अगर तुम साथ हो... भाग ८

कथा तिच्या प्रेमाची
अगर तुम साथ हो.. भाग ८

मागील भागात आपण पाहिले की पल्लवीचा पगार झाल्यावर घरी पैसे कसे द्यायचे, हे ती रितेशला विचारते. आता बघू पुढे काय होते ते.

"काव्या, तुला यायला उशीर झाला ते? मी कधीची वाट बघते आहे. फोनही उचलत नव्हतीस." स्मिताताई काव्यावर चिडल्या होत्या.

"ते जरा.." काव्याने मागे वळून बघितले.

"मागे काय बघतेस? तो रितेश पण कुठे गेला आहे, देव जाणे? असे कसे गं तुम्ही?" स्मिताताई बोलत घरात गेल्या.

"आई, किती बोलतेस? थकशील.. हे घे.. रसमलाई.." रितेश त्यांच्या हातात डब्बा देत म्हणाला.

"तू ही होतास का पाठी? तरीच ही वळून वळून पाठी बघत होती. पण एका शब्दाने बोलली नाही बघ."

"आई.. हे समोसे पण घे."

"अरे.. आज चाललंय काय? रसमलाई, समोसे?"

"पैसे कमवायची अक्कल नाही. उधळायची बरी आहे. आपण इथे यांची वाट बघत होतो आणि हे बाहेर उनाडत होते." माधवराव चिडले होते.

"बाबा, ते माझा पगार झाला.. म्हणून बाहेर गेलो होतो." काव्याने मध्ये बोलायचं धाडस केलं. "आणि आई, हे घरखर्चासाठी पैसे." काव्या स्मिताताईंच्या हातात पैसे ठेवत म्हणाली.

"नवीन सुनेने घरात पैसे द्यावेत इतकी वाईट वेळ अजूनतरी आमच्यावर आली नाही. तुमचे पैसे तुमच्याकडेच असू द्या. स्मिता, जेवायला वाढ. हे बाहेरून खाऊन आले असतील, आपणच मूर्खासारखे थांबून राहिलो." स्मिताताई पटकन स्वयंपाकघरात गेल्या. काव्या आणि रितेश डोळ्यातलं पाणी लपवत त्या समोश्यांकडे बघत राहिले. भेळ खायला म्हणून दोघे गेले होते तिथे एकजण गरम समोसे तळत होता. ते बघून भेळ खाण्यापेक्षा सगळ्यांसाठीच समोसे घेऊन जाऊ म्हणून काव्याने समोसे घ्यायचा आग्रह केला. दोघे काहीच न खाता तसेच घरी आले आणि आल्यावर हे असं. दोघेही खोलीत जायला निघाले तोच स्मिताताईंनी रितेशला हाक मारली,

"रितेश, घरात थोडा वरणभात तरी खा."

"आई, आम्ही दोघेही उपाशी आहोत. बाहेर काहीच न खाता आम्ही आपल्या सगळ्यांसाठी खायला घेऊन आलो तर हे? मी तुमचाच मुलगा आहे. मला हवं तसं बोलताच ना.. पण काव्या? ती तर नवीन आहे ना आपल्या घरात? तिने तुमचा विचार केला आणि तुम्ही? वाटेल तसं बोललात?" रितेश उद्विग्न होऊन बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून स्मिताताई आणि माधवराव ओशाळले.

"काव्या, आण ती रसमलाई.. आणि समोसे पण गरम कर जरा ओव्हनमध्ये." माधवराव म्हणाले. ते ऐकून काव्याच्या चेहर्‍यावर हसू फुलले. रितेश अजूनही रागात होता पण काव्याने त्याला डोळ्याने विनवले. त्यानंतर जेवणे शांतीनेच झाली. परत कोणताच वाद होऊ नये म्हणून जेवण झाल्या झाल्या रितेश आत निघून गेला. काव्या मात्र मागची झाकपाक करत होती. बेडरूममध्ये रितेश मोबाईल बघत पडला होता. काव्यासुद्धा मोबाईल घेऊन त्याच्याशेजारी जाऊन बसली.

"सॉरी.." खूप वेळाने रितेश म्हणाला.

"कश्यासाठी?"

"ते बाबा तसं बोलले म्हणून. काव्या सगळ्याच गोष्टींसाठी सॉरी. ऐक ना मला अजूनही नोकरी मिळत नाहीये.. आपण.. आपण.. वेगळे होऊयात का? तू दुसरं लग्न कर आणि सुखाने जग." रितेश नजर खाली करून बोलत होता.

"माझ्याकडे बघून बोल.." काव्या म्हणाली.

"काव्या.. तू खरंच मला सोड. तू खूप छान आयुष्य डिझर्व्ह करतेस. मी नाहीये तुझ्या योग्य." रितेश हताश होऊन बोलत होता.

"वेडा आहेस का तू? उलट आज मला एवढं छान वाटलं ना.. तू माझी बाजू घेऊन आईंशी बोललास. काहीही झालं तरी तू माझ्यासोबत आहेस ही भावनाच खूप मस्त आहे." काव्या रितेशच्या गळ्यात हात घालत म्हणाली.

"पण माझी नोकरी?" रितेश खिन्नपणे म्हणाला.

"एक सुचवू? राग येणार नसेल तर.."

"विचार.."

"त्यादिवशी आईबाबा लग्नाला गेले होते. तुझ्यामुळे मला ऑफिसला जायला उशीर झाला." काव्या लाजत बोलत होती.

"तुला वाईट वाटतंय का त्याचं?" मिस्किल हसत रितेशने विचारले.

"तू ऐकणार आहेस का?" काव्या त्याला दटावत म्हणाली.

"आता हाताची घडी आणि तोंडावर बोट." रितेश खरंच तोंडावर हात ठेवत म्हणाला. ते बघून काव्याला हसू आवरत नव्हतं. पण आता काही बोललं तर तो जवळ येईल आणि महत्त्वाचे बोलायचे राहून जाईल म्हणून तिने त्याची समजूत काढली नाही.

"तर मी काहीच न खाता ऑफिसला गेले म्हणून तू बटाट्याचे पराठे बनवून ऑफिसमध्ये आणलेस. ते ना.. सगळ्यांना खूप आवडले. आमच्या कँटिनमधला अण्णा बदलल्यापासून कँटीनच्या अन्नाला चव नसते. तर मला असं वाटत होतं.. की.. तुला जमेल का कँटीन चालवायला?" काव्याने बोलून टाकले.

"मी आणि कँटीन? तू बरी आहेस ना? मी कधीतरी जातो स्वयंपाकघरात. आणि मला छान नोकरी हवी आहे. हे काम नाही करायचे मला." काव्याला झटकून टाकत रितेश म्हणाला.

"मी कुठे म्हटलं की तू हेच काम कर. मी फक्त तुला सुचवलं.. आणि प्लीज.. इतका सुंदर दिवस गेल्यानंतर असा चिडू नकोस ना." काव्या कान पकडत म्हणाली.

"कान पकडायची काही गरज नाही.. दिवस जसा सुंदर गेला आहे तशीच रात्रही जाईल याची नक्की खात्री बाळग." काव्याला जवळ घेत रितेश म्हणाला.


काव्याने दिलेला प्रस्ताव रितेश स्वीकारेल का? घरातल्यांना त्याचा हा निर्णय पटेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all