अजब प्रेमाची गहजब गोष्ट भाग 12

This Is A Love Story



विनिशाच्या आईने फोन का केला नाहीस व काय झाले होते तुझ्यात आणि निशांतमध्ये अशी चौकशी केल्यावर त्यांना निशांतची तब्बेत ठीक नाही हे कळले तेंव्हा विनिशाचे आई-बाबा संध्याकाळी त्यांच्या घरी आले.
निशांत बेडरूम मध्ये झोपला होता. त्यांना पाहून तो उठून बसला.
विनिशाचे बाबा,“कसं वाटतंय निशांत आता?” ते काळजीने म्हणाले.
निशांत,“ ठीक आहे मी आता.” तो म्हणाला.
विनिशाचे बाबा,“ बरं आराम कर तू आणि ऑफिसला जाऊ नको आता आठवडाभर तरी!” ते म्हणाले.
निशांत,“ हो ” इतकंच म्हणाला कारण त्याला खूप थकल्या सारखे वाटत होते. तो झोपला आणि विनिशाचे आई-बाबा हॉलमध्ये आले.विनिशाने तो पर्यंत कामवाल्या बाईला चहा करायला सांगीतला होता. ती हॉलमध्ये चहा घेऊन आली विनिशाने चहाचा ट्रे घेतला व ती गेली.विनिशाने आई-बाबांना चहा दिला.
विनिशाचे बाबा,“हे काय विनिशा निशांतची तब्बेत इतकी खालावली आणि तुला कळले ही नाही. तुला कसं कळणार म्हणा तू तर तुझ्या हट्टा पुढे आंधळी झालीस.सगळं सांगितले तुझ्या आईने मला!काय चुकलं ग त्याच तुझ्या काळजी पोटीच नाही म्हणतोय ना तो आणि तू त्याच्याशी अशी वागलीस ,नवरा आहे ना तुझा तो? मग तुला त्याच्या चेहऱ्यावर दिसलं नाही त्याला काही तरी त्रास होतो आहे ते? का तुला असं वाटतंय की फक्त तुझी जबाबदारी त्याच्यावर आहे पण त्याची ही जबाबदारी तुझ्यावर आहे ना? मला तुझा अभिमान वाटायचा विनिशा पण तू माझी मान शरमेने खाली केलीस निशांतशी असं वागून, वर रुसून घरी निघून आलीस त्याला एकट्याला सोडून! जर काल मी तुला निशांत बरोबर जबरदस्तीने नसत पाठवलं तर काय झालं असत आज; याचा विचार केलास का? त्याला काही झालं असत तर त्याच्या आई- वडीलांना काय उत्तर देणार होतीस तू सांग ना?आणि काल गिरीषला फोन केलास मग आम्हाला का नाही केलास फोन? हे बघ तुझ्या अशा वागण्याने तू निशांतला कायमच गमावून बसशील अजून वेळ गेली नाही सावर स्वतः ला!आणि फोन कर तुझ्या सासऱ्याना कळवं की निशांतला बरं नाही ते समजलं?” ते हे सगळं रागाने बोलत होते.
विनिशा मात्र सगळं खाली मान घालून अश्रु ढाळत ऐकून घेत होती. विनिशाची आई ते पाहून म्हणाल्या.
विनिशाची आई,“ रडू नकोस. काळजी घे निशांतची”अस म्हणून त्या तिच्या जवळ जाऊ लागल्या तर विनिशाच्या बाबा त्यांना अडवत म्हणाले.
विनिशाचे बाबा,“चला! ती लहान नाही तिचे अश्रु पुसायला आता ! तीस वर्षांची घोडी आहे आणि लग्न होऊन ही पाच- सहा वर्षे झाली पण हिला मात्र अजून आपल्या माणसाचा चेहरा ही वाचता येत नाही. अजून एक जर तुला निशांतशी भांडून माहेरी यातच असेल तर तुला माहेरचे दरवाजे बंद आहेत. निशांतची काळजी घे ” ते असं म्हणून निघून गेले.
विनिशा मात्र रडत राहिली. तिने निशांतच्या व स्वतः च्या ही ऑफिसमध्ये फोन करू आठवडा भराची रजा काढली. या घटनेला चार-पाच दिवस होऊन गेले. निशांतला आता बरे वाटत होते .रोज निशांतचे आई-बाबांचा फोन करून निशांतच्या तब्बेतीची चौकशी करत होते. विनिशाने त्याची काळजी घेतली.
निशांतला या आजारपणा मुळे विनिशाच्या भुणभुणी पासून जरा सुटका मिळाली.पण हट्ट सोडेल ती विनिशा कसली. ती फक्त निशांतची तब्बेत ठीक नाही म्हणून शांत होती. पण तिने या घटनेनंतर एक ठरवले की निशांतशी आता भांडण करायचे नाही.
●●●●
निशांत ऑफिसला जायला तयार होत होता. विनिशाला त्याने अजून दोन दिवस तरी ऑफिसला जाऊ नये असे वाटत होते.म्हणून ती त्याला म्हणाली.
विनिशा,“ लगेच बरं वाटलं की ऑफिसला जायची गरज आहे का? अजून दोन दिवस आराम कर” ती त्याला पाहत म्हणाली.
निशांत,“ बरं वाटतंय ना मला आता आणि ऑफिसमध्ये माझी बरीच कामे पेंडीग आहेत ती पूर्ण करायला हवीत. तू ही जा ऑफिसला संध्याकाळी आल्यावर बोलू.” तो तिला समजावत म्हणाला.
विनिशा,“ ठीक आहे.” ती म्हणाली.
त्यानंतर आठवडा उलटून गेला. तरी विनिशाने बाळाचा विषय काढला नाही. निशांतला वाटले. विनिशा शांत झाली. पण तो त्याचा भ्रम होता.एक दिवस रात्री झोपताना विनिशाने परत बाळाचा विषय छेडला.
विनिशा,“ मला तुझ्याशी बोलायचे आहे.” त्याच्या जवळ जात म्हणाली.
निशांत,“ बोल?” तो मोबाईलमध्ये पाहत म्हणाला.
विनिशा,“तो मोबाईल ठेव आधी” त्याचा मोबाईल काढून घेत म्हणाली.
निशांत,“आज मूड मध्ये दिसतायत मॅडम” तिला मिठी मारत म्हणाला.
विनिशा,“ऐक ना” ती म्हणाली.
निशांत,“ बोल ना मग मी ऐकतोय” तो तिच्या केसात हात फिरवत म्हणाला.
विनिशा,“ मला बाळा बद्दल बोलायचे होते”ती जरा चाचरत म्हणाली.
निशांत,“ आहेच का अजून तुझं ते?”तिला दूर करत म्हणाला.
विनिशा,“ त्या दिवशी गिरीष काय म्हणाला ऐकलेस ना? आपण गिरीषच्या ओळखीच्या गायनिक कडे जाऊन पाहू ना एकदा.” त्याच्या जवळ जात म्हणाली.
निशांत,“ तरी मला वाटलेच तू गप्प कशी आहेस” तो म्हणाला.
विनिशा,“प्लिज एकदा जर त्या गायनिक नी ही रिस्क आहे म्हणून सांगितले तर मी परत नाही विषय काढणार”ती त्याला मिठी मारत म्हणाली.
निशांत,“ ठीक आहे पण promise me. की जर गायनिक नी रिस्क आहे असं सांगितले तर तू हा हट्ट सोडणार!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
विनिशाने नुसता मानेने होकार दिला. दोघे एकमेकात एकरूप झाले. दोन दिवसांनी गिरीष च्या ओळखीच्या एका गायनिक डॉक्टरकडे ते गेले. डॉक्टरने मात्र विनिशाच्या प्रेग्नन्सी व डिलिव्हरीची पूर्ण जबाबदारी घेतली आणि नशीबाचे दान विनिशाच्या बाजूने पडले. निशांतला त्याचे हत्यार टाकून शरणागती पत्करावी लागली.नेहमी प्रमाणे विनिशाचा विजय झाला.
दोन महिन्यांतच विनिशाचे प्रेग्नन्सी रिपोर्ट पोसिटीव्ही आले. विनिशा खूपच खुष झाली. पण निशांतला मात्र तिची काळजी वाटत होती. पण विनिशाला पाच महिने कसलाच त्रास झाला नाही. सहाव्या महिन्या पासून निशांतनेच तिचे ऑफिसमध्ये जाणे बंद केले. तिला घरात बसून काम करण्याची परवानगी मिळाली.तरी बरीचशी तिची कामे निशांत करून देत असे. आता तिला प्रेग्नन्सीचा त्रास होऊ लागला होता. सातव्या महिन्या पासून तर तिला उठता बसता ही येत नव्हते. निशांतच्या मदतीने ती तिची दैनंदिन कामे करत होती.तिची आई ही आता अधून मधून येऊन राहत होती. निशांतच्या आईला मात्र ही बातमी ऐकून खूपच आनंद झाला होता.
आठव्या महिन्याच्या शेवटी मात्र विनिशाचे हात-पाय सुजले. तिचा बी.पी.ही वाढला त्यामुळे व बाळाची पूर्ण वाढ झाली असल्याने डॉक्टरांनी वेळे आधीच सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला व तिला ऍडमिट करून घेतले. विनिशाचा बी.पी. पाहून तिला त्याच दिवशी सिझेरियनला घ्यायचे ठरवले. निशांत मात्र खूपच टेन्शनमध्ये होता. त्याला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटत होती त्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली होती.
निशांतला नर्सने काही फॉर्म भरण्या व सह्य करण्यासाठी दिले.त्यातला एक फॉर्म वाचून निशांत सरळ डॉक्टरच्या केबिन मध्ये शिरला व त्यांना मोठ्याने भांडू लागला.
निशांत,“ what the Hell is this doctor? काय लिहिलंय यात की जर पेशंटला काही झाले तर तुम्ही जबाबदार राहणार नाही. हे सिझेरियन आम्ही आमच्या जबाबदारीवर करून घेत आहोत?” तो मोठ्याने बोलत असल्याने त्याचा आवाज ऐकून विनिशाचे बाबा पळतच आले.
डॉक्टर, “ Mr शिंदे its just formality you don’t worry. तुमची काळजी मी समजू शकते.विनिशाला काही नाही होणार” त्या निशांतला पाणी देत म्हणाल्या.
विनिशाचे बाबा म्हणाले.
विनिशाचे बाबा,“sorry डॉक्टर तो जरा घाबरला आहे त्यामुळे तो असं बोलतोय. मी फॉर्म्यालिटी पूर्ण करतो.” निशांतच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले.
डॉक्टर,“ its ok मी समजू शकते” त्या म्हणाल्या.
विनिशाचे बाबा निशांतला केबिन मधून बाहेर घेऊन आले. सगळ्या फॉर्म्यालिटी त्यांनी पूर्ण केल्या.विनिशाला स्ट्रेचरवरून ओ.टी. मध्ये घेऊन जाताना निशांत तिच्या जवळ गेला व म्हणाला.
निशांत,“ promise me.तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस बोल ना!” त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.
विनिशा,“ वेडा आहेस का तू? मी तुला सोडून कोठे ही चालले नाही आणि जाणार ही नाही.” त्याचे डोळे पुसत ती म्हणाली.
ऑपरेशन सुरू झाले. निशांत मात्र अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. विनिशाची आई व बाबा देवाकडे विनिशाच्या सुखरूप सुटकेसाठी प्रार्थना करत होते. जवळजवळ अर्धा पाऊण तासाने ओ.टी. मधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्या नंतर पंधरा-वीस मिनिटांनी नर्स बाळाला घेऊन बाहेर आली. विनिशाच्या आईने पळाला घेतले. निशांत व विनिशाच्या बाबांनी बाळाला पाहिले. नर्स म्हणाली अभिनंदन मुलगा झालाय.
