अहिल्या

कथा एका स्त्रीची

अहिल्या...


" अहिल्या, ए अहिल्या.. कुठे लपली आहेस? पटकन बाहेर ये.. नाहीतर आई रडेल बरे.." सरस्वतीबाई अहिल्येला हाक मारत होत्या..

" नाही येणार.. तू शोधून काढायचे.." लपलेली अहिल्या बोलून गेली..

" असे कसे लपलेल्या परीला आम्ही शोधायचे बाबा.." असे म्हणत सरस्वतीबाईंनी लपलेल्या अहिल्येला जाऊन पकडले..

"आई तू चिटींग केलीस.. आम्ही नाही जा.." छोटी अहिल्या गाल फुगवून बोलली..

" पण चिटींग केली नसती तर मग हि परी कशी दिसली असती मला. तसेही आता बाबा येणार आहेत.. बाबा एका मुलीला बागेत घेऊन जायचे म्हणत होते.. पण ती मुलगी तर लपून बसायचे म्हणून चिडून बसली आहे.. आता काय बरं करायचे?" सरस्वतीबाई विचार करत म्हणाल्या.

" काही नाही.. आवरायचे आणि बाबांसोबत फिरायला जायचे.." अहिल्या आईला मिठी मारत म्हणाली.


अहिल्या, सरस्वती आणि बिपीन यांची एकुलती एक मुलगी.. गोबरे गाल, कुरळे केस, नितळ चेहरा.. गालावर हसू.. बघताच क्षणी आवडावे असे ते रूप.. अत्यंत लाघवी, प्रेमळ मुलगी. आईबाबांची अतिशय लाडकी.. बाबांची मोठी औषधे बनवायची कंपनी.. पण त्यातूनही न चुकता अहिल्येसाठी वेळ काढणारच.. त्यांचे अहिल्या हे दुसरे मूल आणि कंपनी पहिले.. कारण कंपनीचा जन्म तिच्याआधी झाला होता..

      दिवसामागून दिवस जात होते.. छोटी अहिल्या आता मोठी होत होती.. आधीच सुंदर आणि त्यात तारुण्याचा बहर.. अहिल्याचे रूप निखरून आले होते.. कॉलेजमध्ये अनेकजण तिच्यापाठी होते.. तिने कधीच कोणालाही भाव दिला नाही. बर्‍याच मुलांनी हि सुंदर आणि धनवान मुलगी आपल्या बसकी बात नही असे म्हणत तिचा विचार सोडला होता.. पण एकाने नाही.. देवेंद्र.. त्याने अहिल्येबद्दल खूप ऐकले होते.. तेव्हापासूनच तो तिच्या प्रेमात होता. तिला पाहिल्यावर तर तो वेडाच झाला होता.. लग्न करायचे तर हिच्याशीच असे त्याने ठरवले होते.. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते.. आडून आडून त्याने अहिल्येला विचारलेही होते.. देवेंद्र दिसायला देखणा, तडफदार, बोलका होता.. मुलींमध्ये खूप प्रसिद्ध होता.. नाही म्हटले तरी अहिल्येला कुठेतरी तो आवडला होता पण तिनेच आईवडिलांच्या पसंतीने लग्न करायचे ठरवले होते.. त्यामुळे ती त्याला होकार देत नव्हती.. पण मनात कुठेतरी तिलाही तो आवडत होता. देवेंद्रला हे जाणवले होते.. त्याचे वडिलही मोठे उद्योगपती होते.. त्याने त्यांच्याशी बोलून अहिल्येला लग्नाची मागणी घालण्याचा हट्ट केला.. अहिल्येच्या रूपाबद्दल तिच्या स्वभावाबद्दल त्यांनीही खूप ऐकले होते. त्यामुळे त्यांनीही वेळ न दवडता बिपीनला भेटायचे ठरवले..

"वेळ न दवडता विषयाला हात घालू का?"

" बोला ना.."

" आमच्या देवेंद्रला तुमची अहिल्या फार आवडली आहे.. त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे.. तुमची इच्छा असेल तर.."

हे ऐकून आनंद व्हायच्या ऐवजी निराशा बिपीनच्या चेहर्‍यावर दिसायला लागली..

" मी काही चुकीचे बोललो का?" देवेंद्रच्या वडिलांनी विचारले..

" चुकीचे असे नाही.. पण आम्ही अजून हा विचारच केला नाही.. मला थोडा वेळ द्याल का? मी जरा अहिल्या आणि तिच्या आईशीही बोलतो.."

