अहो

Navryas Patra
प्रिय,
प्राणप्रिय,
सखा,
मित्र,
प्रियतम,
जिवलगा खर सांगू काय म्हणू तुम्हाला?
खरंच कळत नाही.की अहो म्हणू? तुम्हाला लिहितांना शब्दांची पळापळ होतोय. हे अस का होत खरंच कळत नाही हो. कळत या करता नाही ,काही नाती शब्दात बांधता येत नाही ना.त्याच्या करता कुठलीही उपमा निर्माण करता येणं तेवढाच कठीण असतं.आणि म्हणून गोंधळले हो. खरतर आपल्या दोघांचं नात सगळ्या नात्यांची गुंफण.कितीतरी नात्यांची गुंफण.जेंव्हा तुमचा विचार करते ना ,तेंव्हा सर्वात पहिले मित्रं नंतर मग खोडकर प्रियकर,मला समजून घेणारा नवरा मग माझ्या मुलींचा आदर्श बाप नंतर मला माझ्या प्रत्येक गोष्टीत आवडीने मदत करणारा माझा कर्तबगार व हरहुन्नरी मदतनीस असे कितीतरी रूप आहेत हो तुमची.या सगळ्या रूपांसाठी रूपक शोधणे कठीणच.
सत्तावीस वर्षाचं प्रेमळ आणि परिपक्व नात आपलं.प्रेम म्हणजे काय असते ते मला तुमच्या मुळेच कळलं मला.
लग्न झाले तेंव्हा मी अगदी अठरा वर्षाचीच.
एक सांगू का हो तुम्हाला? मला सुरुवातीला तुमचा राग यायचा. कारण बाकीच्या पोरींप्रमाने मलाही वाटायचं की मला पण कोणीतरी नवरा मुलगा मला बघायला येईल.चहा पोहांचा कार्यक्रम होईल.सजून सवरून मी समोर जाणार.पण तुमच्या मुळे हा माझा कार्यक्रम राहून गेला.तुम्ही हा कार्यक्रम न करताच एकदम सरळ साक्षगंध ची तारीख ठरवून टाकले.इतकी आवडली होती का हो मी तुम्हाला?पण आता आठवले की हसायला येत.कोणी आलेच नाही मला बघायला.सुरुवात आणि शेवट इथेच संपलं.तुमचा सहवास मला आवडू लागला तुमच्या गोड स्वभावात मी वाहू लागले.तुमचा समजूतदारपणा मला आकर्षित करू लागला.काही चूक झाली तर मला तुम्ही प्रेमाने समजावू लागले.अगदी माहेरपणा सारखच सासर वाटू लागले.लाडाने माझे सारे हट्ट पूर्ण करणारा नवरा मला भेटला होता. प्राणा पेक्षाही जास्त जपणारा माझा प्राणसखा.
मुलींसाठी रात्रभर जागणारा पिता मी बघितले.मुलीला बर नव्हतं तेंव्हा तुम्ही तिला रात्र रात्र भर खांद्यावर घेऊन पाठ थोपवत झोपवतांना एक प्रेमळ भावनिक पिता मला तुमच्यात जाणवलं.सकाळी तो ताण तुमच्या डोळ्यात दिसत होता पण कधी आम्हाला जाणवू दिल नाहीत.सकाळी तेवढ्याच उत्साहाने ऑफीसला जात होते.कुठून यायची हो तुमच्यात एवढी स्पृती? मुलगी कॉलेज जातांना तिची स्कूटी पुसून अगदी किक मारून बघुन, माझ्या मुलीला रस्त्यात काही त्रास तर होणार नाही ना! याची तसल्ली करून घेऊन मग तिच्या हातात देत होते. कितीहो काळजी तुम्हाला त्यांची! अहो त्या सक्षम होत्या त्यांची काळजी घ्यायला. तुमच्या प्रेमापायी मी नतमस्तक झाले होते.
मुलींना शेरके बच्चे म्हणातांना पोरींवरचा तुमचा अभिमान अतुल्यनियच !
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही मला साथ दिलीत.एक वळण असाही आला होता तो म्हणजे माझा हृदय विकाराचा ,एक तास तो खूप कठीण गेला.
जीवनमरणाचा ,एका तासात काहीही झालं असतं.पण तुम्ही होतात ना त्यामुळे मी जिवंत आहे. हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतरची जी काळजी तुम्ही घेतली त्या साठी शब्दचं नाहीत हो.कारण पत्नीचं पतीची सुश्रुषा करावी असा आपला नियम पण तुम्ही ती मोडून काढलीत.तुमचं प्रेम बघुन यमराजालाही रिकाम्या हाती परतावं लागलं.कधीही माझ्यासाठी तुमच्या कडे वेळ असतोच. कितीही काम असले तरी!
माझ्या ओषधीची ,जेवणाची काळजी बघुन मनोमनी खूप हर्ष होतो मला.ओठावर स्मित हास्य येत.हृदय फुलून येत. रोगप्रतिकारकशक्ती अशीच जागृत होते.
तुमची साथ मला सतत हवीहवीशी वाटते.
आपसूकच मोगऱ्याचा सुगंध मनात दरवळतो.प्राणवायू निर्माण होतो.वातावरण प्रसन्न करतो.ऑफिस मधून दुपारच्या वेळी विचारपुस साठी केलेला एक फोन कॉल शरीराचा पूर्ण थकवा मिटवून जगण्याचा रोज नवीन जी ऊर्जा निर्माण करते ना, ते शब्दात व्यक्त नाही करता येत हो!
तुम्ही प्रत्येक स्त्रीचा ,त्यांचा कामाचा आदर करता ना ते मला भारावून टाकत.माझा आणि माझ्या मित्र मैत्रिणी प्रती तुमचे विचार अप्रतिमच! त्यांना दिलेला सन्मान माझा अभिमान उंचावतो हो.
तुम्ही म्हणजे माझा श्वास! कस सांगू तुम्हाला!तुम्ही म्हणजे जगण्याला अर्थ.
माझे दिवस रात्र तुम्हीच! माझा साज शृंगार तुम्हीच.तुमच्या पलीकडे माझं विश्वच नाही.
तुमच्या मुळेच माझं अस्तित्व.तुम्ही आहेत म्हणून मी आहे हो.तुमच्या मुळेच सारे रंग माझे.तुमची अमूल्य साथच माझे जीवनगाणे.जगण्याची प्रेरणा, आनंद आणि सर्वस्व .
फक्त तुमचीच
लाडाची बायको❤️
सौ. कविता आईटवार (नागपूर)