अधुरी प्रेम कहाणी भाग ५

एक प्रेम कथा


अधुरी प्रेम कहाणी भाग ५
मागील भागावरून पुढे…

"कल्पना आज आपण ज्या बगीच्यात सगळे भेटायचो जिथे जायचं?" अरविंद ने विचारलं.

" ए…काय मस्त कल्पना आहे तुझी.!"

" कल्पना नावाच्या मुलीबरोबर राहून मला खूप छान छान कल्पना सुचायला लागल्या आहेत." अरविंद हसत म्हणाला.

" ए…पीजे कसला मारतो. खरच खूप मजा येईल. जाऊया.तिथपर्यंत रेंज असेल नं?" कल्पना

"आपण कुठे मोबाईल वापरतो आहे?" अरविंद

"मोबाईलची रेंज नाही म्हणतंय.आपली रेंज आहे का?" कल्पना

" म्हणजे?"अरविंद

"म्हणजे आपण तिथपर्यंत जाऊन शकतो का?" कल्पना

" हो. भूतं कुठेही जाऊ शकतात."अरविंद

" मग चल लवकर.वेळ नको घालवू.तू फार चेंगट मुलगा आहेस." कल्पना


" झालं पुन्हा सुरू? जागा मी सुचवली नं?"
अरविंद

" हो." कल्पना

" न भांडता चलणार असशील तर चल." अरविंद

कल्पना आणि अरविंद नावाचे दोन पांढरे पुंजके अतिऊत्साहाने आणि घाईघाईने चालत पृथ्वीतलावरच्या त्या बगीच्यापाशी आले.या बगीच्यात कल्पना आणि अरविंदचे सगळे मित्र मैत्रिणी जमायचे. खूप धमाल करायचे.

बगीच्याजवळ येताच अरविंद म्हणाला,

" कल्पना माझे हार्टबिट्स वाढले." अरविंद

" का?" कल्पना

"अगं आपले जुने दिवस आठवले. सगळ्यांमध्ये असून आपले डोळे एकमेकां मधेच गुंतलेले असायचे." अरविंद

" इश्श…" कल्पना लाजली.

"आत्ता पण काय छान लागलीस ग!" अरविंदचा आवाज प्रेमाने उत्तेजीत झाला.

" अरविंद ते बघ दोघं कसे मस्त बोलतात आहे. ऐकायच का ते काय बोलतात आहे?" कल्पना

"ए…दुस-यांचं बोलणं चोरून ऐकायचं नसतं." अरविंद म्हणाला.

"ए तो नियम जीवंत माणसांसाठी असतो. आपल्यासाठी नाही. चल लवकर." कल्पना म्हणाली.

एका बाकावर दोघं तरूण प्रेमी बसले होते.
कल्पना आणि अरविंद त्यांच्या बाजूला जाऊन उभे राहीले आणि त्यांचं बोलणं ऐकू लागले.

" रागीणी तू कधी सांगणार आहेस तुझ्या आईबाबांना?" जयदीप ने विचारलं.

" जयदीप मला नोकरी मिळाली आहे. तुला जेव्हा नोकरी मिळेल तेव्हा मी घरी सांगू शकेन." रागीणी म्हणाली.

" काय करू ग? खूप प्रयत्न करतोय पण नोकरी मिळत नाही."

जयदीपचा चेहरा रडवेला झाला ते बघून कल्पना आणि अरविंद दोघांचे चेहरे उतरले.

"मी काय म्हणते जयदीप तू छोटीशी तरी नोकरी बघ." रागीणी

" अगं मी इंजिनियर आहे मी छोटी नोकरी कशी करू? जयदीप

" जयदीप मला तुझं मन कळतंय पण छोट्या नोकरी निमित्त तू जरा चार लोकांमध्ये मिसळशील. तुझ्या ओळखी होतील. ओळखीने तुला दुसरी नोकरी मिळू शकते .तू फक्त नोकरी शोधत घरातच बसून राहिलास तर निराश होशील. तसं झालं तर काय उपयोग?" रागीणी जयदीपला समजावणीच्या सुरात म्हणाली.