" नक्की.. काहीच अडचण नाही.. पण थोडा लवकर करा म्हणजे झाले.."

देवेंद्रचे वडील गेल्यावर त्याच टेन्शनमध्ये बिपीन घरी आले..

" तुम्ही असे का दिसताय? काही अडचण?" सरस्वतीबाईंनी विचारले.

" आता तुला सांगावेच लागणार आहे. तुला अहिल्येचे शिक्षक गौतम माहित आहे?"

" हो.. त्यांचे काय?"

" काल त्याने अहिल्येला मागणी घातली आणि आजच देवेंद्रचे स्थळही तिला चालून आले आहे.."

" देवेंद्र म्हणजे........ मुलगा ना?"

" हो.."

" मग अडचण काय आहे? त्या देवेंद्रला मी पाहिले आहे. मुलगा देखणा आहे, हुशार आहे.. अहिल्येला विचारून होकार देऊन टाका त्यांना.."

" तीच तर अडचण आहे.."

" म्हणजे?"

" अग, गौतम त्या बदल्यात कंपनीला मदत करायचे वचन देतो आहे.. कंपनीची अवस्था सध्या खूपच बिघडत चालली आहे.. ती सुधारायला मी मदत करीन असे त्याचे मत आहे. माझे तर डोकेच चालत नाहीये."

" त्यात डोके काय चालवायचे? तो वयाने किती मोठा आहे अहिल्येपेक्षा. माझी हि नाजूक लेक त्याच्या गळ्यात नाही बांधायची मला.." सरस्वतीबाईंनी ठामपणे सांगितले..

" माझी तरी कुठे इच्छा आहे तशी.. पण त्याने हि मागणी कुमारसमोर घातली.. आता कुमारचे असे मत आहे कि गौतमला होकार द्यावा.." 

" त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न लावून द्यावे मग.. माझीच मुलगी का? आणि तुमच्या बिझनेससाठी माझ्या मुलीचा बळी का?"

" बरोबर आहे तुझे.. मी सांगतो कुमारला.. मला हे मान्य नाही म्हणून.. गौतमने मदत करायला नकार दिला तरी चालेल पण त्यासाठी मी अहिल्येला त्रास नाही होऊ देणार." 

" थांबा बाबा.. घाई करू नका.. मला मान्य आहे हे लग्न.." अहिल्या खरेतर आईबाबांसाठी चहा घेऊन आली होती. तेव्हा तिच्या कानावर हे सगळे पडले होते. दोघांना बोलताना बघून ती परत जात असताना तिचे नाव आले म्हणून ती थबकली आणि सगळे संभाषण तिने ऐकले. तिच्या बाबांचे त्यांच्या कंपनीवर किती प्रेम आहे हे तिला माहीत होते. त्यामुळेच बाबांची कंपनी वाचविण्यासाठी तिने गौतमला होकार देण्याचा निर्णय घेतला..

"अहिल्या हट्टीपणा नको करूस.. तुझे आयुष्य जास्त महत्वाचे आहे आमच्यासाठी.." सरस्वतीबाईंनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला..

" आई, मला समजते.. पण मी खरंच मनापासून हो म्हणते आहे लग्नासाठी. सरांना मी ओळखते. आमच्यामध्ये वयाचे अंतर जरी असले तरी ते जाणवत नाही.. तू नको टेन्शन घेऊस. मी सांभाळून घेईन सगळे.."


अहिल्या गौतमशी लग्नाला तयार झाली हि गोष्ट जेव्हा देवेंद्रला समजली तेव्हा त्याला तिचा खूप राग आला..

" तू त्या म्हातार्‍याशी लग्न करणार?" त्याने अहिल्येला विचारले..

 " बोलताना विचार करून बोल.. ते माझे होणारे पती आहेत.."

" अहिल्या पण मला सोडून तू त्याच्याशी लग्न करूच कशी शकतेस? अजूनही वेळ आहे. मोड ते लग्न आणि मला हो म्हण.."

" ते शक्य नाही आता.. मी शब्द दिला आहे.."

" असं.. बघतोच तुला कसे मिळवायचे ते.." रागारागाने देवेंद्र तिथून निघून गेला..




अहिल्या आणि गौतमचे लग्न होईल का? झाले तरी देवेंद्र त्यांना संसार करू देईल का? पाहू पुढील भागात..

कथा कशी वाटली सांगायला विसरू नका..


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all