अहिल्या भाग २

कथा एका स्त्रीची

अहिल्या भाग २



"अहिल्या , लग्नाला होकार दिल्याबद्दल थँक्स.." गौतम अहिल्येचा हात हातात घेऊन बोलत होता.. "लग्न न करता सगळे आयुष्य संशोधन करण्यात घालवायचे असे ठरवले होते मी.. पण त्या दिवशी तुला पाहिले आणि स्वतःचा निश्चय विसरून बसलो. लगेचच तुझी चौकशी केली आणि तुझ्या बाबांकडे जाऊन लग्नाची मागणी घातली.. तुला राग नाही ना आला?"

अहिल्या हलकेच हसली आणि समोरच्या गौतमकडे तिने एक नजर टाकली.. साधारण बत्तीसच्या आसपास वय.. ज्ञानाचे तेज चेहर्‍यावर पसरलेले.. तरूण संशोधक म्हणून प्रसिद्ध असलेली हि व्यक्ती असे बोलेल अशी तिला अपेक्षाही नव्हती..

" हसतेस काय? राग आला कि नाही ते तर सांग.." किंचित चिडून गौमतने विचारले.

" नाही आला.." अहिल्येने शांतपणे उत्तर दिले..

"मग एक प्रश्न विचारू?"

"विचारा.." 

" तुझे कोणावर प्रेम वगैरे?"

" तुम्ही माझी चौकशी केली ना?"

" हो.." गौतम गोंधळून म्हणाला.

"मग कोणी सांगितले नाही?"

" हे बघ.. मी एक संशोधक वृत्तीचा माणूस आहे.. आवड म्हणून मी शिकवतो.. त्यामुळे मला प्रश्न विचारायची सवय आहे.. उत्तरे द्यायची नाही.. तूच सांग पटापट.." गौतम वैतागून म्हणाला..

" बरं.. तसे कॉलेजमधली अनेक मुले पाठी होती.. पण मी कोणालाच होकार दिला नव्हता.. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही खात्री करून घेऊ शकता.." बोलताना अहिल्येच्या डोळ्यासमोर देवेंद्र क्षणभर उभा राहिला. तिने डोळे मिटून घेतले. मन शांत केले.

"माझा विश्वास आहे तुझ्यावर.. पण मी आधीच सांगतो मला इतरांसारखे संसारातल्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देता येणार नाही.. माझे संशोधन आणि अध्यापन यातून जो वेळ मिळेल तो तुझा.."

"तुमचे बोलून झाले असेल तर आता मी विचारू?"

" बोलना.."

" गैरसमज नका करून घेऊ.. पण माझ्या बाबांना तुम्ही मदत करणार म्हणजे नक्की काय करणार?"

" माझे नवीन संशोधन त्यांना देणार. ते पूर्ण होतच आले आहे.. आणि मला खात्री आहे कि ते भरपूर यशस्वी होईल.."

" आणि नाही झाले तर?" अहिल्याने शंकित स्वरात विचारले..

" तू आपल्या होणाऱ्या नवर्‍याची माहिती काढली नसतीस तर चालले असते.. पण ज्याच्याकडे पी. एच. डी. करतेस त्याची तरी माहिती काढायची ना? माझ्या नावावर बर्‍याच औषधांचे पेटंट आहे.. आणि ते यशस्वी सुद्धा झाले आहेत.. त्यामुळे त्याची काळजी सोडा.. आणि होणाऱ्या नवर्‍याची काळजी घ्या.." गौतम अहिल्येच्या हातावर थोपटत म्हणाला.. दोघेही एकमेकांशी हसून बोलत होते.. पण हे बघून पाठी बसलेला देवेंद्र रागाने लाल होत होता..

     अहिल्या आणि गौतमचे लग्न झाले.. गौतमचे संशोधन पूर्ण झाल्यावर त्याने ते बिपीनच्या कंपनीला दिले.. अपेक्षेप्रमाणेच त्या औषधाला यश मिळाले.. आणि बिपीनची डगमगणारी कंपनी स्थिर झाली. अहिल्या गौतमच्या मार्गदर्शनाखाली पी. एच. डी. करत होती , त्याचबरोबर त्याला संशोधनात मदतही करत होती.. दोघांचाही संसार आणि काम हातात हात धरून चालू होते.. दोघांचेही एकमेकांवर प्रेम जडत चालले होते.. पण म्हणतात ना एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. अगदी तसेच अहिल्येचे झाले.. अहिल्येला एका नव्या जीवाची चाहूल लागली होती.. अहिल्या आणि गौतम दोघेही खूपच आनंदात होते. बिपीन आणि सरस्वती सुद्धा खुश झाले होते.. दुःखी होता तो फक्त देवेंद्र. तो अहिल्येला विसरूच शकत नव्हता. ती सतत डोळ्यासमोर रहावी म्हणून त्यानेही गौतमला मार्गदर्शक व्हायची गळ घातली होती आणि त्याने ती स्विकारलीही होती.. एकत्र काम करून सुद्धा अहिल्या त्याच्याशी जेवढ्यास तेवढेच बोलत होती.. हे देवेंद्रला खूप खटकायचे.. आणि त्यात आलेली हि बातमी.. त्याचे आईवडील त्याला पी. एच. डी न करता बिझनेस जॉईन करायला सांगत होते. पण तो अजूनही तयार नव्हता..

     अहिल्येला गौतम अगदी फुलासारखा जपत होता.. तिची खूप काळजी घेत होता.. पण तरिही अनर्थ घडलाच.. कारण अगदी क्षुल्लक होते. कधी नव्हे ते गौतमने सांगितले म्हणून अहिल्या साडी नेसली होती.. साडी सांभाळत चालता चालता तिला खाली पडलेले केळ्याचे साल दिसले नाही.. आणि त्यावरून पाय घसरून ती जोरात पडली.. आणि तिचा गर्भपात झाला.. हि घटना ऐकून बाहेर फिरायला गेलेले बिपीन आणि सरस्वती लगोलग तिला भेटायला येत होते तर त्यांचा अपघात झाला आणि दोघेही त्या अपघातात जागच्या जागी गेले..

 आधी बाळ आणि लगेच आईवडील हा धक्का अहिल्या पचवू शकली नाही.

"अहिल्या.. थोडे खायला आणले आहे. उठून खाऊन घेतेस?" गौतमने विचारले..

" नाही.. मला भूक नाही.." अहिल्या तोंड फिरवत म्हणाली..

" अग तुझ्यासाठी नाही निदान....." गौतमने शब्द गिळले..

" बोला ना.. वाक्य पूर्ण करा.. बाळासाठी..." अहिल्येने रडायला सुरुवात केली.. गौतमने रडणार्‍या अहिल्येला जवळ घेतले..

" आपण ना तुझ्या आईबाबांना परत आणू शकतो ना बाळाला.. आता आपण दोघेच आहोत ना एकमेकांना? सावर स्वतःला.." गौतम तिची समजूत काढत होता.. पण अहिल्या त्यातून बाहेर यायला तयार नव्हती.. तिच्या या अवस्थेसाठी तो स्वतःला जबाबदार मानायला लागला होता.. त्यात बिपीनच्या कंपनीची जबाबदारी, त्याचे संशोधन.. हळूहळू तो अहिल्येपासून दूर रहायला लागला होता.. तिचे जेवणखाण बघायला त्याने एक बाई ठेवली होती.. सकाळ संध्याकाळ तू कशी आहेस? विचारले कि त्याचे काम संपत होते.. हे सगळे देवेंद्र बघत होता.. 

" सर, मॅमची तब्येत कशी आहे?"

" ती? ती बरी आहे.." अहिल्येबद्दल बोलताना पहिल्यांदाच गौतम अडखळला होता..

"जर तुम्हाला अडचण नसेल तर मी त्यांना भेटलो तर चालेल का? म्हणजे आम्ही दोघे एकाच वर्गात होतो ना म्हणून.." देवेंद्र सफाई देत म्हणाला..

" हो.. जा ना.. तिला पण थोडे बरे वाटेल.. भेट तू.."

देवेंद्र अहिल्येला भेटायला तिच्या घरी गेला.. जाताना न चुकता त्याने तिची आवडती फुले, खाऊ घेतला.. 

" अहिल्या आहे का?" त्याने घरात काम करणाऱ्या बाईंना विचारले.

" आत झोपल्या आहेत. तुम्ही कोण म्हणून सांगू?"

" मी.. त्यांचा मित्र आहे. सरांच्या सांगण्यावरून त्यांना भेटायला आलो आहे.. "

" आत या ना.. मी सांगते त्यांना.."

" नको.. मी सरप्राईज देतो त्यांना.."

देवेंद्र आत गेला.. अहिल्या भिंतीकडे टक लावून बघत होती.. फुलांच्या वासाने तिने वळून पाहिले.. देवेंद्र हातात फुले घेऊन उभा होता..

" कशी आहेस?" त्याने विचारले..

तिने श बोलता मान फिरवली.

" ठिक आहे.. नाही बोलायचे नको बोलूस.. हे तरी खाशील ना? माझ्यासाठी?" तो आर्जवी आवाजात बोलला.. त्याने आणलेले तिचे आवडते पदार्थ बघून तिने परत रडायला सुरुवात केली.. पण या रडण्यात कोणालातरी आपल्या आवडीची काळजी आहे हि भावना होती.. देवेंद्रने तिला वाढले.. तिने हळू हळू ते खायला सुरुवात केली.. त्या दिवसापासून देवेंद्र गौतमच्या परवानगीने रोज अहिल्येला भेटायला यायला लागला.. त्याच्या रोज येण्याची आता अहिल्येलाहि सवय झाली.. तिच्या कंटाळवाण्या जीवनात जणू तो एक आशेचा किरण होता. गौतम मात्र अहिल्येला वेळ देण्याऐवजी जास्तीत जास्त कामाच्या गराड्यात स्वतःला जुंपून घेत होता. रोज रात्री तिच्या खोलीत जायला चुकत नव्हता. दिवसेंदिवस तिच्यामध्ये होणारा बदल त्याला दिसत होता.. तेव्हाच आलेल्या एका महत्त्वाच्या कामामुळे तो अजूनच गुंतला गेला होता.. त्याचा पुरेपूर फायदा देवेंद्र घेत होता.. तो अहिल्येच्या जास्तीत जास्त जवळ जात होता. चोरटे स्पर्श, जुन्या आठवणी तो परत परत जागवायला लागला.. अहिल्यापण मानसिक धक्क्यातून बाहेर येत होती.. अशाच एका क्षणाचा फायदा घ्यायचे देवेंद्रने ठरवले.. 


 देवेंद्र आपला मनसुबा पूर्ण करू शकेल का? पाहू पुढील भागात..

कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all