पुस्तकाचे नाव: अग्निपंख
लेखक: डॉ ए पी जे अब्दुल कलाम
अनुवाद: प्रा. माधुरी शानभाग
पुस्तकाचे रसग्रहण: डॉ सुप्रिया दिघे
"अग्निपंख" या पुस्तकाचे नाव घेतले की, डॉ ए पी जे अब्दुल कलमांची आठवण होते. दहावीच्या मराठीच्या पाठपुस्तकात डॉ ए पी जे अब्दुल कलामांच्या आयुष्यावर एक धडा होता, तो धडा वाचल्यावर "अग्निपंख" हे पुस्तक वाचण्याचे मी ठरवले होते.
अग्निपंख या पुस्तकात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहेच, पण त्याचबरोबर भारताचा अवकाश संशोधनातील प्रवास हेही ह्यात आढळून येते.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होणार पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. क्षेपणास्त्रांच्या विकासात जी कामगिरी त्यांनी बजावली होती, त्यासाठी त्यांना "मिसाईल मॅन ऑफ इंडिया" या नावाने ओळखले जाते. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या आयुष्याची जवळपास चाळीस वर्षे संशोधनात घालावली होती.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी जीवनगाथा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. एका नावाड्याच्या कुटुंबातून निघून भारताच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोहोचण्याचा त्यांचा जो प्रवास आहे, तो सर्वच धडपडणाऱ्या भारतीय तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे.
१९३१ ते १९४७ हा काळ डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा बालपणीचा काळ होता, बघायला गेलं तर भारताच्या अवकाश क्षेत्राचाही हा बालपणाचा काळ म्हणावा लागेल, कारण या काळात भारतीय अवकाश संशोधनाचे भवितव्य ठरण्याचे बाकी होते.
नावाडी कुटुंबात जन्म झालेला असताना सुद्धा अवकाशभरारीचे स्वप्न जपण्यासाठी बराच संघर्ष केला तसाच संघर्ष भारतानेही अवकाश संशोधन क्षेत्रात प्रगत होण्यासाठी केला होता. दारिद्र्य, बेरोजगारी आणि आरोग्याच्या समस्या पुढे असताना सगळ्या समस्यांना तोंड देत भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात यश मिळवले.
डॉ अब्दुल कलाम हे नेतृत्वाचे खरे उदाहरण आहेत. डॉ कलाम यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा गुण होता, तो म्हणजे नवीन शिकण्यासाठी ते नेहमी तयार होते. एखाद्या कार्यात यश आले, तर त्याचे श्रेय डॉ कलाम सर्वांना द्यायचे आणि अपयश आले, तर त्याची जबाबदारी ते स्वतः घ्यायचे. डॉ कलाम यांच्या ह्या वृत्तीमुळे आणि नम्र स्वभावामुळे त्यांनी नेतृत्वाची वेगळीच पद्धत शोधली होती.
मुळात आपण लोकांचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवण्यापेक्षा आपल्या कामात इतके निपुण व्हायचे की, लोकं आपोआपचं आपलं अनुकरण करतील, हेच आपल्याला अग्निपंख या पुस्तकातून शिकायला मिळते.
©®Dr Supriya Dighe