गोष्ट छोटी डोंगराएवढी १४

Ahinsa Is The Best Quality On The Earth
गोष्ट छोटी डोंगराएवढी..१४

अहिंसा.... मानवता हाच धर्म

भारतीय संस्कृती ही हिंसक की अहिंसक? ती ती दया-क्षमा-शांती या सदगुणांवर आधारलेली? की ती द्वेष, मत्सर, तिरस्कार या दुर्गुणांवर आधारलेली आहे..
या सर्व प्रश्नांवर उत्तर एकच. भारतीय संस्कृती चा एकच मूलमंत्र आहे . "तो म्हणजे जगा आणि जगू द्या."

साने गुरुजींनी म्हटलेले आहे...." खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे."
माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे हाच मानवधर्म आहे. आणि आपल्याला हे सांगावे लागत आहे ही शोकांतिका आहे.
अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा प्रयोग गांधीजींनी प्रथम केला. कविवर्य ग दि माडगूळकरांनी "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया". या शब्दात अहिंसे ने केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे वर्णन केलेले आहे.
अहिंसे मध्ये केवढी ताकद आहे हे गांधीजींनी जगाला दाखवून दिले. हीच अहिंसा माणसाला अगदी निर्भय जीवन जगण्याची प्रेरणा देते.
आज आपला देश वेगवेगळ्या जाती-धर्मपंथांमध्ये वाटल्या गेलेला आहे. निसर्गाने असा कोणताच भेदभाव मानवात केलेला नसताना निसर्गाच्या विरुद्ध वागण्यामुळे जग रसातळाला जाताना आज दिसत आहे. वेगवेगळ्या जाती व धर्मपंथांमध्ये मानवतेची वाटणी होत आहे. पण मानवता हाच खरा धर्म आहे हा दृष्टिकोन विसरल्या जात आहे. त्यामुळे जगात अराजकता, शत्रुत्व, हिंसक वृत्ती वाढल्यामुळे येणारी नवीन पिढी सुद्धा याच तत्वांना मानून ती सुद्धा हिंसक होऊन भारतीय संस्कृती लयाला जाण्यास वेळ लागणार नाही.
बळीराजा हा सुद्धा मानवतावादी होता. त्याच्या राज्यात एकच धर्म होता. तो म्हणजे मानवता. सर्वांशी सहिष्णूतेने वागणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणे. त्यामुळेच म्हणतात, "
"इडा पिडा टळो, बळीच राज्य येवो."
राष्ट्रसंत सुद्धा हेच सांगतात; या भारतात बंधुभाव नित्य वसु दे, दे वरची असा दे!
सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे!
दे वरची असा दे!
भारतात नितळ, शांत, मानवतावादी, जीवनदायी संस्कृती असावी असे वाटत असेल तर मानवता हाच खरा धर्म आहे याची जाणीव असणं गरजेचं आहे

मानवता हाच आहे युग धर्म!
अन्य सारे धर्म साफ खोटे!!
जगा आणि जगू द्या! हेच श्रेष्ठ तत्व!!
अन्य ते सर्व निसत्व!!

छाया राऊत