अहिंसा परमो धर्म...

Ahinsa sarvat motha dharm aahe

अहिंसा परमो धर्म....

“काय ग इतकी साधी गोष्ट तुला करता येत नाही?”


“काय करत असतेस तू दिवसभर? तुला काहीच जमत नाही.”
“तुला ना अक्कलच नाही.”


“देवाने सुंदरता तर दिलीच नाही पण बुद्धीही दिली नाही.”

हे रोजचे वाक्य अनघाच्या कानावर पडत होते.


अनघाचा नवरा समीर रोज तिला घालून पाडून बोलत होता. लग्नाला बरेच वर्ष झालेली होती. आधी तर फक्त टोचून बोलत होता. नंतर  नंतर मारायलाही  सुरुवात झाली होती. मूड चांगला असला तर प्रेमाने वागत होता, नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला मारहाण करत होता. तो खूप अहंकारी झाला होता, मीच श्रेष्ठ हा त्याचा स्वभाव झाला होता.


तो भांडला की अनघा गप्प बसत होती कारण शब्दाने शब्द वाढतो हे तिला माहीत होतं.


तो चिडला की ती शांत बसत होती. त्याच्याशी अजून जास्त प्रेमाने वागत होती. कधी कधी तो विचार करत होता ‘मी हिला इतकं बोलतो तरी ही शांत कशी काय राहू शकते?’
तिला त्याला प्रेमाने जिंकायचं होतं. दाखवून द्यायचं होतं की पैशापेक्षा किंवा अहंकारापेक्षा प्रेमात जास्त शक्ती आहे. हिंसा करून प्रत्येक गोष्ट मिळवता येत नाही. 


‘माझं काही चुकत असेल तर त्याने ते प्रेमाने सांगावं, हिंसा करून सांगण्यात काय अर्थ आहे. उलट नात्यात दुरावा निर्माण होतो.’


काहीही झालं तरी ती प्रेमानेच वागत होती, तिला याचा खूप त्रास होत होता. 
“तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे” असं झालं होतं. पण मनात कुठेतरी आशा होती की याचा शेवट नक्की छान होणार.

एक दिवस अचानक समीरचा  अक्सिडेंट झाला, दोन्ही पायाला फ्रॅक्चर होतं. सहा महिने तो बेड वर होता. त्याला स्वतः उठून चालता येत नव्हतं.

अनघाने त्याला ब्रश करण्यापासून ते त्याचं जेवण, त्याच्या पायाची मालिश सगळं सगळं अगदी छान केलं, दिवसभर करून थकून जात होती पण कधीच कुणाला बोलली नव्हती. कुठे चिडचिड नव्हती की तक्रार नव्हती. 

समीरला रोजची तिची काम दिसत होती, ती सगळं त्याच्यासाठी खूप प्रेमाने करत होती. समीरचं मनपरिवर्तन होऊ लागलं. आता तो तिच्यावर चिडत नव्हता. समीर थोडा बरा झाल्यानंतर एक दिवस अनघा त्याला बगिच्यात घेऊन गेली.


समीरला मनोमन त्याची चूक कळली, तो मनात विचार करू लागला.


‘मी अनघावर किती अत्याचार केले, तिला घालून पाडून बोललो, तिला मारहाण केली पण ती एकाही शब्दाने बोलली नाही की कधी उलट उत्तर दिलं नाही, किती तो तिचा संयम.’

“अहो काय विचार करताय.”
“मी तुझ्याशी असा वागत आलो आणि तरी देखील आज तू माझ्यासोबत इथे आहेस. मी खूप वाईट वागलो पण तू नेहमी माझ्याशी चांगलंच वागली.”

“प्रत्येक गोष्ट हिंसा करून मिळवता येत नाही, तुम्ही हिंसा केली मी ही जर तेच केलं असतं तर आज आपण इथे एकत्र नसतो. हिंसे पेक्षा अहिंसा कधीही चांगली.”


अहिंसेने वागून सगळ्या गोष्टी सोप्या होतात. 


आपल्या समाजात आजही घरेलू हिंसाला कितीतरी स्त्री या बळी पडतात. घरेलू हिंसा सर्रास सुरूच आहे. कुणी बोलत कुणी बोलत नाही. अहिंसेचा मार्ग अवलंबला तर कितीतर तुटणारी नाती वाचतील. नातं जपता येईल.

आज अनघा त्याच्याशी प्रेमाने वागली तर तिचा संसार वाचला, असाच प्रयत्न प्रत्येकाने केला तर समाजातील हिंसा कमी होईल. कुठेना कुठे या गोष्टीला आळा बसेल.
अहिंसा परमो धर्म हाच सर्वात मोठा धर्म आहे.

समाप्त: