्येयानं कधी रविकांतला झपाटलं त्याचं त्यालाच समजलं नाही. मोठ्या आशेने स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी रविकांतने आपल्या गावच्या सुरक्षित वातावरणातून मोठया शहरात पहिलं पाऊल टाकलं. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात त्याने उद्योग सुरू केला. सुरुवातीच्या काळात अनेक संकटाना तोंड देत, आर्थिक घडी सांभाळत त्याने आपल्या व्यवसायाची बीजे रोवली आणि हळूहळू त्याचा व्यवसाय वाढत गेला. घर, गाडी, बंगला सर्व कमावलं होतं. घरात नोकर चाकर सेवेला हजर होते. सुख, ऐश्वर्य पायाशी लोळण घालत होतं पण रात्रीच्या चंद्राला जसा अमावस्येचा शाप असतो तसंच रविकांतच्या ऐश्वर्यालाही जणू एक शाप होता. लग्नाला बारा वर्षे उलटून गेली होती पण अजूनही रविकांत आणि कुसुमच्या वंशवेलीला फुल उमललं नव्हतं. वैद्य, हकीम झाले, कित्येक दवाखाने पायाखाली पालथे घातले. डॉक्टर्स, औषधपाणी केलं. व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, नवस, उपासतापास करून झालं पण कुसुमला बाळ होतं नव्हतं. दोघंही अपत्यसुखासाठी आसूसले होते. कुसुमच्या माथी वांझपणाचा शिक्का बसला होता. कुसुमला नातेवाईकांत, शेजारीपाजारी कोणत्याही शुभ कार्यात आमंत्रित करत नव्हते. बायका कधी तोंडावर तर कधी तिच्या मागे ‘वांझ’ म्हणून तिला हिणवायच्या. त्यामुळं दोघेही फार दुःखी होते. सारं ऐश्वर्य कवडीमोल वाटायचं.

आणि एक दिवस विधात्याला कुसुमची दया आली असावी. देवाची कृपा झाली. बारा वर्षाचं एक तप लोटल्यानंतर इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कुसुमला दिवस गेले. घरात आनंदीआनंद झाला. कुसुमच्या या गरोदरपणाच्या दिवसांत रविकांत तिची मनापासून काळजी घेत होता. तिला हवं नको ते पाहत होता. घरात नोकर होते. या दिवसांत कुसुमची काळजी घेण्यासाठी रविकांतचे आईबाबा घरी आले होते. सर्व गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने होत होत्या.. जुन महिना सुरू होता. कुसुमचा नववा महिना संपून गेला होता. तिचे दिवस भरत आले होते आणि अचानक एका रात्री कुसुमच्या पोटात दुखू लागलं. रविकांतने आईला सोबत घेतलं. हॉस्पिटलला जाण्यासाठी ड्राईव्हर कार बाहेर काढायला सांगितली. आई ड्राईव्हर शेजारी पुढे बसली. त्याने कुसुमला मागच्या सीटवर बसवलं आणि तो तिच्या शेजारी बसला. तिला कुशीत घेऊन डोक्यावरून हात फिरवत तिला धीर देत होता. पावसाचे दिवस होते. सोसट्याचा वारा सुटला होता. बाहेर धो धो पाऊस पडत होता. कुसुम वेदनेने विव्हळत होती. तिच्या पोटात प्रचंड दुखत होतं. 

“कुसुम, थोडा धीर धर.. आपण हॉस्पिटलला पोहचूच लगेच. बघ बाहेर कसा छान पाऊस पडतोय. हा पाऊस आपल्या आयुष्यातही सुखाच्या सरी बरसवेल. आनंदाची बरसात कायम असेल. आपल्या बाळालाही पाऊस खूप आवडेल बघ. ”

रविकांतही घाबरला होता. कुसुमची अवस्था पाहून चिंतीत झाला होता. एकदाची गाडी हॉस्पिटलमध्ये पोहचली. डॉक्टरांनी लगेच तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली. कुसुमला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं. रविकांत आणि त्याची आई बाहेर थांबले होते. रात्रभर कळा सोसून अखेरीस कुसुमची सुटका झाली. तिने एका गोड मुलीला जन्म दिला. बाहेर येऊन नर्सने ही आनंदाची बातमी रविकांतला सांगितली.

