Jan 29, 2022
कथामालिका

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 25

Read Later
अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 25

अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग 25


पूर्वार्ध..


अहिल्या कशीबशी
प्रकाशच्या हातून निसटली, तिला एक वृद्ध दाम्पत्य दिसले, अहिल्या त्यांच्याकडे गेली, तिथे थोडासा विसावा घेतला आणि तिथुन निघणार तर आजीनी अडवलं, एवढया रात्री निघू नकोस,वाटलं तर अगदीच पहाटे जा.


अहिल्या तयार झाली.


इकडे मालतीला सासूबाई आणि नवरा धमकावत होते, प्रकाश तिला अहिल्याला कस पकडलं हे रंगवून रंगवून सांगत होता. आता ती माझ्या हातून निसटली पण मी तिला सोडणार नाही असं मालतीला सांगून गेला, मालतीला खूप टेन्शन आलं, आपल्यामुळे अहिल्याला काही झालं तर.
विचार करता करता तिचा डोळा लागला.


आता पुढे,

 

रात्रीच्या अंधाराची जागा आता सकाळच्या प्रसन्न पहाटेने घेतली.
सकाळचं प्रसन्न वातावरण मनाला स्पर्शून जाणारं होतं.


पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिराच्या घंटेचा नाद सर्वत्र पसरला.
कोवळं ऊन खिडकीला चिरत आता गेलं, अहिल्याच्या त्या गुबगुबीत गालावर उमटलं .

  त्या किरणांनी अहिल्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणखीनच वाढलं, जशी किरणे तिच्या चेहऱ्यावर पडली तिने हळूच डोळे उघडले, कुस पलटली.


रोजच्यापेक्षा आज तिला उठायला जरा उशीरच झाला, पण आज चेहऱ्यावर वेगळच तेज दिसत होतं, का कुणास ठाऊक खूप दिवसानंतर आज तिला प्रसन्न वाटतं होत. उठून फ्रेश झाली तर देवघरातून घंटीचा आवाज येऊ लागला तशी अहिल्या देवघराकडे वळली.


शेणाने सारवलेली ती प्रशस्थ देव खोली अगरबत्तीच्या  सुगंधाने दरवळत होती. मातीच छोटसं देवघर, त्यावर हाताने कोरलेल्या देवांच्या छटा बघून अहिल्या सुखावली.

 

आजीच्या बाजूला जाऊन बसली. आजीनी तिच्या कपाळावर कुंकू लावायला हात समोर केला तस अहिल्याने आजीचा हात पकडला आणि मानेनी नकारात्मक मान हलवली.

आजीनी हात खाली केला, चेहऱ्यावर एक स्मितहास्य खुलवलं.


“पोरी तू मला का थांबवलस? मला माहित नाही, तुझ्या आयुष्यात काय काय घडलं? मला याची काहीच कल्पना नाही. पण जे काही झालंय त्याची शिक्षा तू स्वतःला का देतेस? स्वतःच आयुष्य पणाला का लावतेस? ज्या गोष्टीसाठी तू माझा हात धरलास ना तेच स्त्रीच सौन्दर्य आहे.तो तिचा मान आहे, तू तुझी सुंदरता का कमी करतेस?.”


अस बोलून आजीनी तिला आरश्या समोर नेलं.


“बघ इथे, स्वतःला निरखून बघ. इतक्या सुंदर चेहऱ्यावर हा लाल कुंकुवाचा टीका तुझ्या कपाळावरच सौंदर्य वाढवत, तुझ्या चेहऱ्यावरचं तेज खुलवतय,तू स्वतःला यापासून अलिप्त का ठेवतेस?”

 

“कुणालाही घायाळ करावं इतकं सुंदर गोंडस  रूप आहे तुझं”
अहिल्याने आजीचा हात बाजूला केला आणि चेहऱ्यावर हलक हास्य आणलं.


“जो घायाळ व्हायला हवा होता, त्याच्यावर तर काहीच परिणाम झाला नाही. ज्याने माझ्या सौंदर्याचे वर्णन करायचं होतं , त्याला माझ्यात कधी सुंदरता दिसली नाही. मी नटाव तरी कुणासाठी?. हा साज शृंगार करावा तरी कुणासाठी?”

 

“स्वतःसाठी बाळा.फक्त स्वतःसाठी,  या जगात कुणीही कुणाला पुरत नाही, माणुस एकटा येतो नी एकटा जातो, मीच भली नशीबवान की म्हाताऱ्याने अजून साथ सोडली नाही”
“काय ग मला काही बोललीस का?”


“बघितलस पोरी, म्हाताऱ्याने हे बरोबर ऐकलं.”
दोघीही हसल्या.


आजीनी तिला बसवलं, तिला शृंगार करून दिला.
आणि तिला आरशासमोर नेलं.


“बघ आरशात”


लाल रंगाची नववारी ,त्यावर हिरवा काठ, काठावर मोराच नक्षीकाम.


त्यावर पिवळ्या रंगाचा चमचमता शेला, गळ्यात बारीक कुंदन- मोत्याची ठुशी, कानात मोत्याची बाली, नाकात मोठी जरीची नथ, भांगात भरलेलं कुंकू आणि कपाळावरचा मनमोहक टिका.


अहिल्या  बराच वेळ स्वतःला निरखून बघत राहिली.
आणि हरवली भूतकाळात.

राजेशाही थाटामाटात झालेलं लग्न.


आपण मोठ्या घरात रहायला जाणार एवढाच आनंद त्या चिमुकल्या जीवाला झाला होता.


अहिल्या आनंदात होती,आपल्याला नवीन माणसं मिळणार, आपण नवीन घरी जाणार, आपला सगळा हट्ट पुरवणार एवढंच तिच्या डोक्यात होतं, तीच बालपण कष्टात गेलं,तिची सावत्र आई तिला खूप त्रास द्यायची.


लग्नाचा दिवस उजाडला.


“ एक बंधन,एक कर्तव्य
एक नवं नातं, एक नवी जाणीव
एक नव्याने जुळणारी रेशीमगाठ
एक स्वप्न दोन डोळ्यांच
एक हुरहूर दोन मनांची
एक पाऊल सात पावलांचा
उत्सव नवीन नात्यांचा”

 


रोषणाईने  संपूर्ण राजवाडा टीमटीम ताऱ्यांसारखा लखलखत होता, सर्वत्र प्रकाश पसरलेला होता.


सगळे पाहुणे मंडळी राजवाड्यात पोहोचले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव होते..सगळे राजवाड्याच्या सजावटीची चर्चा करत होते.


राजेशाहीचा थाट बघून सगळ्यांचे डोळे दिपून गेले.

नवरदेव माधवराव यांचे प्रस्थान  झाले.
नवरी नटून थटून आली, सगळ्यांच्या आशीर्वादाने विवाह संपन्न झाला.
दोघेही विवाह बंधनात अडकले.


विवाह हा एक संस्कार सोहळा आहे, त्यात दोन कुटुंब जोडली जातात, दोन मने जोडली जातात, या सोहळ्यात धार्मिक विधी सोबत इतरही विधी पार पाडल्या जातात, वधू वरांची सलगी वाढवण्यासाठी उष्टी हळद लावली जाते, सगळ्यांसमोर वधू वर एकमेकांना एकनिष्ठ राहण्याच वचन देतात.


सप्तपदीच्यावेळी  दोघेही एकत्र सात पावले चालून नाते दृढ करतात.


लग्न विधी पार पडला आणि नववधूचे तिच्या नवीन घरी स्वागत झाले.


गृहलक्ष्मीच्या आगमनाने सर्व कुटुंब आनंदी झाले, गृहप्रवेशाच्या वेळी नववधूला उखाणा घ्यायला सांगितला.
अहिल्याने छान छोटासा उखाणा घेतला


“ उंबरठ्यावरती माप देते
सुखी संसाराची चाहूल
माधवरावांच्या जीवनात टाकले मी
आज पहिले पाऊल”

 


सगळ्यांनी छान छान म्हणत अहिल्याच कौतुक केलं.
सगळ्या विधी झाल्यानंतर अहिल्या तिच्या खोलीत गेली, खोली मनमोहक फुलांनी सजवलेली होती.


अहिल्याला माधवराव अजून कळले नव्हते, कधी गाठ भेट नाही की कधी बघितलं नाही.


अहिल्या खोलीत जाऊन बसली..थोड्यावेळाने माधवराव आले.
तिने हळुवार मान वर केली, तिरप्या नजरेने माधवरावांकडे  कटाक्ष टाकला. माधवरावांचा चेहरा बघून सुखावली. ती रात्र फक्त गप्पा आणि गप्पात रंगली.


“अहिल्या...ये पोरी.”


आजीच्या आवाजाने अहिल्या भानावर आली.


“काय ग पोरी कुठे हरवलीस?”
अहिल्याने स्मितहास्य केलं.
“कुठेही नाही”
“पोरी अशीच हसत रहा, आणि अशीच नटत रहा, छान दिसतेस”


“आजी मी जाऊ?.”


आजीनी होकारार्थी मान हलवली.


अहिल्या आजी आजोबांना नमस्कार करून निघाली.
अहिल्या घरी पोहोचली, गेल्या गेल्या विठ्ठल भडकला.
“अहिल्ये.अग काय,कुठे होतीस?. कुठे कुठे शोधलं मी तुला? कुठे होती रात्रभर.”


“अरे बसू तरी दे मला”


“हम्म बस,मी पाणी आणतो.”


अहिल्याने विठ्ठलला सगळा वृतांत सांगितला.
बाहेरून हे सगळं प्रताप ऐकत होता.


“अहिल्यासोबत इतका वाईट प्रसंग घडला, आपण तिच्यासोबत नव्हतो” असा विचार त्याच्या मनात आला.मी काहीच मदत करू शकलो नाही याचं त्याला खुप वाईट वाटलं.
प्रतापचे डोळे पाणावले.


क्रमशः

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing