अहिंसा परमोधर्म की जय

लेख
| अहिंसा परमोधर्म की जय |


मानव एक अत्यंत बुद्धिवान प्राणी आहे . सद्सद्विवेक बुद्धी त्याच्याकडे आहे.... अन् त्याप्रमाणे तो वागतो. काही अपवाद सोडल्यास सगळेच चांगले वागण्याचा प्रयत्न करत असतात.
अर्थात कोणत्याही धर्माची तत्वे चांगलेच शिकवत असतात. कोणताही धर्म चांगलें वागण्याची शिकवण देतातच.......
पण माणूस मात्र आपल्या मना प्रमाणे वागून, संयम सोडून वागून, धर्म शिकवण विसरून वागतात.
अहिंसा तत्व हे आयुष्यातील एक अविभाज्य अंग आहे. प्राणीमात्रांवर दया दाखवणे, त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांना संकटातून वाचवणे... इत्यादी गोष्टी ह्या अहिंसा परमो धर्म... या तत्वातच येतात.
महात्मा गांधी चे तर हे प्राणप्रिय तत्व होते. तसेच भगवान महावीर, गौतम बुद्ध या सर्वांनी हेच तत्व अंगिकारायाला लावले आहे. म्हणजे कोणाकडूनही पाप घडणार नाही...असा त्या तत्वाचा गभार्थ लक्षात घेण्यासारखा आहे... सजीव, निर्जीव वस्तू साठी हे तत्त्व पाळायचे आहे.. भारतीय संस्कृती ही जगात सर्वोत्कृष्ट आहे... माणुसकी, दया, सहानुभूती, नम्रता... ह्या सर्व गुणांनी मानव प्रगतीशील होतोच. चारित्र्य सुदृढ राहते. अहिंसेने शांती नांदते... हे सर्वश्रुतच आहे... म्हणुन अहिंसा परमो धर्म....हे तत्व तिन्ही त्रिकाळ सत्य आहेत.
महावीर, गौतमबुद्ध, महात्मा गांधी यांसारख्या महात्म्यांनी अहिंसेचे महत्त्व सांगितलेय. आपली भारतीय संस्कृती निर्जिवातही
देवपण शोधते तर सजीवांची गोष्टच वेगळी !
सर्व प्राणीमात्रांत अन् सजीव सृष्टीत जीव असतो. कोणत्याही प्राण्यांची शिकार वा हिंसा करू नये असं महावीरांची , गौतमांची आर्यसत्ये पंचशील यात याच मुद्द्यांवर भर दिलाय. कुणाचीही हिंसा करू नये. ते पाप समजले जाते.
अलिकडे कोणत्याही देवीला कुणाचाच बळी दिला जात नाही. कळत नकळत ही कुणाचा जीव घेऊ नये.
कर्म धर्म जाणूनच वागावे. माणुसकी अन् भूतदया सोडू नये. यालाच अहिंसा परमो धर्म: असे म्हणतात
परमत सहिष्णूता आणि तन्मुलक परमतस्वीकार हे भारतीय संस्कृतीचे एक लक्षण आहे ,वृत्ती आहे .
अहिंसा या जीवनमूल्यांचे विकासित झालेले एक प्रसन्न दर्शन होय .मानवी जीवनाला सहिष्णुता , प्रेम आणि अहिंसा यांचे अधिष्टान मिळाल्याशिवाय त्याची केव्हाही उन्नती होवू शकत नाही . बळावणाऱ्या वासनावर नियंत्रण ठेवणाऱ्या विवेकातूनच अहिंसक जीवनाचा गंध दरवळू लागतो .
विश्व हे अनादी – अनंत स्वरूपाचे आहे .ईश्वराने केलीच नाही आणि जीवांच्या सुखदु:खाना कोणत्याही अर्थाने हा अस्तित्वात नसलेला परमेश्वर जबाबदार नाही ही भूमिका ठेवून त्यांनी मनुष्यच आपल्या जीविताचा ,सुखदु;खांचा एकमेव निर्माता आहे हे सत्य जगासमोर आणले.
प्रत्येक प्राण्यात आत्मिक विकास साधण्याची शक्ती अंतर्निहित आहे .तिला जाग आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे . प्रेम ,सहिष्णुता अहिंसा या वृत्तींचा मानवी जीवनात प्रभाव पडला तर “जगा आणि जगू द्या “हे सत्यात उतरेल .म्हणूनच प्रत्येकाने जगण्यात माणुसकीची आणि प्रेमाची ज्योत तेवत ठेवली पाहिजे. भगवान महावीरांनी यज्ञयागातील पशुबलींच्या विरुद्ध अहिंसेचा उद्घोष केला आणि अध्यात्मिक पातळीवर नव्या चैतन्याचा अविष्कार केला .
अहिंसा तत्व आणि शाकाहाराचे कडक पालन हे नीतीचे प्रथम आणि मुलभूत विशेष आहेत . मानवाच्या अध्यात्मिक इतिहासात हिंसा न करणे आणि कुणालाही दु:ख होवू न देणे ही एक फार महत्वाची घटना आहे .
अमूल्य नितीतत्वांचे मानवजातीच्या कल्याणासाठी नव्या युगाच्या जरुरीप्रमाणे जनसमाजात निरुपण करणे .भगवान महावीरांनी “अहिंसा परमोधर्म:” हे तत्व अशा काळी समाजाला शिकविले कि ,ज्यावेळी यज्ञात बळी देवून शांती करण्यामध्येच मोठे धर्मकार्य मानले जात असे .भगवान महावीरांनी बळी देण्यासारखा मोठा अधर्म नाही हे जगाला सांगून सर्व जीव समान आहेत हा मानवतेचा संदेश जगाला दिला .सर्व जगातल्या प्राणिमात्रांची एकता आणि त्यांचा शांतीने जगण्याचा हक्क ह्या कल्पना भ.महावीरांचे स्मारक होय.भगवान महावीरांनी अहिंसेबरोबरच संयमाची शिकवण दिली .ज्या अज्ञानाने माणसामाणसात उच्चनीच भेद निर्माण होतात त्याचे निर्मुलन करण्याचा निश्चय व प्रयत्न करून मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ आणि समर्थ होतो हे आचरणातून जगाला दाखवून दिले व प्रत्येक मनुष्य स्वताच्या मोक्षाचा ,अतींद्रिय सुखाचा स्वत:च शिल्पकार बनू शकतो हे सिद्ध करून दाखविले .जसे पेरावे तसे उगवते .जो पर्यंत सर्व कर्मांचा क्षय होत नाही तो पर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही .ज्यावेळी सर्व कर्मांचा क्षय होतो त्यावेळी मनुष्य हा मनुष्य न राहता तो सिद्ध पुरुष अगर परमात्मा होतो .
मृत्युनंतर लाभणाऱ्या परलोकातील स्वलोकप्राप्तीपेक्षा इहलोकीचा स्वर्ग बनवणारी मानवता आणि सामाजिक नितीमत्ता हे धर्माचे “परमश्रेयस” असल्याची आणि दया क्षमा शांती हेच परमेश्वराचे अधिष्ठान असल्याची युगकल्पना महाविरानीच सर्वप्रथम मांडली.अगणित पशुंचे बलिदान करून मेल्यानंतर स्वर्ग मिळण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा विद्यमान जगातच मनुष्यमात्रांशी अहिंसेने म्हणजेच प्रेमाने आणि माणुसकीने वागून दयाबुद्धी प्रगट करा ,सत्याला जागा,अपहार टाळा,इंद्रियनिग्रह करा,संग्रहाची लालसा सोडा ,आणि पृथ्वीचा स्वर्ग बनवा असा उपदेश दिला .भारतातील अध्यात्मिक विचारधारेला नावे वळण देवून ती पूर्वीपेक्षा अधिक अंतर्मुख आणि आत्मप्रवण बनवणारे श्रेष्ठ तत्त्वज्ञ भगवान महावीर केवळ समस्त मानवजातीचे प्रात:स्मरणीय विभूती ठरतात .
महावीरदि तीर्थांकरानी इतर गोष्टींचा निषेध करून अहिंसादी पंचमहाव्रते व त्यांचे पालन करणे हाच खरा धर्म असा प्रभावी प्रचार करुन भारताच्या अध्यात्मिक तत्त्वज्ञानाची दिशाच बदलली व धर्मविचारांचे नवे युग सुरु केले .सत्य कोणत्याही एका व्यक्तीचा किवा संप्रदायाचा वारसा नव्हे तर ते सर्वांचे आहे .सर्वांजवळ सत्यांश असतो आणि तो असलाच पाहिजे .जेथे सत्याचे रूप दिसेल तेथे त्याचा अंगीकार केला पाहिजे .भगवान महावीरांनी अनेकांतवादाच्या द्वारे एक वैचारिक क्रांती केली .त्यांनी वैचारिक सहिष्णूततेचा झेंडा उंच करून सर्वाना त्या झेंड्याखाली उभे राहून आपले मत व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले .
भगवान महावीरांनी सांगितलेल्या व उपदेशिलेल्या मार्गावर चालून प्रत्येक मनुष्य स्वत:चे कल्याण करू शकतो .म्हणूनच “जीवो जीवस्य जीवनम”, “अहिन्सामयी विश्वधर्म”, “जगा आणि जगू द्या “ “सत्याचा मार्ग स्विकारा”, “अहिंसेचे पालन करा “या सत्यामार्गाचा वापर प्रत्येकाने केल्यास व प्रत्यक्ष कृतीतून उतरविल्यास जीवन सार्थक होईल.

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद.