अहो जिमला जातात

कथा एका जिमला जाणाऱ्या नवर्‍याची


अहो जिमला जातात..


"ओ मै तो सुपरमॅन, सलमान का फॅन." बेडरूममधून जोरजोरात गाण्यांचा आवाज ऐकू येत होता..
" अरे काय चालले आहे? गाद्या उचलताय कि गाणी म्हणताय?" सुचेता ओरडत आत गेली. तिथे गौरवने गादी खांद्यावर घेतली होती.. आणि जोरजोरात गाणी म्हणत होता. यश आणि परी टाळ्या वाजवत त्याला साथ देत होते..
" काय चालले आहे म्हणजे? दिसत नाही गाद्या उचलतो आहे.. बोला रे मुलांनो.. मै तो सुपरमॅन.." गौरव सुचेताला चिडवत म्हणाला..
" हॅ.. सुपरमॅन म्हणे.."
" मेरा सोला का डोला, छियालीस कि छाती.."
" छियालीस??? हा डोला?? आमच्याकडे याला काय म्हणतात माहिती आहे?" सुचेता गौरवलाच चिडवत म्हणाली..
" काय?"
" हातापायाच्या काड्या आणि.."
" मी काही एवढा बारिक नाहीये.. उगाचच चिडवू नकोस.." गौरव चिडला..
" मी चिडवते आहे.. बरं.. आणि मगाशी तू जे करत होतास ते?"
" मी गाणे म्हणत होतो.. "
" बरं.. गाद्या उचलून झाल्या असतील तर मला फक्त तो सिलेंडर लावून दे.. मला नाही जमत.."
" माहित आहे ते.. चला रे मुलांनो.."
गौरवने रिकामा सिलेंडर बाहेर काढला आणि भरलेला लावून टाकला.. आणि अचानक त्याच्या डोक्यात आले..
" परी पटकन कॅमेरा हातात घे.."
" का बाबा.."
" सांगतो ते ऐक.. यश तू असा थोडा मला मदत कर.."
" हो बाबा.."
" परी मी सांगितले कि पटकन फोटो काढ.. काय?"
गौरवने यशच्या मदतीने तो सिलेंडर एका खांद्यावर ठेवला..
" यश पटकन बाहुबलीचे गाणे लाव.. परी तू कॅमेरा चालू ठेव."
" बाबा कोणते गाणे? कान्हा सो जा जरा?"
" तू पण तुझ्या आईचाच मुलगा.. ते कुठे लावतोस.. कौन है वो कौन है वो कहा से वो आया, ते लाव.. "
यश चिडला होता पण खांद्यावर बाहुबली टाईप सिलेंडर घेऊन उभा असलेल्या बाबाची त्याला दया आली.. त्याने गाणे सुरू केले आणि परीने व्हिडिओ.. हे होईपर्यंत बेडरूम आवरून आली..
" परत बालिशपणा सुरू? मुलांनो तुम्हीपण? जा बरे खाली खेळायला.."
" काय रे गौरव, काय सुरू आहे वेड्यासारखे?"
" मी काय केले ?"
" बरे तू काही नाही केलेस.. पण एवढीच जर आवड आहे तर मग जिम लाव ना.."
"अरे..यस.. चांगला सल्ला.. मी आत्ताच शोधतो एखादी जवळपास असलेली जिम.."
आणि खरेच संध्याकाळपर्यंत गौरवने जिम जॉइन पण केली.. आल्यावर एक कागद त्याने सुचेताच्या हातात दिला..
" हे काय?"
" माझा डाएट प्लॅन.. आता उद्यापासून मिसळ, पोहे, उपमा सगळे बंद.. मी फक्त हेच खाणार."
"म्हणजे? मी उद्यापासून डबल स्वयंपाक करायचा?"
" ते तुझे तू बघ.. पण नंतर मला बघून तुच म्हणशील..\"उसकी भुजायें....\""
" बस.. मी काही म्हणणार नाही.. पण थोडे दिवस तू ॲडजस्ट करना.."
" नाही.. आता तर मी जिमला जाणार आणि डाएट करणार म्हणजे करणारच.. मग बोल हातापायाच्या.."
" बोलणार नाही.. तू जिमला जातोस तर जा ना.. पण माझ्या गळ्यात तुझे डाएट का मारतो आहेस?"
" का म्हणजे? शेवटी तू बायको आहेस माझी.. उद्या मी बिल्ड बनवली ना तर लाईन लागेल माझ्यापाठी.. मग येशील रडत मी तुझ्यासाठी हे करू का? ते करू का?"
" मी आणि रडत येणार? चल हट.. त्यापेक्षा त्या ज्या पाठी येतील ना त्यांनाच सांग नाश्ता करायला.."

अशी कितीही लाडिक वादावादी झाली तरी बायको ती बायको.. नवर्‍याच्या स्वभावाचा अंदाज बांधून तिने आधीच शिल्लक असलेल्या दोन सुट्ट्या आणीबाणी म्हणून वापरायच्या ठरवल्या.. दुसर्‍या दिवशी मुलांना शाळेत आणि नवर्‍याला जिममध्ये पाठवून आता थोडा वेळ तरी शांत बसू असा सुचेताने विचार केला.. तोच मोबाईलवर गौरवचा मॅसेज आला.. फोटो होता व्यायाम करतानाचा.. \" हा व्यायाम करायला गेला आहे कि फोटोसेशन करायला.. बरे इथे फोटो काढतो आहे.. काढून घेतो आहे.. माझ्यासोबत फोटो काढायचे म्हटले कि अंगात येते.. आणि हे डम्बेल्स हातात धरायला तरी जमतंय का?कसं दिसतय ते ध्यान.. पण जाऊ दे.. आपणच कशाला आपल्या नवर्‍याला वेड्यात काढा.\" असा विचार करून तिने त्याला फक्त थम्स अपचा इमोजी पाठवला आणि ती परत तिचे वाचन करायला बसली..
गौरव आला तोच रडतखडत..
" आई ग.. अंग खूपच दुखतय ग.. भूक पण लागली आहे.. काय केले आहेस खायला? आधी चहा दे छानसा.."
" पण तू तर म्हणाला होतास कि तो प्रोटिन शेक पिणार म्हणून.. मी तो तयार करून ठेवला आहे.."
" बरं आण.."
" पकाव आहे ग.. याच्यापेक्षा आपला चहाच दे कसा.."
" अजिबात नाही.. काय ते गाणे.. मेरा डोला का शोला वगैरे वगैरे..."
कसाबसा गौरवने तो शेक संपवला..
" मी थोडावेळ पडतो.. तुझा स्वयंपाक झाला कि उठव.. पण तू ऑफिसला जाणार असशील ना?"
"नाही.. आज जरा माझे काम होते म्हणून मी सुट्टी घेतली आहे.. पण तुला नाही जायचे ऑफिसला?"
" तुला ताप नाही ना आला? एवढी मेहनत करून आलो आहे.. आता जर मी ऑफिसला गेलो ना तर मेलोच मी."
" म्हणजे दांडी का?"
" तुला समजायचे ते समज.. पण आता मी पडतो.. माझी पेशी न पेशी रडते आहे आरामासाठी.. खूप जास्तच व्यायाम करायला लावतात ग".
" हो का.." अशा परिस्थितीत एक आदर्श पत्नी जेवढी सहानुभूती दाखवू शकते तेवढी दाखवून सुचेता घराबाहेर पडली.. मैत्रिणींना भेटली.. छान खादाडी केली आणि परत चेहर्‍यावर गांभीर्य पांघरून घरी आली.. गौरव अजून झोपला होता.. झोपेत बडबडत होता.. " प्लीज हे सोडू नका.. खूप जड आहे.." कसेबसे आपले हसू आवरून सुचेताने गौरवला हलवले..
" उठतो आहेस ना?"
गौरव दचकून उठला. " काय भयंकर स्वप्न पडतात ना.."
" काय स्वप्न पडले?"
" अग कोणी तरी तुला त्रास देत होते.. आणि मी त्यांच्याशी मारामारी करत होतो.."
" अच्छा.. असो.. तुला भूक लागली असेल ना.. चल तुझे जेवण तयार आहे. "
" हो ग.. खूप भूक लागली आहे.."
सुचेताने गौरवला जेवायला वाढले..
" हे काय? फक्त दोन फुलके आणि हि कडधान्य?"
" हो.. मग.. अगदी तुझ्या चार्टप्रमाणे केले आहे.. नंतर अंडी खा.."
" अग पण भाजी? आणि तू काय खाणार?"
" मी आत्ता बाहेर गेले होते तेव्हा थोडे खाऊन आले आहे.. माझे कुठे आहे डाएट वगैरे? तू खा बाबा.. आज मी गरी आहे तर करून देईन चार्टप्रमाणे.. नंतर तुझे तुलाच करायचे आहे.."
गौरवच्या चेहर्‍यावर बारा वाजले होते.
" मी काय म्हणतो, हे जिमला जाणे गरजेचे आहे का?"
" तू तर असे विचारतोस जसे काही मीच तुला सांगितले आहे जिमला जा म्हणून.."
" पण तुलाच तो प्रभास आवडतो ना.."
" त्याचा इथे काय संबंध?"
" संबंध नाही कसा? तूच तर म्हणत असतेस.. कसला आहे बघ.. त्याची बिल्ट बघ.. "
" अच्छा काहीतरी जळतय वाटतय.. अरे वेड्या तो प्रभास जरी मला आवडत असला तरी तो काय गॅसचे सिलेंडर बदलून देणार नाही.. त्यामुळे तूच माझा रिअल लाईफ प्रभास.."
" खरे?"
" अगदी खरे.."
"मग जिम?"
" तुला वाटले तर जा.. आणि नाही जमले तरी फिट राहण्याचा प्रयत्न तरी कर.."


पुढे काय झाले? तुम्हाला काय वाटते गौरवने जिम चालू ठेवली असेल का? तर्क करायला विसरू नका.. आणि हो कथा आवडली असेल तर सांगायलाही विसरू नका...

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई