अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग पहिला

Ahilya awaghi daha varshachi chimuradi Khelane bagadnyache divas

अहिल्या, अवघी दहा वर्षाची चिमुरडी....

खेळणे, बागडण्याचे दिवस,

शिक्षण घेण्याचे दिवस...

आज तिचा विवाहसोहळा पार पडला..

अहिल्यानी हिरव्या रंगाची नऊवारी घातलेली,

माथ्यावर मोठं कुंकवाचा टीका,

नाकात नथ, गळ्यात ठुशी, हातात कंगण,

डोळ्यात अंजन, पायात पैंजण आणि केसांवर माळलेला गजरा..

अगदी निरागस चेहरा....

याउलट ...माधवराव पंडित ,वय वर्ष चोवीस..

उंच पुरे, अंगकाठी जाड ,

डोक्यावरचे अर्धे केस गेलेले...पण मनानी खूप प्रेमळ....

पूर्ण चौदा वर्षाच अंतर होत दोघात...

अहिल्या लग्न होऊन लक्ष्मी च्या पावलांनी सासरी आली, गृहप्रवेश झाला...

माधवरावांचा भव्य वाडा होता.... बारा पंधरा खोल्या, मोठे मोठे न्हाणीघर.. भव्य स्वयंपाक खोली....

अंगणात मधोमध मोठं तुलसी वृंदावन..... वेगवेगळ्या फुलांची झाडे...

गृहप्रवेशाच्या वेळी माधवरावांच्या बहिणीने यमुनाने अहिल्याला नाव घ्यायला सांगितले, अहिल्या ने नाव घेतले, एक छोटासा उखाणा घेतला

भव्य वाडा,

त्यात टीमटीमती रोषणाई

सासुबाई सारख्या आई मिळाल्या,

हीच माझी उतराई

यमुनेसारखी बहीण मिळाली

सासर्यांच्या रुपात वडील मिळाले

सगळी नाती जपेन 

असे वचन देते मी

गृहप्रवेशाच्या वेळी

माधवरावांचे नाव घेते मी......

 गृहप्रवेश झाला... घरात पाऊल ठेवत नाही तर सासूबाईंनी नाक मुरडले...

माधवरावांची आई येसूबाई यांना अहिल्या कधीच आवडली नव्हती पण माधवराव यांच्या वडिलांनी म्हणजेच गणपतरावांनी हे स्थळ आणलेलं त्यामुळे येसूबाई काही बोलू शकल्या नव्हत्या...

गृह प्रवेश झाला आणि काही वेळाने येसू बाईंनी अहिल्याला हळद दूध बनवायला सांगितले,त्यांच्या कडे तशी परंपरा होती नवीन सुनेने आल्या आल्या सगळ्यासाठी हळद दूध बनवणे....

अहिल्याने हळद दूध बनवले पण ते काही जमले नव्हते, त्यावरून येसू बाई तिला खूप बोलल्या, बिचारी दहा वर्षाची पोर मुसमुसली....

रात्र झाली सगळ्यांची जेवण आटोपली.. सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले, माधवरावांच्या बहिणीने खोली छान तयार करून ठेवलेली पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण येसूबाईंनी अहिल्या ची झोपायची सोय व्हरांड्यात करून ठेवलेली होती....

“नवीन नवरी अशी उघड्यावर झोपेल बर वाटत का? गणपतराव

“झोपेल ती, तसही तिला सवय असेलच...झोपडीतून आली आहे ना....

“अग पण...

“तुम्ही गप्प बसा हो, तुमच्या पसंतीची सून आलीय ना घरात.…मग गप गुमान राहा...

“तिच्या माहेरी कळलं तर त्यांना काय वाटेल....

“काहीही वाटणार नाही...ते खूषच असतील, त्यांच्या घरातली धोंड आपल्या गळ्यात बांधली....

“तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही....अस म्हणत गणपत राव त्यांच्या खोलीत निघून गेले...

रात्रभर अहिल्या व्हरांड्यात रडत बसली होती, तिला हे अपेक्षित नव्हतं... तिनी जे स्वप्न रंगवली होती, त्याचा भंग झाला होता..

काही वेळाने माधवराव अहिल्या जवळ आले, तिच्याशी बोलायला... पण अहिल्या काही जास्त बोलली नाही... दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्या माधवरावांच्या रूम मध्ये गेली...

“ अहिल्या... ये ना...

“ मला तुमच्याशी काही बोलायचे आहे...”

“ बोल ..

“ मला इथे छान नाही वाटत, मला माझ्या घरी जायचं आहे....

“तुझ्या घरी?.. अग हे तुझंच घर आहे... आता तुला इथेच राहायचे आहे..

“ हो माहितीये मला, पण तुम्हाला माहितीये ना, मी सासूबाईंना नाही आवडत..

माधवरावांनी अहिल्याबाईच्या खांद्यावर हात ठेवत “तु काळजी करू नको, मी समजावेन त्यांना....

असं बोलून दोघांनी एकमेकाकडे बघून स्मितहास्य केले...

अहिल्या ने स्नान करून देवपूजा आटोपली,

देवाला हात जोडून नमस्कार केला आणि प्रार्थना केली की

"हे माता अंबाबाई हे बघ ना ग ,काय होतंय...आई बोलली होती मला की हे घर खूप छान आहे, सगळी माणसे चांगली आहेत, तुला तर सगळं महिती आहे ना, तू ओळ्खतेस ना सगळ्यांना...बघ ना यांच्या आई कशा वागतात माझ्याशी, मला बाहेर झोपवलं, मी लहान आहे ना मला खूप भीती वाटते.....हे अंबे माता तू त्यांना सांगशील का माझ्याशी चांगलं वागायला...."

मी जाते नाहीतर कुणीतरी ओरडणार...अस म्हणत ती उठली....

तुळशी समोर रांगोळी घालून तुळशीची पूजा केली....

ऐव्हाना घरातली मंडळी झोपून उठलेली होती...अहिल्या नी सगळ्यांसाठी चहा टाकला...आणि सासूबाईंच्या खोलीत घेऊन गेली...

“ आत येऊ का सासूबाई?...

“ये, काय काम काढलस..

‘सासूबाई, चहा आणलाय..अगदी तुम्हाला आवडतो तसा....

“हह.. एका दिवसात तुला माझी आवड निवड कळली.....

ती चेहरा हिरमसून

“तस नाही सासूबाई...

“दे आता आणलस तर... ओततेय नडडयात.....

अहिल्या सासूबाईंच्या हातात चहाचा कप देण्यासाठी समोर पाऊल टाकला तर तिच्या नऊवारीचा काठ पायाच्या अंगठ्यात लटकला, अहिल्या अडखडली आणि गरम गरम चहा सासुबाई च्या अंगावर सांडला...

“ तुला नीट चालता येत नाही का? तुझ्या आई-वडिलांनी तुला हेच शिकवलं का?”

“माफ करा सासुबाई...चुकून झालं...

येसूबाई ओरडल्या

“चल निघ....निघ इथन...

अहिल्या रडत रडत अंगणात झाडाच्या खाली बाकावर जाऊन बसली....

अहिल्या लग्नाआधी चोळी पोलका घालायची त्यात तिला सुटसुटीत वाटायचं आणि आता खूप अस्वस्थ वाटतं, अंगावर भार असल्यासारखं वाटतं , नऊवारी घालणं आणि त्यात अजून भरजरी दागिने...

अहिल्या कुठेही दिसत नाही म्हणून माधवराव तिला शोधत अंगणात आले, इकडे तिकडे बघत होते त्यांचं लक्ष अहिल्या कडे गेले, तिला रडताना पाहून त्यांना खूप वाईट वाटलं...ते अहिल्या जवळ जाऊन बसले...

“अरे बापरे ¡ माझ्या लहानश्या बाहुली ला काय झालंय?... अशी का रडतीये?....

तिला थोडं जवळ घेऊन

“ काय झालं अहिल्या?.

“मी सासूबाई साठी चहा घेऊन गेले होते...आणि चुकून त्यांच्या अंगावर चहा सांडला ... त्या मला खुप ओरडल्या...

“तू आधी रडणं बंद कर...मी बोलतो आईशी....

“नाही नाही... ती काकुळतेने बोलली...

सासूबाईंना वाटेल की मी तुम्हाला सांगत आले..

“नाही ग , ती तसा विचार नाही करणार..... मी बोलतो .... माधवराव येसूबाईंच्या खोलीत गेले..

“आत येऊ का...

“हहह...

आई हे काय चाललय???

“कुठे काय?

“तू अहिल्या शी अशी का वागतेस??मला माहिती आहे तुला ती आवडत नाही अग पण म्हणून तू तिच्याशी दुरव्यवहार करावा..तुझ्याकडून ही अपेक्षा नाही... अग किती लहान वय आहे तीच..अश्या वागण्याने तिच्या मनावर परिणाम होईल....

“ लग्न होऊन एक दिवस झाला नाही, आणि तू तिची वकालत घेऊन आलास इकडे.... थोडीशी तरी लाज बाळग.... माधवराव काहीही न बोलता खोलीतून निघून गेले... आठ दहा दिवस असेच गेले, सगळ्यांना वाटलं नीट होईल पण काहीच नीट होत नव्हतं... शेवटी गणपतरावांनी निर्णय घेतला काही वर्षे अहिल्या माहेरीच राहील त्यांनी सगळ्यांना निर्णय सांगितला..

 “मी निर्णय घेतला, अहिल्या काही वर्षे तिच्या माहेरी राहायला जाईल... गणपतराव

“माधव तिच्या आई वडिलांना निरोप पाठव....”

अहिल्या हे ऐकून खूप खुश झाली...

क्रमशः

ऋतुजा वैरागडकर

*ही कथा काल्पनिक आहे.. याचा कुठल्याही घटनेशी काहीही संबंध नाही, असल्यास हा निव्वळ योगायोग समजावा...

*कथा आवडल्यास लाईक, शेयर आणि कंमेंट नक्की करा...

🎭 Series Post

View all