अग अग म्हशी..

कथा नवदांपत्याची
अग अग म्हशी..



" सुजय.. हा ओला टॉवेल असा का बेडवर टाकलास?" चित्राने ओरडत विचारले.

" का म्हणजे? अंघोळ केली, अंग पुसले आणि तो तिथे असा टाकला.." सुजयने कसं ते परत करून दाखवले.

" अरे पण ओला टॉवेल टाकायची ही जागा आहे का? तिथे वाळत घाल ना." कामाला जायला उशीर होत असल्याने वैतागलेली चित्रा खेकसली.

" लग्नाच्या दोनच महिन्यांत तू ना अगदी टिपिकल बायको मटेरियल झाली आहेस. नुसती वसावसा ओरडत असतेस. प्रेमाने बोलताच येत नाही का तुला?" सुजय पण चिडला होता.

"हो का?? आणि तुझे काय रे? लग्नाआधी म्हणे चंद्र हवा का? तारे हवे? हे असे कपडे इथेतिथे टाकण्यापेक्षा उचलून ठेवलेस ना तर ते ही पुरे.. " चित्रा रडकुंडीला आली होती.

" छ्या.. लग्न करून पस्तावलो आहे मी. सकाळी सकाळी रडणे म्हणजे वैताग आहे नुस्ता. ते प्रेमाने बोलणे वगैरे फक्त टीव्हीमध्येच दाखवतात. तिथे ती हिरोईन तर नवर्‍याला टॉवेल काय आणून देते, त्याची पाठ काय पुसते.. आणि... आणि.. आमच्याकडे जरा जवळ जावे तर माझी पोळीच करपते, भाजीच जळते नाहीतर टॉवेल इथे का टाकला?" सुजय चित्राची नक्कल करत म्हणाला.

" हो का?? त्या तुझ्या हिरोईनला घरी कामं करायची नसतात. सकाळी उठून डबे करा, घर आवरा.. वैताग नुसता. त्यांना काय जातंय सकाळी उठून रोमान्स करायला. त्यांचे नवरे काळजी घेतात त्यांची आणि आमच्याकडे? हे हातात दे.. ते हातात दे.."

" अग जा ग.. तू नसताना नव्हते का होत माझे? तुझ्यात रोमँटिकपणाच राहिलेला नाही की नव्हताच?"

" तू मला जा म्हणालास? मी पण ना आईकडे खुश होते.. हातात सगळे मिळायचे मला.. तुला ना कदरच नाही माझी.. एवढी नकोशी झाले आहे तर जातेच मी.." रडत रडत चित्रा कशीबशी आवरून घराबाहेर पडली.

" आई..." ऑफिसला न जाता ती माहेरी गेली आणि आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली. आपली लाडाची लेक रडायला लागली हे बघून आईच्या काळजाचा ठोकाच चुकला.

" काय ग, काय झाले रडायला? सासूबाई काही बोलल्या का?" आईचा पहिला प्रश्न.

" बोलायला त्या इथे आहेत कुठे? त्या गेल्या आहेत ना फिरायला.." इति चित्रा.

कथेत पुढे जाण्याआधी थोडीशी पार्श्वभूमी. सुजय आणि चित्रा या नवविवाहित दांपत्याचे आईवडील खूपच हुशार. लग्नानंतर सासूसूनेचे वादविवाद नको म्हणून सुजयच्या आईवडिलांनी घराच्या जवळच त्याला घर घ्यायला लावले. चित्राच्या आईवडिलांनी सुद्धा मुलगी डोळ्यासमोर रहावी म्हणून शहरातले स्थळ बघितले. त्यामुळे हे आईवडील म्हटले तर वेगळे म्हटलं तर एकत्र असं राहून मुलांवर लक्ष ठेवत होते. एवढं करूनही लेक रडत आली म्हटल्यावर चित्राची आई घाबरली..

" मग? सुजयने मारले??"

" आई....." चित्राने भोकाड पसरले.


काय सांगेल चित्रा आईला? आई त्यातून योग्य मार्ग काढेल की यांच्या संसारात विघ्नं आणेल? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all