अग अग म्हशी.. भाग २

कथा नवदांपत्याची


अग अग म्हशी.. भाग २

मागील भागात आपण पाहिले की नवीनच लग्न झालेल्या सुजय आणि चित्राचे भांडण होऊन ती माहेरी जाते. आता बघू पुढे काय होते ते.


" आई.. दुष्ट आहे ग तो नुसता." चित्राचे रडणे थांबत नव्हते.

" काय केले तरी काय त्याने असे? सांग तरी.. का जीवाला घोर लावतेस?"

" आई.. मी नुसती कामं करत असते ग घरी. याला आवडतो म्हणून रव्याचा लाडूही शिकले. हो की नाही?" चित्रा नाक पुसत बोलली. आईच्या डोळ्यापुढे ते लाडू आले. ते कडक लाडू त्यांच्या कॉलनीतली मुले बॉल म्हणून वापरत होते. लेकीच्या दुःखावर अजून डागण्या नको म्हणून आई समजूत काढत बोलली.

" हो ग माझी गुणाची बाय ती."

" तेचतर एवढे मेहनतीने लाडू केले पण याला आनंद म्हणून झाला नाही. पण लाडू सगळे गायब. म्हटलं जाऊ दे. खाल्ले असतील एका रात्रीत. असं याच्यासाठी एवढं मरा.. पण हा नुसता पसारा करणार. आला की मोजे एकीकडे बूट दुसरीकडे. त्या मोज्यांना तर एवढा वास येतो ना.. ईईईई." चित्राच्या अंगावर शहारे आले.

" मग स्वतःचे स्वतः करायला सांगायचे प्रेमाने."

" अग मग तेच सांगितले की भांडतो माझ्याशी. म्हणतो मी टिपिकल बायको झाले आहे. नुसती बोलते. आई.. आपल्याकडे बाबा कुठे असे वागतात? ते तर किती नीटनेटके आहेत." हे ऐकून आईने एक सुस्कारा सोडला.

" चित्रा.. अग पुरुषाचे बाईसारखे नसते. नवरी लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी बायको होते पण नवरा हा आयुष्यभर नवराच राहतो ग. त्याला ताळ्यावर आणावे लागते. हवं तसं घडवावे लागते."

" आई.. अजिबात कोड्यात बोलू नकोस. आधीच सकाळी सकाळी भांडून डोकं दुखायला लागले आहे. त्यात आता हे ट्रेनिंग कसले?"

" सांगते.. सगळे सांगते.." आईने चित्राशी बोलायला सुरुवात केली.


तिकडे सुजयला वाईट वाटत होते. स्वयंपाक चांगला येत नसला तरी बाकी गुणी बायको होती त्याची. त्याच्या आवडीनिवडी जपायचा प्रयत्न करत असते सतत. सकाळी आपला कसा तोल गेला काय माहित? आपलं पण चुकलंच. काय हरकत असते वस्तू जागेवर ठेवायला. करू का चित्राला फोन? सुजयने हातात फोन घेतला. \"नकोच.. नाहीतर परत डोक्यावर चढून बसेल.\" सुजयने फोन परत ठेवून दिला. चित्रानेही त्याला आज फोन केला नाही.


मिटेल का दोघांचे भांडण? चित्राची आई काय शिकवत असेल तिला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all