अगर तुम साथ हो.. भाग १४
मागील भागात आपण पाहिले की काव्या आणि रितेश सध्या रहात असलेलं घर विकत घेतात. पण तरीही ते रितेशच्या आईबाबांच्या घरी रहायला जातात. आता बघू पुढे काय होते ते.
"पल्लवी, अजून काही खावंसं वाटत असेल तर सांग हो.." स्मिताताई पल्लवीसमोर गुलाबजाम ठेवत म्हणाल्या.
"नाही ग बाई.. अजून काही नको.. गुलाबजामपण मला तुझ्या हातचे खावेसे वाटले म्हणूनच. बरं उद्याचा मेनू ठरला ना? आणि कोणाला सांगितलं आहे? " पल्लवीने आईला विचारले.
"कोणाला म्हणजे? बहिणीचं डोहाळजेवण म्हणजे रितेशच करणार ना? काळजी करू नकोस.. सगळे पदार्थ तुझ्या आवडीचेच असतील." स्मिताताई कौतुकाने आपल्या लेकीकडे बघत म्हणाल्या. तोच आतून काव्या आलूपराठा घेऊन आली.
"हे घ्या ताई.."
"थॅंक यू ग.. काव्या, तुमच्या लग्नाला पण आता वर्ष होईल ना?" पराठा खात पल्लवीने विचारले.
"हो.. का ताई?" काव्याने विचारले.
"राग नको येऊन देऊस.. पण तुम्ही काय प्लॅनिंग करताय का?" सहज विचारते आहे असं दाखवत पल्लवी विचारत होती.
पल्लवीने स्मिताताईंकडे टाकलेला कटाक्ष काव्याला समजला. ती कोणत्या अर्थाने विचारते आहे, ते ही तिला समजले. एक क्षणभर तिला वाटले की त्यांना सांगावे, मीसुद्धा गरोदर आहे. पण तिला स्वतःलाच ही गोष्ट एवढ्यात सांगायची नव्हती. तसेही तिथे परत येऊन त्या दोघांना आठच दिवस झाले होते. घरातल्यांचे स्वभाव परत नव्याने समजत होते. हे दोघे आले आहेत हे समजताच पल्लवीचे धुमधडाक्यात डोहाळजेवण करायचे ठरले. सातव्या महिन्यात एकदा केले होते. तेव्हा तोंडदेखलंही कोणी ये, असं म्हटलं नव्हतं. पण आता भाऊ असताना परत केले जात होते. नाही म्हटलं तरी काव्याला ही गोष्ट खटकत होती. रितेशला हे सगळं हवं आहे म्हटल्यावर तिने मूक प्रेक्षकाची भूमिका घेतली होती.
पल्लवीने स्मिताताईंकडे टाकलेला कटाक्ष काव्याला समजला. ती कोणत्या अर्थाने विचारते आहे, ते ही तिला समजले. एक क्षणभर तिला वाटले की त्यांना सांगावे, मीसुद्धा गरोदर आहे. पण तिला स्वतःलाच ही गोष्ट एवढ्यात सांगायची नव्हती. तसेही तिथे परत येऊन त्या दोघांना आठच दिवस झाले होते. घरातल्यांचे स्वभाव परत नव्याने समजत होते. हे दोघे आले आहेत हे समजताच पल्लवीचे धुमधडाक्यात डोहाळजेवण करायचे ठरले. सातव्या महिन्यात एकदा केले होते. तेव्हा तोंडदेखलंही कोणी ये, असं म्हटलं नव्हतं. पण आता भाऊ असताना परत केले जात होते. नाही म्हटलं तरी काव्याला ही गोष्ट खटकत होती. रितेशला हे सगळं हवं आहे म्हटल्यावर तिने मूक प्रेक्षकाची भूमिका घेतली होती.
"प्लॅनिंगचा असा काही विचार अजूनतरी आम्ही केला नाही." काव्या बोलून गेली.
"मी काय म्हणते काव्या.. उद्या हिचं ओटीभरण सुरू झालं की तू आणि तुझी वहिनी.. काय गं नाव तिचं?" स्मिताताई बोलू लागल्या.
"सुपर्णा.."
"हां.. तू आणि ती लगेच जेवायचं बघा. म्हणजे ओटी भरली रे भरली की बायका जेवतील आणि लगेच जातील." स्मिताताई म्हणाल्या.
"मी नको ओटी भरू?" काव्याने मुद्दाम विचारले.
"तू कशाला भरतेस? मी भरते आहे ना?" स्मिताताई म्हणाल्या.
"तिने का नाही भरायची ओटी?" यांचं बोलणं अर्धवट कानावर पडलेल्या रितेशने ऐकून विचारलं. ते ऐकून स्मिताताई आणि पल्लवी चपापल्या. पण बोलून टाकायचं असं त्यांनी ठरवलं.
"अरे, नको म्हणजे.. अजून तुमचं कशात काही नाही. मग कशाला?" स्मिताताईंनी वाक्य अर्धवट सोडलं. रितेशने काव्याकडे बघितले. तिच्या डोळ्यात त्याला वेदना दिसत होत्या. तिने नाही सांगितलं होतं तरी त्याने आता ती गोष्ट सांगायचं ठरवलं.
"कशात काही नाही म्हणजे?"
"अरे.. अजून मूलबाळ नाही ना.."
"पण आज ना उद्या होईलच ना.. मग काय हरकत आहे?"
"तुला समजत नाही.. की माझ्याच तोंडून वदवून घ्यायचं आहे?" स्मिताताई चिडल्या होत्या.
"समज हवं ते.." रितेशही हट्टाला पेटला होता.
"आई, नको ना विषय वाढवूस. बरं.. काव्या उद्या माझी ओटी भरेल.. झालं?" पल्लवी मध्ये पडत म्हणाली.
"ती नाही भरणार ओटी." रितेश म्हणाला.
"आता काय झालं?" पल्लवीने विचारले.
"मी जर चुकत नसेन तर गरोदर बाईने दुसर्या कोणाची ओटी भरायची नसते. म्हणून काव्या उद्या ओटी भरणार नाही." रितेश ठामपणे म्हणाला.
"ते गरोदर बाईने..." स्मिताताई बोलता बोलता थबकल्या.
"म्हणजे.. काव्या???" दोघींच्याही चेहर्यावर आश्चर्यमिश्रित आनंद दिसून येत होता.
"मग इतके दिवस सांगितलं का नाही?" स्मिताताईंनी विचारले.
"आम्हालासुद्धा नुकतेच समजले होते. ते लगेचच सांगायचे नसते म्हणून. आज तुम्ही जरा जास्तच बोललात म्हणून बोलावे लागले." रितेश म्हणाला.
"चुकलं हो माझं.. आता मला काय माहित? बरं काव्या.. आता अजिबात धावपळ करू नकोस. अरे देवा.." स्मिताताईंनी डोक्याला हात लावला.
"आता काय झालं आई??" रितेशने विचारले.
"मला वाटलं होतं काव्या इथे आली आहे म्हणजे पल्लवीच्या बाळंतपणात मला तिची मदत होईल. पण आता हिला कामं सांगायची म्हणजे?"
"एवढी नको काळजी करायला. मी जाईन माझ्या सासरी. तिथे आहेत कामासाठी भरपूर माणसं." पल्लवी म्हणाली.
"असं नाही गं.. पहिलं बाळंतपण माहेरी करायचं असतं ना. ते कसं होणार आता याची काळजी लागली आहे मला."
"आई, आम्ही दोघं आलं नसतो तर तुला एकटीलाच करावं लागलं असतं ना? पण तू काळजी करू नकोस.. आपण प्रत्येक कामासाठी माणसे लावू. आता आहे मी तेवढा सक्षम."
"हो रे.." स्मिताताई लेकाची अलाबला काढत म्हणाल्या.
"थॅंक यू.." खोलीत गेल्यावर काव्या रितेशला म्हणाली.
"थॅंक यू कशासाठी?" रितेशला आश्चर्य वाटत होतं.
"तू आता माझ्यासाठी आई आणि ताईच्या विरोधात उभा राहिलास.. आणि..." बोलता बोलता काव्याने त्याला मिठी मारली.
"ए वेडाबाई.. मी तुझ्यासाठी नेहमीच असेन. आणि तूच म्हणाली होतीस ना.. आपल्या दोघांमध्ये सॉरी आणि थँक यू नको. सो... आता फक्त हसायचे." रितेश मिठी घट्ट करत म्हणाला.
रितेश आणि काव्याच्या आयुष्यात आता येत आहेत आनंदाचे क्षण. ते कसे वाटतात सांगायला विसरू नका.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई