अग्गबाई सासूबाई.. अंतिम भाग

कथा सासूसुनेच्या वेगळ्या नात्याची


अग्गबाई सासूबाई.. भाग ३


" ताई, समजा वर्षभर भाऊजी बाहेरगावी असतील तर चालेल तुम्हाला?"


" कसं चालेल? नवरा आहे तो माझा.. जवळ असलाच पाहिजे. मनातलं हवं नको ते बोलायला. आणि.. " बोलताबोलता सुमेधा मध्येच थांबली.

" का थांबलात ताई? हेच ना कधी वाटलं तर मिठीत घ्यायला.. मग लग्नाला काही वर्ष झालेल्या तुम्हाला वाटते, नुकतेच लग्न झालेल्या मला वाटते मग किमान सोळा सतरा वर्ष वैवाहिक आयुष्य जगलेल्या आईंना नसेल वाटत?"

" तसं असतं तर आईने मला सांगितलं असतं. एवढा मोकळेपणा नक्कीच आहे आमच्या दोघींमध्ये.." सुमेधाचे हे बोलणे ऐकून चित्राने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

" ताई, तुमच्या लग्नानंतर तुम्ही कधी दोघे राहिला आहात का घरी?"

" तेवढी वेळच नाही आली कधी. पण बाळंतपणासाठी राहिले होती की चार महिने चांगले."

" म्हणूनच.. एकतर तुम्ही कधी राहिला नाहीत.. आणि आजी झाल्यावर त्या बाळामध्ये एवढ्या गुंतल्या असाव्यात की इतर काही विचार करताच आला नसावा. पण ताई गेले काही महिने मी हे अनुभवते आहे. आम्ही दोघे एकत्र असलो की आई विचित्र वागतात. मला असे वाटते की कुठेतरी त्यांना स्वतःच्या संसाराची आठवण येत असावी."

" तुझा भ्रम असावा.. आई स्वतःच्या मुलाच्या संसारावर ??? मला विचारही करवत नाही. तसं असतं तर तिने हा विचार माझ्याबाबतीत का केला नाही?"

" ताई, एकतर तुम्ही कधी तरी येणाऱ्या. त्यामुळे हे जाणवले नसेल. बरं समजून चला नसेल असं काही तरिही तुम्ही तुमच्या संसारात बिझी. आम्ही दिवसभर बाहेर असतो. त्यात आईंची ऑफिसमधून नुकतीच झालेली सेवानिवृत्ती. मैत्रिणी असल्या तरी त्या दूर राहणाऱ्या. फोनवर बोलणार्‍या. नोकरीमुळे घरकामाची सवय नाही. अख्खा दिवस एकट्याने काढायचा. मग असे विचार येणारच ना?"

" अग पण आई शेजारीपाजारी जाते की."

" हो. पण तेही कामापुरते. शेजारचे काका आजारी आहेत. त्यामुळे त्या काकू सतत त्यांच्या शुश्रुषेत मग्न असतात. आणि फ्लॅट संस्कृती मध्ये कितीही म्हटलं तरी थोडा कोरडेपणा असतोच ना.."

" तुला खरं सांगू चित्रा, हा विचार आम्ही कधी केलाच नाही. बाबा गेले. मग माझे शिक्षण त्यानंतर लगेचच लग्न, माझा संसार या सगळ्यात गुंतून गेले होते अगदी. त्यातूनही कधी असं वाटलं तरी असं वाटायचं की इतर कोणत्याही पुरूषाला आपल्या आईसोबत कसे बघायचे? किंवा असे वाटायचे की या वयात आईला सोबतीची काय गरज आहे?"

" ताई, सोबत तर माणसाला नेहमीच हवी असते ना? लहानपणी आपण शाळेत जाताना पण जर सोबत चांगली असेल तर उत्साहाने जातो पण तेच जर कोणी नसेल तर छोटासा रस्ता पण अवघड होऊन जातो."

" तुझे म्हणणे पटले मला. आईच्या मनात असं काही असेल असं खरंच वाटते का तुला?"

" हे समजून घेण्याचा शेवटचा उपाय म्हणजे त्यांच्या बेस्ट फ्रेंडशी बोलून घ्या."

" तू तर पूर्ण तयारीनिशी आली आहेस." सुमेधा कौतुक करत बोलली. दोघी तिथून तशाच मालतीताईंच्या मैत्रिणीकडे , सुधाताईंकडे गेल्या. आधी फोन केला नाही कारण त्या लगेच मालतीताईंना सांगण्याची शक्यता होती. सुधाताई घरी एकट्याच होत्या. या दोघींना बघून नाही म्हटलं तरी त्यांना थोडा धक्काच बसला.

" मावशी, आधी वचन दे. मी इथे आलेलं तू आईला बोलणार नाही."

" हे काय नवीन?"

" आधी हो म्हण.." सुमेधाने हट्ट केला.

" हो बाई.. एवढी मोठी झालीस तरी हट्ट करणे सोडू नकोस.. लहान मुलासारखा." सुधाताई कौतुकाने बोलल्या.

" मावशी, मला सांग. बाबा गेल्यावर आईच्या मनात कधी दुसर्‍या लग्नाचा विचार आला का?" सुमेधाने विचारल्यावर इतका वेळ हसणार्‍या सुधाताई एकदम गंभीर झाल्या.

" काय झाले मावशी.. सांग ना प्लीज. "

" तुला आज का हे आठवले?" सुमेधाने चित्राकडे बघितले. सुमेधाने चाचरत आपल्याला आलेले अनुभव सांगितले. सुधाताईंनी शांतपणे ऐकून घेतले.

" तुमचे बाबा गेल्यावर खूपजणांनी तिला दुसर्‍या लग्नाचा आग्रह केला होता. पण त्यांच्यावर असलेलं प्रेम, तुमचं अडनीडं वय, आलेली जबाबदारी यामुळे तेव्हा ती या गोष्टीला नकार देत होती. सुमेधाचे लग्न लागताना जेव्हा तिचे मोठे काकाकाकू देवदेवक बसवायला बसले तेव्हा तिला खूप वाईट वाटत होते. कसं असतं ना जगाला दाखवायला मंगळसूत्रापासून सगळे दागिने जरी घातले ना तरी अशावेळेस नवरा नसल्याची जाणीव समाज करून देत असतो. तेव्हाच तिला जोडीदाराची उणीव भासली होती." सुमेधाने चित्राकडे बघितले.

" ऑफिसच्या कामात ती जरी मन गुंतवत असली तरी घरी आल्यावरचे एकटेपण तिला खायचे. कारण शशांकला यायला उशीर व्हायचा. इतर सगळेच आपापल्या व्यापात. कधीतरी मन मोकळे करायची ती माझ्याकडे. मी तिला सुचवले होते, मुलांशी मी बोलते म्हणून.. पण तिने नकार दिला होता. नंतर मग माझेच आजारपण सुरू झाले. माझ्या डोक्यातून हा विषयच निघून गेला."


चित्रा आणि सुमेधा तिथून बाहेर पडल्या. आपल्या आईचे मन आपल्याला जाणता आले नाही याचा विषाद सुमेधाला वाटत होता. आता याचे परिमार्जन करायचे असंच तिने ठरवले होते. ती चित्राला घेऊन तशीच एका वधूवरसूचक मंडळात गेली. तिने तिथे मालतीताईंचे नाव नोंदवले. दोनेक दिवसांनी सुधाताईंना घेऊन ती घरी गेली. त्या दोघींचं आधी बोलणे झाले असावे. मालतीताईंनी जास्त आढेवेढे न घेता दुसर्‍या लग्नाला होकार दिला. सुरूवातीला शशांक काचकूच करत होता.


" ताई, खरंच काय गरज आहे आईच्या लग्नाची?"

" तू हे बोलतोस? अरे तिलाही एकटेपणा जाणवत असेलच ना?"

" अग पण उद्या मला बाळ झाल्यावर थोडीच ती एकटी पडेल.."

" शशांक, तुला आई हवी आहे की आया? तिने दिवसभर घर सांभाळावे, तुझी मुले सांभाळावीत आणि नंतर देवाचे नाव घ्यावे? उद्या तुझी मुले मोठी झाल्यावर मग तिने काय करायचे?"

" पण ताई.. त्या माणसाने आईला त्रास दिला तर? आणि आईशी मग आपले संबंध कमी झालेतर?" शशांकची असुरक्षितता बाहेर पडत होती."

" शशांक, अरे तुझेच बघना.. तुला आईसाठी जास्त वेळ मिळतो का? तुला जसा आपल्या जोडीदाराला वेळ द्यावासा वाटतो तसाच जर तिने दिला तर काय चुकीचे? तसेही तिला आवडणार्‍या गोष्टीत तुला रस नसतो.. मग तिने करायचे तरी काय?"

शशांकचाच विरोध मोडून काढल्यावर बाकीच्यांचा विचार करायची गरजच वाटली नाही. मालतीताईंच्या पसंतीने त्यांच्याच वयाच्या एका व्यक्तीशी त्यांनी पुनर्विवाह केला. ती व्यक्ती शहरातलीच असेल हे बघूनच. म्हणजे अडीनडीला त्यांच्याकडे लक्षही देता येईल या हेतूने. लग्नाला काही जणांनी नाके मुरडली तर काही जणांनी पसंती दर्शवली. पण मालतीताई खुश आहेत हे बघून सुमेधा आणि चित्राने लक्ष दिले नाही.

" सुमेधा आणि चित्रा, तुमचे कसे आभार मानू समजत नाही." लग्नाला एक महिना झाल्यावर मालतीताई बोलत होत्या.

" आभार कसले त्यात?"

" खरंच.. खूप कंटाळा आला होता एकटेपणाचा. मुलं, मैत्रिणी असल्यातरी आपलं हक्काचं कोणीतरी असावं, असं खूप वाटायचं. पण बोलायची हिंमत नव्हती. "

" क्रेडिट द्यायचे तर चित्राला दे.. तिने पुढाकार घेतला म्हणून हे झाले. नाहीतर आमच्या माठ डोक्यात हे आलेच नसते.." हसत सुमेधा बोलली.

मालतीताईंनी न बोलता दोघींना जवळ घेतले.. त्यांच्या स्पर्शातून फक्त कृतज्ञता जाणवत होती.



उतारवयातील जोडीदाराची गरज हा वादाचा मुद्दा असतो. ही कथा मी माझ्या दृष्टीकोनातून लिहिली. कशी वाटली सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all