एलोमा पैलोमा गणेश देवा!

Indian Festival

भारता मध्ये नवरात्र देशभरात साजरा होतो. बंगाली लोकांची दुर्गा पूजा, गुजरातचा गरबा प्रसिध्द. पण आता त्याची जागा दांडिया, डिस्को दांडियाने घेतलीये 

महाराष्ट्रात घटस्थापना. घरोघरी पारंपरिक पद्धतीने घट बसवले जातात. देवींच्या देवळांमध्ये खूप मोठा उत्सव असतो. ओटी भरण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा असतात. नऊ दिवसात नऊ रंगांनी न्हाऊन गेलेला असतो अवघा आसमंत! ह्या सगळ्यात हात न धुवून घेतील ते राजकारणी कसले. लगेच त्यांच्यात चढाओढ. मोठ मोठे मंडप. सेलेब्रिटी बरोबरचे दांडिया. हैदोस, उत्साह ज्याला जे हवं ते त्यानं म्हणावं.

थोड लहान असताना आम्ही देवी बघायला जायचो, विशेषतः अष्टमीच्या दिवशी, बिल्डिंग मधील काही जणी मिळून देवीला जात असू. मोठं कुंकू लावलेल्या, मळवट भरलेल्या बायका घागरी फुंकायच्या. तेव्हा त्यांना बघुनच माझी खूप टरकायची.

ह्या सगळ्यात अगदी मनापासून आवडणारा म्हणजे भोंडला. माझ्या आठवणीत काही वर्षांपूर्वी, विसरला जातोय की काय असं वाटतं असतानाच, परत भोंडला करायला सुरुवात झाली.

आमच्या सोासायटीतील काही वर्षांपूर्वीचा भोंडला आठवतो. खुप वर्षांनी भोंडला खेळायला मिळणार म्हणून मी खूपच उत्सुक होते. 

एक दिवशी खाली नोटीस लागली, " अमुक तमुक दिवशी भोंडला आहे. नोंदणी करा. ५०रू वर्गणी.

खिरापत - वडापाव आणि खोबऱ्याची वडी "

झालं! "खिरापत - वडापाव" अरे आता कधी गंमत येणार.  पण म्हटलं असू दे  आताच्या नवीन पद्धती.

भोंडल्याच्या दिवशी मात्र खूप साऱ्या बायका मस्त छान जरीच्या साड्या नेसून खाली जमल्या. ज्या काकूंनी सगळं अरेंज केलेलं त्यांनी एक छोटा हत्ती आणलेला. मग तो मध्यभागी ठेवला, पूजा केली. सगळ्यांनी फेर धरला. आणि speaker वर भोंडल्याची गाणी सुरू झाली. मला वाटतं खूप कमी जणींना गाणी येत असावी. आता उत्साह अजूनच कमी झाला. भोंडला करायला जास्त करून आज्या आणि आयाच होत्या. गोल गोल फिरत फिरत शेवटी 

"आडात पडला शिंपला आणि संपला आमचा भोंडला" म्हणत भोंडला संपला.

सगळ्यांनी लगेच फेर सोडला, वडापाव चे वाटप सुरू झाले. आणि मी इकडे " सर्प म्हणे मी एकला..." म्हणत बसले ( बहुदा मनातच). 

त्या काकू आणि त्यांच्या मैत्रिणींनी खरंच मनापासून चांगल्या हेतूने नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून भोंडला ठेवला, सगळी तयारी केली त्याबद्दल कौतुकच! पण भोंडल्याची खरी ओळख आणि मजा नवीन पिढीला द्यायची तर मग तो भोंडला खासच झाला पाहिजे, अगदी आमच्या लहानपणी खेळायचो तसा.

सुरुवातीचे काही वर्ष, प्रत्येकीच्या घरी स्वतंत्र भोंडला असे. एकीकडाचा संपला की दुसरीकडे, कधी कधी २-३ भोंडले असायचे. पण हळू हळू अभ्यास वाढले, लगेचच सहामाही परीक्षा असायच्या मग आमचा सगळ्यांचा भोंडला वर गच्चीवर होऊ लागला. 

कोणी पाट आणायचे, हत्ती आणायचे, मग फुल वगैरे वाहून व्यवस्थित पूजा करून फेर धरला जायचा.

ऐलोमा पेलमा, एक लिंबू झेलू बाई, हरीच्या नैवेद्याला, अडकित जाऊ खिडकीत जाऊ, श्रीकांता कामला कांता, कारल्याचा वेल, कोथिंबीरी बाई ग....

शेवटचं आड बाई आडोणी ... तरी अजून एक शेवटचं "सर्प म्हणे मी एकला...खिरपतीला काय ग? " म्हणून जोरात फतकल मारून खाली बसायचं.

आता खरी गंमत, ती म्हणजे खिरापती ओळखणे. 

मग एक एक काकू पुढे येत.

"तिखट की गोड?", " गोल की चपटा?", "ओला की सुका" "चमच्याने खायचा की हाताने?" आमचे प्रश्न आणि त्यांची "हो" किंवा "नाही" ची उत्तरं.

कधी कधी तर " मीठ, साखर" एवढ्यावर पण गाडी येत असे.

त्या सगळ्याजणी पण दरवर्षी काहीना काही नवीन नवीन शोधून आणायच्या. जेवढ्या जास्त खिरापती, तेवढी अजूनच मजा, तेवढा जास्त वेळ. धमाल यायची.

एक तासाचा भोंडला असेल तर एक तास खिरापती ओळखणे, मग त्यांचे वाटप, आणि मग ती खिरापत स्वाहा होई.

तर अशी ही साठा उत्तराची नवरात्रीची थोडी आधुनिक थोडी पारंपरिक कहाणी संपन्न!

 तुम्हाला अजून गाणी आठवत असतील तर नक्की कमेंट्स मध्ये टाका! तुमच्या गावाच्या, भोंडल्याची, हादग्याच्या आठवणी असतील तर please शेअर करा.