अग्गबाई.. सासूबाई..

कथा सासूसुनेच्या वेगळ्या नात्याची


अग्गबाई सासूबाई..


" आजपासून ह्या घराच्या चाव्या तुझ्या ताब्यात.. आता मी फक्त आराम करणार."


पूजेच्या दिवशी जमलेल्या सगळ्या पाहुण्यांसमोर नवीन लग्न झालेल्या सुनेच्या, चित्राच्या हातात चाव्या देत मालतीताई बोलल्या. चित्रा खरंतर अवघडत होती, त्या चाव्या घेताना.. पण तिची नणंद, सुमेधा पुढे झाली.

" अग बाई.. किती ते लाजणं. आमच्याकडे असं म्हणतात की सासूबाई काही देत असतील तर हवं असूदे नसूदे जोपर्यंत देत आहेत, घेऊन ठेवावे. हो की नाही काकू?"

" घे ग , चित्रा. वहिनी मनापासून देत आहेत. आणि खरंच सांगते भाऊजी गेल्यापासून वहिनींनी खूप त्रासात दिवस काढले आहेत. आता त्यांना तुम्ही दोघे सुखात ठेवा." डोळ्यातलं पाणी पुसत काकू शशांकला बोलल्या.

" हो काकू.." चित्रा आणि शशांक दोघांनी जोडीने सगळ्यांना नमस्कार केला. तेव्हाच चित्राने मनाशी सासूबाईंना नेहमी आनंदात ठेवण्याचा निर्णय घेतला. दोघे हनिमूनला जाऊन आले. नव्याचे नऊ दिवस सरले. आणि सुरुवात झाली खऱ्या संसाराला.

चित्रा आणि शशांक, दोघांचेही ठरवून झालेले लग्न. मध्यस्थांनी आधीच सांगितले होते शशांकचे वडिल साधारण पंधरा वर्षांपूर्वीच वारले होते. मध्यमवयात अचानक सुटलेली जोडीदाराची साथ, अडनिड्या वयात असलेली मुले, आर्थिक अडचणी या सगळ्यांना मालतीताईंनी एकहाती तोंड दिले होते. त्यांच्याबद्दल हे ऐकून लग्न ठरल्या ठरल्या चित्राच्या आईने चित्राला सांगितले होते , "जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून संसार कर. आणि त्यांना कसलाच त्रास होऊ देऊ नकोस. आधीच खूप कष्टात दिवस काढले आहेत त्यांनी." शशांकशी बोलल्यावर तर तिला ते जाणवलेच.. आणि तिच्या मनातला आदर दुणावला. मग लग्नातही सगळ्या गोष्टी त्यांच्या कलाने घेतली गेली.

दोघे हनिमूनला गेल्यावर दोघेही एकमेकांच्या घरच्यांशी बोलत होते. मालतीताई अगदी प्रेमाने तिच्याशी बोलत होत्या. घरी आल्यावर त्या घरातली दोघांची लग्नानंतरची खऱ्या अर्थाने पहिलीच रात्र होती. लग्नाआधी आणि लग्नानंतरही छान बोलणार्‍या मालतीताई तिच्याशी प्रेमाने बोलतील, समजून घेतील असेच चित्राला वाटत होते. त्यामुळेच उठायला झालेला उशीर तिने मनावर घेतला नाही. दोघांचीही दोन दिवस सुट्टी बाकी होती. त्यामुळे ऑफिसला जायची घाईही नव्हती. ती अंघोळ आटपून बाहेर हॉलमध्ये आली. रात्रीच्या गोड गोष्टी आठवून चेहर्‍यावर हसू होते. ती चहा घ्यायला स्वयंपाकघरात जाणार तोच कानावर तुसडा आवाज आला,

" आठ ही काय उठायची वेळ आहे? यावेळेस अर्धा स्वयंपाक झालेला असतो माझा.." मालतीताई कडाडत होत्या.
चित्रासाठी त्यांचे हे रूप नवीनच होते.मालतीताईंचे कोणते वागणे खरे होते? लग्नाआधीचे की नंतरचे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all