त्याचा अहंकार - भाग - 3 ( अंतिम भाग )

ahankaar


त्याचा अहंकार – भाग ३ ( अंतिम भाग )
नीरज काही बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यात नेहल पटकन गर्दीतून वाट काढत निघून जाते, नीरज नुसताच पहात राहतो, मात्र आता पुन्हा वारंवार नेहल ची भेट होण्याच्या शक्यतेने मनातून रिलॅक्सही होतो, काहीही करून आता पुन्हा तिला भेटायचंच आणि आपली सगळी बाजू एकदा सविस्तर समजावून सांगायचीच असा विचार करून नीरज तिथून निघतो आणि नंतर जवळजवळ दोन-तीन दिवस सतत मुलीला सोडायच्या बहाण्याने शाळेजवळ नेहल ची वाट पहात राहतो, पण नेहल काही त्याला भेटत नाही.
चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याला मुलीला सोडायला आलेली नेहल दिसते, त्याची मनातली आशा पुन्हा पल्लवीत होते, हिम्मत करून नीरज आज तिला काहीही करून तिला गाठतोच आणि नेहल अशी हाक मारून बोलण्याचा प्रयत्न करतो, नेहल आता त्याला ओळख तर दाखवते, पण मोजकच बोलून त्याला टाळून पटकन निघून जाते, इकडे नीरज बेचैन होतो, पुढच्याच दिवशी नीरज पुन्हा शाळेबाहेर नेहल ला गाठतो आणि काहीतरी महत्वाच बोलायच आहे अस सांगून तिच्याशी फक्त पाचच मिनिटे बोलण्याची इच्छा व्यक्त करतो, नेहल तिला वेळ नाहीय, उशीर झालाय, असं सांगून टाळण्याचा प्रयत्न करते.
इकडे नेहलची सुद्धा चलबिचल होते, आपला लग्नापुर्वीचा प्रियकर आता इतक्या वर्षांनी अचानक आपल्याला भेटतो आणि काहीतरी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो, तो आपल्याला ब्लॅकमेल तर करणार नाही ना ? त्याला आपल्याशी काय बरं बोलायच असेल ? आपण अचानक त्याला न कळवता पटकन लग्न करून त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेलो त्याचा जाब तर त्याला विचारायचा नसेल ? की त्याला आपली बाजू समजावून सांगायची असेल, आता आपण एक विधवा, आपल असं एका परपुरुषाला बाहेर भेटणं योग्य दिसेल का ? कोणी पाहिलं तर काय म्हणेल ? त्यातून इतर काही अफवा पसरली तर उगाचच दोघांचीही बदनामी होईल, काय कराव ? भेटायला जाणं योग्य कि अयोग्य ? जाउदे एकदा शेवटचं भेटून त्याला पुन्हा कधीही भेटनं तर सोडाच पण साधी ओळखही न दाखवण्याबद्दल खडसावून सांगुया असा विचार मनात पक्का करून नेहल दुसऱ्या दिवशी नीरज ला भेटायला जाते.
दुसऱ्या दिवशी नीरज आणि नेहा मुलांना शाळेत सोडून जवळच्याच एका हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी जातात, इकडच्या-तिकडच्या गप्पा मारताना नकळत त्यांच्या पूर्वीच्या एकमेकांवरच्या प्रेमाचा विषय निघतो, अगदी मनापासून प्रेम असूनही चांगली नोकरी मिळून स्थिरस्थावर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करायचा नाही, अशा केलेल्या निश्चयामुळे आपल्याकडून लग्नाला उशीर झाला आणी तुझ्यावर अशी दुसऱ्या लग्नाची पाळी आली त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला स्वतःलाच जबाबदार धरून तो स्वतः सर्वप्रथम नेहल ची माफी मागतो.
पुढे गप्पांच्या ओघात नेहल ची खरी कहाणी कळते, की वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्या मनाविरुद्धच तिच लग्न नात्यातल्याच एका मुलाबरोबर लावून दिल होतं, पण लग्नानंतर साधारण तीन वर्षांतच तिचा नवरा कॅन्सर ने दगावला, तिला एक मुलगी आहे, घरी सासू आहे, घरी कमावतं दुसर कोणीच नसल्याने तिला कुटुंबाची जबाबदारी नोकरी करून पेलावी लागतेय असं नेहल सांगते, त्यामुळे तिची परिस्थिती तशी बेताचीच आहे, त्यामुळे नीरज - नेहल ला आपल्याच कंपनीत जास्त पगाराचा चांगला नवीन जॉब मिळवून देण्याच प्रॉमिस करतो, सुरवातीला नेहल नाही नको असं करत करत शेवटी तयार होते.
पुढे एकाच ऑफिसात काम करत असल्यामुळे रोजच्या भेटण्या-बोलण्यातून पुन्हा एकदा दोघांमध्ये हळुवार मैत्री फुलते, ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त नंतरही त्याचं एकत्र बाहेर फिरणं, सिनेमा, शॉपिंग या गोष्टी वाढतात, दोघांनाही पुन्हा एकदा एकमेकांचा सहवास आवडू लागतो, अशातच नीरज एक दिवस नेहल ला ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवसांसाठी दुसऱ्या शहरात आपल्यासोबत मिटींगला चालण्याचा आग्रह करतो, नेहल नाही म्हणते, लहान मुलगी, आजारी सासू ची अडचण सांगते..पण नीरज शेवटी तिला मनवतोच.
मिटींगच्या आदल्या दिवशी दोघेही निघतात आणि रात्री एका हॉटेलवर मुक्कामासाठी थांबतात, फ्रेश होतात आणी गप्पा मारत बसतात, गप्पांच्या ओघात ,नेहल नीरज ला समजावून सांगते, कि तू तुझा संसार नीट बघ सांभाळ, हे सर्व आपण वागतोय ते बरोबर नाही..
नीरज आता आपली बाजू नेहल ला समजावून सांगतो, हे बघ नेहल , तुझं म्हणणं मला अगदी मनापासून पटतंय, पण मला नाही वाटत की मी काही चुकीचा वागतोय, हो मी माझ्या बायकोशी प्रतारणा करतोय हे खरय, पण खरं म्हणजे तुझं लग्न होवून तू माझ्यापासून दूर निघून गेल्यामुळे मला इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करण्यात काडीचाही रस नव्हता, मी माझ्या लग्नाचा विषय नेहमीच टाळत राहिलो, पण लहान भावंडाच्या खोळंबलेल्या लग्नामुळे आणि केवळ माझ्या आईच्या इच्छेखातर मला गीतांजली सोबत नाईलाजाने लग्न कराव लागलं, पण लग्नानंतर देखील तुझ्या आठवणीमुळे मी मनाने तिला कधीच आपली समजू शकलो नाही, पुढे माझी इकडे पुण्याला बदली झाली, जसजसा मला तुझा विसर पडत गेला तेव्हा मात्र मी हळूहळू तिला स्वीकारायला लागलो, थोड्याच दिवसांत आम्हाला मुलगी झाली आणि आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो, आता आपण आपली कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवायची नाही या प्रामाणिक विचाराने मी तिला एक दिवस आपल्या पूर्वीच्या प्रेमाबद्दल सगळं सांगून टाकलं, तिनेही ते मोठ्या मनाने एक्सेप्ट केलं.
नीरज म्हणतो मी मुलीसाठी थांबलो नाहीतर मी गीतांजली ला केव्हाच घटस्पोट घेऊन मोकळा झालो असतो, पण आता मी मुलीच्या प्रेमापोटी गीतांजली ला सोडू शकत नाही. गीतांजली ला ह्या नात्याची तशी थोडी कुणकुण आहे पण माहेरी गरिबी त्यात जास्त शिक्षण नाही त्यामुळे ती बिचारी नाईलाजाने हे सर्व मूकपणे सहन करतेय, गीतांजली म्हणतेय हे घर नीरज च आहे त्याने मला इथून निघून जा सांगितले तर मी काय करणार त्यामुळे मी सगळ सहन करत त्या घरात राहतेय.
लग्नाला पंधरा वर्ष झाल्यावर नीरज ने नेहल ची सासू वारली म्हणून हट्टाने नेहल ला आणि तिच्या मुलीला कायमचे घरी राहायला आणले , गीतांजली खूप रडली , असं करू नका असं ओरडू लागली नीरजला..... पण नीरज ने स्वतःचा अहंकार तिथे हि गाजवला....त्याने कोणाचच ऐकल नाही,.... गीतांजली अगदीच हतबल झाली होती, रडून दिवस घालवत होती, चार दिवसांनी तीने ट्रेनखाली उडी मारून स्वतः ला आणि मुलीला संपवले. ........
अशाप्रकारे नीरज आणि नेहल एकत्र तर आले पण नीरजला आयुष्यभर माझ्यामुळे गीतांजली आणि आपल्या मुलीचा जीव गेला ह्याची खंत लागून राहीली आणि त्यामुळे तो नेहाल बरोबरसुद्धा कधीच सुखी राहू शकला नाही आणि ह्या प्रेमामुळे तीन व्यक्ती कायम च्या दुःखी च राहिल्या.
नमस्कार.. सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )
( हि एक सत्य घटना होती माझ्या एका मैत्रिणीची.... )

🎭 Series Post

View all