अगर तुम साथ हो.. भाग १५

कथा तिच्या प्रेमाची
अगर तुम साथ हो.. भाग १५

मागील भागात आपण पाहिले की रितेश काव्याच्या बाजूने उभा राहतो. आता बघू पुढे काय होते ते.


"थकलीस का?" डोळे मिटून बसलेल्या काव्याला रितेशने विचारले.

"थोडीशी.. हा रिशान फार दमवतो बाबा. तो झोपला की शांत असतो तेवढाच." डोळेही न उघडता काव्या बोलत होती.

"वैतागत असेल एकटाच खेळून." रितेश काव्याशेजारी बसत म्हणाला.

"तो वैतागणार?? तो वैताग आणेल." रितेशच्या खांद्यावर डोकं ठेवत काव्या म्हणाली. रितेशनेही तिला जवळ घेतले. दोघेही काही क्षण तसेच बसले होते.

"मी जेवायला वाढते तुला." काव्या उठत म्हणाली.

"नको उठूस.. मी जेवून आलो आहे. तू जेवली आहेस ना?" अचानक काहीतरी आठवून रितेशने विचारले.

"हो.. याच्यापाठी धावून जीव अर्धा झालेला असतो. यापेक्षा ऑफिसची धावपळ परवडते. रितेश, मला असं वाटतं की मी आता ऑफिसला जायला सुरूवात करावी. रिशान नाही म्हटलं तरी झाला की दोन वर्षांचा. घरी तरी किती दिवस राहणार?" काव्या बोलत होती आणि रितेश चुळबुळत होता.

"तुला काही बोलायचे आहे का?" काव्याने विचारले.

"हो.. तू बॉम्बे पिक्चर बघितला आहेस?"

"बॉम्बे???"

"हो.. मणीरत्नमचा.." रितेश बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून काव्या गोंधळली.

"त्या पिक्चरचा इथे काय संबंध?"

"त्यात ना एक गाणं आहे.. कुची कुची रक्कम्मा पास आये ना.. इक प्यारी प्यारी गुडिया दे दो ना.." रितेश चक्क गायला लागला होता.

"रितेश काय सुरू आहे हे??" काव्या हसू लागली.

"म्हणजे.. रिशानला बहिण आणूयात ना. एक गोडुली.. " रितेश काव्याला मस्का मारत होता.

"अरे रिशान आत्ताशी दोन वर्षांचा आहे." काव्याचे डोळे मोठे झाले होते.

"तेच तर.. दोघांमध्ये अंतर कमी असेल तर दोघे छान राहतील. आणि एकदा ती झाली की तू पण मोकळी." रितेश काव्याची समजूत काढत होता.

"नाही.. मला परत त्या चक्रातून नाही जायचं. मला माझं काम पण सुरू करायचं आहे." काव्या शहारत म्हणाली.

"काव्या.. काय गरज आहे तुला कामाला जायची? आता नाही म्हटलं तरी आपली दोन हॉटेल्स झाली आहेत. देवदयेने छान चालत आहेत. छान घरी बस.. मुलांना सांभाळ." रितेश बोलत होता.

"रितेश, हॉटेल्स छान चालू आहेत हे चांगलंच आहे.. पण मला स्वतःच जग हवं आहे. जे मला माझ्या कामातच मला मिळणार आहे." काव्या सांगू लागली.

"म्हणजे.. आपल्याला दुसरं बाळ नको हेच ना?" नाराज होत रितेश म्हणाला.

"मी असं म्हटलं का?" लाजेने मान खाली घालत काव्या म्हणाली. "एकाला दुसरं हवं असं मलाही वाटतं.. पण.."

"आता पण नको आणि बिण नको.. आपलं छानसं चौकोनी कुटुंब हवं मला." रितेश काव्याला जवळ घेत म्हणाला.

