अगर तुम साथ हो.. भाग १०

कथा तिच्या प्रेमाची
अगर तुम साथ हो.. भाग १०

मागील भागात आपण पाहिले की पल्लवी तिची अंगठी हरवल्यावर रितेशला खिशात बघायला सांगते. आता बघू पुढे काय होते ते.


"काव्या.. तुझा.. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे का?" वाट बघून मध्यरात्री कधीतरी डोळा लागलेल्या काव्याला रितेशने विचारले.

"रितेश.. तू दारू पिऊन आला आहेस?" काव्या दचकून उठून बसली.

"ते महत्वाचे नाही. मला सांग तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे का?" रितेशच्या आवाजातली वेदना काव्याला समजली.

"हो.. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू काही खाल्ले आहेस का? वाढू का तुला जेवायला?"

"जेवायला नको.. अन्न म्हणजे विष वाटतं आहे मला. तू त्यादिवशी विचारलेस ना कँटीनसाठी? मी करतो सुरू कँटीनचे काम."

"रितेश.. दारूच्या नशेत निर्णय नको घेऊस."

"दारूच्या नशेत नाही.. ज्यावेळेस ताईने विचारले ना, की तुझ्या खिशात अंगठी आहे का? तेव्हाच हा निर्णय झाला होता. आता फक्त त्यावर शिक्कामोर्तब केले. ते म्हणतात ते किती खरं आहे ना.. असतील शितं तर जमतील भुतं.. बाहेरच्यांचं समजून घेता येतं गं. पण ही तर आपलीच माणसं ना? त्यांनीही हिच किंमत करायची? ताईला काय वाटलं, पैसे नाहीत म्हणून मी तिची अंगठी घेईन? तिला असं वाटूच कसं शकतं?" रितेश बोलत होता. आणि त्याचा एकेक शब्द काव्याच्या काळजावर वार करत होता.

"बरं.. आता या विषयावर उद्या बोलू." काव्या रितेशला झोपवत म्हणाली.

"बायको.. तू आहेस ना माझ्यासोबत?" रितेशने काव्याचा हात घट्ट पकडला.

"हो रे.. आहे मी.. नेहमीच." काव्या हातावर थोपटत म्हणाली.

"मला ना घट्ट धरून ठेव.. काहीही झालं तरी जाऊ नकोस.." रितेश काव्याला मिठीत घेत म्हणाला.. ती ही त्याच्या मिठीत विरघळून गेली.


"काव्या, तुझ्या त्या अण्णाशी एकदा बोलायचं होतं.. त्याने काय मेनू ठेवले होते. त्याची किंमत काय ठेवली होती." सकाळी आवरताना रितेश काव्याशी बोलत होता.

"तू खरंच विचार करतो आहेस?" काव्याने विचारले.

"तुझा विश्वास नाही?"

"तसं नाही.. पण मग मला असं वाटतं की त्याच्याशी बोलण्यापेक्षा तुझे तू ठरवावेस."

"म्हणजे?"

"हे बघ.. तो अण्णा फक्त इडली, डोसा आणि वडा असेच मेनू ठेवायचा. कारण त्याच्याही बाकीच्या जेवणाला तेवढी चव नसायची. तू आधी बघ स्वतःला काय काय जमते ते. तुला हे करण्यासाठी माणसांची मदत लागेल. आधी ते होतं आहे का बघ. नंतर टेंडर भर." काव्याच्या बोलण्यावर रितेश विचारात पडला.

"तू एवढा विचार केला आहेस?"

"करावा लागला. मला असं वाटत होतं की नोकरी नाही मिळत तर तू त्याच्यापाठी जाण्याऐवजी स्वतःचं काहीतरी करावंस. मग त्यातूनच मी माझ्या मैत्रिणीला भेटले. ती पण केटरिंगचं काम करते. यासाठी तुला अनेक गोष्टींची तयारी करावी लागेल. आधी ती कर. मग पुढे जाऊ. कारण एकदा पुढे गेल्यावर मागे वळणे नाही." काव्या धीर देत होती. रितेशला तिचे म्हणणे पटले. त्याने मग आधी त्या व्यवसायाची माहिती काढायला सुरुवात केली. याच्या त्याच्या ओळखीने त्याने त्याची टीम बनवायला सुरुवात केली.


"काव्या, मला जरा तुझ्याशी बोलायचे आहे." स्मिताताई बोलू की नको या विचारात होत्या.

"बोला ना आई."

"रितेशचं नक्की काय चालू आहे? सकाळी लवकर जातो, रात्री उशीरा येतो. काही गडबड तर नाही ना?" स्मिताताई धास्तावल्या होत्या.

"गडबड म्हणजे?"

"आता कसं सांगू? त्यादिवशी पल्लवी जे वागली त्याने चिडून हा चुकीच्या कामाला नाही ना लागला?" स्मिताताईंच्या चेहर्‍यावर भिती दिसत होती.

"आई.. तुम्हाला असं वाटतं रितेश काही चुकीचं काम करेल?"

"वाटत नाही गं.. पण कोणाचं काय सांगावं? म्हणून जरा भिती वाटते.. बाकी काही नाही."

"मग तुम्ही त्याच्याशीच बोलून घ्या ना."

"नको गं.. उगाच पराचा कावळा करायचा तो. तूच सांग बाई.."

"आई, तो कामाच्याच गडबडीत आहे. पण ते त्याच्याच तोंडून ऐका ना.."

"हे बरं आहे.. तुला सगळं माहित आहे. आणि मी सख्खी आई असून लेक काय करतो ते माहित नाही." स्मिताताईंच्या बोलण्याने काव्या दुविधेत पडली. खरंतर रितेश आता वेगळ्याच प्लॅनवर काम करत होता. आणि त्याला स्वतःलाच हे सगळं झाल्याशिवाय घरी सांगायचे नव्हते.

"ते रितेश.. खाण्याचा बिझनेस सुरू करायचा म्हणतो आहे."

"म्हणजे??"

"म्हणजे तो स्वयंपाक करून इतरांना डबे वगैरे देता येतात का ते बघतो आहे." काव्या चाचरत म्हणाली.

"व्वा.. आजवर आमच्या घरच्या पुरूषांनी कधी स्वयंपाकघरात पाऊल टाकलं नाही. आणि आमचा हा दिवटा स्वयंपाक करून लोकांना जेवायला घालणार?" माधवरावांनी दोघींचं बोलणं ऐकलं.

"बाबा, जगण्यासाठी काहीतरी करणं भागच आहे ना? आणि काम हे काम असतं. यात बायका आणि पुरूष कुठून आले?" काव्याने विचारले.

"हेच ते.. मध्ये मध्ये बोलणं. साधीसरळ नोकरी करायची तर ते नाही.. बिझनेस करायचा.. आणि तो ही कसला स्वयंपाक्याचा. मला मान्य नाही. या घरात रहायचं असेल तर मला हे चालणार नाही." माधवरावांनी निर्वाणीचे सांगितले.


माधवरावांच्या दबावाला बळी पडतील काव्या आणि रितेश? की करतील स्वतःचा व्यवसाय सुरू? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all