निशांत,“विनिशा कशी आहे नर्स.” त्याने काळजीने विचारले.
नर्स,“ don’t worry she is stable.थोड्याच वेळात सर्जरी कम्प्लित होईल. मग त्यांना शिफ्ट केलं जाईल.”अस म्हणून ती बाळाला घेऊन गेली.
विनिशाला रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले. ती अजून बेशुद्ध होती. डॉक्टरने ती तासभरात शुद्धीवर येईल असे सांगितले.निशांत तिच्या जवळच बसून होता. विनिशा शुद्धीवर आली आणि निशांतला पाहून हळूच म्हणाली.
विनिशा,“ काय झालं निशांत आपल्याला!” ती हळू आवाजात म्हणाली.
निशांत,“ तुझ्या मनासारखेच होते ना कायम मुलगा झालाय.”तो तिचा हात धरून म्हणाला.
तेव्हढ्यात विनिशाची आई व बाबा बाळ घेऊन आले.विनिशाने बाळ पाहिले व तिच्या डोळ्यातून आनंद अश्रु वाहू लागले.ते पाहून निशांत म्हणाला.
निशांत,“ आता काय झाले रडायला?झाले ना तुझ्या मना सारखे; हा ही तुझ्या सारखा हट्टी नाही झाला म्हणजे मिळवले” तो तिचे डोळे पुसत म्हणाला.
विनिशाच्या बाबांनी निशांतच्या बाबांना फोन करून ही आनंदाची बातमी दिली. हे ऐकून निशांतचे आई-बाबा दुसऱ्याच दिवशी नातवाला पाहायला आले. निशांतच्या आईने मात्र बाळाला घेतले व त्या बाहेर निघून गेला. त्यांनी ना विनिशाला पाहिले ना तिची विचारपूस केली. निशांतच्या बाबांनी मात्र विनिशा कशी आहे.तिची तब्बेत कशी आहे याची चौकशी केली. निशांतला मात्र त्याच्या आईचे वागणे खटकले होते.पण त्याला सध्या विनिशाची काळजी होती म्हणून तो गप्प राहिला.
हॉस्पिटलमधून विनिशाला तिचे आई-बाबा त्यांच्या बरोबर घेऊन गेले. निशांत ही तीन महिने त्यांच्यातच राहिला कारण दिवस भर जरी विनिशाची आई विनिशाला बाळ सांभाळायला मदत करत असल्या तरी रात्री मात्र त्यांना विनिशा बरोबर राहणे शक्य होत नसे. म्हणून निशांत त्यांच्यातच विनिशा बरोबर राहिला. विनिशाला एक वर्षाची मॅटरर्निटी लिव्ह मिळाली होती.त्यामुळे ऑफिसचा प्रश्न नव्हता.तीन महिन्या नंतर निशांत तिला घरी घरून गेला. बाळाला सांभाळण्यासाठी तिच्या मदतीला एक बाई ठेवली.आता बाळ सात महिन्यांचे झाले होते.
निशांतच्या आईने मात्र विनिशा आणि त्याच्या मागे बाळाला कोल्हापूरला घेऊन या बारसे मोठे करायचे म्हणून टुमने लावले होते. निशांताने आत्ता पर्यंत टाळाटाळ केली होती पण विनिशाने त्याला गळ घातली व त्याला कोल्हापूरला घेऊन गेली. पुण्यातून तिचे आई-बाबा,समिधा, गिरीष ही बारस्यासाठी गेले. बारसे धुमधडाक्यात झाले. निशांतने बाळाचे नाव निव ठेवले.
बारसे झाल्यावर सगळे पुण्याला गेले पण निशांतच्या आईने विनिशा आणि निशांतला एक आठवडा राहा म्हणून ठेवून घेतले.कारण निशांतच्या आईच्या मनात काही वेगळेच चालले होते.


निशांतच्या आईच्या मनात नेमकं काय असेल?

©swamini chougule


🎭 Series Post

View all