दिवस जात होते.. काव्या आणि रितेशला मुलगी झाली, क्रिशा. त्याच मुहूर्तावर रितेशने अजून एक हॉटेल घेतले. स्वतःचं वेगळं जग हवं असलेली काव्या मात्र घरातच अडकून पडली होती. माधवराव आणि स्मिताताईंचं वय वाढत होतं. दोघांनाही मदतनीसांच्या सहाय्यानेही मुलांना सांभाळणं शक्य होत नव्हतं. घरातही आलंगेलं असायचंच. मुलांसाठी, घरासाठी आपल्या करिअरवर काव्याला पाणी सोडावं लागलं. समोर आलेल्या परिस्थितीला नाराजीने सामोरं जाण्यापेक्षा हसत हसत सामोरे जायचं, असं काव्याने ठरवलं. तिने मुलांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या विकासाकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. दोन्ही मुलंही गुणी निघाली. अभ्यासातही हुशार आणि इतर गोष्टीतही. रितेश वाढत्या कामाच्या गडबडीत तसेही मुलांकडे लक्ष देऊ शकत नव्हता. पण त्याची उणीव काव्या भरून काढत होती. रिशान अभ्यासासोबत क्रिकेट खेळत होता आणि क्रिशा डान्समध्ये चमकत होती. मुलांचे यश बघून त्यातच काव्याला समाधान मिळत होते.

"रितेश, अरे घरी थोडा तर वेळ देत जा ना. काल आईबाबा तुझी वाट बघत होते. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता." काव्या रितेशकडे तक्रार करत होती. रितेश आरशात बघून स्वतःची तयारी करत होता.

"काल एक महत्वाची मिटिंग होती. तुला माहिती आहे, एका हॉटेलपासून सुरू झालेलं हे सगळं आता साता समुद्रापार जायची वेळ आली आहे." रितेशच्या चेहर्‍यावर तोच उत्साह होता. काव्या बघतच राहिली. चाळिशी ओलांडली तरी त्याचे वय त्याच्या चेहर्‍यावर दिसत नव्हते. नेहमीच टापटीप घातलेले कपडे आणि त्यातही चेहर्‍यावर आलेले तेज. हा तोच रितेश आहे? तिचे लक्ष पाठच्या आरशाकडे गेले. तिला विरोधाभास जाणवला. तो जितका टवटवीत दिसत होता ती तेवढीच दमलेली. हाताशी सगळं असूनही मुलांच्या, सासूसासर्‍यांच्यापाठी नाचताना तिने स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष दिसून येत होतं.

"आणि मी हे सगळं करतो ते कोणासाठी? तुमच्याचसाठी ना?" रितेशच्या शब्दांनी काव्या भानावर आली. तो परफ्यूम लावत होता. तो वास तिला हवाहवासा वाटला. आणि तिला जाणीव झाली की कितीतरी दिवसात त्या दोघांनी एकत्र असा वेळ घालवलाच नव्हता.

"करतोस आमच्यासाठीच.. पण मग कधीतरी तू ही रहात जा ना आमच्यासोबत. तुला तर हे ही माहित नसेल की तुझा मुलगा यंदा बारावीला आहे. आणि त्याचा आता रिझल्ट आहे." काव्या रागावत म्हणाली.

"रिझल्ट आला पण जवळ? तुला काय वाटलं मुलांवर माझं लक्ष नाही? तसं तू असताना द्यायची गरज तरी आहे का? तू आहेस म्हणून तर आईबाबा, घरदार सगळं तुझ्यावर सोडून मी निश्चिंत आहे." रितेश काव्याला मिठीत घेत म्हणाला. काव्याला अचानक आठवलं,

"रितेश, आजकाल तुमच्या पार्ट्या नसतात का रे?"

"असतात ना? तुला अचानक आठवलं?" रितेश लांब जात म्हणाला.

"ते आजकाल तू विचारत नाहीस ना येतेस का? म्हणून आठवलं. काही झालं आहे का?"


देईल का रितेश काव्याला तिला हवा असलेला वेळ? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all