Jan 29, 2022
कथामालिका

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 29

Read Later
अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 29

कथामालिका
अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग 29

आधीच्या भागात आपण पाहिले की,
अहिल्या गौराई आणि झाशीला घेऊन मालतीकडे गेली. पण मालतीशी तिची भेट होऊ शकली नव्हती. मालतीच्या सासूने सांगितलं की ती माहेरी गेली पण पत्ता विचारल्यावर गडबडली. अहिल्याला संशय आला की नक्कीच काहीतरी गडबड आहे.


विठ्ठलने प्रकाशला गाठलं त्याच्या कडूनही काहीच माहिती मिळाली नाही. अहिल्याने तिथे जाऊन आजूबाजूला चौकशी करायचं ठरवलं.


आता पुढे,


अहिल्या पुन्हा मालतीच्या गावाला गेली.चेहरा कुणी ओळखू नये म्हणून तिने तिचा चेहरा पदराने झाकुन घेतला होता. मालतीच्या शेजारच्या घरी एक बाई दिसली.अहिल्या तिच्याकडे गेली.

अहिल्या:“अहो ताई मला तुम्हाला काही विचारायचं आहे, मी येऊ का आत?”


शेजारची बाई: “कोण तुम्ही? कुठे राहता? तुम्हाला माझ्याकडून काय माहिती पाहिजे?”


अहिल्या:“मी अहिल्या शेजारच्या गावी राहते. ती तुमच्या बाजुला मालती राहते ना तिची मैत्रीण आहे मी.तुम्ही ओळखता ना मालतीला? म्हणजे तुमचं बोलणं होतं का तिच्याशी? आणि तुमचं नाव काय? सहज विचारलं ह.”

“ माझं नाव मंगली,  मालतीच म्हणाल तर ,नाही बाई  तिची सासू तिला घराच्या बाहेरच निघू देत नाही. कधी बोलण्याचा प्रश्नच आला नाही. मालतीची सासू कधी ना सुनेला सणासुदीला बाहेर काढत ना कोणत्या कार्यक्रमाला, अशी कुठे घेऊनही जात नाही.”


अहिल्या: “तुम्ही शेवटचं कधी पाहिलं तिला?  काही माहिती देऊ शकाल?”


मंगली:“मला तर खूप दिवसापासून ती दिसलीच नाही. आधी कशी खिडकीतून बोलायची आता त्यांची खिडकी पण बंद  दिसते. आता दोन दिवसा आधी मला बाजूची रुक्मा भेटली होती. ती सांगत होती त्यांच्या घरातून खूप जोरजोरात आवाज येत होते म्हणून, काय माहिती नवऱ्याने तिला मारलं की काय केलं? तसंही तिच्या जीवाचा छळ सुरूच होता. सासूही त्रास द्यायची आणि नवरा पण त्रास द्यायचा.”


अहिल्या:“नाही पण तिचा नवरा प्रकाश तिच्याशी चांगला वागायचा ना? म्हणजे तो सुधारला होता ना?”

मंगली: “कायचा सुधरते तो बाई,  सगळी नाटकं असतात. “खायचे दात वेगळे आणि दाखवायचे  वेगळे” घरात त्याच्या आईचीच इच्छा चालते बाहेर तो फक्त दाखवण्यापुरता बोलतो की त्याला मालतीची काळजी आहे. काही काळजी नसते त्याला. तुम्हाला सांगते नक्कीच काहीतरी गडबड आहे. रुक्मा बोलली ना त्या दिवशी जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला, त्या दिवसापासून आवाज आलाच नाही, त्यांची खिडकी पण कोणी उघडली नाही. सगळे दार बंद बंदच राहतात. ते घरात कोणाला येऊ देत नाही आणि स्वतः घराच्या बाहेर निघत नाहीत.”

 

 अहिल्याने मंगलीकडून माहिती घेतली आणि ती थेट घरी आली.


घरी आल्या आल्या अहिल्याने विठ्ठलला सगळं सांगितलं.

अहिल्या: “पणत्याभाऊ मी गेले होते पण काहीच माहिती मिळाली नाही.”
विठ्ठल सुन्न बसून होता.


अहिल्या: “काय रे पणत्याभाऊ मी तुझ्याशी बोलते आणि तू काहीही न ऐकल्यासारखं का बसलास?”

 

अहिल्याच बोलणं ऐकूनही तो सुन्नच होता. अहिल्या त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हाताने हलवलं तेव्हा तो भानावर आला आणि अहिल्याकडे बघू लागला.
अहिल्या: “काय झालं? मी तुझ्याशी बोलत आहे आणि तुझं लक्ष कुठे आहे? काय झालं असा का बसलास?”

