Feb 26, 2024
नारीवादी

अगर तुम साथ हो.. भाग ११

Read Later
अगर तुम साथ हो.. भाग ११
अगर तुम साथ हो.. भाग ११

मागील भागात आपण पाहिले की रितेश करणार असलेला व्यवसाय माधवरावांना पसंत पडत नाही. आता बघू पुढे काय होते ते.


"काव्या, हे घर लहान आहे. चालेल का तुला?" रितेश आणि काव्या भाड्याने घर शोधत होते.

"तुला जमेल का? तुझ्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून."

"जमवावं लागेल काव्या. सध्या मोठं घर घेण्याइतपत पैसे नाहीत आपल्याकडे. तसेही यासाठी तुझे साठलेले पैसे आहेत, म्हणून आपण एवढं तरी करू शकतो आहोत. नाहीतर काय केले असते मी. काव्या.. खरंच का गं केलंस माझ्यासारख्या भणंगाशी लग्न?" रितेश बोलत होता.

"तू लिहायला का नाही सुरुवात करत?" काव्याने विचारले.

"काय???" रितेश जोरात ओरडला.

"मी म्हटलं.. लिहायला का नाही सुरुवात करत? किती ते अलंकारिक बोलतोस. बापरे.. भणंग काय.. आणि काय काय?" काव्या रितेशला चिडवत म्हणाली.

"तुला मस्करी सुचते आहे?" रितेशच्या नाकावर राग दिसू लागला.

"नाही रे.. पण सतत तेच तेच ऐकून कंटाळा आला. आता एक गोष्ट लक्षात ठेव. आपलं लग्न झालं आहे.. यात तुझं माझं काही नाही.. जे आहे ते आपलं आहे. समजलं?" काव्या रितेशच्या ओठांवर ओठ ठेवत म्हणाली.

"हो.. समजलं.." तिच्या गळ्यात हात घालत रितेश म्हणाला.

"आईबाबांना वाईट नाही का वाटणार आपण इथे रहायला आल्यावर?" काव्याचा मूड पटकन बदलला.

"त्यांनीच तर सांगितलं आहे ना वेगळं रहायला.. मग काय तर." रितेश कडवटपणे बोलला.

"पण तरीही मला वाटते, तू एकदा बाबांना समजावून सांगावेस."

"मला ना आता त्यांच्याशी बोलायची इच्छाच होत नाही. त्या दिवशी ताई असं वागूनही ते काहीच बोलले नाहीत. आता मी काहीतरी करायला बघतो आहे तर ते ही नाही. पण आता मी थांबणार नाही. आणि काव्या तूच बघ ना.. माझ्या एका शब्दाखातर माझ्या मित्रांनी त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे सांगून मला आधीच जवळपास वीस डब्यांची ऑर्डर दिली आहे. मला ही क्वालिटी मेंटेन करायला जमली ना, की बघ मी कुठच्या कुठे जातो ते." रितेश काव्याचा हात हातात घेऊन बोलत होता.

"हो रे राजा.. पण एवढं काम तुला एकट्याला झेपेल का?" काव्याने काळजीने विचारले.

"का नाही जमणार? पोळ्या करायला, भाजी चिरून द्यायला मावशी आहेत, भांडी घासायला एकजण आणि बाकीच्या कामाला मी.. त्याहीपेक्षा एक खूप महत्त्वाचे काम आहे त्यासाठी अजून एक माणूस आहे." बोलता बोलता रितेश थांबला.

"कसलं काम? आणि कोण करणार आहे ते?"

"मला आधार द्यायचं.. आणि ते काम करायला तू आहेस. थँक यू.. परत एकदा."

"तू ना या भिंतीवर एक मोठा बोर्डच लाव. सॉरी आणि थँक यू चा.. म्हणजे तुझा बराच त्रास कमी होईल." काव्या परत हसत म्हणाली.

माधवरावांनी सांगितल्याप्रमाणे काव्या आणि रितेशने लवकरच घर सोडले. आणि दोघेही एका छोट्याश्या घरात राहू लागले. काव्या नोकरी न सोडता रितेशला मदत करत होती. तीन माणसांपासून सुरू केलेला व्यवसाय हळूहळू वाढू लागला होता. जेवणाचा दर्जा चांगला राखल्यामुळे रितेशच्या ग्राहकांची संख्या वाढू लागली होती. वीस डब्यांपासून सुरू झालेली संख्या आता शंभरावर येऊन पोहोचली होती. रितेशच्या हाताखाली दहा माणसे काम करू लागली होती. घेतलेली जागा आता या कामासाठी अपुरी पडू लागली होती. स्मिताताई या दोघांच्या संपर्कात असल्यातरी माधवराव आणि पल्लवीने मात्र परत फोन केला नव्हता. काव्याचे आईबाबा मात्र त्या दोघांच्या पाठिशी उभे होते. त्याच दरम्यान आदित्यचेही लग्न झाले होते. तेव्हाही स्मिताताई आणि माधवरावांनी येणं टाळलं होतं. काव्या दिलजमाई करण्याचा प्रयत्न करत होती पण रितेश सध्या कामाच्या धांदलीत तिथे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हता.

"काय रे? आज तोंड पाडून बसला आहेस?" ऑफिसमधून आलेल्या काव्याला रितेशला एकट्याला बघून आश्चर्य वाटले. आज घरात एकदम शांतता होती. त्यांच्या घरात अशी शांतता फक्त रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी असायची ज्या दिवशी डबे नसायचे.

"अरे बोल ना पटपट.." काव्याला थोडं टेन्शन आलं होतं. रितेश मात्र तसाच बसून राहिला होता.

"काव्या..."

"काय झालं?? मावशी काम सोडून गेल्या का?"

"काव्या.. मला..."

"आता बोलतोस की मी जाऊ निघून.." काव्या रडवेली झाली.

"काव्या, मला समोरून ऑफर आली आहे.. मला हॉटेल चालवायला मिळेल का म्हणून?" रितेशच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वहात होता.

"काय??" काव्याचाही विश्वास बसत नव्हता.

"हो.. ते आपल्या कोपर्‍यावरचे हॉटेल आहे ना, त्यांचा मुलगा परदेशी राहतो आहे. मालकांना पण तिथे जायचे आहे. त्यांचा जीव मात्र हॉटेलमध्ये अडकला आहे. त्यांना कोणीतरी माझं नाव सुचवलं. त्यांनी आपल्या जेवणाची चव बघितली. आपली काम करायची पद्धत ते बघत होते. आज त्यांनी अचानक समोरून बोलवून मला त्यांचा भागीदार होणार का म्हणून विचारले."

"खरंच?? मग तू काय सांगितलेस?"

"मी बिचारा काय सांगणार? मी म्हटलं बायकोला विचारून सांगतो." रितेश मिस्किलपणे हसत म्हणाला.

"तुला ना भलत्यावेळी मस्करी सुचते. खरं सांग ना.. आणि हॉटेल सुरू केल्यानंतर हे डब्बे?" काव्याने विचारले.

"भागीदारीसाठी विचारलं हे खरंच आहे. मला असं वाटतंय त्यांना हो म्हणावं. आणि हे डब्बे पण चालू ठेवावेत. कारण असंही तिकडचं स्वयंपाकघर आपल्याला वापरायला मिळेल. म्हणजे या लोकांचा रोजगार न जाता त्यांचेही काम चालू राहिल."

"अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. मग आता कधी ते काम सुरू होईल तुझं?"

"समजेल लवकरच.." काहीतरी विचार करत रितेश म्हणाला.


काय असेल रितेशच्या मनात? आतातरी येतील का दोघांच्या आयुष्यात सुखाचे दिवस? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//