अधुरी प्रेम कहाणी.भाग१

एका वेगळ्या जगातील प्रेम कहाणी.



अधुरी प्रेम कहाणी


नमस्कार वाचकहो… मी एक नवीन कथा मालिका सुरू करतेय.
ही कथामालीका आहे एका वेगळ्याच जगातील. भूत योनीत जगणारे आपले नायक नायिका आहेत.आमच्या कथेतील भुतं बोलतात.तेव्हा भुतं बोलताना बघून दचकू नका. मनुष्य योनीत जगणारे प्रेमी युगुल कसे बोलतील, वागतील तसे ते बोलतात, वागतात.पण त्यांना शरीर नाही. मनोरंजन हा हेतू ठेवून ही कथा मालिका लिहीलेली आहे.

तुम्हाला ती नक्की आवडेल.वाचल्यावर कमेंट नक्की करा.

……

अधुरी प्रेम कहाणी…

कल्पना काही दिवसांपूर्वीच या जगात आली. हे जग मानवाच्या जगापासून वेगळं आहे. कल्पना काही दिवसांपूर्वी मनुष्य योनीतून भूत योनीत आली.

नवीन असल्याने हे जग, ही योनी सुरवातीला कल्पनेला अनोळखी वाटली. तिचही बरोबर आहे गेली पन्नास वर्ष ती मनुष्य योनीत जगली. तिथलं जगणं, तिथलं वातावरण या सगळ्यांशी तिची छान गट्टी जमली होती.एके दिवशी अचानक तिला भुतयोनीत यावं लागलं.

" या वयात इतका अनपेक्षित बदल कसा सहन करावा?\""

कल्पना स्वत:शीच पुटपुटली. पुटपुटली पण लगेच भानावर आली आपलं पुटपुटण कोणी ऐकलं तर नाही म्हणून चहूबाजूला बघू लागली. तिचं पुटपुटणं ऐकायला तिच्या आजूबाजूला कोणी नव्हतं. तिला आश्चर्य वाटलं.

" मी मनुष्य योनीत असते तर नक्की कोणीतरी माझं हे पुटपुटणं ऐकलंच असतं" याची खात्री कल्पनाला पटली.

तिच्या आजूबाजूला अनेक भुतं अशीच फिरत होती. भुतं म्हणजे पांढरे कापसाचे पुंचके दिसावे तसे दिसत होते. \"भूत योनीत काहीच काम नसतं का? \"हा प्रश्न कल्पनाला पडला.त्याच वेळी एक भूत तिच्या जवळ येऊन म्हणालं

" कल्पना तू कधी आली इकडे?" एक भूत म्हणजे पांढरा पुंजका.

त्या आवाजाने कल्पना भानावर आली. तिने बाघीतल तिच्या बाजूला एक पांढरा पुंचका उभा होता.

"तुम्ही कोण?" घाबरून कल्पनेने विचारलं.


" अग मी अरविंद". तो आवाज म्हणाला.


" काय अरविंद तू…? इतकी वर्ष कुठे होतास?" कल्पना

" मी मनुष्य जन्मात होतो तेव्हा मुंबईत होतो. तू कुठे होतीस? इथे कधी आलीस?" अरविंद

" मी नारखेडला. खेड्यात." कल्पनाचा चेहरा उतरला.

" नागपूरहून नरखेड सारख्या खेड्यात कसं पाठवलं तुझ्या आई वडलांनी?" अरविंद ने आश्चर्यानं विचारलं.

" मालदार पार्टी होती. करून दिलं लग्न. तुझा कुठे ठाव ठिकाणा होता? आलेल्या स्थळाला मी नकार तरी कसा देणार?" कल्पना घुशश्यात म्हणाली.

" तुझं बरोबर आहे." अरविंद ओशाळून म्हणाला.

कल्पना यावर काही बोलली नाही. या नवीन योनीत कोतीतरी ओळखीचं भेटलं म्हणून कल्पनाला मनातून बरं वाटलं.

कल्पना तशीही भिडस्त स्वभावाची होती. कधी कुठे एकटी जात नसे. चौकावरच्या भाजीवाल्याकडे सुद्धा एकटी जात नसे आणि अचानक या भूतयोनीत एकटी आली. तिचं तिलाच आश्चर्य वाटलं.

" कल्पना तुझं नवरा कसा होता?" अरविंद ने अचानक विचारलं.

"होता चांगला. काळा सावळा पण मर्दानी. अंगात जमीनदारी भीनलेली होती. जमीनदारीची रग होती त्याच्या अंगात पण माझा गोरा रंग आणि सौंदर्य याने तो पार वेडा झाला होता जसा तू झाला होतास."

हे बोलून कल्पना हसली. अरविंद ने चमकून तिच्याकडे बघीतलं.

" कल्पना मी तू गोरी आहेस, सुंदर आहेस म्हणुन तुझ्या मागे नव्हतो मी. हे तुलाही माहिती आहे." बोलताना अर्विंदाचा स्वर दुखावला होता.

" त्याचा उपयोग झाला का?" कल्पनेच्या मनातील रागाणे फणा वर काढला.

"मी सुद्धा काही करू शकलो नाही. तू हुशार होतीस म्हणून तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचं मनात होतं पण ….."

अरविंदाच्या आवाजात खंत होती.

"तुझी खूप वाट बघीतली. तू साधा निरोप पाठवला नाहीस. मी माझ्या घरच्यांना तुझ्या बाबतीत काय सांगणार होते?" कल्पना म्हणाली.

" म्हणजे ? नीलूने तुला माझं पत्र दिलं नाही?"

अरविंदाच्या आवाजात आणि चेहे-या वर आश्चर्य होतं.

"नाही. ती माझ्या लग्नाला पण आली नव्हती." कल्पनचा चेहरा निर्विकार होता.

"तरीच…मला नीलुचं वागणं खटकत होतं. पण त्यामागचं कारण कळत नव्हतं."

"तुला का नीलूचं वागणं खटकत होतं?" कल्पना

" ती मला सारखं म्हणायची कल्पना येणार नाही. तिने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे." अरविंद

" मी कुठे जाणार होते?" कल्पना संभ्रमात पडली.

"आपण पळून जाऊन लग्न करू असं लिहिलेलं पत्र तुला द्यायला निलू जवळ दिलं होतं. तू तयार असलीस तर किती तारखेला आणि कुठे भेटायचं तेही मी त्या पत्रात लिहिलं होतं." अरविंद म्हणाला.

" मला तुझं कुठलही पत्र दिलं नाही निलूने."
कल्पना म्हणाली.


" ती त्या दिवशी माझ्यासमोर ते पत्र घेऊन तुझ्या घरात शिरली हे मी तुझ्या घराच्या बाहेर असलेल्या झाडाआड लपून बघीतले."
अरविंद म्हणाला.

" एक दिवस… हं…आठवतय मला निलू खूप वेळ माझ्या घरी बसली होती. सगळ्यां गप्पा झाल्या. तुझ्याविषयी मी तिला कितीदा विचारलं. तिने काहीच सांगितलं नाही. तू तिला भेटला हे पण नाही सांगितलं तसच त्या पत्रबद्दलही तिने काही नाही सांगितलं. "

" नीलुने मुद्दाम हा डाव खेळला हे आता माझ्या लक्षात येतंय." अरविंद रागाने म्हणाला.


" नीलू का डाव खेळली असेल?" कल्पनेने काहीच न उमगून विचारलं.


"मला इतकी वर्ष असा संशय आला नाही आज वाटतंय निलुने माझ्याबरोबर डाव खेळला.मला मूर्ख बनवलं." अरविंद


" मला नाही वाटत नीलूने असं काही केलं असेल." कल्पनेचा आपली मैत्रीण निलूवर फार विश्वास होता.


" केलंय…." अरविंद जोरात ओरडला.

तसं त्या दोघांच्या अवती भवती फिरणारी भुतं म्हणजे कपसासारखे दिसणारे पांढरे पुंजके क्षणभर थांबून अचंबित होऊन कल्पना आणि अरविंद कडे बघू लागले. त्यामुळे दोघंही गोंधळली.

"ए अरविंद केवढ्यांदा ओरडलास? बघ सगळे कसे बघताहेत आपल्याकडे…."

" दाखवतोय आता एकेकाला.भूतयोनीत आले तरी लोकांच्या आयुष्यात दखल देण्याची मनुष्य योनीतील वाईट सवय गेलेली नाही." असं म्हणून

अरविंदचा पुंजका बाकी पुंजक्यांवर धाऊन गेला. तसे भरभर सगळे पळाले.

"नीलू कशाला डाव खेळेल? ती माझी चांगली मैत्रीण होती." कल्पना पुन्हा म्हणाली.

"तुला कळलंच नाही कधी नीलू कशी आहे. मी त्या दिवशी कॉलेजच्या स्नेह संमेलनात इतक्या खाणा खुणा करून तुला सांगायचा प्रयत्न केला की तू खूप सुंदर दिसते आहेस. तू लव्हेंडर कलरची साडी नेसली होतीस त्यावर खड्यांचं गळ्यात, कानात घातलं होतस. एका हातात टाॅप घड्याळ घातलं होतस आणि दुस-या हातात मस्त खड्यांचं ब्रेसलेट घातलं होतं. काय भारी दिसत होतीस. पण मी काय सांगत होतो ते तुला समजलंच नाही."

" मी कोणती साडी नेसले होते, गळ्यात काय घातलं होतं मला नाही आठवत. तुला बरं आठवतंय?" कल्पना

" माझ्या मनाची तार अशी छेडली होतीस नं तू… की वा…!" अरविंद अजूनही त्याच धुंदीत होता.

"मग तोंड उचकटून सांगायचं न…! मला नाही कळत अश्या खाणा खुणा."

"कसं तोंड उचकटून सांगणार होतो…? बाकी मित्र मैत्रीणी होत्या. किती बधीर आहेस ग तू." अरविंद चिडला.

"मी बधीर…! तू तर पुचाट आहेस. तू पुचाट नसतास तर आपलं लग्न झालं असतं." कल्पना

" तुला मी आवडतो हे मल आधी कळलं असतं तर मी तोंड उचकटलं असतं.कधीच तुझ्या घरी आलो असतो." अरविंद

" असू दे आता डींग्या मारून काय उपयोग? आता तर भूत झालोय आपण."

" भूत झालो तरी काय झालं? प्रेमात डुंबु शकतो. आता तर कोणीच नाही आपल्याला अडवायला. ती नीलुपण नाही." अरविंद जोरात हसू लागला.

पुन्हा ते पांढरे पुंजके अरविंद कडे बघु लागले.

" ए जरा हळू हंस नं.काय मेली ही भूत पांढ-या पुंजक्या सारखी. शी:" कल्पनेने तोंड वाकडं केलं.

" ए बधीर आपणही पांढरे पुंजकेच दिसतो." अरविंद

" मला पुन्हा बधीर म्हणालास." कल्पना


"मग काय म्हणू? तू मला सारखी सारखी पुचाट म्हणते ते चालत?" अरविंद

" बरं झालं बाई आपलं लग्नं नाही झालं " कल्पना

" का? असं का वाटतं तुला?" अरविंद

" भांडत बसलो असतो आयुष्यभर." कल्पना

" मनुष्य योनीतील जाऊ दे. या भूत योनीत पण भांडतेस." अरविंद

"वागतोसच तू तसा. मला राग येण्यासारखा." कल्पना

" मी काय केलं आता?" अरविंदला प्रश्न पडला.

" आता नाही काही केलं. काॅलेजमध्ये असताना करायचा." कल्पना

" काॅलेज मध्ये मी कधी त्रास दिला तुला? तू बोलायचीस तरी का माझ्याशी त्रास द्यायला." अरविंद

" तुझ्याकडे बघायचे नं सारखी. ते नाही कळलं तुला?" कल्पना

" तू माझ्याकडे बघीतले की माझ्या अंगावर रोमांच उठायचे ग. मनातून इतकं छान वाटायचं. मनात गिटार वाजायची.पण तू बोलायची नाहीस."
अरविंद

" येडछाप एकदा तर बोलून बघायचं." कल्पना

" मला कसं कळणार? " अरविंद

" काय?" कल्पना

" तुझ्याशी बोलावं." अरविंद

" मुली तोंडाने बोलत नाही." कल्पना

" मग कशा बोलतात?" अरविंद


" मुली डोळ्यातून सांगतात.तुला माझ्या डोळ्यांची भाषा कळली नाही त्याला मी काय करू?" कल्पना

" डोळ्यांची भाषा हा विषय असता नं जर काॅलेजमध्ये तर मला नक्की कळली असती तुझ्या डोळ्यांची भाषा. मला नाही कळली डोळ्यांची भाषा तर तू सांगायचं नं!" अरविंद

" सांगीतलं नं तुला मुली आपलं प्रेम स्वतःहून व्यक्त करत नाही. तू सिनेमे बघायचा नाही का?" कल्पना

" सिनेमा! हो बघायचो.त्याचं काय इथे? अरविंद

"शहारूखचा सिनेमा दिलवाले दुल्हनियाँ बघीतला?" कल्पना

" बघीतला." अरविंद

" देवा ! तरी तुला कळलं नाही.ती काजोल सांगते का आपणहून शहारूखला \"मै तुमसे प्यार करती हूं \"असं? सांग नं?" कल्पना

" अगं पण तू काजोल कुठे आहेस? काजोलला म्हटलं असतं मी." अरविंद

" देऊ का एक दणका?" कल्पना

यावर अरविंद खो खो हसला.
________________________
क्रमशः अधुरी प्रेम कहाणी

कल्पना आणि अरविंद यांच्या काॅलेजमधील प्रेमाचे रंग कसे बहरले वाचू पुढील भागात.

लेखिका…मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all