Aug 09, 2022
Love

सासऱ्याची माया

Read Later
सासऱ्याची माया

सासऱ्याची माया

"अगं ए रेवा,फोन उचलायला किती उशीर? होतीस कुठे?"

"अगं धनु,सासऱ्यांना जेवायला वाढत होते बाई."

"तुमच्याकडेच असतात का?"

"अगं हो ना."

"तुला दिर वगैरे नाहीत का? नाही गं माझा नवरा हे माझ्या सासूसासऱ्यांच एकुलतं एक अपत्य. बरं म्हातारा कोणा सग्यासोयऱ्यांकडेही जात नाही. सदा काहीतरी खरडत व वाचत असतात. लेखक आहेत म्हणे."

"काय सांगतेस काय!"

"कोण विचारतय आजकाल लेखकांना. फेसबुकवर,वॉट्सएपवर हवे तेवढे लेख वाचावयास मिळतात. अगदी फ्री..हो शिवाय पुस्तकांची पायरसीही होते आजकाल. थोडे पैसे भरले नं की मोठमोठी पुस्तक फुक्कट वाचायला मिळतात त्यामुळे या लेखकलोकांना पहिल्यासारखं डिमांड नाही गं आता. बरं त्यातून हे अगदी सामान्य केटेगरीतले लेखक. हं,एखादा जोडधंदा वगैरे केला असता तर आता म्हातारपणी वेळही गेला असता शिवाय चार पैसेही मिळाले असते. माझ्या सासूला ऐन पन्नाशीत संधिवाताने गाठलं. मग काय त्या जीवंत असेस्तोवर हे त्यांची सेवा,नोकरी व किचन सांभाळत करत राहिले."

"ते जाऊदे गं. ऐकना रेवा,रविवारी  आम्ही पिकनिकला जाणार आहोत. मंग्या,रमेश,हेतल,प्रज्ञा..सगळा कॉलेजातला ग्रुप आहे. तू यायचस हं."

"नाही गं नाही जमायचं. सासरेबुवांना सर्वह मलाच करावं लागतं नं.

"ए काय गुंडाळतेस यार. मगाशीच बोललीस नं तुझ्या सासऱ्यांना किचनवर्क येत म्हणून."

"ते येतं गं पण मीच त्यांना माझ्या किचनमधे यायचं नाही असं सांगितलय."

"सटकलय का तुझ?"

"अगं धनु, माझ्या माहेरी पुरुष घरकाम करीत नाहीत. तीच सवय मला झाली आहे. पुरुष स्वैंपाकघरात काही काम करु लागला की सटकतं माझं. सासरे असेच शिरा,पोहे,भाजी वगैरे बनवू पहायचे. मला फार ऑक्वर्ड वाटायचं ते. शेवटी एकदा कंटाळून मी त्यांना क्रुपा करुन किचनमधे येत जाऊ नका असं सांगितलं."

"मग ओरडले नाही का तुला?"

"छे! मान हलवली,बरं म्हणाले नि गेले निघून. सासू असती तर कचाकचा भांडता तरी आलं असतं. एक माणूस गप्प असलं तर दुसरं एकटंच वाद किती वेळ घालणार!"

"तू पुस्तकं वाचत जा त्यांची. त्यावर त्यांच्याशी चर्चा कर. बघ सुर जुळतील तुमचे."

"धार्मिक विषयांवर लिहितात गं ते. मला आपलं हलकंफुलकं वाचायला आवडतं. ते जडजड शब्द नाही बाई डोक्यात जात माझ्या. बरं चल बाय. आलीस की कॉल कर मला नि पिकनिकचं डिटेल स्टोरी सांग."

रेवाने फोन ठेवला व जरा गाणी ऐकत बसली. तिचे सासरे,वामनराव हॉलमधे काहीतरी लिहित बसले होते. हल्ली ते हॉल नि हॉलची गेलरी यातच फिरायचे. कोपऱ्यात टेबल होतं. तिथे लाकडी खुर्चीवर बसून लिहित बसायचे. 

"पुर्वी वामनरावांनी एखादा लेख लिहिला की ते रमेशच्या आईला वाचून दाखवायचे. ते लिहित असले की रमेशची आई,यमुनाताईही त्यांना वाफाळती कॉफी करुन द्यायची. वामनरावांच्या लिखाणाचं त्यांना कोण अप्रुप होतं.

 वामनराव यमुनाताईंना वाचून दाखवल्याशिवाय कोणताही लेख प्रुफ रिडिंगला देत नव्हते. यमुनाताई संधिवाताने अंथरुणाला खिळल्या तरीही नवऱ्याचे लेख ऐकणं,त्यावर समिक्षण करणं सोडलं नव्हतं त्यांनी.

 वामनराव स्वैपाकघरातही यमुनाताईंना बरीच मदत करायचे. भांडी लख्ख घासणं मनापासून आवडायचं त्यांना. ओटा आवरणं,सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणं हौसेने करायचे ते. सुरळीच्या वड्या,खसखसं या सिग्नेचर डिश होत्या त्यांच्या पण ..पण सुनेचं राज्य आलं नि माघार घेतली त्यांनी. किचनचा भूप्रदेश सुनेला देऊन टाकला. बेडरुमवर तर आता त्यांचा हक्क नव्हताच.

रात्री दहाच्या सुमारास रमेश आला. रमेशने येताना वामनरावांसाठी खास गीफ्ट आणलं होतं. उद्या त्यांचा एकाहत्तरावा वाढदिवस हे त्याच्या बरोबर लक्षात होतं. 
रमेशने वामनरावांना.लेप टॉप दिला. ऑपरेट कसा करायचा हे तो स्टेप बाय स्टेप शिकवणार होता. वामनराव म्हणाले,"कितीला घेतलास रे? जास्त महाग असेल ना."

"बाबा,तुमच्याहून मौल्यवान असं काहीच नाही हो माझ्यासाठी. तुम्ही जीव अहात माझा,"असं म्हणून रमेशने वामनरावांच्या मांडीवर डोकं ठेवलं.

"बाबा,आई असायला हवी होती ना हो. मला आठवण येते तिची. आज जरा जास्तच आली. तुमच्या वाढदिवशी तुमच्यापेक्षा जास्त खूष तीच असायची हो ना."

"उद्या,मी तुमच्या आवडीची सिताफळ रबडी बनवतो,पुरी,वरणभात,दहीभात असा मेन्यू ठेवुया. पण बाबा,ते खसखसं एकदा करा हो. बरेच दिवस झालेत खाऊन. जीव खसखसतोय माझा खसखसं खायला."

इतक्यात रेवा रमेशचं जेवण घेऊन आली. रेवाने वामनरावांना किचनमधे येण्यास मनाई केली आहे हे वामनरावांनी लेकाला सांगितलं नव्हतं. त्यांना या कारणावरुन रेवा व रमेशमधे वाद झालेला आवडला नसता.

रमेश व रेवाने रात्री बारा वाजता वामनरावांना बर्थडे विश केलं. रेवाने झोपताना रमेशला विचारलच,"महाग असेल ना रे लेप टॉप!" यावर रमेश तिला म्हणाला,"माझे बाबा सर्वस्व आहेत माझे. त्यांच्यासाठी घेतलेल्या भेटवस्तूची किंमत करायची नाही कधी."

"आणि मी,मी कोणी नाही का तुझी?"

"बायको बायकोच्या जागी नि वडील वडिलांच्या जागी बॉ.You can't emotionally blackmail me on this ground and what about the laptop that I had gifted to my father-in-law last month? You had not asked me its cost."

"ए बाबा,बास कर आता तुझं लेक्चर,चुकले मी. आयला! जरा एखाद्या मुद्दयावरुन बोलायचं झालं की बेणं डायरेक्ट विंग्रजीवर उतरतं. गुड नाईट." असं म्हणून रेवा नाक फेंदारुन निजली. 

तीनेक वाजले असतील..रेवाच्या कण्हण्याने रमेशला जाग आली.

"काय गं रेवा. बरं वाटत नाहीए का?"

"ओटीपोटात खूपच दुखतय रे माझ्या."

रमेश किचनमधे गेला. त्याने पाणी गरम करत ठेवलं व ते चामड्याच्या थैलीत ओतून थैलीचं बुच लावू लगला. वामनराव जागेच होते. त्यांची झोप तशी कमीच झाली होती. 

त्यांनी किचनमधे रमेशला पाहिलं व नजरेनेच काय झालं म्हणून विचारलं तसं रमेशने त्यांना रेवाचं ओटीपोट दुखतय म्हणून सांगितलं. वामनरावांना रेवाची काळजी वाटू लागली.

पाचेक वाजता रेवाच्या पोटात जास्तच दुखू लागलं तसं वामनरावांनी त्यांच्या गायनेक मैत्रिणीला फोन लावला. ती म्हणाली या घेऊन. वामनरावांनी रमेशला रेवाला घेऊन चल मी गाडी ड्राइव्ह करतो असं सांगितलं. 

कुठे जायचं,कोणत्या हॉस्पिटलला हे विचारायच्या मनस्थितीत रमेश नव्हता. त्याला रेवाचं विव्हळणं सहन होत नव्हतं. तो बेगेतलं डेबीट कार्ड घेऊ लागला तसं वामनरावांनी त्यांना खुणेनेच नको म्हणून सांगितलं. रेवाला घेऊन रमेश मागच्या सीटवर बसला. वामनरावांनी गणरायाला प्रार्थना केली व गाडी चालू केली. वीसेक मिनिटांत ते डॉ. गायत्रीच्या हॉस्पिटलमधे आले. गायत्रीने रेवाला तपासलं. लागलीच तिची सोनोग्राफी केली.

रेवाला सलाईनमधून इंजेक्शन देणं सुरु केलं. रमेश रेवाजवळ बसून होता. वामनरावांना डॉ.गायत्रीने केबिनमधे बोलावलं. डॉ.गायत्री त्यांच्या लिखाणीची चाहती होती.

वामनराव म्हणाले,"काही सिरियस नाही नं डॉक्टर?"

डॉक्टर म्हणाल्या,"वामनराव रेवाला माझ्यावर सोपवा आता. रेवाच्या गर्भपिशवीच्या बाह्य व आंतरभागात फायब्रॉइडच्या गाठी वाढल्या आहेत त्यामुळेच तिला हा त्रास होतो आहे. आपण दुर्बिणीने शस्त्रक्रिया करुन त्या काढून टाकू."

वामनरावांनी ब्लडची व्यवस्था केली. सगळी धावपळ तेच करत होते. रेवाचे आईवडील केरळच्या ट्रीपला गेले होते त्यामुळे वामनराव त्यांना सांगण्याच्या भानगडीत पडले नाहीत. 

आठवडाभर वामनराव घर ते हॉस्पिटल सगळं एकहाती सांभाळत होते. रेवासाठी मऊभात,वरण कधी खिचडी, रमेशसाठी भाजीपोळी,चहा..सगळं घेऊन जायचे. दुपारी रमेशला आंघोळीला घरी पाठवून स्वतः रेवाच्या शेजारी बसून रहायचे. तिला लवकर बरी होणार तू बाळा म्हणायचे. चष्मा काढून डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसायचे. 

रेवाला आता वामनरावांच तिच्या आयुष्यातलं महत्त्व जाणवत होतं. ऑपरेशनला जायच्या आधी तिने वामनरावांचा हात हातात घेतला व म्हणाली,"बाबा,मला माफ करा. मी फारच तुटक वागले तुमच्याशी. तुम्हाला आपलं मानलच नाही कधी. किचनमधे वावरु दिलं नाही तरी एका शब्दाने मला कधी बोलला नाहीत. या आठ दिवसांत मला कळून चुकलं की रमेशइतकच प्रेम तुम्ही माझ्यावरही करता. शक्य झाल्यास मला माफ करा. मी यातून जगले वाचले तर ठीक नाहीतर रमेशचं लग्न लावून द्या परत. आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या."

"वामनराव म्हणाले,अगं पोरी,असलं काही किल्मिष मनात आणू नकोस हो. मी तुझ्यावर नाही रागावणार. बाप रागावतो का गं आपल्या लेकीवर! तू रुजतैस आमच्या घरात. तुला रुजायला,बहरायला वेळ लागेल इतकच. जा रेवा काही होणार नाही तुला. माझ्या गणोबाचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी."

वामनराव मग गणपतीच्या मुर्तीजवळ डोळे मिटून बसून राहिले. रमेश येरझारा घालत होता. त्याचा जीवच थाऱ्यावर नव्हता. 

बऱ्याच वेळाने डॉ.गायत्री बाहेर आल्या. त्यांनी वामनरावांना व रमेशला ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं. ते फायब्रॉईडही दाखवले. दोन दिवसांनी रेवाला डिस्चार्ज मिळाला. रमेशने रेवाच्या आईबाबांना रेवाच्या शस्त्रक्रियेबाबत कळवलं व रेवाची तब्येत बरी असून धावपळ करत येऊ नका,निवांत या म्हणून सांगितलं. 

पुढे दोन महिने वामनरावांनी रेवाला पाण्यात हात घालू दिला नाही. तिला व रमेशला पारंपरिक पदार्थ करुन जेवू घालू लागले. रेवासाठी डिंकाचे,मेथीचे लाडूही त्यांनी वळले. रोज उठल्यावर एक ग्लासभर दूध व लाडू तिला बळेबळे खाऊ घालायचे. रेवा चांगली हिंडूफिरु लागली तसं वामनरावांनी आपणहून किचनमधून काढता पाय घेतला पण चाणाक्ष रेवाच्या ते लक्षात आलं. 

तिने वामनरावांना म्हंटलं,"चला नं बाबा ,आज मला खसखसं शिकवा." यावर वामनराव गोड हसले व किचनकडे वळले.

********

नमस्कार,मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा ती माहेरच्या रीतीनुसार वागू पहाते. यामुळे सासवासुनांत,सासरेसुनेत इतकच काय नवराबायकोत वाद होतात,पण थोडं तिच्या कलाने घेतलं की काही महिन्यांत,वर्षात ती सासरी रुळते. काहीजणी लवकर रुळतात काहींना थोडा वेळ लागतो. तो वेळ मात्र द्यायला हवा, सासरच्यांनी. मुलींनीही माहेर सासर यात तुलना करणं टाळावं. हो ना मंडळी.

--------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now