अहो आणि अहोंची खरेदी

नवर्‍याला बायकोने खरेदीचे पूर्ण हक्क दिल्यावर होणारा गोंधळ

अहो आणि अहोंची खरेदी..



" तू मुद्दाम हि भाजी आणतेस का ग?"

सुजितने चिडून प्रियाला विचारले..

" मुद्दाम काय केले मी? काल येताना हि एकच भाजी उरली होती. ती मी आणली.." प्रिया निरागसपणे बोलत होती..

" बर्‍या मला न आवडणार्‍या भाज्याच तुला दिसतात आणि करता येतात.. आणि मी अजिबात भाजी आणणार नाही.." प्रिया बोलायचा प्रयत्न करत होती हे पाहून सुजितने आधीच सांगून टाकले.. " नंतर मग तुझी कटकट सुरू होते.. भाजी महागच होती.. खराबच होती.. नाही.."

" राहिले मग.. पण आता महिनाभर मला ऑफिसमध्ये काम खूप आहे. मग येताना जे दिसेल तेच मला आणावे लागेल आणि तुला तेच खावे लागेल.. चालेल ना.."

" मग तू सकाळी खरेदी करना?

" आणि काय ऑफिसमध्ये भाजी निवडत बसू? तू पण ना सुजीत कधी कधी एवढा विनोदी वागतोस ना.."

" विनोदी काय त्यात? तुला काय होत आहे बोलायला.. तू खातेस सगळ्या भाज्या.. आमच्या सारख्या न खाणाऱ्यांचे हाल होतात.."

" पण मग उपाय सुचवला कि मी.."

" मग मी आणलेल्या वस्तूंवर एकही शेरा मारायचा नाही. चालेल?"

"धावेल. मी काय म्हणते भाजीच कशाला , तू या महिन्यापासून आर्थिक जबाबदारीच घे ना तुझ्यावर.. नाहीतरी मी खूप कंजूषपणा करते असा तुझा आणि मुलांचा आरोप असतोच ना माझ्यावर.."

" आरोप कसला.. वागतेच तू तशी.." धाकटा नील तावातावाने बोलायला लागला.. "बाबा त्या दिवशी छान सायकल दिसली मला.. मी म्हटले घे तर नाही घेतली.."

"मी तर तिची सावत्र मुलगी असल्यासारखेच वागते ती माझ्यासोबत.." अवनी बरसली.. "एक ड्रेस खरेदी करू देत नाही.. सतत आपले कपाट भरून चालले आहे.. आत्ताच तर खरेदी केली.."

" डरनेकी क्या बात.. जब डॅडी हो साथ.. फिकर नॉट मुलांनो.. मी आहे तुमच्यासोबत.. चल प्रिया.. या महिन्यात सगळी आर्थिक जबाबदारी माझी.." सुजित मोठ्या आढ्यतेने बोलला. 

" मग मी महिन्याची एक रक्कम तुझ्याकडे देते.. उद्यापासून भाजी, किराणा, दूध सगळी जबाबदारी तुझी." प्रियाने कन्फर्म करून घेतले..

" हो.. आणि माझे हे छावे मला मदत करतील.. कराल ना रे?" सुजितने मुलांना विचारले. 

"हो बाबा.." दोघांनीही एकसुरात होकार दिला..

" ऑल द बेस्ट" बोलून प्रिया आत निघून गेली..

मुले बाबांसोबत खरेदीची लिस्ट करत बसली..

शनिवार, रविवार घरात सगळ्यांनाच सुट्टी होती.. सगळ्यांचा लोळण्याचा दिवस.. प्रियाने सुजितला उठवले..

" सुजित, भाजी आणायला जातोस ना?"

" आता? "

" नाहीतर कत्ता? जा लवकर.. मग परत भाजी संपली तर तुझीच हालत खराब होईल .."

" तू जा ना.."

" गेले असते रे.. पण मी ना आता डोशाचे पीठ वाटायला घेतले आहे. तसेही तुला दिलेला शब्द मोडायला आवडत नाही ना.."

" भाजी, भाजी , भाजी..." चिडून पुटपुटत सुजित बाहेर गेला..

" येताना नारळही घेऊन ये हा चटणीसाठी.." प्रियाने पाठून आवाज दिला.. सुजित गेला आणि अर्ध्या तासात आला पण.. 

"बघ, अशी आणतात भाजी.."

 प्रियाने भाजी बघितली.. ती कसनुसे हसली.. 

" नारळ?" 

" आणला ना.. आता छानसा चहा होऊन जाऊ दे.."

" करते ना.. बस तू इथेच.."

सुजित अभिमानाने बसला.. तोवर भाजी निवडणार्या मावशी आल्या..

" वहिनी आज काय भाजी?"

" ती बघा.. तिथे ठेवली आहे.. आणि नारळपण खवून द्या जरा.."

" मावशी, भाजी कशी ताजी आहे ना? आणि स्वस्त पण.." कधीनव्हे तो सुजित मावशींशी हसत बोलला.. मावशींनी त्याला बघून न बघितल्यासारखे केले..

" वहिनी.. तुम्ही करडई कधीपासून खायला लागलात? आणि ती पण अशी? एवढी मातीने भरलेली? हात खराब होतील ना?"

" ती करडई आहे?" सुजितला जोरका धक्का बसला होता..

" मग काय? मी काय खोटे बोलते?" मावशी चिडून म्हणाल्या..

" पण मी तर त्याला मेथी मागितली होती.." सुजित पडलेल्या आवाजात बोलला..

"त्या कोपर्‍यावर बसणाऱ्या भाजीवाल्याकडून आणली वाटते दादांनी?" सुजितने मान हलवली..

" तो नवीन माणसांना असेच फसवतो. कालची राहिलेली भाजी ताजी म्हणून विकतो. अजून काही आणले नाही ना त्याच्याकडून?" मावशींनी काळजीने विचारले..

" नारळ.."

मावशींनी नारळ फोडला.. आत पाणी नव्हते पण नारळ चांगला होता.. सुजितने टाकलेला सुस्कारा पार त्या भाजीवाल्यापर्यंत ऐकू गेला असावा.. या सगळ्या प्रसंगात प्रिया मात्र गप्प बसली होती.. तोवर मुलेही उठली.. " बाबा खरेदी, बाबा खरेदी.." त्यांचा आरडाओरडा सुरू झाला.. फायनली सुजित मुलांना घेऊन बाहेर गेला.. येताना अवनीसाठी चारपाच ड्रेस , नीलला हवी तशी सायकल घेऊन आला.. त्यामुळे मुले बाबावर फार खुश होती.. 

" सुजित, दुधाचे पैसे आणि किराण्याची यादी लक्षात ठेव हं.."

" हो.. करतो आहे ना मी सगळे नीट.."

प्रियाने फक्त खांदे उडवले.. सुजितच्या भाजीचा धसका घेऊन मावशींनी स्वतःच भाजी आणायचे कबूल केले त्यामुळे त्याचे एक टेन्शन कमी झाले..

पुढच्याच आठवड्यात प्रियाचा वाढदिवस होता.. यावेळेस प्रियाने खरेदीवर काहीच टिप्पणी करणार नाही असे सांगितले होते.. त्यामुळे तो तिच्यासाठी एक साडी घेणार होता.. अर्थात त्याच्या आवडीच्या रंगाची.. त्याने फक्त जवळच्या नातेवाईकांना पार्टीसाठी बोलावले होते.. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी सुजितने ती साडी प्रियाच्या हातात ठेवली..

" वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.. "

" थॅंक यू नवरोबा.. उघडू का हे पार्सल?"

" उघड ना.."

प्रियाने साडी बघितली.. भडक पिवळा रंग होता.. सुजितने मुद्दाम किंमतीचा टॅगही तसाच ठेवला होता.. पाच हजारांची साडी आणि हा रंग.. पण.. प्रियाने चेहर्‍यावर हास्य आणले.. 

" संध्याकाळी हिच साडी नेसशील ना? साडी पिको करून आणली आहे.. फक्त ब्लाऊजचे बघायला लागेल.."

" नेसते ना.."

संध्याकाळी सुजितने बोलावलेले सगळे पाहुणे आले.. हा हि तिच्यासाठी धक्काच होता.. पण तिने छान सावरून घेतले.. सुजितने हॉटेलमधून खूप पदार्थ मागवले होते. प्रियाचा जीव तुटत होता.. पण 'काही बोलायचे नाही' हे तिच्या मनाशी तिने पक्के ठरवलेच होते.. सुजितच्या बहिणीने त्याच्या कानात विचारले, "प्रियाला कपड्यांचा सेन्सच नाही राहिला का रे?"

" काय झाले ताई?"

" अरे काय तो साडीचा भडक रंग.. आधी तिने कधी असा रंग वापरला नव्हता.."

" अग मीच तिला गिफ्ट केली आहे.. ती कधीची आंबा कलरची साडी शोधत होती.. म्हणून.." 

" हा आंबा कलर?? अरे हा तर हळदीचा रंग आहे.."

" पण दोन्ही पिवळेच झाले ना शेवटी" सुजित वैतागून बोलला..

" धन्य आहे तुझी.. प्रिया काही बोलली नाही?"

" नाही. तिने काहीच बोलणार नाही असे वचन दिले आहे.."

" ठिक.. मी कशाला बोलू मग तुमच्यामध्ये.."

पण सगळ्याजणी प्रियाच्या साडीकडे बघत होते हे मात्र नक्की..


" बाबा, क्लासची पुढच्या वर्षीची फि भरायची आहे?" अवनीने सांगितले..

" एवढ्या लवकर?" सुजितने आश्चर्याने विचारले. 

" काय बाबा? त्यांनी मेल पण केला होता मागच्या महिन्यात.. तेव्हाच सांगितले होते.."

" अग मी विसरलो.. थांब भरतो मी.."

" बाबा, मी सुट्टीत त्या शिबिराला जाऊ? " नीलने विचारले..

" विचारतोस काय? जा ना.."

" बाबा पैसे ?"

" किती भरायचे आहेत?"

"......"

" एवढे?"

" हो.. माझे सगळे मित्र जाणार आहेत.."

" सुजित या महिन्यात आपली पॉलिसीपण ड्यू आहे.. त्याचे पैसे पण काढून ठेव.."

" अग पण सगळे एकाच महिन्यात?"

" ती पॉलिसी माझ्या वाढदिवसानिमित्तच आपण काढली होती ना? आणि अवनीच्या फीचा मॅसेज तर मागच्याच महिन्यात आला होता.. आणि सुट्ट्या आहेत तर शिबिरे चालू होणारच ना?"

" अग पण प्रिया, पैसे संपले ग माझ्या खात्यातले सगळे.. मला एफ.डी. मोडावी लागेल.. एवढ्या खर्चासाठी.."

" मी काय बोलू बाबा? मी काही बोलले तर मग ती कटकट होते.."

" तू कसे मॅनेज केले असतेस मग हे?" सुजितने तावातावाने विचारले..

" नक्की सांगू?"

" हो.."

" पहिली गोष्ट, मी नीलला सायकल घेतली नसती, जरी घेतली असती तरी एवढ्या महागाची नक्कीच नाही.. कारण आता तो शिबिराला जाणार कि सायकल चालवणार..

दुसरी गोष्ट, माझ्या सावत्र लेकीला आधी कपाटातले कपडे काढायला लावले असते ज्यात अनेक एकदासुद्धा न वापरलेले कपडे आहेत ते घालायला लावले असते.

आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट माझा वाढदिवस एवढ्या जोरात केला नसता. त्यातही एवढी महागाची साडी घेतलीच नसती.. आता काही कारणही नाही. जेवण मागवायचेच होते तर आपल्या नेहमीच्या कॅटररला सांगितले असते. त्याने नक्कीच योग्य त्या किमतीत आपल्याला जेवण पाठवले असते.. पण मी तर कंजूस आहे.. सगळीकडे फक्त पैसेच वाचवते हो कि नाही?"

" नाही ग माझी आई.. तू तर दूरचा विचार करून पैसे खर्च करतेस.. आता तुझे काम तुझ्याकडे परत घे.. आणि मला माझी सुट्टीची झोप परत दे.." सुजित हात जोडत म्हणाला..


" नक्की?"

"हो हो.. अगदी नक्की.."



कथा कशी वाटली ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई