अहिंसा परमो धर्म

अहिंसेचे महत्तव


अहिंसा परमो धर्म...

गोष्ट छोटी डोंगराएवढी..

" बुद्धम् शरणम् गच्छामी.. धम्म्म् शरणम् गच्छामी.." ही प्रार्थना जेव्हा इसवीसन पूर्वी अखंड भारतभूवर निनादत होती तेव्हा पाटलीपुत्राचे सम्राट अशोक ज्यांच्या अधिपत्याखाली बहुतांश भारतीय उपखंड होता ते मात्र व्यथित होते एका कलिंग देशासाठी.. अफगाणिस्तानापासून बांग्लादेश ते दक्षिणेला पसरलेल्या राज्यात फक्त कलिंग देशाचा अडथळा होता. प्रयत्न सुरू झाले तो देश जिंकण्याचे. त्याकाळात अंदाजे एक लाख लोकांचा रक्तपात आणि दीड लाख लोकांना निर्वासित केल्यानंतर सम्राट अशोकाला उपरती झाली. आणि त्याने अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला.

इसवीसन पूर्व काळात यज्ञाचे, वैदिक धर्माचे कर्मकांड याचे प्रमाण खूप वाढले होते. मूक प्राण्यांच्या यज्ञात जाणाऱ्या बळीचे प्रमाणही वाढले होते. अशा मूक प्राण्यांची वेदना जाणून बुद्ध आणि जैन धर्माने त्यांच्या धर्माची एक महत्तवाची शिकवण म्हणून अहिंसेचा स्वीकार केला. अहिंसा म्हणजे मूक प्राण्यांना न मारणे किंवा कोणालाही दुखापत होईल असे न वागणे. पण नेहमीच आदर्श पुरूषांच्या शिकवणुकीचा जसा आपल्याला हवा तसा सोयीस्कर अर्थ काढला जातो तसाच हळूहळू अहिंसा या तत्त्वाचाही काढला गेला. फलस्वरूप अहिंसा या शब्दाला बटबटीत स्वरूप आले. केवळ शिकारीसाठी किंवा मनोरंजनासाठी म्हणून प्राण्यांना विनाकारण मारणे हे जेवढे वाईट. तेवढेच जर एखादा माथेफिरू इसम सगळ्यांना त्रास देत असेल तर त्याला सोडून देणेही वाईटच.. बर्‍याचदा प्रमाणाबाहेर हिंसा केल्यानंतर एखाद्याला उपरती होते आणि तो अहिंसेच्या मार्गावर चालू लागतो. पण मग तोपर्यंत केलेली हिंसा ही माफीलायक असते?

खरेतर आताच्या क्षणी जेव्हा तिसऱ्या महायुद्धाचे संकट डोक्यावर घोंगावते आहे त्यावेळेस अहिंसा या तत्त्वाचे आचरण व्हावे असे मनापासून वाटते. पण ते सम्राट अशोकासारखे युद्धानंतरचे नसून युद्धपूर्व असावे हीच इच्छा. कारण हिंसा ही कधीच मानवी समाजाचे कल्याण करू शकत नाही. मग ती शारिरीक असो वा मानसिक.. एखाद्याला शिवीगाळ करणे, त्याच्या मनाला लागेल असे वागणे ही सुद्धा एकप्रकारची हिंसाच झाली. ज्याचे पडसाद त्या व्यक्तीच्या आयुष्यात पडत जातात.

सर्वे भवन्तु सुखिनः, बघायला गेले तर अतिशय साधी आणि सरळ गोष्ट. आपल्या इतकाच दुसर्‍यालाही सुखी आयुष्य जगण्याचा हक्क आहे.. हे एकदा मान्य केले की मानसिक असो वा शारिरीक हिंसा निघून जाते. आणि उरते शांततामय अहिंसा..



लेख कसा वाटला ते नक्की सांगा.. अभिप्रायच्या प्रतिक्षेत..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई