अहिल्या..संघर्ष मातृत्वाचा भाग 26
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अहिल्या आजीच्या घरून निघाली आणि थेट घरी पोहोचली. घरी गेल्यागेल्या विठ्ठल तिच्यावर ओरडला.
“कुठे होतीस?कशी होतीस? काय करत होतीस?मी तुला किती शोधलं?”
“अरे हो हो, बसू तरी दे.”
अहिल्याने विठ्ठलला घडलेला सगळा प्रसंग सांगितला.
दाराच्या बाहेर उभा राहून प्रताप हे सगळे ऐकत होता. अहिल्याच्या वाईट प्रसंगी तो तिच्यासोबत नव्हता याचं त्याला खूप वाईट वाटलं.
आता पुढे,
प्रताप बाहेर उभा होता हे विठ्ठलच्या लक्षात आलं.
“प्रताप असा बाहेर का उभा आहेस?ये ना आत.”
प्रताप आत आला,त्याचा चेहरा हिरमुसला होता.त्याने हळूच अहिल्याकडे बघितलं. अहिल्यानेही प्रतापकडे बघितलं.
“काय रे प्रताप असा का चेहरा पडला तुझा?”
“मला माफ कर अहिल्या.तुझ्या वाईट प्रसंगी मी तुझ्यासोबत नव्हतो.”
“प्रताप तुला माहित तरी होतं का हे सगळ होणार आहे, कधी कोणती वाईट गोष्ट घडेल सांगता येत नाही. अरे पण तू असा उदास का होतोस. बस इथे बस, काय झालं?”
प्रताप अहिल्याच्या बाजूला जाऊन बसला,त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून त्याने हळूच मान बाजूला फिरवून डोळे पुसले. अहिल्याकडे बघितले आणि बोलायला लागला.
“तुला काही झालं तर नाही ना? अशी एकटी का फिरत असते? मला सांगायचं मी आलो असतो तुझ्यासोबत.”
“अरे पण पणत्याभाऊ होता माझ्यासोबत त्याला काही काम आठवलं म्हणून तो निघून गेला होता आणि त्याला तरी कुठे माहिती होतं हे सगळं होणार आहे. तू काळजी करू नकोस मी बरी आहे.”
“अगं हो बरी आहेस म्हणून काय झालं आणि खरच जर त्यांच्या तावडीतून सुटली नसतीस तर, नाही नाही मला तर विचारही करवत नाही, मी तुला सांगून ठेवतो यानंतर कुठे जायचं असेल तर मला सांग मी तुझ्यासोबत येत जाईल, एकटीने जायचं नाही.”
अहिल्याला प्रतापच्या डोळ्यात तिच्या बद्दल अजूनही प्रेम दिसत होतं. प्रताप ज्या काकुळतीने बोलत होता खरंच आतून त्याला खूप वेदना झाल्या होत्या. अहिल्याने प्रतापचा हात हातात घेतला आणि बोलली,
“प्रताप खरंच काळजी करू नकोस आणि मला गरज पडली ना तर मी तुला हाक देईन कारण तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. जेव्हा जेव्हा मला या मित्राची गरज पडेल ना तेव्हा तेव्हा मी त्याला हाक मारेल.”
अहिल्याच बोलणं ऐकून प्रतापला बर वाटलं, त्याने सूटकेचा श्वास घेतला.
“तू सांग तू इथे का आला होतास.?”
“अरे हो विसरलोच, मी तुला हे सांगायला आलो होतो की आईने माझ्यासाठी मुलगी पसंत केली. मी बघितलं नाहीये तिला, आधी म्हटलं तुला सांगावं आणि मग बघावं म्हणून मी इकडे आलोय.”
“अरे काकूंनी बघितलंय ना, मग चांगलीच असणार, होकार देऊन टाक.”
प्रतापने चेहऱ्यावर हलक स्मितहास्य आणलं आणि होकारार्थी मान हलवली.
“ठीक आहे मी घरी जाऊन सांगतो की माझा होकार आहे.”
प्रताप घरी गेला,
“आई आई तु जी मुलगी पसंत केली आहेस ना ती मला पसंत आहे, मी लग्न करायला तयार आहे.”
“काय रे अहिल्याची परवानगी घेऊन आलास की काय?”
“नाही, तिला सांगायचं म्हणून गेलो होतो, तिच्यासोबत खुप वाईट घटना घडली हे ऐकून खूप वाईट वाटलं, मी तिच्यासोबत नव्हतो याचही वाईट वाटलं,पण त्यातून ती सुखरूप बाहेर आली याचा आनंदही तेवढाच आहे.”