“अभिनंदन मि. कौर.. तुम्ही बाबा झालात.. नन्ही परी आयी है..”

नर्सचे शब्द रविकांतच्या कानावर पडले. क्षणभर त्याला काहीच सुचेना. आनंदाने त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. त्याने आनंदाने आईला घट्ट मिठी मारली.

“माँ, तुम दादी बन गयी हो.. मुबारक हो..”

रविकांतच्या आईलाही खूप आनंद झाला होता. डॉक्टरांची परवानगी घेऊन तो कुसुमला भेटायला आत गेला. कुसुम खूप थकलेली पण तरीही खूप समाधानी वाटत होती. रविकांत ने डोळ्यांनीच तिला थँक्यू म्हटलं. ती लाजली. सिस्टरने रविकांतच्या हातात बाळाला दिलं. इवल्याश्या त्या गोऱ्या गोऱ्या पिल्लाला ओंजळीत घेताना रविकांत हरकून गेला. गालावर आनंदाश्रू ओघळले. बाहेर मस्त पाऊस कोसळत होता. पावसाच्या सरीचा नादमय आवाज मनाला मंत्रमुग्ध करत होता.

“स्वरा.. डॅडाची लाडकी स्वरा.. माझी सोनुली..”

रविकांतच्या तोंडून शब्द बाहेर पडले. कुसुमने हसून प्रतिसाद दिला. छोटया परीचा जन्म झाला जणू काही रविकांतचं बालपणच फिरून माघारी आलं. स्वराच्या येण्याने घरातला हरवलेला आनंद परतून आला होता. कुसुम आणि रविकांत तिच्या बाललिला पाहून सुखाने न्हाऊन निघाले होते. स्वरा सर्वांची लाडकी होती. तळहातांच्या फोडाप्रमाणे रविकांत आणि कुसुम तिला जपत होते. तिची प्रत्येक इच्छा, मागणी लगेच पूर्ण व्हायची. रविकांतचा तर ती जीव की प्राण होती. तिला पाऊस खूप आवडायचा. अगदी बाराही महिने पाऊस तिला हवा असायचा. लहानपणी अंगणात ती एकटीच पावसात नाचत राहायची. कुसुमने तिला आत घरात आणलं की पुन्हा थोड्या वेळात ती अंगणात. पाऊस नसला तर तासंतास शॉवरखाली बसून राहायची. कधी कधी रविकांतही तिच्या सोबत पावसात भिजायचा. शॉवरचा फवारा तोही मस्त एन्जॉय करायचा. 

“पाऊसवेडी.. अगदी आपल्या डॅडासारखी..ऐन धो धो पाऊस पडताना झालीय ना.. म्हणून बाईसाहेब असं पावसांचं वेडं घेऊन आल्यात.”

रविकांत कडे पाहून हसत कुसून म्हणाली. कुसुमने तिचं नावच ठेवलं होतं  ‘पाऊसवेडी' तिचं हे पावसाचं वेड सर्वांनाच माहित होतं. या वेडापाई शाळेत असताना तिने शिक्षकांचा ओरडाही खाल्ला होता पण तिला फरक पडत नसायचा. पाऊस आणि तिचं एक वेगळंच नातं होतं. पाऊस तिला इतका आवडायचा की जणू काही तिचा बालपणीचा मित्र.. तारुण्यातलं पहिलं प्रेम.. पाऊस तिच्यासाठी तिचा श्वास, तिच्या आनंदाचा पेटारा होता. मग हाच पाऊस पुढे तिला का नकोसा वाटू लागला असं काय घडलं की पावसात भिजणं तिला नकोसं वाटू लागलं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
© निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all