अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग 28

Ahilya matra vicharat guntat geli

अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग 28


आधीच्या भागात आपण पाहिले की,


मालती आणि प्रकाश दोघेही अहिल्याकडे गेले. मालतीने अहिल्याला सगळं सांगितलं. प्रकाशमध्ये झालेला बदलही सांगितला. दोघेही भेट घेऊन निघाले.


अहिल्या मात्र विचार करत बसली, प्रकाश खरंच बदलला असेल का? की तो नाटक करतोय? मालतीला स्वतःकडे वळवून काही साध्य करण्याचा त्याचा प्रयत्न तर नसेल? असे अनेक प्रश्न तिला भेडसावत होते.

आता पुढे,


विठ्ठलने प्रकाशकडे लक्ष ठेवायला काही माणसांना सांगून ठेवलेलं होतं. ती माणसे प्रकाश वर लक्ष ठेवीत असतं. तो कुठे जातो? कुठून येतो? दिवसभर काय करतो? या सगळ्या गोष्टींकडे ती माणसं लक्ष ठेवून असायची. मालतीला आता थोडं बरं वाटू लागलं. प्रकाश बाहेर गेला आणि मालतीची सासू तिच्या खोलीत आली.


मालतीची सासू:
“आराम करून झाला का? आराम करून झाला असेल तर थोडं कामही करा, इतक्या दिवसापासून मीच करत आहे.” असं म्हणत तिने मालतीला टोमणे द्यायला सुरुवात केली.

“सासुबाई आज मला थोडं बरं वाटतय मी जाते, स्वयंपाकाला लागते.”- मालती

“बुद्धी सुचली म्हणावं.”- मालतीची सासू


मालती भराभर स्वयंपाकखोलीत जाऊन स्वयंपाक करायला लागली. तेवढ्यात बाहेरून प्रकाश आला. त्याने मालतीला स्वयंपाक करताना बघितलं आणि तो रागावला.


प्रकाश काकुलतेने बोलला,
“मालती तुला आराम करायला सांगितलं ना, मग तू हे का करतेस.”

त्यावर मालती नम्रतेने बोलली,
“मी बरी आहे, आई एकट्या किती काम करतील त्यांचं वय नाही आता. त्या काम करून थकतात. करू द्या थोडं मला आता बरं वाटतंय.”


प्रकाशने तिला समजावले आणि खोलीत घेवुन गेला.
आज खुप दिवसानंतर प्रकाश असा प्रेमळ वागला होता त्यामुळे मालतीला खूप बरं वाटलं.
.........................


 अहिल्या प्रतापकडे गेली. प्रतापच्या आईने तिला आत बोलवून बसवलं.


अहिल्याने उत्सुकतेने विचारलं,
“काय काकू कधीचा मुहूर्त काढताय प्रतापच्या लग्नाचं?”

काकू हसत बोलल्या,
“काढू आता लवकरात लवकर, उरकवून टाकू प्रतापचं मन बद्दलण्याआधी.आता कुठे त्याने होकार दिलाय, ते तू बोललीस ना त्याला पोरी म्हणून त्याने होकार दिला नाही तर तो आजपर्यंत तयारच नव्हता.”

अहिल्या स्मितहास्य देत बोलली,
“असं काही नाहीये. त्याला थोडा वेळ हवा होता बाकी काही नाही.”

“आपण सोबत जाऊन बोलण  करून घेऊ.” – प्रतापच्या आईनी तिला सांगितलं.

“काकू मी कशाला? तुम्ही लोक जाऊन या, माझं काय काम तिथे?”- अहिल्या

प्रतापच्या आईने अहिल्याचा हात हातात घेऊन म्हटलं,
“अरे वा, तुझ्या मित्राचं लग्न आहे की नाही. मग तुला तर यावचं लागेल. तू तयार राहशील प्रताप तुला घ्यायला येईल, मग आपण जाऊ.”


“कुठे आहे प्रताप? कुठे गेलाय?”- अहिल्या


“आत्ताच बाहेर गेलाय, काही काम होतं का?”-प्रतापची आई


“नाही, काही नाही सहजच आले, मी निघते काकू नमस्कार करते.”


अहिल्याने काकुला वाकून नमस्कार केला आणि ती गेली.


 तिकडे विठ्ठलचा माणूस प्रकाशवर लक्ष ठेवून होता, प्रकाश एका सामसूम रस्त्यावरून कोणाला तरी भेटायला जाणार होता. प्रकार समोर समोर आणि तो माणूस मागे मागे प्रकाश एका सुनसान ठिकाणी जाऊन थांबला. विठ्ठलचा माणूस झाडाच्या आडोशाला उभा राहून त्याच्याकडे लक्ष ठेवू लागला. थोड्या वेळाने तिथे दोन तीन माणसं आली, त्यांचं बोलणं सुरू होतं.


 काय बोलणं सुरू होतं ते त्याला ऐकायला येत नव्हतं, त्याने ऐकण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच समजलं नाही नंतर ती माणसे निघून गेली आणि प्रकाश त्याच्या रस्त्याने निघाला. तो माणूस पटकन विठ्ठलकडे गेला आणि विठ्ठलला सगळं सविस्तर सांगितलं.

