अगर तुम साथ हो.. भाग ७
मागील भागात आपण पाहिले की पल्लवी रितेश आणि काव्याला हनिमून पॅकेज देते. आता बघू पुढे काय होते ते.
"रितेश, उठ ना.. मला कामाला जायचं आहे." काव्या रितेशला उठवत होती.
"काही कुठे जायची गरज नाही." रितेशने उठण्याऐवजी काव्याला जवळ ओढले.
"मला ना असं वाटतंय की तू अजूनही महाबळेश्वरमध्येच आहेस." काव्या क्षणभर त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.
"हो ना.. असं वाटत होतं तिथेच रहावं. कसलंही टेन्शन नाही. फक्त तू आणि मी.." रितेश मिठी घट्ट करत म्हणाला. तोच कूकरच्या शिट्टीने काव्या भानावर आली.
"पण आता इथे आपण दोघेच नाही. आणि सोड मला.. तू इथे गप्पांमध्ये गुंतवशील आणि ऑफिसमध्ये मला बोलणी खावी लागतील." काव्या उठायचा प्रयत्न करत होती. तिचं बोलणं ऐकून रितेशने तिला लगेच सोडलं.
"हो.. बरोबर आहे. तुला कामाला जायचं आहे आणि मला काम शोधायला. चल उठतो मी." रितेशचा रोमँटिक मूड जाऊन तिथे विषण्णता आली होती.
"रितेश, चिडलास?" काव्याने हळूवारपणे विचारले.
"चिडू कशासाठी? जे आहे ते आहे."
यावर बोलण्यासाठी काव्याने तोंड उघडले पण काहीच न बोलता ती बाहेर गेली. ते बघून रितेश स्वतःशीच बोलला,
यावर बोलण्यासाठी काव्याने तोंड उघडले पण काहीच न बोलता ती बाहेर गेली. ते बघून रितेश स्वतःशीच बोलला,
"रितेशराव, उठा आता.. कामाला लागा. जबाबदारी वाढली आता तुमची."
"उठला का ग रितेश?" स्मिताताईंनी काव्याला विचारले.
"हो.. येतोच आहे बाहेर. मी निघू का? मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे." काव्याने विचारले.
"चहानाश्ता केलास का?" माधवरावांनी विचारले.
"ते बाबा.."
"आधी खाऊन घे, मग जा. नवरा कमवत नाही म्हणून तू खायचे नाही असं नाहीये." माधवरावांचे शब्द काव्याला तसेच आवरून बाहेर आलेल्या रितेशलाही खुपले. पण वाद नको म्हणून दोघेही काहीच बोलले नाहीत. कसाबसा चहानाश्ता करून काव्या बाहेर पडली.
"आता तुम्हीसुद्धा बघा पोटापाण्याचे. जबाबदारी वाढली आहे तुमची." माधवराव रितेशला म्हणाले.
"हो, निघतोच आहे नोकरी शोधायला." चहाचा कप खाली ठेवत रितेश म्हणाला. "आई, मी दुपारी नाहीये गं जेवायला. आवरून निघतोच मी." आतल्या खोलीत येताच रितेशने आधी प्लेसमेंटच्या जाहिराती बघितल्या आणि तिथे फोन करायला सुरुवात केली...
"रितेश, आपल्या नेहमीच्या जागी भेटूयात का?" काव्याने ऑफिसमधून घरी जायच्या आधी रितेशला फोन केला.
"अचानक?"
"थोडं महत्वाचं बोलायचं होतं."
"पोहोचतो.." एवढंच बोलून रितेशने फोन ठेवला. काव्याने इथे सुस्कारा सोडला. त्यांचं लग्न होऊन महिना झाला तरी रितेशच्या नोकरीचं काही होत नव्हतं. घरी त्याच्या आईबाबांचे वागणे 'बरे..' या प्रकारात मोडणारे होते. कोणत्या गोष्टींवर कोणाची काय प्रतिक्रिया येईल हे तिला अजूनही समजत नव्हते. त्यात हळूहळू स्मिताताई येताजाता तिला बोलू लागल्या होत्या. रितेशच्या नोकरीचा तिच्याशी काय संबंध होता, हेच तिला कळत नव्हते. आज तिचा पगार झाला होता. घरखर्चासाठी पैसे घरी द्यायची तिची इच्छा होती. पण ही गोष्ट घरी कशी मांडायची ते ठरवण्यासाठी तिला रितेशला बाहेर भेटायचे होते. ऑफिस संपताच चेहर्यावर पावडरचा थोडा हलका हात फिरवत ती निघाली. नेहमीच्या जागेवर येताच तिच्या चेहर्यावर हास्य पसरले. रितेश तिची वाटच बघत होता.
"आज अचानक इथे बोलावलं?" आल्या आल्या त्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
"अरे हो.. जरा दम घेऊ देत. पण त्याआधी ऐक ना.. मला ना बर्फाचा गोळा खायचा आहे. खाऊयात?"
"आत्ता?" रितेशचा हात नकळत खिशाकडे गेला.
"हो.. आणि आजची पार्टी माझ्याकडून. कारण आज माझा पगार झाला आहे." काव्या हसत म्हणाली पण रितेशचा चेहरा उतरला होता. काव्याला ते समजलं. तिने त्याकडे मुद्दाम लक्ष दिलं नाही. आज काही झालं तरी तिला या विषयावर त्याच्याशी बोलायचंच होतं.
"रितेश, घरी किती पैसे द्यायचे?"
"पैसे? कसले पैसे?"
"आपण तिथे राहतो, खातो, पितो त्याचे." काव्या अडखळत बोलली.
"काव्या.." रितेश ओरडला.
"तुला विचित्र वाटत असेल तर सॉरी. पण मलाही बरं नाही वाटत. घर आहे म्हणजे खर्च होणारच ना. त्याला आपला हातभार लागायला नको का?" काव्या बोलत होती. रितेशला तिचं म्हणणं पटत होतं पण वळत नव्हतं. इतके दिवस बाकीचे सर्वजण आईबाबांच्या जीवावर जगणारा म्हणून नावं ठेवत होते आता बायकोच्या जीवावर जगणारा म्हणू नये, असं त्याला वाटत होतं.
"तुला जे योग्य वाटतं ते कर." नजर चोरत रितेश म्हणाला.
"संसार आपला आहे. इथे दोघांच्याही मताला महत्त्व आहे. आज मी पैसे देते आहे. उद्या तू देशील. हिशोब सोपा आहे."
"काव्या, तू इतकी चांगली का आहेस?" रितेशच्या डोळ्यात पाणी होते.
"काही चांगली वगैरे नाही मी. उद्या बायकोगिरी गाजवायला लागले ना की समजेल तुला." काव्या रितेशचे डोळे पुसत म्हणाली. "चल ना.. आधी भेळ खाऊ, मग गोळा."
स्मिताताई आणि माधवराव घेतील का काव्याकडून पैसे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई