व्यभिचार ( भाग ४ अंतिम )

आशिष आणि आस्थाच्या विवाहबाह्य संबंधांचे झालेले विपरीत परिणाम


आलोकच्या अनुपस्थितीत पुढचे दोन दिवस आशिष आणि आस्थाने उपभोगून घेतले. सुनीता आशिषला डब्बा देऊन गेली की नाही याची खातरजमा करून आस्था आशिषच्या घरी जात असे.
आलोक राजस्थानवरून घरी आल्यावर दोघांचा नाईलाज झाला. तरी आलोक रात्री उशिरा येत असल्याने संध्याकाळी कुठेतरी ते दोघे बाहेर भेटू लागले. नुसतं भेटून दोघांना सुख मिळत नव्हते त्यांना एकमेकांच्या शरीराची भूक जी लागलेली. आशिषने त्यावर तोडगा काढला. त्यांच्या एरियापासून दूर अंतरावर एका गेस्ट हाऊसमध्ये ते दोघे भेटू लागले. एकमेकांचा उपभोग घेऊन दोघे आपल्या घरी परतत असत.
दर्शना पंधरा दिवसांनी घरी आली. तिला आणि मुलांना पाहून आशिषला पाहिजे तितका आनंद झाला नाही. रात्री दर्शना आशिषच्या कुशीत शिरत बोलली, " अहो ! मी पंधरा दिवसांनी घरी आले तर तुम्हाला तितका आनंद झालेला नाही वाटला. काही जास्त बोललात देखील नाही माझ्याशी. तुम्हाला बरं वाटत नाही का ?"
" असं काही नाही. झोप तू." असं म्हणून आशिष कूस वळवून झोपी गेला. दर्शना मात्र विचार करू लागली की, नेमकं ह्यांना काय झाले असेल ? तिला तर वाटलेलं, आशिष पंधरा दिवसांचा विरह सहन करू शकला नसेल. घरी आल्यावर तो तिला सोडणारंच नाही. कुशीत घेईल, सुखाचे क्षण देईल. तिला वाटलेलं तसं काहीच घडले नसल्याने रात्रभर विचार करून पहाटे पहाटे तिचा डोळा लागला.
दर्शना घरी आल्यावर आशिष आणि आस्थाला रोज संध्याकाळी भेटणे जमेना. मग आठवड्यातून एक - दोनदा ते भेटू लागले. आशिष काहीबाही खोटी कारणं दर्शनाला द्यायचा. दर्शना देखील बिचारी नवऱ्यावर विश्वास ठेवायची.
दर्शना शेवटी आशिषची बायकोच असल्याने आशिषच्या वागणुकीचा तिला संशय येऊ लागलेला. आता ह्यावरून दोघांची भांडणे देखील होऊ लागलेली. आता तिला जेव्हा आशिष संध्याकाळी लवकर घरी येत नाही तेव्हा आस्थासुद्धा घरी नसते हे जाणवू लागलेले. पहिल्यापहिल्यांदा तिला असं वाटायचं की, \" उगीचच आपल्या मनात शंका येत असेल, असं दोघांमध्ये काही नसेल. त्या दरम्यान आस्थाची काहीतरी कामे असतील. असा विचार करून वाईट विचार मनातून झटकून द्यायची पण नेहमीच असंच होत राहिलेलं तर मात्र तिचा धीर सुटत चाललेला. तिने आशिषला खोदून खोदून विचारले की, \" तुम्ही आस्थामध्ये गुंतले आहात का ?" आपलं गुपित उघडकीस येईल म्हणून आशिषने बचावासाठी जोरदार भांडण केले. " तुला अक्कल आहे का ? आमच्या दोघांमध्ये असे काहीही नसताना तू आळ कशी घेतेस ?" पण आता आशिषच्या बोलण्यावर दर्शनाने तितका विश्वास ठेवला नव्हता. तिने तिचे निरीक्षण चालूच ठेवलेले.
दरम्यान आलोकच्या कानावर सुद्धा आशिष आणि आस्थाविषयी नको त्या बातम्या कानावर पडत होत्या पण बायकोविषयीच्या अतिप्रेमामुळे त्याने त्या बातम्यांकडे लक्ष दिले नाही. आणि आस्था त्याच्याशी अतिशय आपुलकीने, प्रेमाने वागायची. त्याला पाहिजे तसे शय्यासुख द्यायची तर आस्थामधील फरक त्याला जाणवलाचं नव्हता.
दर्शनाने खूप दिवस तिचे निरीक्षण चालूच ठेवले होते आणि आता तर तिची पक्की खात्रीचं झाली होती की, आशिष, आस्थामध्ये काहीतरी पाणी मुरतयं. ह्या गोष्टीचा छडा लावण्यासाठी तिने गुपचूप आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले. दर्शनाने आणि तिच्या भावाने आशिषला तो कशाकरिता आला आहे याची जरासुद्धा भणक लागू दिली नाही. दर्शनाच्या भावाने दोघांवर पाळत ठेऊन त्याची कामगिरी बजावली. त्याने दोघांना गेस्टहाऊस मध्ये शिरताना पाहिले. दोघांचे पटापट मोबाईलमध्ये फोटो काढले आणि आपल्या बहिणीला दाखवले. त्या दिवशी नेमका आलोक पण घरी लौकर आलेला. आस्थाला आलोक घरी लौकर आला आहे हे माहीत नव्हते. आशिष आणि आस्था वेगवेगळे, थोडे मागेपुढे घरी आले असता दर्शनाने आशिषला मोबाईलमधील फोटो दाखवून चांगलेच फैलावर घेतले. दोघांच्या भांडणाच्या आवाजाने आलोक आणि आस्था त्यांच्या घरापाशी आले असता दर्शना आणि तिचा भाऊ आस्थाशी भांडू लागले. आलोकला मोबाईलमधील फोटो दाखवले. ते फोटो पाहून आलोकच्या पायाखालची जमीनचं सरकली. आशिष फक्त आपल्या बचावासाठी आस्थाला वाटेल तसा बोलू लागला. आस्थाने तिच्या शरीरसुखासाठी त्याचा वापर केला. संभोगासाठी पहिलं पाऊल तिने उचललं असे काहीबाही आस्थाला बोलू लागल्यावर आलोकला सहन झाले नाही तोही आशिषला वाट्टेल तसे बोलू लागला. आशिष आलोकला बोलला, " तू नामर्द आहेस म्हणून तुझ्या बायकोला माझी गरज लागली." एव्हाना कॉलनीतल्या लोकांची आशिषच्या घराजवळ गर्दी जमली होती. आलोकचं नाही म्हटलं तरी समाजात मोठं स्थान होतं. आलोक आणि आस्था आशिषचं इतकं वाईट बोलणं सहन करू शकले नाही. ते दोघे त्यांच्या घरी गेले आणि बेडरूमचं दार त्यांनी बंद केले. बराच वेळ झाला तरी ते दोघे दार का उघडत नाहीत म्हणून मुले आणि त्यांची बाई आशा दार ठोकवू लागली तरी ते दोघे दार उघडत नसल्याने आशाने बाजूच्या लोकांना बोलावून घेतले आणि त्या लोकांनी दार जोरात धक्के मारून उघडले असता समोर खूप भयंकर दृश्य दिसले. आलोक आणि आस्थाने फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. आशिष आणि दर्शनाचे ह्या भयंकर बातमीने अवसानचं गळून गेले. आस्था आणि आलोकच्या इतक्या करूण अंताने आशिषला अतिशय दुःख झाले. दुःखाच्या भरात बेडरूममध्ये जाऊन त्यानेही गळफास लावून आपला अंत केला.
दर्शना पुतळा होऊन तीन निपचित पडलेल्या अचेतन शरीरांकडे एकटक पाहत राहिली होती. विवाहबाह्य संबंधाचा शेवट असा झाला होता.

( समाप्त )

ह्या कथेतील पात्रे, प्रसंग, स्थळे काल्पनिक असली तरी ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. कथेच्या आवश्यकतेनुसार मी शृंगारिक भाषशैलीचा वापर केला आहे. शृंगारिक शब्द जास्त भडक होऊ नये याची काळजी घेतली. कथा आवडल्यास जरुरअभिप्राय द्या. वाचकांचे अभिप्राय हे लेखकांसाठी अतिशय मोलाचे असतात ??

🎭 Series Post

View all