अगर तुम साथ हो.. भाग ४

कथा तिच्या प्रेमाची
अगर तुम साथ हो.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की पल्लवी रितेशच्या लग्नाबद्दल कुरकुर करते. आता बघू पुढे काय होते ते.


"अरे, झालं की नाही आवरून? हॉलवर जायला उशीर व्हायला नको." आदित्य ओरडला.

"हो.. झालंच आहे. काव्या, चल बाळा.." कुंदाताईंनी आवाज दिला.

"आले.." काव्या तयार होऊन बाहेर आली. सगळे तिच्याकडे बघतच राहिले. नेसलेली नऊवारी, केसांचा बांधलेला खोपा, कपाळावरची चंद्रकोर, अंगावर घातलेले मोजकेच दागिने.. पण नव्या नवरीचे तेज तिच्या चेहर्‍यावर दिसत होते.

"तू ही साडी आता का नेसलीस?" कुंदाताईंनी विचारले.

"आई.. फक्त इथून तिथपर्यंत जाण्यासाठी एक साडी, तिथे गेले की लगेच साडी बदला. नकोच ते.. त्यापेक्षा ती साडी तू मला पूजेला दे."

"नको गं एवढं शहाण्यासारखं वागू.." काव्याची अलाबला घेत कुंदाताई म्हणाल्या.

"चला लवकर.. उशीर होतो आहे." डोळ्यातलं पाणी लपवत श्रीकांतराव म्हणाले.


"आई, हा काय हॉल आहे का गं? याच्यापेक्षा माझ्या घरातला हॉल मोठा आहे." आपली पैठणी सावरत गळ्यातले दागिने नीट करत पल्लवी कुरकुरली.

"आता, हे त्या दोघांनी ठरवले आहे. विधिवत लग्न करायचे.. ते पण थोडक्यात."

"टू मच आहे हे.. नशीब मिलिंद इथे नाही. तो तर किती काय काय बोलला असता."

"काय गं इतकेवेळा बोलावूनही आले नाहीत. पटलं नाही माझ्या मनाला." स्मिताताईंना जावई न आल्याचे दुःख झाले होते.

"आई.. तुमचं हे थोडक्यात त्याला जमलं नसतं."

"काय जमलं नसतं?" रितेशने पाठून विचारले. तशी पल्लवी चपापली.

"हेच.. नवरदेव हॉलवर आणि नवरीचा पत्ता नाही. साधं स्वागतालाही कोणी उभं राहिलं नाही."

"ताई, मी केला होता फोन.. त्यांच्या गाडीचं नेमकं टायर पंक्चर झालं होतं. म्हणून अडकली ती लोकं." रितेश समजूतदारपणे बोलत होता.

"हो का.. येतील मग.. पण रितेश, तुला हे असं लग्न करायचं होतं?" कितीही प्रयत्न केला तरीही पल्लवी स्वतःला हे विचारण्यापासून रोखू शकली नाही. ते ऐकून रितेशच्या चेहर्‍यावर आठी आली. त्याने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

"ताई, मला माहिती आहे तुला कालपासून हे बोलायचे होते. पण आता बोललीस. बरं झालं काव्यासमोर हे सगळं झालं नाही. तर ऐक.. मला नोकरी नाही तरी काव्याच्या घरचे आमच्या लग्नासाठी तयार झाले हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. दुसरं म्हणजे तिच्या आईबाबांनी तिच्या लग्नासाठी बाजूला काढलेले पैसे काव्याने बाजूला ठेवायला सांगितले आहेत अडीअडचणीसाठी. म्हणून हे लग्न साधं. आईबाबांनाही मी तेच म्हटलं. लग्नाचा भपका दाखवण्यापेक्षाही लग्नाचे विधी आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. ताई प्लिज.. माझ्या आयुष्यातला हा खूप आनंदाचा क्षण आहे. त्यावर विरजण नको घालूस." रितेश बोलत होता.

"मी दुष्ट आहे का रे?" पल्लवीने डोळ्यात पाणी आणून विचारले.

"मी असं म्हटलं का?"

"बोलण्यातून तरी तेच वाटतंय? मी कशाला तुझ्या आनंदावर विरजण घालू? तू खुश आहेस म्हणजे झालं." यांचं बोलणं चालू असेपर्यंत कोणीतरी नवरीकडची माणसे आली म्हणून सांगायला आले.

"चल गं आई.. तुझ्या सुनेचं स्वागत करू." पल्लवी स्मिताताईंना घेऊन वरपक्षाला दिलेल्या खोलीच्या बाहेर पडली. न राहवून रितेशही बाहेर आला. समोरून येत असलेल्या काव्याकडे बघतच राहिला. साधी, सोज्ज्वळ तरीही खूपच तेजस्वी दिसत होती ती. काव्याने त्याच्याकडे बघताच त्याने घायाळ झाल्याची ॲक्टिंग केली. ती बघून काव्याच्या गालावर गुलाब फुलले.

"तिच्याकडे बघून झाले असेल तर आता आत चल.. नवरदेव आहेस तू." रितेशचा मित्र पार्थ त्याच्या कानात पुटपुटला.

"तू पण ना.. मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेस." रितेश त्याला हसत म्हणाला.


मुहुर्तावर लग्न लागले. सर्व विधी झाले. मोजक्याच उपस्थित लोकांचे जेवण होऊन पाठवणीची वेळ आली. काव्या आईच्या गळ्यात पडून रडत होती. कुंदाताई स्मिताताईंजवळ गेल्या.

"तशी माझी लेक फार समजूतदार आहे. पण तरीही काही चुकलं तर समजून घ्या तिला."

"तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत सांभाळून घ्यायला." स्मिताताई म्हणाल्या.

"हो ना.. त्यातूनही आम्ही तिला सांभाळणार की ती रितेशला हे समजेलच." पल्लवी परत बोलली. वातावरण गंभीर झालेलं बघून पार्थ मध्ये पडला.

"निघूयात का इथून आता? मुहुर्त चुकला तर वाट लागेल?" हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

"लग्न लागल्यावर परत मुहुर्त?" आदित्यने विचारले.

"हो ना.. किती काय काय मुहुर्त पाळावे लागतात. बाबा.. काय सांगू? मग, वहिनीचा रडून मेकअप अजून खराब होण्याआधी तिची पाठवणी करा. नाहीतर आमच्या इकडची लहान चिल्लीपिल्ली तिला बघून घाबरतील." पार्थचं बोलणं आणि बोलण्याची पद्धत बघून काव्या आणि रितेशच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.


हे हसू लग्नानंतरही राहिल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all