विठ्ठल: “अहिल्या नाम्या आला  होता.”
अहिल्या: “कोण नाम्या?”
विठ्ठल: “अगं ज्याला प्रकाशवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तो नाम्या, तो आला होता आज घरी.”
अहिल्या: “मग काय झालं?”
 
विठ्ठल: “मालती शेतावरच्या विहिरीजवळ निपचित पडली दिसली, नाम्याने जवळ जाऊन बघितलं तर तिचा श्वास बंद होता. त्याने आरडाओरडा करून गाव जमा केला. सकाळची दुपार झाली तरी प्रकाश तिथे पोहोचला नव्हता याचा अर्थ तो पळून गेला असावा त्याने आणि त्याच्या आईने मिळून मालतीला मारून टाकलं असावं.”

 


अहिल्याला तिच्या कानावर विश्वास बसेना. “असं कसं होऊ शकत?” मनातले विचार सुरू झाले.
अहिल्या: “काय? काय सांगतोस तू?”

विठ्ठल: “हे खर आहे. नाम्याने मला सांगितलं तेव्हाच मी तिकडे जाणार होतो, पण तू नव्हतीस म्हणून थांबलो. आपण जाऊन बघूया.”

 


विठ्ठलचं सगळं बोलणं ऐकून अहिल्या आतून हादरली, मनात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला. अश्रूंनी पण बरसात करायला सुरुवात केली.  


“मी काहीच करू शकले नाही, मी मालतीसाठी काहीच केलं नाही” 
अहिल्या मनातल्या मनात पुटपुटली. तिला स्वतःचाच राग यायला लागला.


अहिल्या: “मी कमी पडले, मी मालतीसाठी काहीच नाही करू शकले. पणत्याभाऊ मी हरले. मी हरले.”
अहिल्या धाय मोकलून रडायला लागली. 


विठ्ठलने कसतरी समजावून तिला शांत केलं.


विठ्ठल आणि अहिल्या शेतातल्या  त्या विहिरी जवळ गेले. तिथे लोकांनी जमाव केला होता, अहिल्या जमावातून रस्ता काढत समोर गेली. तिला मालती निपचित पडलेली दिसली. तिने मालतीला आवाज दिला, हलवलं पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मालतीचा श्वास बंद झाला होता.

 

तिने आजूबाजूच्या लोकांना विचारलं पण कुणाकडूनच काहीच माहिती मिळाली नाही.

अहिल्या तिथून उठली, पदराने डोळे पुसले. कंबर कसून प्रकाशच्या घरी गेली. त्याच्या घराला कुलूप ठोकलं होतं.
अहिल्याला सगळं समजलं की प्रकाश आणि त्याच्या आईने मिळून मालतीला मारून टाकून तिथून पळ काढला.

 


गावकऱ्यांनी मिळून मालतीचा अंत्यसंस्कार विधी पूर्ण केला.
बरेच दिवस होऊनही प्रकाश आणि त्याची आई कोणालाच सापडली नाही. त्यानंतर गावकरी सुद्धा ही घटना विसरून गेले.

एक दिवस अहिल्या तिच्या संस्थेत गेली, तिथे मुलांसोबत वेळ घालवला.
छान हसत खेळत अहिल्याचे दिवस जात होते. अहिल्याच्या संस्थेमध्ये आता अनेक मुली जमल्या होत्या.

अहिल्या स्वतःची संस्था उघडणार होती, संस्थेचे काम जवळजवळ पूर्ण होत आले होते. आता अहिल्याला संस्थेत जवळ पन्नासच्या वरती मुली झाल्या होत्या. अहिल्याने संस्था उघडली आणि त्या संस्थेचे नाव “मालती निवास” ठेवलं.
ती मालतीला न्याय देऊ शकली नाही, तिचा जीव वाचवू शकली नाही. या गोष्टीचं तिला खूप दुःख झालं होतं आणि म्हणून तिने त्या संस्थेचे नाव “मालती निवास” ठेवलं.

 

मालतीच्या मृत्यूची सल अजूनही तिच्या मनात ठसठसत होती. ती जखम कुठेतरी खोलवर रुजलेली होती.
अहिल्याला त्या  जखमेचा ओलावा कायमस्वरूपी जपून ठेवायचा होता. त्यासाठीच “मालती निवास” चा उगम झाला.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing