
अगतिक
संध्याकाळी जरासा लवकरच मधुकर घरी पोहोचला. अंजू नुकतीच शाळेतून आली होती.तिने दार उघडले.घर अगदीच शांत होते.बुट मोजे काढून तो सोफ्यावर बसला.
" चहा करू?" अंजू ने विचारले.तिच्या शांतपणाने तो चिडला.
" कर!"
मधुकर रागावलेला आहे हे तिला कळलेच नाही.तिने गॅस पेटवून आधण ठेवले.
मधुकर संतापलेला होता.
घरात चैतन्य फुललेले असेल.सुषमाच्या चेहऱ्यावरून हास्य ओलांडलेले दिसत असेल.तिच्या डोळ्यात आपल्याविषयी वासना तरळत असेल.अशी त्याची कल्पना होती.परंतु अपेक्षेप्रमाणे ती घरी नव्हती.
अंजू ने चहा आणून दिला.
" आई आली नाही वाटतं ?'त्याने चिडक्या स्वरात विचारले.
" आई लवकरच आली होती.मी शाळेतून आले तेव्हाच ती बाहेर गेली.ऑफिस च्या कुणा कडे तरी पार्टी आहे वाटतं. तिला उशीर होणार आहे".
चहा पिऊन झाला.चेंज करून त्याने टी व्ही ऑन केला.घरातील चार खोल्या एकदम फार मोठ्या वाटायला लागल्या.
आज शॉपिंगला जायचं ठरले होते.अंजूला नवीन ड्रेस घ्यायचा होता.कौस्तुभ ला बूट पाहिजे होते.आज तो ऐकणार नाही.आदळ आपट करेल.
सुषमा ला नवीन पटोला साडी घ्यायची होती.आज ती घेतली असती.आता कसलं शॉपिंग नि कसलं काय?सुषमा चं असंच आहे,मनोरथ करायला लावते नि आयत्यावेळी दगा देते.
मधुकर चिडला होता पण कुणावर रागवावं हेच त्याला कळत नव्हते.अंजू वर किंवा कौस्तुभ वर रागावून उपयोग नाही.
आपण या घराचे मालक पण आपली कोणालाही पर्वा नाही.सुषमाला चांगलं खडसावले पाहिजे.घरात गृहिणीने असं वागणं शोभत नाही.
सुषमा अशी कुठे गेली असेल?कुणा बरोबर असेल?न सांगता का गेली?अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते.मग आठवलं आज साने कडे पार्टी असावी......
मधूकरच्या कपाळावर आठ्या पडल्या. काही दिवसांपूर्वी साने त्यांच्या घरी आले होते.उंच,सडसडीत,विनोदी बोलणारे ! स्मार्ट.
त्यादिवशी साने बरोबर तिचं वागणं जास्तच खोडकर होतं. ती फारच हसत होती.
एकदा तर रंगात येऊन सानें नी तिला टाळी दिली होती.आपल्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही,आपण सोशल आहोत,तसंच तो दाखवीत होता.
त्याच साने कडे आज पार्टी होती.ती पार्टी त्यांच्या घरी असेल कां?
आणखी बायका असतील कां ती एकटीच असेल?कां फक्त दोघचं असतील?कोरडी असेल की ओली?मधूकरचा जीव एकदम घामाघूम झाला.
मागे एकदा त्याच्याच घरी पार्टी होती.त्यावेळी असंच झालं होतं.ती इतर पुरुषांबरोबर इतक्या मोकळेपणाने वागते त्यामुळे तो व्यथित झाला होता.चिडला होता.त्यापूर्वी पण असं बरेचदा झालं होतं.
कित्येकदा तिला खूप रागवायचं असं त्याने ठरवलं होतं पण त्याला ते जमलं नाही.
एकदा बोलत बोलत तिच्या ऑफिस बद्दल गोष्टी निघाल्या.बॉस होते नाडकर्णी साहेब.पन्नाशी ला पोहोचलेले.ती सांगत होती.
' भयंकर रागीट माणूस पण माझ्याशी लाड लाड बोलतात. खाजगी प्रश्न विचारतात.असं माझ्याकडे बघतात की त्यांची नजर शरीर भेदून जात आहे.'
त्याने कपाळाला आठ्या घातल्या विचारले.
' तू झिडकारून का टाकत नाहीस?'
'त्याचं विशेष काही वाटत नाही...सगळे पुरुष असे बघतात' ती शांतपणे बोलत होती.
' तुला संताप यायला हवास.तू त्यांना ताड ताड बोलायला हवं '
' तुम्ही म्हणता तर मी त्यांना झिडकारून टाकते.एक क्षणही लागणार नाही.पण त्यामुळे काही साधणार नाही.उलट तोटाच होईल.त्यांच्या हातात रिपोर्ट लिहिणं असतं. नोकरीमध्ये बॉस काय करू शकते हे तुम्हाला माहीत नाही.'
' म्हणून हे असं,स्वतः च्या रूपा चं मोल देऊन.....'
' तुम्ही तर फारच ......तसं काही नसतं.मी त्यांना थोडीशी कंपनी देते.माझी खूप कामं होतात.नको म्हणणं सोपं आहे.पण त्याचे परिणाम,थोड्या गोष्टी करिता स्वतःला अनेक फायद्या पासून वंचीत करणे आहे.'
मधुकर यावर काहीच बोलला नाही.एवढ्याश्या गोष्टी साठी नोकरी सोड म्हणणं ही मुर्खपणा चं होतं. पुढे त्याने त्याबद्दल विषय देखील काढला नाही.
दिवे लागले.बाहेर अंधार पसरला.त्याला स्वतः फार अगतिक सारखं वाटलं.तो स्वयंपाक घरात गेला.
स्टडी मध्ये दोन्ही मुलं छान अभ्यास करीत बसली होती.त्याला त्यांची कीव आली. त्याने गॅस पेटविला.अन्न गरम केले.आणि मुलांना जेवायला वाढले.
कौस्तुभ ने हट्ट केला होता.पण कसेबसे त्याने त्याची समजूत काढली.
जेवणं झाल्यावर मुलं झोपी गेली.पण त्याच्या मनात सुषमा बद्दल विचार धुमाकूळ घालत होते.
त्याला प्रमोशन मिळाल्यानंतर त्याने सुषमाला म्हटले होते.
' आता मला भरपूर पगार आहे,तुझ्या नोकरीची जरुरी नाही.तू नोकरी सोड'.
ती अगदी शांतपणे म्हणाली.
" मी सोडणार नाही.दिवसभर पापड कुरडया करत,धुणी भांडी सांभाळत राहणार नाही....ते शक्य नाही.'
'अग , पण इतर लोक ही ....'
' आलं लक्षात.... पण माझी नोकरी आता मला एक एक्साइटमेंट आहे.ती सोडली तर ....शी S S आय कान्ट इवेन इम्याजीन दॅट !'ती कपाळ दाबून धरत म्हणाली.
ती पुढे म्हणाली
' मी नोकरी सोडली तर लवकर म्हातारी होईन.माझे केस पिकतील.कंबर दुखायला लागेल.'ती खूप हसली.
पण पुढेही असे प्रसंग उदभवतच गेले.ऑफिसमध्ये कोणी जोशी नावाचा तरुण होता.तो आणि सुषमा लंच टाईम मध्ये बरोबर डबा खात. पदार्थाची देवाण घेवाण होई.
एकदा ती ट्रीपला गेली होती. त्यांचा पूर्ण सेकशनच गेला होता.त्यात तीन चार बायका ही होत्या.संध्याकाळी परत आल्यानंतर तिने ट्रिप चे वर्णन केले.
' अहो,खूपच मज्जा आली.तो जोशी आहे ना,आम्ही शिवा शिवी खेळलो.त्याला वाटलं मी सहज सापडेन .पण मी त्याला असं चुकवल की ....'निःशंक पणे तिने सांगितले.
आज पण ती पार्टीला गेली होती. तिथे कसली शिवा शिवी चालली असेल कुणास ठाऊक!
बाहेर बेल वाजली.तो एकदम तंद्रीतून जागा झाला.त्याने दार उघडले.दारात सुषमा उभी होती.तिच्या डोळ्यात चांदणं फुललं होतं. सेंटचा सूक्ष्म सुवास दरवळत होता.
काहीच न बोलता तो बेडरूममध्ये निघून गेला.सुषमा मुलांच्या खोलीत गेली.आश्चर्याने हातवारे करीत म्हणाली.
" अग बाई!झोपली वाटतं, म्हणजे तुम्ही त्यांना जेवायला घातलंत ! थँक्स हं!"
"तुमचं जेवण झालं?"
तो काहीच बोलला नाही.
" हे बघा, मला माहित आहे.तुमचं जेवण झालं नाही"
तिने पुन्हा आत जाऊन गॅस पेटवला.उप्पीट बनवले आणि त्याच्या पुढे ठेवत म्हणाली.
"माणसानं खात राहावे,उपाशी झोपू नये
" मला भूक नाही" तो चिडून म्हणाला.
त्याच्या म्हणण्याचा आशय तिच्या लक्षात आला, पण तसे न दाखविता तिने आवराआवर केली.
कॉट वरची चादर बदलली.दिवा मालवला.थोड्या वेळात ती त्याला बिलगली.
तिला झिडकारून टाकण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला.
" नको! जवळ देखील येऊ नकोस"
तरीही तिने त्याला सोडलं नाही.त्याच्या नकाराच्या होकार करण्याच्या अनेक युक्त्या तिच्याजवळ होत्या.
त्या आवेगापुढे नेहमी प्रमाणे त्याचे काही चालले नाही.तो भानावर आला तेव्हा त्याला स्वतः ची लाज वाटली.
गंभीर पणे तो म्हणाला.
" याचा एकदाचा निकाल लावला पाहिजे.तुला स्पष्ट सांगितल्याशिवाय कळत नाही."
"तुम्हीच विषय काढला हे बरंच झालं.ह्या बद्दल मलाही तुमच्याशी बोलायचं होतंच!तुमच्या मनाची तडफड मला कळते."
" नशीब माझं." तो कुत्सितपणे म्हणाला.
" तूच अगतिक होत असशील. इतर पुरुषांशी लगट...."
"मी अगतिक नाही.तुम्हाला वाटतं तसं नाही "
" म्हणजे तुला ते आवडतं '.
" आता कसं बोललात" ती हसली.
" म्हणजे?" ती इतक्या स्पष्टपणे बोलेल अशी त्याची कल्पना नव्हती.
" सर्व गोष्टी मी अगतिकपणे करत नाही.त्यातही एक प्लेझर असते.मी ते नाकारत नाही.ऑफिसमध्ये कितीतरी विवाहित स्त्रिया आहेत.सगळ्यांचे विचार असेच आहे.कुणी कबूल करतात. कुणी करत नाही."
" तू इतकी...."
"अहो,तुम्ही विचार करा.इतके पुरुष अवती भोवती असतात.त्यांच्याशी बोलणं होतं. ती वाढते.नुसतं बहीण भावंडाचं का ते नातं असतं?ते लगट करतात.हॉटेलमध्ये घेऊन जातात."
" आणि हे सगळं तुम्ही चालवून घेता? "
" अहो तुम्ही नीट विचारच करत नाही.तुमच्या ऑफिसमध्ये बायका आहेत.तुम्हाला त्यांच्याशी बोलतांना बरं वाटतं की नाही?त्यांनाही तसं वाटलं तर काय चूक?
"तू तर व्यभिचाराची तरफदारी करते आहेस"
" यात कसला व्यभिचार. देह पावित्र्य मी मानते.सगळ्याच विवाहित स्त्रिया ते जपतात.पण शरीराशी थोडीफार जवळीक म्हणजे काही भ्रष्ट होणे नव्हे!नाडकर्णी, जोशी सगळे जवाबदार लोकं आहेत.हा खेळ कुठपर्यंत न्यायचा ते त्यांना कळत आणि आम्हाला ही कळतं. त्या पुढची पायरी ओलांडण्याची इच्छा कोणालाही नसते.तसं कुणी करत ही नाही."
त्याचा राग बराचसा मावळला होता.त्याच्या डोळ्यात खोल पाहत ती म्हणाली.
"तुम्हाला माझं बोलणं पूर्ण पणे पटलेलं नाही.पुरुषांला कदाचित ते पटणार ही नाही."
ती उठली आणि पदर सावरून म्हणाली.
" पटलं नाही पण पटवून घेणं भाग आहे.त्याशिवाय इलाज नाही".
समाप्त
उज्ज्वल कोठारकर
वर्धा
(सदर कथा निव्वळ करमणुकी करिता लिहिलेली आहे.कुठल्याही वर्गाला उद्देशून नाही.समाजात दोन्ही घटकांना समान आदर आहे असावा.कुठल्याही पात्र, घटनांचा साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)