अहिल्या संघर्ष मातृत्वाचा... भाग 40 अंतिम

Kiti to sanghrsh kiti tya yatna bhogasi alya

अहिल्या संघर्ष मातृत्वाचा... भाग 40 अंतिम


आधीच्या भागात आपण पाहिले की सदानंदने अजयवर वार करून त्याला जखमी केले.

अजयवर उपचार सुरु होते. पण तो शुद्धीवर येत नव्हता. काही दिवसानंतर तो कोमात गेला आणि त्यानंतर त्याच्या तब्येतीत बिघाड होऊन अजय मरण पावला.

गायत्रीला यातून सावरायला थोडा वेळ लागणार होता. सगळ्यांच्या प्रयत्नानंतर गायत्री त्यातून बाहेर पडली. गायत्रीने पुन्हा तिच्या कार्याला सुरुवात केली. आता गायत्रीने मनाशी ठाम निर्णय घेतला की आता यानंतर ती लग्न करणार नाही. सगळ्यांनी तिला समजावलं पण तिचा निर्णय पक्का होता.


आता पुढे, 


अहिल्याच्या कार्याची सगळीकडे प्रचिती व्हायला लागली. अहिल्याने एका संस्थेचे दहा संस्था केल्या. हळूहळू दिवस सरकत गेले. गायत्री सोबत आता गोजिरी पण अहिल्याच्या कामाला हातभार लावू लागली.


विठ्ठलची मुले मोठी झाली. त्यांनी पण स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं. प्रतापच्या मुलीचं लग्न झालं. प्रताप आणि त्याची बायको आता गावात येऊन राहू लागले.

मालती निवास मध्ये अहिल्याने वृद्धाश्रम सुरू केले. अनाथ स्त्रियांना तिथे आधार मिळायला लागला. तिथे येऊन स्त्रियांना आत्मिक समाधान मिळत होतं आणि हे बघून अहिल्याला पण खूप समाधान मिळत होतं.


मालती निवास मध्ये आता जवळजवळ शंभरच्या वर बाया आधाराला आल्या होत्या.


वर्ष उलटली, आहिल्याचे कार्य वाढतच गेलं. अहिल्याची जागा आता गायत्रीने घेतली.

अहिल्याचे आरामाचे दिवस होते त्यामुळे सगळी जबाबदारी गायत्रीने घेतली. गायत्री आणि गोजिरी मिळून सगळे कार्य करायच्या.

गायत्रीने समाजकार्यासोबत छोट्या बालकांना शिक्षण देखील देण्यास सुरुवात केली. शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिक्षणातून काय काय फायदा होऊ शकतो याचे महत्त्व ती सांगू लागली.

समाजकार्य,  शिक्षणकार्य या कार्यातून ती स्वतःदेखील घडत होती. तिच्यातही बरेच बदल झाले. तिच्या पावलावर पाऊल ठेवून गोजिरीने पण स्वतःच्या कार्याला सुरुवात केली. तिने अनाथाश्रमची पूर्ण जबाबदारी घेतली आणि अनाथ आश्रम चालवायला सुरुवात केली.


विठ्ठल आणि अहिल्या घरी बसून आराम करायचे. रात्री गायत्री आणि गोजिरी घरी येऊन त्यांना दिवसभराच्या सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगायचे आणि ते ऐकून दोघांनाही खूप छान वाटायचं.


आपण केलेल्या कार्याचे श्रेय आपल्याला मिळतेय याचं आत्मिक समाधान अहिल्याच्या चेहऱ्यावर दिसायचं. असेच दिवस, महिनोंमहिने, वर्षे उलटत गेली.


महाराष्ट्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या यादीमध्ये अहिल्याचं नाव जाहीर झालं.


वृत्तपत्रात ही बातमी दिसताच सगळ्यांना खूप आनंद झाला.
ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.
अहिल्याच अभिनंदन करायला घराबाहेर मोठी रांग तयार झाली. सगळ्यांनी अहिल्याचं कौतुक केलं. तिला शुभेच्छा दिल्या.


सोहळ्याचा दिवस उगवला,


अहिल्या नवीन नववारी नेसून तयार झाली. सोबत विठ्ठल, गायत्री आणि गोजिरी पण होत्या.


सगळे वेळेत शहरात पोहोचले. मोठया हॉलमध्ये कार्यक्रम होता. संपूर्ण हॉल फुलांनी सजलेला होता ,दारात मोठी संस्कारभारती रांगोळी काढलेली होती. मोठी मोठी मंडळी बसलेली होती. अहिल्या पण आत जाऊन बसली.


बाकीचे तिच्या मागे  जाऊन बसले.


थोडया वेळाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुरस्कार सोहळा सुरू झाला.


मान्यवर स्टेज वर येऊन बसले.
गिरीशने सूत्रसंचालनाला सुरुवात केली.


मी गिरीश, आज आपण इथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी जमलेलो आहोत.
आपण दीप प्रज्वलनाला सुरुवात करूया.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं.


दीप प्रज्वलन झालं त्यानंतर सत्कार सोहळा झाला. मान्यवर अध्यक्ष यांच्या हस्ते अहिल्याचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सचिवांच्या हस्ते पाटील साहेबांचा सत्कार करण्यात आला.


आता कार्यक्रमाला सुरुवात झाली.

काही पुरस्कार दिल्यानंतर अहिल्याचं नाव आलं.


“इथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीने आज मी एका अश्या स्त्रीला इथे आमंत्रित करणार आहे ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त समाजकार्यात झोकून दिलं. त्यांनी ही लढाई  फक्त एकटीने लढली.


लढाई होती एका स्त्रीची, तिच्या मातृत्वाची. ही एक अशी स्त्री आहे ज्या स्त्रीने तिच्या मातृत्वासाठी सासर सोडलं, माहेर सोडलं आणि स्वबळावर आज इथपर्यंत पोहोचली आहे.


त्यांना आई व्ह्यायचं होत. त्यांच्या गर्भात मुलीचा अंश आहे हे कळताच सासरच्यांनी त्रास दिला, अतोनात त्रास सहन करून देखील त्या त्यांच्या मुलीला वाचवू शकल्या नाही. त्यांना मुलगीच हवी होती. 


“मुलापेक्षा मुलगीच बरी
प्रकाश देते दोन्ही घरी”


सासरचा त्रास सहवेना म्हणून त्या घराबाहेर पडल्या.


कुणीतरी फेकलेल्या बाळाला पदराशी बांधल, आणि त्यांच्या मातृत्वाच्या लढाईला सुरुवात झाली. कितीतरी अनाथ मुलींना, कचऱ्यात टाकून दिलेल्या नवजात बाळाला त्यांनी जीवनदान दिल.

त्यांना फक्त एक मुलगी हवी होती पण घरदार सोडलं आणि देवाने पदरात शंभरच्या वरती मुली दिल्या.

स्वतः उपाशी राहून त्यांनी त्या मुलींचे पोट भरले. मुलांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून त्यांना त्यांचं मातृत्व संपुष्टात आल्यासारखं वाटायचं, अनेक वृद्धाश्रम सुरू केलीत.

ज्यांनी आपल्या माय बापाला घराबाहेर हाकललं त्यांना आधार दिला. त्यांच्या बद्दल बोलायला शब्दही अपुरे पडतील अशी त्यांची ख्याती आहे. तर आता मी त्या स्त्रीला मंचावर बोलावणार आहे. स्वागत करूया.


“अनाथांची आई. वृद्धांची माई
 मातृत्वाचा पाझर, हेच तिच्या ठाई” 
टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या
अहिल्या माई साठी..

गिरीशच्या तोंडून कौतुक ऐकताना अहिल्याचे डोळे पाणावले.
नाव ऐकताच ती जागेवरून उठली. समोर स्टेजवर गेली.
मान्यवरांच्या हस्ते अहिल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला.


अहिल्याच्या डोळ्यातले आनंदाश्रू सगळं बोलून गेले,  आज अहिल्याचं मातृत्व जिंकल. अहिल्याने बोलायला सुरुवात केली.


“इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार.
मी खूप आभारी आहे की आज मला इथे बोलवून माझा सत्कार करण्यात आला, तुम्ही सर्वांनी मला या योग्य समजलंत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.


माझ्या प्रवासाबद्दल काय सांगणार, आधीच आपल्या गिरीश भाऊंनी सगळं सांगितलंय. तरी मला एकच सांगावस वाटतंय. 


“मुलगी जन्माला आली म्हणून तिला टाकून देऊ नका. त्यात त्या निष्पाप जीवाची काहीही चूक नसते. मुलीला गर्भातच मारून टाकलं जातंय.  हे अगदी चुकीचं आहे. मुलगी झाली म्हणून काहीही वाईट घडत नाही.


उलट मुलगी झाली म्हणून आपण आनंद व्यक्त करायला हवं कारण मुलीच्या रुपात आपल्या घरी लक्ष्मी येत असते. पण आपल्या समाजात तिलाच नाकारतात.


मी या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छीते की मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद करू नका, दोन्ही समान असतात. एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते.


जय महाराष्ट्र


टाळ्यांचा कडकडाट झाला.

गायत्री आणि गोजिरीच्या चेहऱ्यावर समाधान झलकत होतं.

"किती तो संघर्ष
किती त्या यातना
भोगासी आल्या
पण ती अडखडली नाही
की घाबरली नाही
लढली, पडली उठून
पुन्हा उभी झाली
जखमा झाल्या, वेदनाही झाल्या
सगळं सहन करून
दुसऱ्याला आधार दिला
सगळ्यांना आनंद देता देता
एक नाही,दोन नाही
शेकडो अनाथांची माय झाली.”

समाप्त:


संपूर्ण कथा कशी वाटली नक्की कळवा. सामाजिक विषयावर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न होता.  नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.


धन्यवाद

🎭 Series Post

View all