अगर तुम साथ हो.. भाग ९

कथा तिच्या प्रेमाची
अगर तुम साथ हो.. भाग ९

मागील भागात आपण पाहिले की पल्लवी रितेशला तिच्या कंपनीत कँटीनचं काम करण्यास सुचवते. आता बघू पुढे काय होतं ते.


"आई... आई.. कुठे आहेस?" पल्लवी हाक मारतच घरात आली.

"अग हो.. आलेच.. आज काय खास? आणि एवढी खुशीत आहेस?" स्मिताताईंनी प्रेमाने लेकीला विचारले.

"हे बघ.. मिलिंदने मला काय घेतले." पल्लवी खूप खुश दिसत होती.

"बघू, काय घेतलं ते.."

"हे बघ.. हिऱ्यांचे कानातले, अंगठी आणि हे गळ्यातले.." पल्लवी हौसेने दाखवत होती.

"छानच गं.. पण अचानक?" स्मिताताईंनी विचारले.

"ते त्याचं काहीतरी काम झालं. आणि त्याने मला प्रॉमिस केलं होतं. पण ही अंगठी थोडी सैल होते आहे." पल्लवी अंगठी दाखवत म्हणाली.

"अग मग दुसरी व्यवस्थित बसणारी घ्यायची ना?"

"मला हीच आवडली.. आणि ही मॅचिंग पण आहे. ते करून देणार आहेत मापाची. पण मलाच रहावलं नाही. मी विकत घेतलं आणि तशीच इथे आले बघ." पल्लवी बोलत होती. तोच रितेश तिचा आवाज ऐकून बाहेर आला.

"अरे ताई.. तू कधी आलीस?"

"हे काय आत्ताच आले आहे. काय म्हणतोस कसं सुरू आहे तुझं वैवाहिक जीवन?" पल्लवीने खोचकपणे विचारले.

"चालू आहे छान.." तोंडावर ओढूनताणून हसू आणत रितेश म्हणाला.

"आणि नोकरीचं काही झालं का? नसेलच.. कारण झालं असतं तर मला आईने सांगितलंच असतं." खांदे उडवत पल्लवी म्हणाली. ते टोचरं बोलणं ऐकून रितेश तिथून निघू लागला.

"तुमचं चालू देत.. मी येतो बाहेर जाऊन."

"थांब.. चहा करतेच आहे. चहा पिऊन जा." स्मिताताई चहा करायला उठल्या.

"काव्या, दिसत नाही ते."

"ती ऑफिसला गेली आहे. येईलच इतक्यात." रितेशची नजर पल्लवीच्या गळ्याकडे जात होती. पल्लवीला ते समजले.

"हे बघ, अंगठी आणि कानातले पण घेतले मिलिंदने.. छान आहेत ना?"

"हो.." रितेश कसाबसा बोलला. स्वतःवरच खुश असलेली पल्लवी उठून आरशात बघू लागली.

"घ्या, चहा घ्या." स्मिताताई चहा घेऊन आल्या.

"मी कितीही प्रयत्न केला ना.. तरीही तुझ्यासारखा चहा करूच शकत नाही." पल्लवी आईला मस्का मारत होती.

"शिकून घे.. किती वेळा सांगू?"

"नकोच ते शिकणं.. शिकलं की मग गळ्यात पडतं.. नकोच ते." पल्लवी नाक मुरडत म्हणाली. चहा संपवून रितेश कप आत ठेवायला उठला.

"चालला आहेस तर माझाही कप ठेव रे. आणि बाहेरच चालला आहेस तर मीसुद्धा निघते." पल्लवी म्हणाली. स्मिताताईंनी मान हलवली.

"आई गं..." पल्लवी जोरात ओरडली.

"आता काय झालं?" स्मिताताई दचकल्या.

"माझी अंगठी.." पल्लवी रडकुंडीला आली.

"आत्ता तर होती.."

"पण आत्ता नाहीये.. मिलिंदला समजलं तर.."

"असेल इथेच कुठेतरी.. शोध शांतपणे. रितेश, बघ रे.. कुठे दिसते का?" स्मिताताईंनी त्यालाही कामाला लावले. पल्लवी जिथे जिथे गेली त्या जागा तिघांच्याही बघून झाल्या. केर काढून कचऱ्यातही बघितलं. पण अंगठी जणू गायब झाली होती. पल्लवी रडू लागली होती. रितेश ते बघून अस्वस्थ होऊ लागला होता. त्याला सिगारेट ओढाविशी वाटत होतं.

"मी आलोच खाली जाऊन." तो परत बाहेर जायला निघाला.

"रितेश.. तुझ्या खिश्यात आहे का बघ ना." पल्लवी पटकन म्हणाली.

"ताई..." रितेश बघतच राहिला.

"अरे.. चुकून गेली का. खूप महागातली आहे रे अंगठी. माझा ना जीव खालीवर होतो आहे." पल्लवी नजर चुकवत होती.

"तुला माझी झडती घ्यायची आहे?" 'माझ्याच घरात' हे शब्द रितेशच्या तोंडातून बाहेर पडले नाहीत.

"झडती? कोणाची? काय चाललं आहे?" उघड्या दरवाजातून आत आलेल्या काव्याच्या कानावर शेवटचे शब्द पडले.

"ते.. माझी अंगठी हरवली. म्हणून मी म्हटलं त्याच्या खिशात गेली का बघ." पल्लवी उठत म्हणाली. रितेशने विदीर्ण होऊन काव्याकडे बघितले. तिचा तर स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता.

"आई.. कुठे शोधू गं?" पल्लवी वळली आणि काहीतरी चमकलेलं काव्याला जाणवलं.

"ताई.. एक मिनिट. तुम्ही अंगठी सगळीकडे शोधलीत?" काव्याने विचारले.

"म्हणजे काय? दोनदा कचरा काढला. मी या खोलीच्या बाहेरही गेले नव्हते."

"तुमचा ड्रेस झटकलात?" काव्याने हाताची घडी करत विचारले.

"काय??" पल्लवीने आणि स्मिताताईंनी दोघींनी विचारले. काव्याने पुढे येऊन पल्लवीच्या ओढणीमध्ये अडकलेली अंगठी काढली.

"तुम्ही जेव्हा वळलात, तेव्हा ती चमकली." काव्याने ती अंगठी पल्लवीच्या हातात ठेवली.

"आता तरी मी खाली गेलो तर चालेल ना?" कोणी काही बोलायच्या आत भरलेल्या डोळ्यांनी रितेश खाली निघून गेला.

"ते.. अंगठी सापडत नव्हती म्हणून.." पल्लवी कसंतरी म्हणाली.

"मी कपडे बदलून येते." काव्या तिच्या खोलीत गेली आणि डोळे मिटून बसली.
'काय ठरवलं होतं आणि काय होत आहे? वाटलं होतं की रितेशला छोटीमोठी नोकरी लागेल. छान सुखी आयुष्य जगू. पण इतरांना भराभर लागणाऱ्या नोकऱ्या यालाच का मिळत नाहीत? कधी पगार कमी, तर कधी दुसर्‍याच शहरात. काहीच नाही तर मग क्वालिफिकेशन आड येतं. अजून किती दिवस चालणार हे?' काव्याच्या मनात विचार येत होते. बाहेर चाललेलं स्मिताताईंचं आणि पल्लवीचे बोलणे तिला ऐकू येत होतं. पण काव्याला बाहेर जायची इच्छाच उरली नव्हती. कधीतरी पल्लवी निघून गेली. न ती सांगायला आली ना स्मिताताई. खूप वेळानंतर काव्या बाहेर गेली. माधवराव चहा घेत बसले होते. मगाशी बाहेर गेलेला रितेश अजूनही आला नव्हता. काव्याला हळूहळू काळजी वाटू लागली होती. तिने त्याला फोन लावला. फोन बंद येत होता. न राहवून तिने स्मिताताईंना सांगितले.

"चिडला आहे.. येईल घरी राग शांत झाल्यावर. तू जेऊन घे." त्या म्हणाल्या. काव्याला त्यांना सांगावेसे वाटत होते की रागाने नाही दुःखाने गेला आहे. त्याची समजूत तर काढली पाहिजे. पण ती गप्प राहिली. रितेशची वाट बघत.


कुठे गेला असेल रितेश? खरंच दुखावला गेला असेल का तो? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all