" तू म्हणतेस ते बरोबर आहे मी करून बघतो." जयदीप

" आजच मला एक जाहिरात कळली आहे.
रागीणी म्हणाली.

"कुठली?" जयदीप ने विचारलं.

रागणीने मोबाईल वरची जाहिरात जयदीपला दाखवली.

"यांची एक छोटी कंपनी आहे पण त्यांना कम्प्युटरवर सगळं अकाऊंटस् बघणारा माणूस हवा आहे. तू आयटी इंजिनियर आहेस. तुला जरी अकाउंट मधलं काही कळत नसलं तरी थोडं फार ट्रेनिंगने जमेल. तू हिम्मत दाखव. अश्या छोट्या कंपनीमध्ये मोठ्या कंपन्यां सारखे मोठे ट्रांजेक्शन नसतात. कळलं का?" रागीणी

" हो. विचार करतो." जयदीप म्हणाला.

" फक्त विचार नको करूस जा इंटरव्ह्यूला. हे बघ उद्याच त्यांनी वॉकिंन इंटरव्ह्यू ठेवला आहे. तू सकाळी बरोबर दहा वाजता पोहच तिथे. स्वतःची सगळी कागदपत्र घेऊन जा आणि कॉन्फिडंटली बोल. तुला छोटीशी जरी नोकरी मिळाली तरी मी माझ्या आईवडिलांना लग्नासाठी तयार करू शकेन."


हे सगळं ऐकल्यावर अरविंद कल्पनाला म्हणाला

,"कल्पना उद्या हा जयदीप कुठे इंटरव्ह्यू द्यायला जातो बघू. तिथे याचं सिलेक्शन झालंच पाहिजे. आपण त्याची मदत करायला हवी." अरविंद म्हणाला.

"हो खरंच आपण यांची मदत करू.पण कसं?"

कल्पनाला अरविंद नेमकं काय करणार कळलं नाही.

" ऊद्या बघ." अरविंद म्हणाला.

थोड्यावेळाने जयदीप आणि रागीणी बेंचवरून उठले आणि बगीच्या बाहेर आले.
रागीणीने जयदीपला शुभेच्छा दिल्या नंतर आपल्या गाडीवरून घरी गेली. तिच्यानंतर जयदीप पण निघाला. त्याच्या मागोमाग अरविंद आणि कल्पना नावाचे पांढरे पुंजकेपण निघाले.

****

दुसरा दिवस उजाडला. जयदीप रागीणीने सांगीतलेल्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जाण्याची तयारी करू लागला.

जयदीपच्या आसपासच पण त्याच्या घराबाहेर अरविंद आणि कल्पना उभे होते.

" अरविंद तू काय करणार आहेस ते तरी सांग?" कल्पना ने न राहवून विचारलं.

" तुला सरप्राईज दिलेलं आवडत नाही का?"
कल्पना

"इथे कसलं सरप्राईज देणार आहे?" अरविंद

" बघ तू…ज…रा धीर नसतो बाॅ तुम्हा बायकांना…!"अरविंद जरा चिडलाच.

" ए …पुन्हा बायकांना का बोलतोस? माझ्या जागी तू असतास तर तूही विचारलं असतं. कळलं…?" कल्पना

" नाही नं मी बाईच्या जागी मग कसं विचारीन?" अरविंद

कल्पना रागाने अरविंद ला काही बोलणार तोच अरविंद म्हणाला

" ए गप.जयदीप निघतोय.त्याच्या मागेमागे जायला हवं." अरविंद म्हणाला.

जयदीप घराबाहेर पडला आणि बाईक सुरु करून इंटरव्ह्यू जिथे आहे तिथे जायला निघाला. त्याच्या मागे आपले दोन पांढरे पुंजके पण तुरूतुरू निघाले.

****

जयदीप इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहचला. बाईक पार्क करून आपली फाईल ठेवलेली सॅक सांभाळत त्या कंपनीच्या हाॅलमध्ये शिरला.

आत शिरल्यावर अरविंद कल्पनाला म्हणतो.

"जयदीप जेव्हा आत इंटरव्ह्यू द्यायला जाईल तेव्हा मी इंटरव्ह्यू घेणा-या मनात कोणता प्रश्न आहे ते बघीन त्या प्रश्नाचं त्याला कोणतं उत्तर अपेक्षित आहे हे बघीन आणि तुला सांगीन. तू तेच उत्तर जयदीप कडून वदवून घ्यायचं."

" कसं?" कल्पना ने विचारलं

"तू जयदीपच्या जीभेवर बसायचं. त्याची जीभ वळवून मी जे उत्तर सांगेन तेच त्यांच्याकडून वदवून घ्यायचं."

" मी? " कल्पना

" हो.तू." अरविंद

" मी त्याच्या जीभेवर मावेन का?" कल्पना ने शंका काढली.

" अगं आपण आता भूतं आहोत. आता आपण खूप सुक्ष्म किंवा खूप वजनदार आकार घेऊ शकतो. भूतांना हे करता येतं. तू आता भूत असल्याने तुझं एवढं वजन नाही. त्याच्या जीभेवर सहज बसू शकशील. मी जे सांगतोय ते लक्षात ठेव. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला सांगीन तेवढी सगळी त्यांच्याकडून वदवून घे.आता कळलं तुला सरप्राईज काय आहे?" अरविंद

"ए भारी सरप्राईज आहे. काय मजा येईल. कधी जाईल हा आत?" कल्पना

" आत्ता तर आला आहे. त्याचं नाव पुकारलं की तो आत जाईल. तू वेंधळ्यासारखी इकडे तिकडे बघत बसू नको." अरविंद म्हणाला.

" मी वेंधळी का? तू बघू किती चतुराईने त्या इंटरव्यू घेणा-याच्या मनातील प्रश्न ओळखतो ते. मला बोलत असतो सारखा." कल्पना कातावून बोलली.

" सारखी भांडते." अरविंद

" मी भांडण सुरू केलं का?" कल्पना

" ए जरा वेळ गप बस. सगळे किती टेन्शन मध्ये आहेत बघ." अरविंद

"सगळ्यांना भीती वाटत असेल रे. नोकरी कोणाला मिळेल हाच प्रश्न असेल सगळ्यांच्या मनात." कल्पना

"आपण आज जयदीपला नोकरी मिळवूनच द्यायची. ही नोकरी जयदीपला मिळाली तर यांच्या लग्नाची गाडी पुढे जाईल." अरविंद म्हणाला.

"हो. आपली गाडी लग्नापर्यंत पोचलीच नाही. यांची पोचायलाच हवी." कल्पना ठासून म्हणाली.

***

जयदीपचं नाव पुकारल्या गेलं. त्याच्यामागे अरविंद आणि कल्पना दोघेही आत गेले.

जयदीप ला समोरच्या माणसाने बसायला सांगितले. जयदीप खुर्चीवर बसला. त्याने आपली फाईल समोरच्या माणसाकडे सरकवली.

अरविंद इंटरव्ह्यू घेणा-या माणसाच्या जवळ चिकटून उभा राहिला. अरविंद ला इंटरव्ह्यू घेणा-याच्या मनातील स्पंदन स्पष्टपणे कळत होती. कल्पना जयदीपच्या जीभेवर जाऊन बसली.

जयदीपची सगळी फाईल त्या समोरच्या माणसाने चाळले आणि प्रश्न केला,

"तुम्ही इंजीनीयर आहात एवढ्या छोट्या पोस्टसाठी तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलात."

इंटरव्ह्यू घेणा-याने जयदीपचे इंजीनियरिंग चे मार्कं बघून आश्चर्याने विचारलं.


" सर कोणतही काम छोटं नसतं. काम हे काम असतं. "

जयदीप म्हणाला. इंटरव्ह्यू घेणारा पहिल्या प्रश्नावर जयदीपने दिलेल्या उत्तराने खूष झाला.

जयदीपच्या जीभेवर बसलेल्या कल्पना ने अरविंदने सांगीतल्याप्रमाणे जयदीपची जीभ वळवली.

इंटरव्ह्यू घेणा-याने प्रश्न केला.

"जास्त चांगली नोकरी मिळाली तर तुम्ही लगेच सोडून जाऊ शकता कारण तुम्ही इंजीनियर आहात.तुम्ही अचानक सोडून गेल्यावर आम्ही काय करायचं? पुन्हा आम्हाला दुसरा माणूस शोधावा लागणार. "


"सर असं नाही होणार. मी इंजीनीयर असलो तरी तुमची गैरसोय करून दुसरीकडे नोकरीसाठी जाईन इतका कृतघ्नपणा मी करणार नाही." जयदीप म्हणाला.

इंटरव्ह्यू घेणा-याचं समाधान झालं.त्याने म्हटलं,

" आम्ही पगार पंचवीस हजार देऊ शकू."

" मान्य आहे मला. माझं काम बघून तुमची इच्छा असेल तसा माझा पगार वाढवा." जयदीप म्हणाला.

"ठीक आहे मग कधी जाॅईन होताय?" इंटरव्ह्यू घेणा-याने विचारलं.

" आजपासून सुद्धा होऊ शकतो." जयदीप म्हणाला.

"गुड. ऊद्यापासून जाॅईन व्हा. जरा वेळ बाहेर बसा तुमचं अपाॅंइटमेंट लेटर घेऊन जा."

असं म्हणून इंटरव्यू घेणा-याने जयदीप ला शेकहॅंड करण्यासाठी हात पुढे केला आणि म्हणाला,

" आमच्या कंपनीत तुमचं स्वागत आहे." जयदीप ने पण शेकहॅंड केला.

जयदीप केबीन बाहेर पडण्यापूर्वीच कल्पना जयदीपच्या जीभेवरुन खाली उतरली होती.

जयदीप अपाॅंइटमेंट लेटरची वाट बघत हाॅलमध्ये बसला. त्याला आपण प्रश्नांची काय उत्तरं दिली तेच आठवत नव्हतं कारण उत्तरं अरविंदने सांगीतल्याप्रमाणे कल्पना ने जयदीपची जीभ वळवून वदवून घेतली होती. त्यामुळे जयदीपला ते आठवत नव्हतं.

जयदीप ने रागीणीला फोन लावला.

"हॅलो…गेलास का इंटरव्ह्यू द्यायला?"

रागीणीने विचारलं कारण तिला जयदीप इंटरव्ह्यू द्यायला जाईल असं वाटलं नव्हतं.

" रागीणी मला हा जाॅब मिळाला." जयदीप आनंदाने म्हणाला.


" काय सांगतोस? अभिनंदन.संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेटू तेव्हा बोलू."

" हो.रागीणी मी खूप खूष आहे." जयदीप

" मी पण…फोन ठेवते.समोर साहेब आहेत." रागीणी

" हो ठेव." जयदीप म्हणाला

अरविंद आणि कल्पना पण खूप खूष झाले.

" कल्पना आपलं मिशन यशस्वी झालं." अरविंद

" हो. अरे खूप मजा आली जयदीप ला मदत करताना. आता कोणाला मदत करायची?" कल्पना ने विचारलं

"ऊद्या बघू कोण अडचणीत सापडलय. त्याला मदत करू. आता चल." अरविंद म्हणाला

"हो" कल्पना म्हणाली.

अरविंद आणि कल्पना दोघेही खूप आनंदाने तरंगत वरवर जिथे लागले.

___________________________
क्रमशः अरविंद आणि कल्पना आता कोणाला मदत करतील? बघू पुढील भागात.
लेखिका…मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all