“काय रे असं काय झालं तिच्यासोबत?”
प्रतापने घडलेली सगळी घटना आईला सांगितली.
“इतकं सगळं घडलं त्या पोरीसोबत, खरचं खूप हिम्मतवाली ही पोर, सगळं कसं हिमतीने एकटीने लढते. आयुष्यात खूप समोर जाईल.”
बोलता बोलता आईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले
“काय ग आई तुझा चेहरा का असा झालाय?”
“काही नाही रे त्या पोरीच कौतुक करावं तेवढं कमी, ती आपल्या घरची सून झाली असती तर.”
बोलता बोलता आई थांबली आणि तिथून निघून गेली.
......................................
मालतीकडे तिचा छळ सुरूच होता, सासू आणि नवरा दोघेही तिला खूप छळायचे. मालतीची सासू तिच्याकडून दिवसभर काम करून घ्यायची आणि खायला सुद्धा काही द्यायची नाही. दोन दिवस काम करून करून मालती थकली, पोटात अन्नाचा कणही नव्हता.
ती स्वयंपाक घरात गेली खायला काही आहे का बघत होती इतक्यात सासूबाई आली.
“काय ग, काय शोधत आहेस?”
“मला भूक लागली आहे म्हणून बघत होते काही आहे का.”
मालती अडखळत अडखळत बोलली
“खायला पाहिजे तुला अवदसे” असं म्हणत मालतीच्या सासूने तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने तिचे केस पकडले.
“काम करायला नको फक्त खायला पाहिजे, काहीही खायला मिळणार नाही. चल तुला चांगली वठणीवर आणते” असं म्हणत तिला तिच्या खोलीत नेऊन ढकललं आणि बाहेरून दार लावला.
मालती पलंगाजवळ जाऊन पडली तिच्या डोक्याला पलंगाचा काट लागून रक्त लागलं. अंगावरचा कपडा फाडून तिने ते पुसायला घेतलं. रात्री नवरा दारू पिऊन आला, खोलीत पूर्ण अंधार होता.
“काय ग मालती,मेलीस की काय? सगळीकडे अंधारच दिसतो.”
असं बोलत बोलत तो थोडा समोर आला तर त्याचा पायाला काहीतरी लागून तो अडखळून पडला, तसं मालतीला जाग आली.
तिने पटकन उठुन कंदील लावला.
“ काय ग अवदसे अशी रस्त्यात का बसून होतीस? तुझ्यामुळे मी अडखळलो.”
मालती गप्प राहिली, ती गप्प राहिली याचा प्रकाशला राग आला आणि तो तिच्या जवळ जाऊन तिचे गाल जोरात पकडून
“काय विचारतोय मी, अशी अंधारात का बसली होतीस?”
तरीही मालती गप्पच उभी होती, तिच्या गालांची खूप आग होत होती, मनातल्या मनात ती विचार करत होती अंगात एवढा ताप आहे तरी याला स्पर्शाने सुद्धा जाणवलं नाही.
तिची मान हलवून त्याने तिला झिडकारलं आणि पलंगावर जाऊन पडला.
मालती पाणी प्यायली आणि खाली चटई टाकून झोपली,अर्ध्या रात्रीपर्यंत मालतीचे हुंदके देणे सुरू होते, प्रकाशला जाग आली, तिच्या हुंडक्याचा आवाज त्याच्या कानात गेला.
“काय गं काय झालं हुंदके द्यायला?”
प्रकाशचा आवाज ऐकताच मालती गप्प झाली आणि झोपण्याच नाटक करू लागली.
प्रकाश तिच्या जवळ गेला, तिचा हात पकडला तर तिचा हात खूप गरम लागला.त्याने कपाळावर हात लावला तिथेही गरम जाणवलं
“अरे हिला तर ताप आहे.”प्रकाश मनातल्या मनात बोलला.
“मालती उठ, वैद्याकडे जाऊन येऊया.”
“नाही नको मी बरी आहे.”
“अग उठ तापाने फणफणत आहेस.”
मालती उठून उभी झाली तोच तिला भोवळ आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली पडली.
प्रकाशने तिला उचललं आणि वैद्याकडे घेऊन गेला, वैद्याने तपासून सांगितलं की तिच्या पोटात अन्नाचा एकही कण नाहीये त्यामुळे तिला भोवळ आली आणि ती खूप अशक्त झाली आहे, तिला आरामाची गरज आहे.
प्रकाशला कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं तो मालती जवळ गेला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा