अग्गबाई सासूबाई.. भाग २

कथा सासूसुनेच्या वेगळ्या नात्याची


अग्गबाई सासूबाई.. भाग २


" चित्रा, संध्याकाळी काकूंनी आपल्या सगळ्यांनाच जेवायला बोलावले आहे. लक्षात आहे ना?" मालतीताईंनी विचारले.

सकाळी कडवटपणे बोलणार्‍या मालतीताई याच का? असा चित्राला प्रश्न पडला. पण यावर काहीच उलटी प्रतिक्रिया न देता तिने विचारले.

" हो.. लक्षात आहे. ड्रेस चालेल की साडी नेसू?"

" काकूंकडे पहिल्यांदाच जाते आहेस तर साडी नेसलीस तर बरं होईल. नाहीतर तुझी इच्छा."

" ते मला साडी नीट नेसता येत नाही म्हणून. " चित्रा चाचरत बोलली.

" त्यात काय.. मी देते ना नेसवून." संध्याकाळी मालतीताईंनी चित्राला आवरायला मदत केली. ती संध्याकाळ चित्राची छानच गेली. तरिही त्यांचे सकाळचे बोलणं तिला खटकलं होतंच. शशांकशी बोलणं तिला योग्य वाटत नव्हतं. तसेही दोघांना लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला तेवढा वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे तिच्या बोलण्याचा तो कसा अर्थ घेईल हे तिला माहित नव्हते.

दिवस जात होते. मालतीताईंचे वागणे चित्रासाठी अगम्य होते. कधी त्या तिच्याशी एवढं छान बोलायच्या आणि कधी एवढं कडवटपणे.. तिचे तिलाच समजायचे नाही. हळूहळू तिने त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिला जाणवले. जेव्हा जेव्हा ती आणि शशांक हसत असायचे, बोलत असायचे त्यावेळेस हमखास त्यांचा आवाज बदलायचा. तेच जर त्या दोघीच असतील तर त्या छान असायच्या. तिने एके रात्री हळूच शशांककडे विषय काढला.

" तुला आईंच वागणं विचित्र नाही वाटत?"

" आईचे वागणे? काहिही.. माझ्या आईसारखी प्रेमळ कोणीच नाही."

"ते प्रत्येक मुलाला वाटतेच रे.." चित्रा मनातल्या मनात पुटपुटली.

" तश्या त्या प्रेमळ आहेतच रे.. पण मी बघितले आहे, आपण दोघे एकत्र असलो की त्यांना आवडत नाही." चित्राने धीर करून बोलून टाकले.

" काहिही बोलतेस. ती तर तुझी किती स्तुती करत असते माझ्याजवळ. तसेही आपलं लग्न व्हावे यासाठी तिने फार प्रयत्न केले आहेत."

" मी कुठे अमान्य करते आहे. मला फक्त जो अनुभव आला तो मी तुला सांगितला."

" माझा विश्वास नाही." शशांकने बोलणे थांबवले आणि तो बाहेर निघून गेला. चित्राला या गोष्टीचा सोक्षमोक्ष तर लावायचा होताच. तिने स्वतःशीच विचार केला आणि सुमेधाला फोन लावला.

" काय ग, असं इथे बाहेर का भेटायला बोलावलं?" सुमेधाने आल्या आल्या विचारले. " घरी सगळं व्यवस्थित आहे ना? आई, शशांक वगैरे?"

" ताई हो.. सगळं व्यवस्थित आहे. मला असंच थोडं पर्सनल तुमच्याशी बोलायचे होते. तुम्ही समजून घ्याल अशी खात्री वाटली मला."

" गंभीर आहे का?"

"एक विचारू?"

" बोल ना.."

" ताई, तुमचे बाबा कधी वारले?"

" अचानक हा प्रश्न का?"

" सांगा ना?"

" मी पंधरा वर्षाची आणि शशांक दहा."

" आता त्या घटनेला जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाली आहेत. तुम्हाला कधी तुमच्या बाबांची कमी नाही जाणवली."

" असं कसं बोलतेस? अजूनही त्यांची आठवण आली की डोळ्यात पाणी येते."

"तुम्हाला एवढी येते मग आईंना?"

" ती कशी विसरेल?"

" विसरणार नाहीच पण तुम्हाला असे नाही कधी वाटले की त्यांना जोडीदाराची उणीव भासत असेल?"


काय असेल यावर सुमेधाचे उत्तर? पाहू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all