दोन दिवसानंतर अहिल्या तिच्या कामाने संस्थेत जायला निघाली वाटेत तिला प्रकाश भेटला.


“नमस्कार अहिल्याजी.”
अहिल्याला प्रकाशकडे बघून थोडं आश्चर्य वाटलं, त्याच आश्चर्याने तिने विचारलं.


“तुम्ही इथे?”


“हो इथून जात होतो तुम्ही दिसलात वाटेने म्हणून तुमच्याशी नमस्कार करायला आलोय. कशा आहात तुम्ही?” प्रकाशने विचारपूस केली.

अहिल्याने प्रतिप्रश्न केला,
“मी बरी आहे,मालती कशी आहे?” 


“छान आहे ती पण छान आहे, आनंदात आहे. दिवसभर छान आराम करत असते, आई सगळ तिला हातात आणून देते, छान दिवस जातो तिचा. मी पण तिला वेळ देतो, आम्ही मस्त गप्पा मारतो.” - प्रकाश


प्रकाश मालतीबद्दल खूप भरभरून बोलत होता, हे सगळं ऐकत असताना अहिल्याला खूप आश्चर्य वाटलं,


“ हा माणूस इतका कसा बदलू शकतो? नक्कीच काहीतरी गडबड आहे.” तिच्या मनात मालतीचे विचार सुरू झाले.
प्रकाशने नमस्कार घेतला आणि तो निघून गेला.
अहिल्या तिच्या कामाला लागली त्यामुळे तीही विसरली.
काही दिवस असेच गेले, विठ्ठलचा माणूस प्रकाशवर लक्ष ठेवायचा, पण त्याला काहीच पुरावा सापडला नाही त्यामुळे आता त्यानेही लक्ष देणे सोडलं.
सगळे आपल्याआपल्या कामात व्यस्त झाले. त्यामुळे मालतीचा विषय डोक्यातून निघून गेला.


 काही दिवसानंतर अहिल्या गौराई आणि झाशीला घेऊन मालतीच्या घरी गेली. मालतीच्या सासूने दारू ऊघडला.
अहिल्याला पाहता क्षणी ती दचकली, पण तरी तिने स्वतःला सावरत


“ये पोरी, ये ना. कशी आहेस तू?”
मालतीच्या सासूने इतक्या प्रेमाने विचारलं की अहिल्याला त्याचही खूप आश्‍चर्य वाटलं.


“मी बरी आहे काकू. मालती आहे का घरी?


“मालती.. मालती आहे ना. अगं ती...ना.. तिच्या आईकडे गेली आहे. खूप महिने झाले होते ना ती गेलीच नव्हती.”
मालतीची सासू बोलतानी चाचपडली.


“कुठे असतात तिचे आई-बाबा?”


 हा प्रश्‍न विचारल्यानंतर मालतीची सासू थोडी गडबडली आणि गप्पच राहिली.


“काकू कुठे राहतात मालतीचे आई-बाबा? मी जाऊन भेटले असते तिला. मला, झाशीला आणि गौराईला भेटायचं होतं मालतीला.”


मालतीची सासु  घाबरली,


“ ते ना दुसरीकडे कुठेतरी राहायला गेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पत्ता वगैरे मला माहीत नाही. प्रकाशला माहीत आहे तो  सांगेन तुला. चहा येशील का? आणू थोडा?”

“नाही ,मी निघते आता.”


अहिल्या दोघींना घेऊन तिथून निघाली, थेट घरी आली. तिने विठ्ठलला सगळं सांगितलं. विठ्ठल आणि त्याला संशय आला की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण मालतीची सासू नीट सांगत नव्हती.


विठ्ठलने प्रकाशला गाठलं त्याला विचारलं पण तो काहीच बोलायला तयार नव्हता. शेवटी विठ्ठलने त्याला मारायला सुरुवात केली दोघांची खूप मारामारी झाली, तरी विठ्ठलला काहीच माहिती मिळाली नाही. प्रकाश पळाला आणि विठ्ठल घरीही आला.

“अरे पणत्या भाऊ काय झालं? कुठून मारामारी करून आला?”


“त्या प्रकाशला पकडलं होतं, सुटला हातातून इतका मार मार मारलं पण काहीच बोलला नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे, मालतीची माहिती काढायला हवी. यांनी तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना?”


“पणत्या भाऊ शुभ शुभ बोल. आता कुठे प्रकाश तिच्याशी नीट वागायला लागला होता.”

“तेच तर कळत नाहीये तो नीट वागत होता की नीट वागण्याचं नाटक करत होता. अहिल्या तू एक काम कर तू उद्या तिथे जा, आजूबाजूच्या, शेजारच्या बाया त्यांच्याकडे चौकशी कर. मालतीला त्यांनी बघितलं होतं का? शेवटचं कधी बघितलं? काय बोलणं झालं? या सगळ्यांची माहिती काढ.”

“ठीक आहे, पण तू ये तुला लेप लावून देते.”
आतून विठ्ठलची बायको आली आणि तिने विठ्ठलला लेप लावून दिला.


 अहिल्या मात्र विचारात गुंतत गेली.

 क्रमश:

🎭 Series Post

View all